केळशी गावचे पारंपरिक खाद्यपदार्थ

0
307

महाराष्ट्रात प्रत्येक पट्ट्याची खास खाद्यसंस्कृती आहे. त्यात प्रामुख्याने कोकणी, पुणेरी, मराठवाडी, कोल्हापूरी, खान्देशी, वऱ्हाडी या म्हणता येतील. कोकणात नारळ व तांदूळ मुबलक उपलब्ध असल्यामुळे तेथील पारंपरिक खाद्यपदार्थांत खोबरे व तांदूळ यांपासून बनवलेले पदार्थ जास्त आढळतात…

गावात काही खास पदार्थ पारंपरिक पद्धतीने बनवले जात. पूर्वी वर्षभरातील सण-समारंभाला कोणते पदार्थ बनवायचे हे ठरलेले असे. त्याप्रमाणे त्या त्या सणाच्या ठरलेल्या पदार्थाला लागणाऱ्या जिन्नसांचे नियोजन आधी चार-पाच दिवस केले जाई. केळशी गावचेही असे काही पारंपरिक खाद्यपदार्थ आहेत…

  1. सांजण : तांदुळाचा रवा बरक्या फणसाच्या रसात टाकून इडलीप्रमाणे मोदक पात्रात वाफवतत्याला सांजण म्हणतात. तो नारळाच्या दुधाबरोबर खात. त्याच रसात तांदुळाचा रवा घालून तळलेले घारगे बनवत.
  2. खापरपोळ्या : हा पदार्थ तांदुळाच्या पिठात थोडे उडीदाचे पीठ टाकून मातीच्या खापरावर पातळ पीठ भांड्याने टाकत. ते सारखे होईस्तोवर त्यावर झाकण ठेवून चुलीवर ठेवत. ते शिजल्यावर गूळटाकलेल्या नारळाच्या दुधात टाकून मुरत ठेवत व त्यानंतर खात.
  3. पातोळे : हा पदार्थ बनवताना काकडीचा कीसकाढून त्यात तांदुळाचे पीठ व गूळ घालत. ते पीठ थापण्याइतपत मळून, हळदीच्या पानावर थापत. तेच पान मुडपून झाकून नारळाच्या करवंट्या शेंडीसह उभ्या करून वाफवत. पातोळ्या नारळाच्या दुधाबरोबर खात. याच पदार्थाला ‘पानमोडे’ सुद्धा म्हणतात.
  4. खीर, नारळी भात व मोदक : श्रावणात नागपंचमीलातांदुळाच्या रव्याची नारळाचे दूध व साखर घालून खीर बनवत. नारळी पौर्णिमेला नारळी भात असे आणि गणपतीत मोदक बनवत.
  5. बोरे : बोरे नावाचा पदार्थ भोपळा, तांदूळ व गूळ यांचे मिश्रण तयार करून, त्याचे बोराच्या आकाराएवढे गोळे बनवून तळतात. तो पदार्थ दिवाळीत करत.
  6. आंबोळ्या : संक्रांतीला गुळाच्या पोळ्या व रथ सप्तमीला खीर बनवत. त्या खिरीत गाई-म्हशीचे दूध बोळक्यातून उतू गेले, की ते त्यात टाकत.संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रान्त. त्या सणाला आंबोळ्या बनवत असत. तांदूळ व मेथीचे पीठ आदल्यादिवशी भिजत टाकून हळद, तिखट, मीठ व लसणाचे तुकडे टाकून त्याचे घावन तयार करत. नवरात्रात दसऱ्याला पातोळे बनवत. दिवाळीत फराळाच्या पदार्थांची मेजवाणी असे.

– पुरुषोत्तम मुकुंद वर्तक (जन्म – 1934, मृत्यू – 2011)

शब्दांकन: प्रकाश पेठे 9427786823 prakashpethe@gmail.com

 

————————————————————————————————————-

About Post Author

Previous articleफकिराच्या निर्मितीमागील शेतकरी हात!
Next articleकेळशीच्या रमलखुणा
प्रकाश पेठे यांचा जन्म अमरावतीचा. ते बडोदा येथे स्थायिक आहेत. त्यांनी ‘सर जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’ (मुंबई) येथून शिक्षण पूर्ण केले. त्यांचा वडोदरा महानगरपालिकेसाठी शहराचा पहिला विकास आराखडा व नगर रचना योजना बनवण्यात सहभाग होता. त्यांनी संगीत विशारद ही पदवी 1989 मध्ये मिळवली. ते नगर विकास अधिकारी या पदावरून निवृत्त 1998 मध्ये झाले. त्यांनी ‘महाराज सयाजीराव विद्यापीठ’ बडोदे येथे 1977 पासून अतिथी प्राध्यापक, 2001 पासून ‘सरदार वल्लभभाई पटेल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलाजी’ येथे अतिथी प्राध्यापक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. पेठे यांना प्रवास, छायाचित्रण, साहित्य, संगीत आणि कला अशा विविध विषयांची आवड आहे. त्यांची ‘स्वप्नगृह’, ‘धमधोकार’, ‘आनंदाकार’, ‘वडोदरा’ व ‘नगरमंथन’ अशी पुस्तके ‘ग्रंथाली’तर्फे प्रकाशित झाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here