केशवसुत यांचे खपुष्प आणि अंतराळातील ‘झीनिया’! (Keshavsut)

1
22
-heading-keshavsut

अंतराळात ‘झीनिया’चे फूल फुलले’ या बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. ती बातमी १७ जानेवारी २०१६ ला प्रसिद्ध झाली होती. बातमीशेजारीच नारिंगी रंगाच्या त्या फुलाचे सुंदर छायाचित्रही होते. तो चमत्कार अमेरिकेच्या अवकाश संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे घडला होता. पण मला आनंद झाला तो आणखी एका कारणाने, की त्यामुळे एका मराठी कवीचे स्वप्नच जणू साकार झाले! तो कवी म्हणजे कविवर्य केशवसुत – आधुनिक मराठी कवितेचे जनक. केशवसुतांच्या ‘झपूर्झा’ या गाजलेल्या कवितेतील शेवटचे कडवे असे आहे.

‘सूर्यचंद्र आणिक तारे
नाचत सारे हे प्रेमभरे
खुडित खपुष्पे फिरति जिथे
आहे जर जाणे तेथे
धरा जरा नि:संगपणा
मारा फिरके मारा गिरके
नाचत गुंगत म्हणा म्हणा-
झपूर्झा! गडे झपूर्झा!’

त्यातील ‘खुडित खपुष्पे’ ही कल्पना प्रकर्षाने नोंदवावीशी वाटते. ‘ख’ म्हणजे आकाश आणि ‘खपुष्प’ म्हणजे आकाशफूल. शब्दकोशात ‘खपुष्प’ हा शब्द ‘अशक्यप्राय गोष्टी’साठी वापरण्याचा शब्द म्हणून दिला गेला आहे. मात्र केशवसुतांच्या कविप्रतिभेला अशक्यप्राय गोष्टही कल्पनेच्या पातळीवर शक्य वाटली होती. म्हणूनच त्यांनी अंतराळात खपुष्पे खुडण्याचे विलोभनीय दृश्य पाहिले! इतकेच नव्हे, तर तेथे जाण्याचा मार्गही सांगितला. तो मार्ग कवी, शास्त्रज्ञ, चित्रकार अशा नवनिर्मितीच्या ध्यासाने झपाटलेल्या प्रतिभावंतांसाठी उपलब्ध आहे. तो मार्ग उत्कटपणे झोकून देऊन काम करण्याचा आहे. त्यांनी तो मार्ग ज्ञानाचा हेतू आणि सौंदर्य जाणून घेऊन अनुभवण्याची इच्छा धरणाऱ्या साऱ्यांनी अवलंबण्याची गरज त्या कवितेत सांगितली आहे (कवितेचे लेखन आहे 1893 मधील!). त्यांनी तरच ‘न नांगरलेल्या भुई’तून एखादी वनमाला आणता येईल, असा आशावाद व्यक्त केला आहे. ते खपुष्प उमलले आहे. द्रष्ट्या कवीच्या बाबतीत ‘वाचमर्थोsनुधावति’- शब्दामागून अर्थ धावतो- हे वचन कसे खरे ठरते, त्याची प्रचीती आली. 

मुळात ‘झपूर्झा’ हा शब्द हीदेखील केशवसुतांची नवनिर्मिती होती. अनुप्रासातून निर्माण झालेल्या नादवलयामुळे त्या शब्दाच्या उच्चारासरशी झिम्मा खेळणाऱ्या मुलींची गिरकी घेण्यातील लय जाणवते. तो शब्द उत्कट तन्मयतेची आणि आनंदाची प्रतिमा बनतो. त्यामुळे ‘नासा’च्या शास्त्रज्ञांची मनःस्थितीही जणू ‘झपूर्झा’ अशीच झाली असेल! 

