कोंडगाव-साखरपा हीच तर जुनी पेठ इभ्रामपूर! (Historical Reference of Kondgoan- Sakharpa)

10
36

काजळी नदी

साखरपा आणि कोंडगाव ह्या दोन्ही गावांचा उल्लेख साधारणत: एकत्रच केला जातो. ती दोन्ही गावे एकमेकांना लागून, जुळ्या भावांसारखी आहेत. ती गावे गड व काजळी या दोन नद्यांच्या संगमावरवसलेली आहेत. त्या नद्यांचासंगम साखरपा गावाच्या टोकाशी होतो. गड ही नदी विशाळगडाच्या पायथ्यापासून येते, तर काजळी नदीआंबा घाटातून उतरते. त्यामुळे निसर्गाचा मुक्त आशीर्वाद साखरपा आणि कोंडगाव या दोन्ही गावांना लाभला आहे. पश्चिम महाराष्ट्रातून कोकणच्यारत्नागिरीजिल्ह्यात येताना आंबा घाट उतरावा लागतो. तो घाट उतरला, की पहिले शहरवजा गाव लागते तेच साखरपा. तेथूनच गड व काजळी या दोन्ही नद्यांची एकत्र काजळी नदी होते. ती पुढे वाहत जाऊन रत्नागिरीच्या भाटये किनार्‍यावर अरबी समुद्रालामिळते. त्याच काजळी नदीच्या काठावर कोंडगावही वसले आहे.

जुगाईदेवी मंदिर साखरपा

साखरपा व कोंडगाव ही दोन्ही गावे महसुली दृष्ट्या वेगवेगळी आहेत. दोन्ही गावांच्या नोंदी कागदोपत्री स्वतंत्र आहेत. मात्र त्यांचा उल्लेख एकत्रच केला जातो आणि प्रमुख बाजारपेठेसारखेव्यवहार दोन्ही गावांचे एकच आहेत. बाजारपेठेचा रस्ता साखरपा गावातून सुरू होतो आणि कोंडगावात संपतो. दोन्ही गावांच्यानावांची व्युत्पत्ती माहीत नाहीच, पण गावांच्या नावांना आख्यायिका असल्याचेही कळून येत नाही. कोंडगाव ह्या नावाबद्दल काही अंदाज बांधला जातो. त्या गावाच्या चारही बाजूंना डोंगर आहेत. डोंगरांच्यामध्ये असलेल्या जागेला कोकणात कोंड म्हणतात. कोकणात अनेक गावांमध्ये काही भागएखादी वाडी या अशा कोंडात वसलेल्या असतात. उदाहरणार्थ दाभोळे कोंडदेवळे कोंडकनकाडीकोंड. तशा कोंडात वसलेले गाव म्हणून कोंडगाव असा तर्क बांधला जातो. मात्र कोंडात आख्खे गाव वसले असण्याचे संगमेश्वरतालुक्यातील कोंडगाव हे एकमेव उदाहरण.

इतिहासप्रसिद्ध विशाळगडाचा पायथा हा साखरपा-कोंडगावपासून अकरा किलोमीटर अंतरावर आहे. पायथ्याचे गाव देवडे. पण विशाळगडाची ती मागील बाजू. त्यामुळे तेथून गडावर जाण्यास योग्य वाट नाही. गडावर आंबा घाटातून आंबा गाव पार करून जावे लागते. मात्र गडावर उत्सव असला की देवडेभोवडेकिरबेट ह्या गावांतील उत्साही लोक तेवढे त्या मागील पायवाटेने जातात.

