काकासाहेब गाडगीळांची कढी (Kakasaheb Gadgil)

आचार्य अत्रे आणि काकासाहेब गाडगीळ यांचे नाते नेमके कसे होते हे सांगणे कठीण आहे. दोघांच्या एकमेकांवर कुरघोड्या चालू असायच्या. दोघे काँग्रेसमध्ये होते. अत्रे पुणे नगरपालिकेचे नगरपिता! (नगरपित्याचा नगरसेवक ठाक-यांमुळे झाला) तर काकासाहेब पक्षाचे नेते. अत्रे नगराध्यक्ष होण्यासाठी धडपडणारे तर काका मोडता घालणारे. काकांनी कोठलेही विधान केले, की अत्र्यांनी त्याची रेवडी उडवलीच! काकांची एकाच प्रश्नाला अनेक उत्तरे द्यायची पध्दत तर, काकांचे ते तंत्र धुडकावून लावण्याची अत्रे यांची गडबड. काकांनी अत्र्यांचे भाषण रद्द करण्यापर्यंत हट्टीपणा केला होता आणि त्यांचे भाषण रद्द करण्यासाठी काकांनी जी कारणे सांगितली त्या थापा होत्या हे अत्र्यांनी उघड करून दाखवले. काकासाहेब गाडगीळांचे पथिकहे आत्मचरित्र आहे. त्याचा अत्रे  ‘थापिकअसा उल्लेख करत.

काकासाहेबांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे पुण्यातील काँग्रेस भवनाची उभारणी. त्यासाठी काकांनी त्यांच्या पत्नीचे दागिने गहाण टाकले होते!

या दोन नेत्यांचे एकमेकांवर प्रेमही होते! आचार्य अत्रे एकदा दिल्लीला गेले. मुंबईहून थेट दिल्लीला न जाता ते गुजरात, राजस्थान असे फिरत दहा-पंधरा दिवसांनी दिल्लीत पोचले. काकासाहेब त्यावेळी दिल्लीत होते. अत्रे दिल्लीत पोचल्याचे समजताच काकांनी त्यांना फोन केला आणि म्हणाले,
बाबुरावमहाराष्ट्र सोडून तुम्हाला दहा-पंधरा दिवस झालेत, तर आज जेवायला या. मंडळीपण माझ्याबरोबर आल्या आहेत. तुम्हाला कढी आवडते तर कढीचाच बेत करू या.

अत्र्यांनी निमंत्रणाचा स्वीकार केला. दोघे गप्पागोष्टी करत मनसोक्त जेवले. कढी इतकी छान झाली होती, की अत्रे ती सात-आठ वाट्या नुसती प्याले. तृप्त होऊन काकांना म्हणाले, ”काका, कढी अगदी फक्कड झाली होती. वाऽ!

काकानांही बरे वाटले, पण बाबुरावांच्या स्वभावाची कल्पना असल्याने त्यांनी सांगितले,” बाबुराव! मनसोक्त जेवलात त्यात मला आनंद आहे. मी यजमान म्हणून तृप्त आहे. तुम्हाला कढी आवडली तेही जाणवले. फक्त एक करा, महाराष्ट्रात कोणाला जाऊन असे सांगू नका, की दिल्लीत गेल्यावर काकांची कढी पातळ झाली होती‘. काकांच्या या वाक्याला गदागदा हसून अत्र्यांनी दाद दिली.
Last Updated On 21st October 2019