कार्यकुशल क्रीडा-अधिकारी – रवींद्र नाईक

8
16
_Ravindra_Naik_1.jpg

रवींद्र नाईक यांच्यासारखे कार्यक्षम सरकारी अधिकारी पाहिले, की भारताच्या प्रशासनाबाबतच्या उज्ज्वल भवितव्याविषयी आशा पल्लवित होतात. ते नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी आहेत. त्यांचे कार्यालय ‘शिवाजी स्टेडियम’मध्ये पहिल्या मजल्यावर आहे. नाईक यांना तेथे भेटले तेव्हा ते म्हणाले, “माझ्या कार्यालयात जे अंध, अपंग खेळाडू येतात त्यांना जिना चढून येथवर येणे कठीण जाते, येथे लिफ्टची सोयही होऊ शकत नाही. त्यामुळे मीच माझे कार्यालय तळमजल्यावर नेऊ पाहत आहे.” गोष्ट छोटीशी आहे, पण नाईक त्यांच्या कार्यकक्षेच्या सर्व कानाकोपऱ्याचा विचार कसा करतात त्याची निदर्शक आहे. त्यांना नाशकात जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून सूत्रे हाती घेऊन एक वर्ष झाले आहे.

रवींद्र नाईक मूळ नाशिकचेच. त्यांचा जन्म नाशिकमधील पेठ येथील सरकारी ग्रामीण रुग्णालयात 13 जानेवारी 1969 रोजी झाला. आई रेवती नर्स म्हणून काम करत असत. त्या मेट्रन म्हणून नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून निवृत्त झाल्या. त्याही परीक्षा देत पदोन्नती मिळवत गेल्या. वडील पोस्टाच्या नोकरीत होते. नाईकसरांचे लहानपण नाशिकमध्ये गेले. त्यांना खेळाची आवड होती. मात्र त्यांचे क्रीडाक्षेत्रात काम करायचे असे ठरलेले नव्हते. त्यांचे शालेय शिक्षण नाशिकच्या स्वामी विवेकानंद इंग्रजी शाळेत झाले. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये बी एस्सी केले आहे. ते आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेत असत. त्यांनी हँडबॉल आणि बॉल बॅडमिंटन या खेळांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. त्यांनी बॉल बॅडमिंटनच्या स्पर्धांमध्ये पंच म्हणूनही कामगिरी बजावली आहे.

ते सांगतात, “माझा व्यवसाय कॉम्पुटर असेम्बल करण्याचा होता, पण माझा ओढा क्रीडाक्षेत्राकडे होता. म्हणून मी औरंगाबाद विद्यापीठातून ‘एमपी एड’ केले. मी ‘बीपी एड’ला पहिला आलो होतो.” त्यांनी ‘एमपीएससी’ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्रात तालुका क्रीडा अधिकारी म्हणून पाऊल ठेवले आणि मनःपूर्वक वेगळे काम करणारा प्रामाणिक अधिकारी असा लौकिक मिळवला. त्यावेळी ते पद नव्याने निर्माण झाले होते. लवकरच, ते जिल्हा क्रीडा अधिकारी झाले. त्यांना पुणे मुख्यालयात असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांना मंत्रालय पातळीवरून जीआर बनवणे, नवीन योजना आखणे, कार्यकक्षा ठरवणे अशी यंत्रणेला वळण देणारी जी कामे असतात त्यांत सहभागी होता आले. त्यांनी पुण्यातील युथ कॉमनवेल्थ स्पर्धा, आशियन अॅथलेटिक्स चँपियनशिप, वर्ल्ड स्कूल बॅडमिंटन स्पर्धा यांचे यशस्वी आयोजन केले. त्यांचा महत्त्वाचा सहभाग शिवछत्रपती पुरस्कारांची नियमावली बनवण्यात, अर्जांची छाननी करण्यात आणि राज्य शासनाचे युवक कल्याण धोरण आखण्यात आहे. ते महाराष्ट्राच्या क्रीडा खात्याचे प्रतिनिधी म्हणून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात गेली सलग चार वर्षें जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांना काम उत्कृष्ट करणारे अधिकारी म्हणून संधी मिळत गेली आणि ते प्रत्येक संधीचे सोने करत गेले.