इब्राहीम आदिलशाह दुसरा

साखरपा-कोंडगाव यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी मोठी आहे. विजापूरचा इब्राहीम आदिलशाह दुसरा ह्याने कोंडगावात पेठ इभ्रामपूर ही व्यापारी पेठ वसवली होती. (मूळ नाव अब्दुल मुजफ्फर इब्राहीम आदिलशहा जगतगुरु बादशाह – अजपूजा श्री सरस्वती) आदिलशहाने रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी गावात काजळी नदीच्या काठी जंगल साफ करून तेथे व्यापारासाठी बंदराची निर्मिती केली होती. त्या बंदराला नाव दिले इब्राहीमपट्टण. त्या बंदरातील मालाला उतारपेठ हवी म्हणून साखरपा-कोंडगाव यांच्यासह भडकंबा आणि पुर्ये हा भाग एकत्र करून पेठ इभ्रामपूर ही नवीन वसाहत निर्माण केली होती. ती पेठ त्या वसाहतीत देवरूख आणि प्रभानवल्ली येथील वाणीसोनार जमातीतील व्यापारी आणून वाढवली. बादशहाने इभ्रामपूर येथील व्यापार चालावा ह्यासाठी कुलकर्णी, पोतदार, शेट्ये, महाजन ही अधिकारपदेही निर्माण केली. ती भली मोठी पेठ महसुली सोयीसाठी ब्रिटिश काळात साखरपाकोंडगावपुर्येभडकंबा अशा गावांत विभागली गेली.

दुसरा संदर्भ म्हणजे औरंगजेबाचा मुलगा अकबर दुसरा याने बादशहाविरुद्ध बंड केल्यावर तो दिल्लीहून पळून महाराष्ट्रात आला आणि त्याने 1681 च्या आसपास साखरपा येथे वर्षभर वास्तव्य केले होते.

तिसरा संदर्भ आहे तो दुसरे बाजीराव पेशवे यांचा. पेशवे कोकणात 1811 च्या आसपास आले होते. त्यावेळी पेशव्यांनी विशाळगडचे श्रीमंत भगवंतराव तथा आप्पासाहेब पंतप्रतिनिधी यांच्याबरोबर साखरपा गावाला भेट दिली होती. पेशव्यांनी पंतप्रतिनिधींचा सत्कार त्या भेटीदरम्यान केला होता. विशाळगडाची एक चौकी साखरपा-कोंडगाव येथे होती. गडावरील सैन्याने असंतोषातून 1843 साली बंड केले आणि त्यात ती चौकी जळाली.

गद्धेगळ

 

साखरपा आणि कोंडगाव यांच्या सीमेवर गडदू म्हणजेच गद्धेगळ आहे. गद्धेगळ हा शब्द गाढवाचा दगड ह्या अर्थी आला. त्याचा अपभ्रंश होऊन तो गडदू असा प्रचलित झाला. तो गडदू बाराव्या ते चौदाव्या शतकातील आहे. ती शिळा साधारण चार फूट उंच आणि दोन फूट रुंद अशी आहे. त्यांतील खालचा एक फूटाचा भाग जमिनीत गाडलेल्या अवस्थेत आहे. गावाचे उत्पन्न किंवा जमीन दान एखाद्या किल्ल्यासाठी किंवा मंदिरासाठी दिले तर तशा जमिनीवर गडदू ठेवण्याची पद्धत होती. त्या शिलेवर चंद्रसूर्यगाढव आणि मानवाकृती कोरण्यात आल्या आहेत. गडदुवरील लेखन पुसले गेले आहे. मात्र चार शब्द कोरलेले दिसतात. त्यांपैकी श्रीमात्रागम, निपुत्रीकमाक आणि चुत हे तीन शब्द आहेत. त्यांचा अर्थ काय किंवा तेच ते शब्द नेमके आहेत ना हे सांगणे कठीण आहे. कोरलेल्या चित्रांचा अर्थ राजवाडे यांनी सांगितला आहे. चंद्र, सूर्य यांचा अर्थ जे दान देण्यात आले आहे ते आकाशात चंद्र, सूर्य असेपर्यंत चिरकाळ राहो असा होतो. तर गाढव आणि मनुष्याकृती ही संकर आकारात दाखवण्याचा अर्थ जो ह्या दानाला विरोध करेल त्याचा संकर गाढवाशी होईल अशा अर्थाचा अपशब्द असावा असे राजवाडे यांनी लिहून ठेवले आहे.

