कातकरी-मराठी शब्दकोशाधारे शालेय शिक्षण – गजानन जाधव यांचा उपक्रम

1
130
-gajananjadhav-latur

लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव येथील गजानन जाधव हे डी एड झाल्यानंतर, शिक्षक म्हणून ‘रायगड जिल्हा परिषदे’त नोकरीस 2006 साली रूजू झाले. त्यांना रोहा तालुक्यातील पाले खुर्द आदिवासीवाडी ही शाळा मिळाली. तो आदिवासीपाडा दोन किलोमीटर उंचीच्या डोंगरकडेला वसलेला आहे. तेथे छोटीशी टुमदार शाळा आहे. पाड्यावर जाण्यास कच्चा रस्ता होता. तेथे पायी चालत जावे लागे. रस्ता आता पक्का झाला आहे. गजानन जाधव त्या पाड्यावर गेल्यावर त्यांच्या निदर्शनास आले, की तेथील संपूर्ण वस्ती ही कातकरी आदिवासी समुदायाची आहे. गजानन यांना त्यांची भाषा व त्यांना गजानन यांची भाषा, काहीच समजत नव्हती. कातकरी बोलीभाषिक मुलांना मराठी थोडीफार समजते पण शिक्षकांना कातकरी बिल्कुल समजत नाही. तरी बरे, की गजानन यांनी कातकरी आदिवासी जमातीविषयी पुस्तकात काही वाचलेले होते. त्यांचे राहणीमान, जीवनशैली अगदी वेगळी; त्यांनी त्या लोकांच्या अंगावर गरजेपुरते कपडे व कमरेला कोयता असतो हे चित्र पुस्तकात पाहिले होते. गजानन यांनी त्यांचे लक्ष आदिवासींच्या मुलांना नुसते शिक्षण नव्हे तर गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे देता येईल याकडे वळवले. त्यांनी पालकांच्या घरोघरी भेटी घेऊन त्यांची मानसिकता बदलली. त्यांनी पहिली तीन वर्षें, 2009 सालापर्यंतच्या कालावधीत मुलांसोबत, पालकांसोबत राहून-मिसळून कातकरी समुदायाबद्दल माहिती मिळवली, पण प्रश्न भाषेचा सतत जाणवत असे. शाळेतील विद्यार्थी व ते यांच्यांत संवाद साधताना गोंधळ उडून जात असे.

गजानन यांना काही बोली शब्द मुलांमध्ये राहून- त्यांचे ऐकून समजू लागले. जसे मुलगा = सोहरा, मुलगी = सोहरी, वडील = बाहस, आई = बय…… ते कालांतराने मुलांसोबत त्यांच्या भाषेत संवाद साधू लागले. मुलांना त्यांच्या भाषेत गुरुजी बोलतात हे बघून छान वाटू लागले. त्यामुळे मुले गजानन यांच्या जवळ येऊ लागली. गजानन यांच्या हेही ध्यानी आले, की राज्याच्या शिक्षणाची विभागणी शहरी, ग्रामीण व आदिवासी अशी झाली आहे. प्रमाण मराठी भाषेतील पाठ्यपुस्तके शहरी भागातील व ग्रामीण भागातील मुलांना सहज समजतात; मात्र आदिवासी भागात प्रमाण भाषा समजण्यास अडथळे येतात व त्यातूनच तेथील मुले शाळेच्या प्रवाहाबाहेर राहतात. गजानन यांनी ती मुले त्यांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण दिल्यास नक्की शिक्षणप्रवाहात कायम राहतील या विचाराने कातकरी बोलीभाषेत साहित्यनिर्मिती सुरू केली.

