किलर इन्स्टिंक्ट ही मराठ्यांची उणीव? (Lack of Killer Instinct in Marathas?

0
16
_ShodhaMaharashtracha_1.jpg

महाराष्ट्राचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर वाचकाला गो.स. सरदेसाई, त्र्यं.श. शेजवलकर, वि.का. राजवाडे, ढवळीकर, सेतु माधवराव पगडी इत्यादी इतिहास संशोधकांनी लिहिलेले साहित्य वाचावे असे सुचवले जाते. ते शक्य नसते, कारण ती ग्रांथिक भाषा, पुरावे म्हणून दिलेले इतिहासातील दाखले, सनावळ्या यांमुळे वाचन गुंतागुंतीचे व कठीण होऊन जाते.

पण ते सर्व टाळून लिहिलेला, महाराष्ट्राच्या जवळ जवळ दोन हजार वर्षांच्या इतिहासाचा आढावा घेतलेला एक ग्रंथ सध्या बाजारामध्ये आला आहे. त्याचे नाव आहे ‘शोध महाराष्ट्राचा’. ग्रंथाचे लेखक आहेत विजय आपटे. आपटे हे स्वत:ला इतिहासाचे अभ्यासक मानतात, संशोधक मानत नाहीत. ते म्हणतात, की या पुस्तकाची माझ्या मनात सुरुवात झाली ती ‘मराठी माणसाला झाले आहे तरी काय?’ या मला पडलेल्या कोड्यापासून. त्या कोड्याचे उत्तर शोधता शोधता माझे इतिहासाचे वाचन सुरू झाले.’ म्हणजे सर्वसाधारण उत्सुक वाचकाची जिज्ञासा त्यांच्या ठायी आहे.

ग्रंथ तीन भागांत विभागलेला आहे. पहिल्या भागात महाराष्ट्राचे नैसर्गिक स्वरूप, महाराष्ट्रातील संस्कृतीची जडणघडण, महाराष्ट्राचा भौतिक पाया, गावगाडा, जातिव्यवस्था, भाषा आणि तिचा विकास, विस्तार, साहित्यनिर्मिती, वारकरी संप्रदाय, मराठी समाजातील गुणदोष अशा अनेक गोष्टींचा विचार केला गेला आहे.

दुसऱ्या भागात भौगोलिक इतिहास, प्राचीन काळचा महाराष्ट्र, वाकाटक, चालुक्य या राजवटींपासून ते एकविसाव्या शतकातील एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यापर्यंतच्या इतिहासाचा वेध घेण्यात आला आहे. तिसऱ्या भागात सिंहावलोकन व पुढील, येणाऱ्या काळाबद्दलची चर्चा यांचा समावेश आहे.

मराठी मनाची पहिली जडणघडण सातवाहन वंशाच्या काळात आकाराला आली. त्यानंतर वाकाटक वंशाचे राज्य तिसऱ्या शतकाच्या मध्यावर प्रस्थापित झाले. चालुक्य घराण्याचा उदय सहाव्या शतकाच्या सुरुवातीला झाला. राष्ट्रकुट घराणे चालुक्य घराण्याचा पराभव करून आठव्या शतकाच्या मध्याला पुढे आले. राष्ट्रकुट घराण्याबरोबरच, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर शिलाहार वंशाचे राजे राज्य करत होते. शिलाहार राजांनी मराठीला राज्यभाषेचा दर्जा दिला. राष्ट्रकुट, शिलाहार या दोघांबरोबर महाराष्ट्राचा काही भाग यादव वंशाच्या अमलाखाली होता आणि त्याची राजधानी देवगिरी ही होती. मुसलमान राज्यकर्त्यांनी महाराष्ट्रात त्या काळापर्यंत प्रवेश केला नव्हता.

मुसलमान पातशाही महाराष्ट्रात देवगिरीच्या यादवांच्या पराभवानंतर ते शिवाजी महाराजांच्या उदयापर्यंत म्हणजे जवळ जवळ साडेतीनशे वर्षांच्या कालखंडात स्थापन झाल्या. त्यांपैकी प्रमुख म्हणजे मुगल पातशाही, आदिलशाही, कुतुबशाही व निजामशाही. त्या सर्व मुसलमान राज्यकर्त्यांना मुख्य आधार होता तो कर्तबगार मराठे सरदारांचा हे लक्षात घेतले पाहिजे.

