कै. अरूण साधू स्मृती पाठ्यवृत्ती योजना 2020-21 (Arun Sadhu Memorial Fellowship 2020-21)

1
28

‘अरूण साधू स्मृती पाठ्यवृत्ती योजना’ ह्यावर्षी अर्ज करण्याची अंतिम मुदत 18 ऑगस्ट 2020 आहे.

प्रसिद्ध लेखक कै. अरुण साधू यांच्या स्मरणार्थ एका तरुण पत्रकाराला अभ्यासासाठी दीड लाख पर्यंतची पाठ्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी तरुण मराठी भाषिक पत्रकारांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागामार्फत प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. पाठ्यवृत्तीलायक प्रस्तावाची निवड विद्यापीठातील प्राध्यापक व प्रतिष्ठित नागरिक यांच्या समितीमार्फत होईल.
ग्रंथाली, कै. साधू कुटुंबीय व मित्रमंडळ
आणि संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,
पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने
प्रख्यात लेखक, पत्रकार तसेच पत्रकारितेचे प्राध्यापक कै. अरूण साधू यांच्या स्मृत्यर्थ ग्रंथाली, व कै. साधू यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार, तसेच संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी तरूण पत्रकारांना संशोधन व सखोल वार्तांकनासाठी प्रोत्साहन व आर्थिक साह्य मिळावे यांसाठी ही पाठ्यवृत्ती योजना आखली आहे. दरवर्षी एकूण दीड लाख रूपयांची पाठ्यवृत्ती देण्यात येईल. यंदा पाठ्यवृत्तीचे तिसरे वर्ष आहे. मेघना ढोके याना 2018 तर दत्ता जाधव व मुक्ता चैतन्य यांना 2019 ची पाठ्यवृत्ती विभागून देण्यात आली. 2020-21 या वर्षासाठीच्या पाठ्यवृत्तीकरता पत्रकारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