हा ही लेख वाचा- 
निसर्गकवी बालकवी
            

प्रतिभावंत साहित्यिकांचे द्रष्टेपण पूर्वीही काही वेळा तसे सिद्ध झाले आहे. ‘रामाला गं चंद्र हवा’ असे रामायणापासून लोक गात आलेले आहेत. ते स्वप्न प्रचंड काळानंतर का होईना पूर्ण झाले. एके काळी स्वप्नरंजन वाटावे असे एखादे प्रभावी चित्र पिढ्यान् पिढ्या लोकांच्या मनाला चेतना देत राहते आणि मानवजातीच्या सामूहिक कर्तृत्वाच्या गुणाकारामुळे सिद्धही होऊ शकते. अशा वेळी स्वप्नरंजन हे स्वप्नसंजीवनाच्या पातळीवर पोचलेले असते. वाचकांची मागणी आजकाल ‘फिक्शन’पेक्षा ‘फॅक्ट्स’ना दिसते. त्यामुळे कल्पित साहित्याची निर्मिती मंदावली आहे, ही खरे तर मानवजातीची सांस्कृतिक पातळीवरील हानी आहे. त्या दोन्ही प्रेरणा साहित्यनिर्मितीसाठी समान दर्ज्याच्या आहेत. म्हणूनच येथे आणखी दोन साहित्यिकांनी केलेल्या कल्पनांची स्वप्नवत वाटाव्या अशा गोष्टींची आठवण करून द्यावीशी वाटते.

राम गणेश गडकरी ऊर्फ बाळकराम यांनी ‘संपूर्ण बाळकराम’ या पुस्तकात ठकीच्या लग्नासाठी काढलेल्या मोहिमेचे विनोदाच्या अंगाने मार्मिक चित्रण केले आहे. त्यातील त्यांची एक विनोदी कल्पना अशी आहे. ठकीच्या लग्नाच्या खटपटीत बाळकरामांचे नाजूक हृदय उपयोगी नाही, म्हणून ते लिहितात :- ‘माझे हृदय कापून काढून त्याच्या जागी त्या मृत दरोडेखोराचे उफराटे हृदय सुलट करून चिकटवून दिले आणि त्याची क्रिया अव्याहत चालण्यासाठी एक रास्कोप सिस्टिम लिव्हर वॉच कायमची किल्ली देऊन त्यावर बसवले. याप्रमाणे ते ऑपरेशन सुखरूप पार पडले.’ त्या काळी गडकरी यांनी कल्पनेने वर्णन केलेली हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया म्हणजे अतिशयोक्ती अलंकार वाटला होता. त्यांचा जीवनकाळ होता 1885 ते 1919 आणि जगातील पहिली हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली 1967 मध्ये! त्यावरून गडकरी यांच्या अलौकिक कल्पनाशक्तीची झेप कळते. 

-ziniyaरूकय्या हुसेन या बंगाली मुस्लिम लेखिकेने मुस्लिम स्त्रियांच्या अज्ञानाचा ‘पर्दा’ दूर होण्यासाठी शाळा काढण्याचे काम केले होते. तिच्या ‘सुलतानाज् ड्रीम’ या 1905 मध्ये लिहिलेल्या इंग्लिश कथेतील काही कल्पना आगळ्यावेगळ्या आहेत. त्यात तिने समाजातील स्त्रीच्या बंधमुक्ततेचे स्वप्न तर पाहिले आहेच, शिवाय इतरही काही स्वप्नवत कल्पनांचे सुंदर जाळे विणले आहे. त्यांतील एक कल्पना प्रत्यक्षात आली आहे. तिच्या त्या कल्पित राज्यातील स्त्रिया सौरऊर्जेवर स्वयंपाक करत असल्याचे वर्णन आले आहे. विशेष म्हणजे महिला विद्यापीठातील संशोधनाद्वारे त्या स्त्रियांनी अवकाशातून सूर्याची उष्णता मिळवण्याचे तंत्र आत्मसात केले असल्याचे त्यात नमूद केले आहे (अर्थात त्या कल्पित राज्यातील पुरुषांनीसुद्धा या प्रकाराची नोंद ‘सेन्सेशनल नाइटमेअर’ अशी खिल्ली उडवत केली आहे!). आज, सौरऊर्जा हे ऊर्जेचे वास्तवातील महत्त्वाचे साधन ठरले आहे. त्यामुळे लेखिकेच्या कल्पनेला दाद द्यावीशी वाटते. पाऱ्यासारखी वाटणारी काही स्वप्नेही कधी कधी आतील चैतन्याचा पारा जराही घरंगळून जाऊ देत नाहीत आणि कालांतराने साकार होतात, याची प्रचीतीच कथेमधील त्या तपशिलाने येते. 

एकंदरीत, कल्पनाशक्तीने ‘ज्ञाताच्या कुंपणावरून’ उडी मारण्याचे बळ येत असते. त्यामुळे कल्पनाशक्तीची धार आणि झेप कायम टिकवून ठेवण्याचे आव्हान दुर्लक्षित करता कामा नये. झीनियाच्या उमलण्याचा तोच भावार्थ होय.

नीलिमा गुंडी  9881091935
nmgundi@gmail.com

1 COMMENT

Comments are closed.