रवींद्र नाईक हे क्रीडाक्षेत्रात वेगाने पुढे येणारे नाशिककर आणि महाराष्ट्र शासन यांच्यातील दुवा आहेत. अर्थात ते त्यांचे कामच आहे! पण त्यांचे वैशिष्ट्य ते काम निष्ठेने, मनःपूर्वक पूर्ण करणे हे आहे. ते केवळ टेबलाशी बसून सूत्रे हाकत नाहीत. ते नाशिकभर कामासाठी फिरत असतात; सतत खेळाडूंच्या संपर्कात असतात. ते क्रीडा स्पर्धा आयोजित करणे, क्रीडा संस्थांसाठी शासकीय योजना राबवणे अशा कामांत कुशल आहेत. नाईक क्रीडाक्षेत्रासाठी असलेला पैसा योग्य त्या घटकांपर्यंत पोचवण्याची जोखीम व्यवस्थित पार पाडतात. त्यांच्या भटकंतीतून त्यांना क्रीडाविषयक अनेक गरजा दिसून येतात. ते त्या पुरवण्याचा प्रयत्न करतात. सुरगणा तालुक्यातील घुई येथील आश्रमशाळेत काहीही क्रीडासाहित्य नव्हते. मुली वेलीचा वापर करून दोरीवरच्या उड्या मारत होत्या. त्यांनी त्या शाळेला तातडीने क्रीडासाहित्य पुरवले; शंभर शाळांना तसे साहित्य पुरवण्यात आले. निजामपूरचा एक विद्यार्थी भालाफेकीत तरबेज आहे. त्याला फायबरचा भाला मिळाला तर छान होईल असे सरांच्या लक्षात आले. तो राष्ट्रीय स्पर्धेत खेळून आला. जयश्री टोचे ही अपंग शूटर आहे. तिला शूटिंगसाठी पॅलेट्स लागतात. सरांनी तीही मदत पुरवली. धनुर्विद्येत राष्ट्रीय पातळीवर चमकणारे विद्यार्थी आहेत, त्यांना बाण दिले. तलवारबाजीचीही तीच गोष्ट. साहिल आणि रिदम राव या जुळ्या सायकलिस्टंना प्रगत प्रशिक्षणासाठी सायकलिंग रोलर उपलब्ध करून दिला.

_Ravindra_Naik_3.jpgखेळाडूंना छत्रपती पुरस्कारासाठी अर्ज कसे करायचे हेही ठाऊक नसते. नाईक यांनी त्यासाठी कार्यशाळा घेतली. त्यातून सर्व सिद्धता होऊन नाशिकला सतरा पुरस्कार मिळाले. नाईक यांचे ते वैशिट्य आहे. ते स्वतः योजनांच्या, कामांच्या पूर्ततेसाठी जो ‘कागदी उपद्व्याप’ लागतो त्यात लक्ष घालतात, ते लॅपटॉप उघडून, आवश्यक ती कागदपत्रे तयार करून पूर्ततेसाठी पाठपुरावा करतात. ते बारा बारा तास काम करतात; सतत उत्साहात असतात, कायम सकारात्मक विचार करतात. “हे सगळे जमते स्वतः खेळाडू असल्यामुळे. खेळ माणसाला समतोल राखण्यास शिकवतो, तारतम्य शिकवतो” असे ते कृतज्ञतापूर्वक सांगतात. त्यांच्या प्रयत्नातूनच शासनाकडून नाशिकसाठी वीस लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. ते म्हणतात, “कोणत्याही प्रश्नाला तात्काळ ‘सोल्युशन’ शोधून काढण्याची माझी वृत्ती मला काम करताना उपयोगी पडते. काम वेळच्या वेळी पूर्ण केले, की गोंधळ होत नाही. स्पर्धा झाल्या तरी प्रमाणपत्र न मिळणे, निधी न मिळणे, योजना न कळणे अशा गोष्टींना माझ्या कार्यकाळात फाटा मिळत आहे.”

त्यांनी एक अॅप तयार केले आहे. त्याद्वारे त्यांच्या कार्यालयाशी थेट संपर्क साधता येतो. प्ले स्टोअरमध्ये जाऊन ‘DSO Nashik’ टाईप केले, की क्रीडाविषयक सगळी माहिती जागीच मिळते. “समोरच्याच्या जागी मी स्वतः आहे असा विचार केला, की मला त्याच्या अडचणी जास्त समजू शकतात.” असे ते म्हणतात. मेंटली रिटार्डेड खेळाडूंसाठी विशेष मेहनत हा त्यांच्या कामाचा एक विशेष भाग आहे. त्यामुळे डाऊन सिंड्रोम असणारा स्वयम् पाटील थायलंडला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यास जाऊ शकला आहे.

खेळाडूंना आयुष्यात स्थिरता मिळण्यासाठी आर्थिक पाठबळ असले पाहिजे या हेतूने त्यांच्या थेट नियुक्ती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा फायदा मिळालेल्या काही खेळाडूंची नावे घेता येतील- ललिता बाबर, कविता राऊत, संजीवनी जाधव, मोनिका आथरे…

भारताचे लक्ष्य ‘ऑलिंपिक’ हे आहे. मात्र विविध खेळांसाठी उत्तम प्रशिक्षकांची वानवा आहे. त्यासाठी जे प्रमाणित शिक्षण लागते ते पतियाळा येथे एन आय एस मध्ये दोन वर्षें जाऊन घ्यावे लागते. नाईक यांनी त्यात लक्ष घालून बेसिक कोचिंग सर्टिफिकेट कोर्स निर्माण केला आणि त्यातून उत्तम कोच घडवले. शासकीय पातळीवर ‘खेलो इंडिया’मुळे भारतभर क्रीडाक्षेत्रात उत्साहवर्धक वातावरण आहे. ‘नॅशनल’च्या माध्यमातून ऑलिंपिकचे दरवाजे उघडले गेले आहेत. नाईक 2020 आणि 2024 च्या ऑलिंपिकमध्ये भारत बऱ्याच सुवर्णपदकांचा धनी होईल अशी खात्रीयुक्त आशा बाळगून आहेत. त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