त्या सर्व मुसलमान राज्यकर्त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी राज्य टिकवण्याच्या दृष्टीने केलेला राज्यकारभार. त्यांनी हिंदूंच्या धार्मिक कायद्याला मोडीत काढले नाही, की त्यांचा शरियत कायदा लावण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी त्यांची सत्ता बळकट करण्यासाठी जी मराठा घराणी त्या काळात उदयाला आली त्यांचा उपयोग करून घेतला. काही हिंदू जुलमाने, परिस्थितीने, लोभाने किंवा स्वार्थी हेतूने धर्म बदलून त्या काळात मुसलमान झाले, पण मोठ्या प्रमाणावर जबरदस्ती अशी झाली नव्हती. मुसलमान राज्यकर्त्यांच्या भाषा तुर्की, फारसी, अरबी अशा असल्याने त्या भाषांमधील अनेक शब्द मराठी भाषेत रूढ झाले आहेत.

मुसलमान राज्यकर्त्यांनी त्यांना सत्ता टिकवायची असल्याने शासन आणि समाजसत्तेतील प्रमुख घटक यांना हात लावला नाही. उलट, त्यात सुधारणा करून ती सुसूत्रपणे राबवली. त्यांनी मुसलमान राज्यकर्त्यांशी एकनिष्ठ राहवे म्हणून देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी, खोत, मुकादम या मंडळींना वतनदार केले, जादा अधिकार दिले. सामाजिक प्रतिष्ठा दिली आणि कर गोळा करण्याची पद्धत मजबूत करून ती राबवली.

त्याचा परिणाम असा झाला, की मराठे सरदारांनी सुलतानाला त्यांचा राजा मानले व ते त्याच्याशी एकनिष्ठ राहिले. ही वतनदार मंडळी इतकी पाय रोवून उभी राहिली, की शिवाजी महाराजांना विरोध स्वराज्य स्थापनेच्या वेळी जास्तीत जास्त त्यांच्याकडूनच झाला.

मराठ्यांनी स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणेने एकत्र येऊन मराठी राज्याचा विस्तार जरी केला तरी त्या मागील ध्येय एकछत्री सुराज्य स्थापणे हे न राहता वतनांची आणि सरंजामाची प्राप्ती हे झाले. देवगिरीच्या यादवांसारखे मराठा राजे विस्तृत भागावर राज्य करत होते, पण ते मराठे आहेत ही भावना त्यांच्यात नव्हती. शिवाजी महाराजांनी मराठी मुलखाचा महाराष्ट्र केला. त्यांनी प्रथम आम्ही मराठे, आमचा देश, महाराष्ट्र ही अस्मिता निर्माण केली.

_ShodhaMaharashtracha_2_0.jpgमराठ्यांकडे धैर्य होते, कष्ट उपसण्याची वृत्ती होती, एका जागी पाय रोवून चिवटपणे लढत राहण्याची क्षमता होती, पण एवढे सर्व असूनदेखील मराठी सैन्य अजिंक्य ठरले नाही. त्याची कारणे अनेक आहेत, पण प्रमुख कारण म्हणजे शिस्तीचा अभाव.

मराठ्यांच्या शौर्याच्या कथा अनेक आहेत. त्यांनी मिळवलेल्या विजयाचे वर्णन आहे. म्हणजे सर्व काही वाचकाला आवडेल असेच आहे, पण त्यांच्या दोषांबद्दल फार कमी ठिकाणी लिहिले गेले आहे. ते मागील चुकांपासून शिकणे आवश्यक आहे.

मराठ्यांनी सैन्याच्या बांधणीसाठी शास्त्रशुद्ध प्रयत्न कधी केले नाहीत; सदैव युद्धासाठी सज्ज असणारी फौज मराठ्यांना तयार करता आली नाही. मराठ्यांनी युद्धाचा शास्त्र या दृष्टीने विचार केला नाही. त्यांना भूगोलाचे ज्ञान नव्हते. त्यामुळे त्यांच्याजवळ पुरेसे नकाशे नव्हते. रसद पोचवण्यासाठी रस्ते बांधले जात नसत. मराठा कूट नीतीतही कमी पडले. भारतातील इतर सत्ताधीश, विशेषत: राजपुत, जाट आणि शीख यांच्याशी सौख्य करून त्यांना विश्वासात घेऊन मराठ्यांना त्यांच्याबरोबर घ्यायला जमले नाही. उलट, राजपुत आणि शीख यांच्यामध्ये मराठ्यांबद्दल अविश्वास जास्त होता. शाहूची सूटका औरंगजेबाच्या मृत्यूनंतर झाली आणि मराठी राज्याचे दोन भाग झाले. शाहू महाराजांनी राज्य मंडळ अस्तित्वात आणले. त्यात पेशवे, नागपूरकर भोसले, शिंदे, होळकर, गायकवाड, पवार आदी घराण्यांचा समावेश होता. पेशवे नाममात्र प्रमुख होते. खरी सत्ता ही सर्व सरदारांमध्ये विभागली गेली होती. मराठा सरदारांना कोणाचीच सत्ता न मानता मन मानेल तसे मोकाट वागण्याची सवय झाली होती. एक शिवाजी महाराज सोडले तर त्या नंतर आलेल्या सर्व राज्यकर्त्यांना इतिहासाचे आणि भूगोलाचे ज्ञान अगदी कमी होते.