कोंडगाव ग्रामदेवतेचे मंदिर

भडकंबा हे गाव साखरपा-कोंडगाव यांच्या बाजूला, नदीपलीकडे आहे. त्या गावात डोंगरावर छोटा किल्ला आहे. तो छोटा किल्ला विशाळगडाच्या प्रभावळीतील आहे. त्याला दुशाळगड असे संबोधले जाते. तो भग्नावस्थेत आहे – केवळ दगडांचा ढिगारासंगमेश्वर, देवरूख येथे असलेल्या प्रचीतगड आणि महिपतगड यांवरून विशाळगडावर जाणारी वाट साखरपा-कोंडगाव येथून जाते. त्यामुळे शत्रू त्या दिशेने आल्यास तो विशाळगडावर थेट पोचण्याआधी त्याला प्रतिकार दुशाळगडावरून केला जावा ह्या उद्देशाने तो गड बांधण्यात आला होता. त्याची बांधणी तुळाजी आंग्रे यांनी केली होती. किल्ल्यावर लढाईही झाली होती. विशाळगडावर श्रीमंत गंगाधर कृष्ण प्रतिनिधी यांचा अंमल होता. आंबा गावाजवळील मलकापूर गावात मुदागड नावाचा किल्ला होता. तो किल्ला तुळाजी आंग्रे यांनी ताब्यात घेऊन पन्हाळाविशाळगड परिसरात उपद्रव सुरू केला. आंग्रे यांना प्रतिकार करण्यासाठी प्रतिनिधींनी अडीच हजार सैनिकांसह मुदागडावर आक्रमण केले. पण त्यांना आंग्रे यांच्या सैन्यापुढे माघार घ्यावी लागली.

सावंतवाडी येथील सावंत यांचे आंग्रे यांच्याशी वैमनस्य होते. त्याचा फायदा घेण्यासाठी पंतप्रतिनिधींनी नारो रायाजी गोडे यांना सावंत यांच्याकडे पाठवून मदत मागितली. पंतप्रतिनिधीसावंत यांनी एकत्रित दहा हजार सैन्य घेऊन मुदागडाला वेढा घातला. आंग्रे यांनी पळ त्या वेढ्यातून कसाबसा काढला. गड नारो रायाजी गोडे यांनी ताब्यात घेऊन तो जमीनदोस्त केला. त्यानंतर तुळाजी आंग्रे यांनी साखरपा गावाला लागून असलेल्या दुशाळगडाची बांधणी केली. आंग्रे त्याच दुशाळगडावरून कोकणपट्टीचा महसूल वसूल करत असत. गड ताब्यात घेण्यासाठी रवळो महादेव सबनीस आणि बापूजी उद्धव कारखानीस हे सैन्य घेऊन आले तेव्हा आंग्रे यांनी साखरपा गावाच्या आसपास जाळपोळ सुरू केली. त्यामुळे जनता त्रस्त झाली. कालांतराने, जगजीवन परशराम प्रतिनिधी हे फौज घेऊन साखरपा येथे आले. त्या लढाईत आंग्रे यांनी पुन्हा पळ काढला. नारो रायाजी गोडे यांचे वंशज भडकांबा गावात राहतात. विशाळगडाच्या काही अधिकार्‍यांचे वंशज साखरपा-कोंडगाव परिसरात वास्तव्य करून आहेत. त्यात सुभेदार केतकरदिवाण केळकरपागे अभ्यंकरधर्माधिकारी, रेमाणे; तसेच, आठल्ये, गद्रेपुरोहित यांचा समावेश होतो.

गढी

कोंडगावमध्ये काजळी नदीच्या किनार्‍यावर चौथरा आहे. तो चौथरा गढीह्या नावाने ओळखला जातो. तेथून माचाळ ह्या ठिकाणी निशाणे दाखवून संदेश पाठवले जात असत. माचाळ हा विशाळगडाचा एक बुरूज होता. कोंडगावचा आणखी एक संदर्भ थेट विनोबा भावे यांच्याशी जातो. विनोबांनीभूदान चळवळ सुरू केली आणि गावागावातून त्यांना प्रतिसाद मिळाला. कोंडगावातही तशीच एक जमीन ही विनोबांच्याभूदान चळवळीला दान देण्यात आली होती. गावातील ग्रामस्थ खंडू केतकर आणि त्यांचे पूर्वज यांची ती जमीन. कोंडगावातून बाहेर पडले की एक चौक लागतो. एक रस्ता रत्नागिरीला आणि दुसरा देवरूखला जातो. ती जमीन त्या वळणात आहे. कालांतराने, भूदान चळवळ थंडावली. जमीन तशीच पडून राहिली. तिचा सदुपयोग झाला नाही अशी खंत खंडू केतकर व्यक्त करत असत.

