कुकटोळीचा दुर्लक्षित गिरीलिंग डोंगर (Giriling Neglected mountain temple in sangli District)

महादेवाचे मंदिर

 

गिरीलिंगचा डोंगर सांगली जिल्ह्याच्या कवठेमहांकाळ तालुक्‍यातील कुकटोळी गावाजवळ आहे. त्या डोंगरावर चढणे तसे अवघड आहे. जाण्यासाठी आता रस्ता झाला आहे, त्यावरून पायी जाता येते.  डोंगरमाथ्यावर पोचल्यानंतर सात-आठ पायऱ्या चढून गेल्यावर महादेवाचे पूर्वाभिमुख मंदिर दिसते. मंदिर पुरातन आहे; मंदिरावरील शिखर मात्र पुरातन वाटत नाही. मूळ गर्भगृह डोंगरकपारीतील गुहेत आहे. गर्भगृहातील महादेवाची पिंड दक्षिणोत्तर असून तिचे नूतनीकरण झाले असावे. गुहेसमोरच्या डोंगरकपारीचा आधार घेऊन मंदिर बांधलेले आहे. मंदिरातील सभामंडप चौदा खांबांवर उभा आहे. खांब हेमाडपंथी बांधकामाप्रमाणे उभारलेले आहेत. प्रवेशद्वारावर छोट्या कमानीतून फणी असलेला नागराज पाहण्यास मिळतो. मंदिराला लागून असलेल्या डोंगर कपारीत तीन/चार गुहा आहेत. मंदिरातील सभामंडपात गणपतीचे अधिष्ठान भिंतीत पाहण्यास मिळते. सभागृहात छोटा दगडी नंदी आहे. बांधकाम केलेल्या मंदिराची रूंदी तीस फूट असावी.

 

मंदिरातील सभामंडप चौदा खांबांवर उभा आहे.

 

मंदिरासमोरचे पटांगण पेव्हर ब्लॉक घालून सुशोभित करण्यात आले आहे. देवस्थानाजवळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. पाणी पिण्यासाठी हौद बांधलेला आहे. मंदिराभोवती स्वच्छता आहे. मंदिर उंच डोंगरावर असल्याने पूर्वेच्या बाजूला पाहिल्यावर परिसर फार सुंदर दिसतो. तेथे हवादेखील तुलनेने थंड वाटते.
बौध्द लेणी

 

मंदिराचे दर्शन झाल्यावर उत्तरेच्या बाजूस पंधरा-वीस पायऱ्या आहेत. त्या चढून गेल्यावर विस्तीर्ण असे सपाट मैदान दृष्टीस पडते. डोंगराच्या दुसऱ्या बाजूला उतारावर बौध्द लेणी पाहण्यास मिळतात. त्या पठारावर छोटी छोटी गवतातील रंगीबेरंगी फुले सर्वत्र पसरलेली दिसतात. कासच्या पठाराप्रमाणे त्या पठाराचा विकास करता येईल. त्या पठाराला जुना पन्हाळाअसेही संबोधले जाते. प्रचलित लोककथेप्रमाणे तेथे किल्ला बांधण्याचा विचार झाला होता. परंतु तो विचार, अपशकुन वाटावा अशी घटना घडल्यामुळे सोडून दिला गेला असे सांगतात. गोष्ट अशी, की किल्ला बांधण्याच्या कामावर असलेल्या कामगारांनी त्यांच्या जेवणासाठी ससा मारला. त्यांनी कालवण ढवळण्यासाठी एक काठी वापरली. त्यामुळे तो ससा परत जिवंत होऊन पळून गेला. ती काठी संजीवनी वनस्पतीची असावी असा समज पसरला. गावकऱ्यांनी त्याचा अर्थ डोंगरावर औषधी वनस्पतीदेखील आहेत असा लावला आणि किल्ला बांधण्यास विरोध दर्शवला.

 

 

 

            डोंगरावर जाण्यासाठी कुकटोळीमार्गे ज्याप्रमाणे रस्ता आहे, त्याचप्रमाणे डोंगरवाडीकडूनही वर जाता येते. रस्ता दोन्हीकडे खराबच आहे. तरीसुद्धा व्हावेत पर्यटन विकासाच्या दृष्टीने आश्‍वासक ठिकाण म्हणून या डोंगराकडे पाहता येईल!

(‘आडवाटेवरचा इतिहास’ या पुस्तकावरून उद्धृत)

– प्रल्हाद कुलकर्णी 8830072503 drpakulk@yahoo.com

प्रल्हाद कुलकर्णी हे इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून कोल्हापूरच्या विवेकानंद संस्थेच्या कॉलेजमधून निवृत्त झाले. त्यांनी इंग्रजी लेखक विल्यम गोल्डिंग यांच्या कादंबऱ्या या विषयावर पीएच डी पदवी संपादली. त्यांची मराठीत आठ पुस्तके व इंग्रजीत चार पुस्तके प्रसिद्ध आहेत. निवृत्तीनंतर त्यांचा भटकंती आणि तत्संबंधी लेखन हा छंद बनला आहे. त्यांनी भारतविद्या, मोडीलिपी व पर्शियन भाषा या विषयांचाही अभ्यास केला आहे. त्यांनी ‘साहित्याचे पश्चिम रंग’ हे सदर तरुण भारतमध्ये पाच वर्षे लिहिले होते.

———————————————————————————————-—————————————-