कै. अरूण साधू स्मृती पाठ्यवृत्ती योजना 2020-21 नियमावली

1) पाठ्यवृत्तीसाठी पात्रता –
• मराठी भाषक पत्रकार (कार्यक्षेत्र अथवा वास्तव्य महाराष्ट्राबाहेर असेल तरी चालेल)
• 1 जुलै 2020 रोजी किमान 28 वर्षे पूर्ण ते कमाल 45 वर्षे पूर्ण यांदरम्यान असावे. (म्हणजेच 02 जुलै 1974 ते 3 जुलै 1992 यांदरम्यानचा जन्म हवा)
• कोणत्याही माध्यमात किमान तीन वर्षे पूर्ण वेळ पत्रकार म्हणून काम केलेले असावे.
अथवा
• मुक्त पत्रकार म्हणून किमान सहा वर्षे काम केलेले असावे.
• ज्या विषयाच्या किंवा घटनेसंबंधीच्या सखोल अभ्यासाचा प्रस्ताव असेल त्याविषयी किमान तीन लेख/श्राव्य कार्यक्रम/दृकश्राव्य कार्यक्रम प्रसिद्ध झालेले असावेत.
अथवा
• भिन्न विषयांसंबंधी किमान सहा लेख/श्राव्य कार्यक्रम/दृकश्राव्य कार्यक्रम प्रसिद्ध झालेले असावेत.
(टीप- वरील दोन्हीसाठी वेब माध्यमावरील कामही विचारात घेतले जाईल.)
2)  पाठ्यवृत्तीसाठी विषय –
• पत्रकार त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही विषयासंबंधी प्रस्ताव सादर करू शकतात.
• पत्रकारांना मार्गदर्शन व्हावे यासाठी काही विषयांची यादी पुढे देण्यात आली आहे. प्रस्ताव यादीतील किंवा यादीत नसलेल्या विषयासंबंधी असू शकतो.
o  राज्यात अलिकडे घडलेल्या महत्त्वाच्या गंभीर घटनेचा पाठपुरावा (उदा. विदर्भातील शेतकऱ्यांचा कीटकनाशकांमुळे मृत्यू)
o  सार्वत्रिक प्रश्नाचे प्रादेशिक किंवा स्थानिक पातळीवरील स्वरूप
o  राज्यव्यापी प्रश्नाचा व्यापक स्तरावरील अभ्यास
o  सामाजिक परिवर्तनासाठी कार्यरत असणारे परंतु आजवर सर्वस्वी अपरिचित उपक्रम, संस्था किंवा व्यक्ती यांचा सखोल चिकित्सक परिचय
o  सद्यकालीन पत्रकारितेतील महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास. (सार्वत्रिक किंवा राज्यव्यापी प्रश्नांमध्ये स्थलांतर, लिंगभेद, सामाजिक दुही, भ्रष्टाचार, मानसिक आरोग्य, प्रदूषण, अस्तंगत होत चाललेले उद्योग-व्यवसाय अशा असंख्य विषयांचा समावेश होऊ शकतो).
3) अर्ज करण्याची प्रक्रिया –
• प्रस्ताव फक्त इमेलद्वारे head.dcj@gmail.com या पत्त्यावर पाठवावेत.
• एकाच इमेलद्वारे खाली नमूद केलेल्या, टंकलिखित असलेल्या व पीडीएफ केलेल्या पाच स्वतंत्र फाइल्स जोडाव्यात. प्रत्येक फाइलच्या नावात अर्जदाराचे नाव व फाइलचा विषय स्पष्टपणे नमूद केलेला असावा. (उदा. अबक अल्पपिरचय.PDF, अबक जन्मदाखला.PDF, अबक प्रस्ताव. PDF इत्यादी)
1. पत्रकाराचा अल्पपरिचय
2. जन्मतारखेचा दाखला
3. अनुभव प्रमाणपत्र किंवा त्यासंबंधीची कागदपत्रे
4. पूर्वप्रकाशित लेखांच्या स्कॅन कॉपी. श्राव्य किंवा दृकश्राव्य कार्यक्रमांचा संदर्भ द्यायचा असल्यास त्यांच्या लिंक्स (संपूर्ण कार्यक्रम मेलने पाठवू नये)
5. प्रस्ताव (पुढीलप्रमाणे)
♦  प्रस्ताव सहाशे ते आठशे शब्दांचा असावा.
प्रस्तावात विषयाचे शीर्षक संबंधित विषयाची पार्श्वभूमी, पत्रकाराचा त्या किंवा तत्सम विषयातील पूर्व अभ्यास अथवा अनुभव; तसेच, विषयाचे महत्त्व सांगून प्रस्तावित अभ्यासपद्धत (मुलाखती, प्रत्यक्ष भेटी, निरीक्षण, दुय्यम माहितीस्रोत, आशय विश्लेषण, सर्वेक्षण इत्यादी) इत्यादींचा तपशील द्यावा.
4) निवडप्रक्रिया –