शाळा

साखरपा-कोंडगाव शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध आहे. कोंडगावमधील ग्रामस्थ गोपाळ विठ्ठल केतकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून 3 मार्च 1869 ह्या दिवशी पहिली खाजगी शाळासुरू केली. त्या शाळेला 1885 साली शासनमान्यता मिळाली. ती शाळा जीवन शिक्षण विद्या मंदिर ह्या नावाने ओळखली जाते. शाळेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव 2019 मध्ये साजरा झाला. मुंबई येथील हिंद विद्यालयाचे संस्थापक परशुराम चिंतामण गद्रे यांनी शाळासुरू करून त्यातील काही वर्गांतून इंग्रजी शिकवण्याची सोय केली. ते मूळचे कोंडगाव येथील. ती शाळा रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय ह्या नावाने सुरू आहे. अनंत कबनूरकर हे मूळचे कबनूर गावाचे रहिवासी. गांधी हत्येनंतरच्या दंगलीत त्यांचे घर जाळण्यात आल्यावर ते अंगावरील कपड्यांनिशी साखरपा येथे आले. त्यांचे चिरंजीव श्रीधर आणि स्नुषा लीना कबनूरकर यांनी 2003 साली संपूर्ण इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आहे. त्याच शाळेत 2018 साली गुरुकुलही सुरू करण्यात आले आहे. कोंडगावचे ग्रामस्थ गंगाराम ऊर्फ आबासाहेब सावंत यांनी परिसरातील विद्यार्थ्यांची पदवी शिक्षणाची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाची स्थापना केली. कोकणरत्न हा पुरस्कार देण्यास प्रारंभ झाला तेव्हा पहिला पुरस्कार आबासाहेब सावंत यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. त्यांच्या पत्नी गीतांजली सावंत ह्या जिल्हा परिषद सदस्य होत्या.

साखरपा-कोंडगावमध्ये अद्ययावत प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. ते दहा हजार चौरस फूट आवारात आहे. कोंडगाव-साखरपा मिळून परिसरातील सात गावचे खोत असलेले भाऊसाहेब, बाबासाहेब व गुरुवर्य दादासाहेब सरदेशपांडे यांनी ती जमीन आरोग्य केंद्राला देणगी म्हणून 1961 साली दिली. आरोग्य केंद्राची जुनी इमारत पाडून त्याजागी आधुनिक इमारत बांधण्यात आली आहे.

सरदेशपांडे हे घराणे साखरप्याचे खोत म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनीच साखरप्याच्या जुन्या एसटी स्टँडला जागा 1938 साली देणगी म्हणून दिली होती. तेथे ग्रामपंचायतीकडून बहुद्देशीय सभागृह बांधण्यात येत आहे. कोंडगाव ग्रामपंचायतीची इमारत असलेली जागाही (सहा गुंठे) सरदेशपांडे यांनीच 1984 साली दान दिली आहे. मोडी लिपी अभ्यासक चैतन्य सरदेशपांडे हे कोंडगावचे रहिवासी आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाद्वारे घेण्यात आलेल्या मोडी लिपी परीक्षेत सरदेशपांडे यांनी राज्यातून द्वितीय क्रमांक मिळवत ते शासनमान्य मोडी लिपी भाषांतरकार ठरले आहेत. चैतन्य सरदेशपांडे यांनी साखरपा-कोंडगाव ह्या गावांच्या इतिहासाबाबत सोशल मीडियावर बरेच लेखन केले आहे.