-logo

त्यांनी कातकरी-मराठी शब्दसंग्रह तयार केला. तो मुलांच्या भावविश्वातील, परिसरातील, कुटुंबातील; तसेच, प्राण्यांचे, पक्ष्यांचे कातकरी बोलीभाषेतील शब्द व त्यांचा मराठीतील अर्थ अशा शंभर शब्दांचा संग्रह होता. फुलपाखरू = भिंगरूट, अंडी = साकू, म्हातारा = डवर, म्हातारी = डोसी अशा, दररोज बोलल्या जाणाऱ्या शब्दांचा त्यात समावेश होता. त्यांच्या त्या कामाचे मोल अनमोल ठरले. शब्दसंग्रहाचा फायदा रायगड जिल्ह्यातील कातकरी वस्त्यांवर काम करणाऱ्या शिक्षकांना होऊ लागला. त्यांचे शिकवण्याचे काम सोपे झाले. गजानन यांनी मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी बालगोष्टींचे पुस्तक कातकरी बोलीभाषेत अनुवाद करून पुढचे पाऊल टाकले. त्याप्रमाणे ‘म्हातारीचा भोपळा’, ‘टोपीवाला आणि माकड’, ‘ससा-कासव’ अशा गोष्टी कातकरी भाषेत तयार झाल्या. त्या त्यांनी मुलांसमोर सादर केल्या. त्यामुळे मुले एवढी खूश झाली, की ती घरी जाऊन पालकांना त्या गोष्टी सांगू लागली. त्यामुळे मुलांची शाळेतील उपस्थिती वाढली. मुलांना सरांबद्दल आवड निर्माण होऊ लागली व सरांनाही मुलांचा लळा लागला. ते सर्व शक्य झाले फक्त भाषेमुळे.
जाधव यांनी पहिलीच्या मुलांना अध्ययनाची गोडी लागावी यासाठी त्यांना मुळाक्षरांची ओळख, त्यांच्या परिसरातील प्राण्यांची-वस्तूंची त्यांच्या भाषेतील नावे योजून सांगितली. जसे, की क- केल्यातील (माकड), कोहळ (भोपळा); ख- खुबे (गोगलगाय); ग-गोड (गूळ). परिणाम म्हणजे मुले वाचन-लेखन प्रक्रियेत चांगला प्रतिसाद देऊ लागली.

सरांना मुलांना शाळेत आणण्यासाठी सुरुवातीला धडपड करावी लागे. कालांतराने, मुले स्वत: वाचन-लेखन करू लागली व व्यक्त होऊ लागली. परिणामत:, मुले चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत चमकू लागली. काही मुले शिष्यवृत्तिधारक झाली. शाळेचा निकाल शंभर टक्के लागू लागला. गजानन जाधव यांच्या प्रयत्नांतून 2006 ते 2016 या कालावधीत शाळेचे व मुलांचे रूपडे पालटून गेले!

-caption 1

जाधव यांची पाले खुर्द येथून बदली जून 2016 मध्ये झाली व त्यांना नवीन शाळा मिळाली. तेथे एकही कातकरी बोलीभाषिक मूल नव्हते. त्यामुळे जाधव यांना त्यांनी साहित्यनिर्मितीचा घेतलेला वसा थांबेल अशी भीती वाटली. तेव्हा त्यांनी रदबदली करून संतोषनगर आदिवासीवाडी शाळा मिळवली. तेथे, त्यांनी इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकाचा कातकरी बोलीभाषेत अनुवाद केला. त्यांनी पहिलीच्या कविता, गोष्टी, चित्रकथा, संवाद कातकरी भाषेत बनवल्या व ते साहित्य त्याची पीडीएफ बनवून व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील शिक्षकांपर्यंत पोचवले. शिक्षक त्या साहित्याचा मार्गदर्शिका म्हणून वापर करू लागले. त्यामुळे त्यांना पहिलीच्या मुलांना शाळेत आनंददायी पद्धतीने रमवता येऊ लागले. 