मुळात, ते नाशिकच्या ‘छत्रपती शिवाजी स्टेडियम’नेच कात टाकून विविध खेळांसाठी सक्रिय आणि सज्ज असावे यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी स्टेडियममध्ये एका कोपऱ्यात स्पोर्ट्स कट्टा सुरू केला आहे. तेथे ठरावीक वेळी क्रीडाक्षेत्रातील मंडळींच्या विचारांची देवघेव होत असते. स्क्वॅश या खेळासाठी अद्ययावत क्रीडागृह नाशिकमध्ये तयार झाले आहे. त्यांनी नाशिकमधील सामाजिक संस्थांच्या अजेंड्यावर खेळ आणि खेळाडू यांना आणले आहे. वाणी समाज मित्रमंडळाच्या माध्यमातून आयोजित केलेला ‘स्पोर्ट्स फॅशन शो’ हे त्याचेच आगळे उदाहरण, तर ‘मिशन फुटबॉल’ अंतर्गत भिंतीवर जाहिराती रंगवणे हे दुसरे! जागतिक सूर्यनमस्कार दिनाला हजारो मुलांचे सांघिक सूर्यनमस्कार हे अजून एक उदाहरण.

_Ravindra_Naik_2.jpgचॉकबॉल हा खेळच मुळी रवींद्र नाईक यांनी स्वतः हुडकून काढलेला आहे. त्यांना इंटरनेटवर त्या खेळाचा शोध २००० च्या दरम्यान लागला. तो जिनिव्हा येथे खेळला जायचा. त्या खेळाचे हँडबॉलशी साम्य आहे. तो खेळ भारतात सुरू करावा म्हणून त्यांनी परवानगी मागितली. तो खेळ राज्यांना शिकवला. त्याच्या आठ राष्ट्रीय स्पर्धा घेतल्या. नंतर पहिली आशियाई चँपियनशिप आयोजित केली. चॉकबॉल आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो. त्याचा समावेश शालेय स्तरावरील स्पर्धांमध्ये असतोच. नाईक यांनी तो खेळ आणि त्याचे नियम समजावून सांगणारे पुस्तक मराठी आणि इंग्रजीत लिहिले आहे.

‘योग’ हा नाईक यांचा आवडीचा विषय आणि त्यांना ‘फिटनेस’ कमालीचा गरजेचा वाटतो. ते सांगतात, “मी इतरांना फिटनेसचे महत्त्व पटवतो तेव्हा मी स्वतः तंदुरुस्त राहणे साहजिकच आवश्यक आहे. सायकलिंग मला आवडते. मी रोज न चुकता तीस ते पस्तीस किलोमीटर सायकल चालवतो.”

रवी यांच्या पत्नी सीमाली आणि मुलगा रिशी त्यांना उमदी आणि उत्साहवर्धक साथ देत आहेत. रिशी पंजाबात ‘एनआयटी’मध्ये एम टेक करत आहे. तो बुद्धिमान आहे. तोही शासकीय परीक्षा उत्तम रीतीने उत्तीर्ण झाला आहे. तो तलवारबाजीचा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. नाईक आईवडील-कुटुंब ही सगळी नाती सहज सांभाळतात. नाशिककरांनी त्यांचा गौरव ‘पंचवटी रत्न’ पुरस्कार देऊन केला आहे.

– अलका आगरकर-रानडे, alkaranade@gmail.com

8 COMMENTS

 1. कोकाटे सुरेश शंकरराव एचपीटी-आरवायके काॅलेज नाशिक

  अतिशय छान पुढील कार्यासाठी…
  अतिशय छान पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा

 2. आपण जिल्हा क्रीडा अधीकारी…
  आपण जिल्हा क्रीडा अधीकारी याच्या कामाला योग्य न्याय दिला आहे

 3. खूपच चांगले लेख समजात ऊर्जा…
  खूपच चांगले लेख समजात ऊर्जा निर्माण करण्यासाठी खूप महत्वाची भूमिका,

 4. माझ्या आठवणीतील सवोत्कृष्ट…
  माझ्या आठवणीतील सवोत्कृष्ट क्रीडाधिकारी.
  साहेब सलाम आपल्या कार्याला.

 5. नाशिक जिल्ह्यास अतिशय…
  नाशिक जिल्ह्यास अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी, प्रेरणादायी मार्गदर्शन,उत्कृष्ट स्पर्धाआयोजन यामुळे क्रीडा क्षेत्रात खेळाडू व शिक्षकांचेमनोबल निश्चितच उंचावले….??????????

 6. We are indeed very fortunate…
  We are indeed very fortunate that Nashik District has received an Officer as Ravindra Naik sir.
  I Congratulate him for all his Achievements and very thankful to him for overall development in field of sports in Nashik District.
  Regards,
  Sachin Pawar.
  General Secretary
  Karate Association Nashik District & Joint Secretary State Association.

Comments are closed.