राजापूर येथे स्थायिक झालेले आणि राजापूर हायस्कूलचे अध्यापक दत्तात्रय जगन्नाथ सरदेशपांडे हे मूळचे साखरपा-कोंडगावचे रहिवासी. त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना 1960 च्या दशकात राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. कोंडगाव येथील श्री दत्त सेवा संस्थानचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काही काळ काम केले. देवरूख येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थापनेतही त्यांचा सहभाग होता. साखरपा-कोंडगावमधील श्रीपाद शिवराम तथा बाबासाहेब सरदेशपांडे यांना कैसर-ए-हिंद हा किताब ताम्रपदक स्वरूपात मिळाला आहे. तो किताब ब्रिटिश राजघराण्यातर्फे विविध क्षेत्रांत भरीव कार्य करणार्‍या भारतीय लोकांना दिला जात असे. श्रीपाद यांनी स्वातंत्र्योत्तर काळात तो परत केला होता. प्रवीण नवाथे हे गावातील पहिले सरकारी वकील म्हणून तालुक्यात प्रसिद्ध आहेत.

धरण

श्री क्षेत्र मार्लेश्वरहे साखरपा-कोंडगाव पासून बत्तीस किलोमीटरवर आहे. साखरप्याची गिरजाईदेवी हिचा लग्नसोहळा देव मार्लेश्वरयांच्याबरोबर दर वर्षी संक्रांतीच्या दिवशी साजरा होतो. त्यासाठी गिरजाईदेवीची पालखी भाविक आणि मानकरी स्वत: खांद्यावरून चालत घेऊन जातात. तो विवाह सोहळा जिल्ह्यात पसिद्ध आहे. गावात दत्त, विठ्ठल, राम, गणपतीगिरजाई अशी मंदिरेआहेत.  मंदिरांमध्ये विविध उत्सव सातत्याने सुरू असतात. कोंडगावमध्ये जोयशीवाडी परिसरात 2005 साली धरण बांधण्यात आले. त्या धरणामुळे कोंडगाव परिसरातील अनेक वाड्यांचा उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा प्रश्न सुटला.

माहिती सहाय्य – चैतन्य सरदेशपांडे

अमित पंडित 9527108522

ameet293@gmail.com

अमित पंडित हे शिक्षक आहेत. ते  दैनिक सकाळमध्ये पत्रकारिताही करतात. त्यांची सात पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचे लेखन विविध वृत्तपत्रे व मासिकांमधून प्रसिद्ध होत असते.

—————————————————————————————————————————–

10 COMMENTS

  1. खूप सुंदर माहिती इतके वर्षे साखरपा कोंडगाव भडकंबा येते जाणे होते पूर्ण साखरपा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे हे पाहत आलो आहे.

  2. अमिताजी खुप महितिपूर्ण लेख आहेया लेखमुळे आपल्या गावची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल

  3. धन्यवाद…. खुप छान माहिती दिलीत सर त्या गावचा रहिवासी असूनही ही माहिती माहीत नव्हती. आपला गाव निसर्गाच्या विविधतेने नटलेला तर आहेच परंतू ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे हे आपल्या द्वारे कळले. Tase आपल्या साखरपा मध्ये काही विरगळी आहेत त्याबद्दल माहिती पाहिजे होती सर.

  4. धन्यवाद पंडित सर.खूप छान माहिती मिळाली तसेच अभिमानाने मान उंचावली कारण माझं गाव मुशि॔ साखरप्या पासून ३ कि.मी. वर आहे. असंच फोन वर संवाद साधुयाआपला नम्र,किरण भिऺगाडे॔.

  5. धन्यवाद जवळच्या कुणी अभिप्राय दिला की त्याचं महत्व वेगळच वाटतं. असाच एखादा लेख मुर्षी गावावरही लिहिता येईल . आपला संपर्क नंबर कळवावा

  6. एखाद्या गावची इतकी इत्यंभूत माहिती प्रथमच वाचनात आली. अत्यंत अभ्यासपूर्ण विस्तृत लेखन केले आहे. धन्यवाद पंडित सर 🙏