कारहुनवी – बैलांची मिरवणूक

जय हनुमान या नावाचे प्रसिद्ध असे मंदिर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात सलगर या गावी आहे. तेथे तीन दिवसांची जत्रा वटपौर्णिमेच्या दरम्यान भरते. त्या जत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे बैलांची मिरवणूक (कारहुनवी) व दारुकाम हे होय. त्या गावाचा परिसर कर्नाटकजवळचा असल्याने तेथे कन्नड भाषिक मोठ्या प्रमाणात आहेत.

वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी कळसारोहणाची पूजा पार पाडली जाते. त्याला रुद्राभिषेक असेही म्हटले जाते. दुपारी पालखी मिरवणूक असते. रात्री आठ वाजता रथोत्सव व शोभेचे दारुकाम केले जाते. वळसंगचे कन्नशेट्टी हे प्रसिद्ध दारुकाम करणारे त्या गावात येतात. तर रात्री भजन, कीर्तन (कन्नड भाषेत) केले जाते. पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाला व्हनुगी म्हणतात.

दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारावाजेपर्यंत बैलांची मिरवणूक काढली जाते. दुपारी एक ते संध्याकाळी पाचपर्यंत गाड्या घरापासून देवळापर्यंत नेल्या जातात. त्या गाड्यांना कारहुनवी गाडी असे म्हणतात. मंदिराच्या भोवती बैलांच्या गाड्या पळवल्या जातात (शर्यत नाही). संध्याकाळी पाचनंतर कर तोडणे कार्यक्रम होतो. कर तोडणे म्हणजे फित कापण्यासारखा कार्यक्रम.

– शीतलकुमार कांबळे
9028575188