• टप्पा 1- अर्जांची प्राथमिक छाननी (वय, अनुभव, पूर्वलेखन इत्यादी) विभागप्रमुख व विभागातील अन्य एक शिक्षक यांच्या समितीमार्फत
• टप्पा 2- प्रस्तावांचे मूल्यमापन – विभागप्रमुख, विभागातील अन्य एक शिक्षक, विद्यापीठाच्या अन्य विभागांतील एक ज्येष्ठ प्राध्यापक, साधू परिवाराचे एक प्रतिनिधी व समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या समितीमार्फत
• टप्पा 3- सर्वोत्तम चार प्रस्ताव सादर करणाऱ्या पत्रकारांच्या, वरील समितीतर्फे प्रत्यक्ष मुलाखती
• प्रस्तावित विषयाची व्याप्ती, समर्पकता, महत्त्व इत्यादींचे मूल्यमापन करून समिती पूर्ण रकमेची एका व्यक्तीला पाठ्यवृत्ती द्यायची की दोघांना विभागून द्यायची ते ठरवेल.
• सदर समितीचा निर्णय अंतिम असेल,
5) पाठ्यवृत्तीची रक्कम तीन समान टप्प्यांत पुढीलप्रमाणे धनादेशाद्वारे ‘ग्रंथाली’च्या वतीने विभागामार्फत अदा केली जाईल.
• पाठ्यवृत्तीच्या घोषणेच्या वेळी – 35 टक्के,
• सहा महिन्यांत झालेल्या कामाचा अहवाल सादर केल्यावर व समितीने तो संमत केल्यावर  35 टक्के, (अंदाजे पुढील वर्षीच्या मार्च अखेरीस)
• अंतिम वृत्तांत सादर केल्यावर व समितीने तो संमत केल्यावर 30 टक्के (अंदाजे पुढील वर्षीच्या ऑगस्टअखेरीस)
6) अंतिम वृत्तांत
पाठ्यवृत्तीप्राप्त पत्रकाराच्या/पत्रकारांच्या नावाची घोषणा करण्यासाठी दरवर्षी 25 सप्टेंबरच्या सुमाराला अरूण साधू स्मृती व्याख्यान आयोजित करण्यात येईल.
7) पाठ्यवृत्तीधारकांनी अभ्यासाचा मराठीतून लिहिलेला अंतिम वृत्तांत टंकलिखित स्वरूपात सादर करावा. तो किमान आठ ते दहा हजार शब्दांचा असावा. वृत्तांताचा रूपबंध ठरवण्याचे स्वातंत्र्य पाठ्यवृत्तीधारकाला आहे. परंतु वृत्तांत वाचनीय व सर्वसामान्यांना आकलनीय असावा.
पाठ्यवृत्तीधारकाने अंतिम वृत्तां हे पाठ्यवृत्तीधारकाचे मूळ लेखन आहे व त्यात अन्य स्रोतांतून घेतलेल्या सर्व संदर्भांचा योग्य पद्धतीने निर्देश करण्यात आला आहे’ असे प्रमाणपत्र वृत्तांतासोबत जोडणे आवश्यक आहे.
8)  वृत्तांताला प्रसिद्धी
दर्जेदार अभ्यासांचा त्यातील शक्यतेनुसार ‘थिंक महाराष्ट्र’ या संकेतस्थळावर वृत्तांतलेखाद्वारे किंवा ‘ग्रंथाली’द्वारे (पुस्तकरूपाने) प्रसिद्धीसाठी विचार करण्यात येईल.
9) 2020-21 या वर्षासाठीचे वेळापत्रक –
जून, 2020 अखेर – पाठ्यवृत्तीची घोषणा
18 ऑगस्ट, 2020 –  प्रस्ताव स्वीकारण्याची अंतिम मुदत
(प्रस्ताव फक्त इमेलद्वारे head.dcj@gmail.com या पत्त्यावर पाठवायचे आहेत.)
31 ऑगस्ट, 2020 पूर्वी –  प्राथमिक छाननी
10 सप्टेंबर, 2020 पूर्वी –  प्रस्तावांचे प्राथमिक मूल्यमापन
25 सप्टेंबर, 2020 पूर्वी –  मुलाखती (ऑनलाईन पद्धतीने)
25 सप्टेंबर, 2020 –  अरूण साधू स्मृती व्याख्यान व पाठ्यवृत्तीप्राप्त पत्रकारांच्या नावांची घोषणा (ऑनलाईन पद्धतीने).
31 मार्च, 2021 –  झालेल्या कामाचा अहवाल व पुढील कामाचा आराखडा
31 ऑगस्ट, 2021 – अंतिम वृत्तांत सादर करणे
25 सप्टेंबर, 2021 –  अरूण साधू स्मृती व्याख्यान. पाठ्यवृत्तीधारकांचे सादरीकरण. (ऑनलाईन पद्धतीने)
(अधिक माहितीसाठी संपर्क- डॉ. उज्ज्वला बर्वे 9881464677)

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here