 

गजानन जाधव यांनी ‘अध्ययन शिक्षक मार्गदर्शिका’ नावाची पुस्तिका पीडीएफ स्वरूपात बनवली. रायगड जिल्हा परिषदेने तिच्या बाराशे प्रती छापून सर्व आदिवासी पाड्यांवरील शाळांत वाटल्या आहेत. त्यांच्या कातकरी बोलीभाषा शिक्षणाच्या उपक्रमाची निवड महाराष्ट्रातील पन्नास उपक्रमांमध्ये 2016-17 साली झाली होती. तशा पन्नास उपक्रमांची निवड ‘शिक्षणाच्या वारी’ या नावाने दरवर्षी शिक्षण खात्याकडून होत असते. एका छोट्या आदिवासी वाडीवरील उपक्रम राज्यस्तरावर पोचला! त्यांनी त्या वारीच्या माध्यमातून पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे जाऊन महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांना उपक्रमाची माहिती दिली. तो उपक्रम महाराष्ट्राच्या विविध आदिवासी क्षेत्रांत काम करणाऱ्या शिक्षकांना आवडला. काही शिक्षकांनी पुढील कालावधीत वारली, लमाण भाषांत तसे साहित्य बनवलेसुद्धा!

गजानन यांचे वडील सावरगाव येथे एकटे राहतात – शेती करतात. ते पोलिस खात्यात नोकरीला होते. गजानन, त्यांच्या पत्नी पूनम व छोटा मुलगा असे तिघेच रोह्याजवळ कोलाडला राहतात. गजानन शाळेत जाण्यासाठी रोज चौदा किलोमीटर मोटारसायकलवरून ‘अपडाऊन’ करतात. ते सणवार व सुट्टी अशा काळात वडिलांना भेटण्यासाठी रोकडा सावरगावला जातात, कारण वडील तिकडे एकटे असतात आणि त्यांना शेती सोडून येताही येत नाही.

-caption2

गजानन यांनी सांगितले, की कातकरी भाषा ही रायगड, ठाणे, पालघर, पुणे, सातारा या जिल्ह्यांतील बऱ्याच ठिकाणी आहे. अशा प्रकारे, प्रत्येक मूल शिकले पाहिजे यासाठी उपक्रम बोलीभाषेकडून प्रमाणभाषेकडे सर्वत्र पोचला व त्याचा उपयोग मुले शाळेत येण्यासाठी, टिकण्यासाठी व शिकण्यासाठी होत आहे याचा आनंद वाटतो. गजानन यांनी स्वतःच्या सहा वर्षांच्या मुलाला आदिवासींच्याच शाळेत शिकण्यास आरंभी टाकले होते. तोही शिक्षण आरंभी आदिवासींच्या मुलांसमवेत त्यांच्या बोलीभाषेत घेत असे. गजानन यांची बदली अधिक दुर्गम गावी झाल्यानंतर मुलगा त्यांच्या कोलाड येथील राहत्या घराजवळच्या शाळेत जाऊ लागला आहे.
रायगड जिल्ह्यात कातकरी वस्त्यांमध्ये छोट्या वीस ते पन्नास मुलांच्या पंधराशे प्राथमिक शाळा आहेत. गजानन म्हणाले, की त्या ठिकाणी मुलांना आंघोळ घालण्यापासून स्वच्छतेचे धडे द्यावे लागतात. मुले त्यांच्या लहान भावंडांना घेऊन शाळेत येतात. गजानन यांची नेमणूक चिंचवली तर्फे अतोणी या, डोंगरांतील अधिक खोल भागात असलेल्या शाळेत झाली आहे. ती दोन शिक्षकी शाळा आहे. शाळेची इमारत पाडली असल्याने शाळा मारुतीच्या मंदिरात भरते. शाळेत चोपन्न मुले आहेत, पैकी त्रेपन्न कातकरी आहेत.
– गजानन जाधव  9923313777
gajanan.jadhav1984@gmail.com 

– संतोष मुसळे   9763521094, 9527521094
santoshmusle1983@gmail.com
(‘पुण्यनगरी’वरून उदृत संपादित – संस्करीत)

About Post Author

1 COMMENT

  1. खूप छान सरांचे काम आहे
    खूप छान सरांचे काम आहे

Comments are closed.