मराठ्यांपाशी अभ्यासू वृत्ती दिसून आली नाही. अभ्यासू वृत्तीमुळे कसा फरक पडतो, हे समजण्यासाठी एक उदाहरण पुरेसे आहे. दुसऱ्या बाजीरावावर हल्ला करून त्याला ठार मारणे किंवा पकडणे हे शक्य असताना माल्कम नावाच्या अधिकाऱ्याने वरिष्ठांना सूचना केली, की त्याला ठार मारले तर, त्याच्या विषयी सहानुभूती निर्माण होईल आणि कोणी दुसरा महत्त्वाकांक्षी वारस पुढे येऊन सर्व मराठ्यांना त्याच्या निशाणाखाली गोळा करील आणि संभाजीच्या वेळेसारखी परिस्थिती निर्माण होईल. त्या ऐवजी त्याला शरण येण्यास भाग पाडून खुशाल सुखाने पेन्शन खाऊ द्यावे. त्याप्रमाणे, त्यांनी दुसऱ्या बाजीरावाला आठ लाख रुपयांची पेन्शन चालू करून उत्तर भारतात पाठवून दिले.

कर्तृत्ववान व्यक्तींचा अकाली मृत्यू हे देखील मराठ्यांच्या अपयशाचे एक कारण आहे. प्रथम शिवाजी महाराज, मग संभाजी, नंतर पहिले बाजीराव व पहिले माधवराव यांचे अकाली जाणे मराठी सत्तेला हादरा देऊन गेले. मराठ्यांकडे किलर इन्स्टिंक्ट नव्हती. मराठा सरदरांनी शत्रूला त्याची तहाची बोलणी स्वीकारून, सैन्याचा नाश न करता अनेक वेळा परत पाठवून दिले आहे.

मराठ्यांनी अटकेपार झेंडा लावला, पण ते झेंड्याखाली ठाण मांडून बसले नाहीत. मराठी सैन्याचा तळ उठला की त्यांची सत्ता नाहीशी होत असे. मराठेशाहीत सैन्याच्या मार्गातील खेड्यांचे हाल होत असत. गावे लष्कर येण्याच्या अफवेने ओस पडत असत. धारचे सरदार तुकोजीराव पवार यांनी खुद्द शाहू महाराजांचा ऊसाचा फड कापून नेला होता. त्यामुळे पूर्वीचे मुसलमान राज्यकर्ते आणि मराठे यांच्यात विशेष फरक असा जनतेला जाणवत नव्हता.

असे असूनदेखील मुसलमानांनी पूर्णपणे न जिंकलेले असे संपूर्ण भारतात फक्त मराठे होते! पुस्तकाच्या पुढील भागात परिचित असा स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास; तसेच, सद्यस्थितीचा घेतलेला परामर्ष आहे.

‘शोध महाराष्ट्राचा’ हे पुस्तक इतिहास अभ्यासकांना; त्याचप्रमाणे सर्वसाधारण वाचकांना आवडेल असे आहे. पुस्तकाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे लेखकाने कोठेही हात आखडून लिहिले आहे किंवा काही गोष्टी झाकण्याचा प्रयत्न केला आहे असे वाटत नाही. लेखकाने जसे आहे तसे सांगण्याचा प्रयत्न केला आहे व तो यशस्वी झाला आहे.

– माधव ठाकूर
madhavthakur3745@gmail.com

(साहित्य मंदिर, ऑगस्ट 2018 वरून उद्धृत)
Last Updated On – 30th Nov 2019