कल्पतरू ताडवृक्ष

ताडाचे झाडताडाच्या (borassus flabellifer) जगाच्या पाठीवर शंभर जाती आहेत. हा वृक्ष आफ्रिकेच्या उष्ण कटिबंध विभागातील आहे. त्याचा प्रसार भारतात (बंगाल, बिहार, पश्चिम व पूर्व द्वीपकल्पाच्या समुद्रकिनारी), श्रीलंकेत व ब्रह्मदेशात आहे. भारतात त्यापैकी महत्त्वाचे चार प्रकारचे नीरा देणारे वृक्ष आढळतात. त्यांना ताड, शिंदी, भैरली, माड किंवा नारळी नावाने ओळखले जाते. विशेषत:, या झाडाचा गोड स्वादिष्ट रस आंबवून ताडीच्या स्वरूपात विकला जातो. म्हणून त्यांना ताडीची झाडे म्हणूनसुद्धा ओळखतात. ताड हा नारळीसारखा उंच वाढतो.

ताडाच्‍या वृक्षाच्या खोडाचा व्यास तळाशी सामान्‍यतः १–१.५ मीटर असतो. ते काळे, उंच व दंडगोलाकृती असते. खोडाला फांद्या नसतात; ते मध्यावर किंचित फुगीर असते. पाने मोठी, साधी, पंख्यासारखी, एकाआड एक उगवलेली परंतु खोडाच्या टोकावर झुबक्यात वाढलेली दिसतात. पानाचे पाते चकचकीत, हस्ताकृती, थोडेफार विभागलेले असून त्‍यास ६० ते ८० खंड असतात. पानांची कळी उमलण्यापूर्वी पात्यास चुण्या पडून ते कळीत सामावलेले असते. फुलांच्या लिंगभेद प्रकाराप्रमाणे दोन प्रकारचे फुलोरे दोन स्वतंत्र झाडांवर मार्च-एप्रिलमध्ये येतात.

ताडगोळेताड वृक्षाचे दोन प्रकार असतात. नर व मादी, नराला फक्त शेंगांसारख्या पोयी येतात तर मादीला फळे येतात. झाडाचे फळ मेमध्ये तयार होते. कोवळी फळे ‘ताड गोळे’ म्हणून विकली जातात. त्यांची चव खोबऱ्यासारखी परंतु अधिक मधुर असते. त्यामुळे उन्हाळ्यात थंडपणा मिळतो. भारतात अंदाजे ११.१२ कोटी छेदनयोग्य ताडाची झाडे असून त्यांपैकी सध्या फक्त २.२० कोटी नीरा-ताडगुळासाठी उपयोगात आणली जातात. यावरून त्या उद्योगाच्या वाढीस किती वाव आहे ते लक्षात येईल.

महाराष्ट्रात त्या झाडांचा उपयोग नीरा उत्पादनासाठी फार कमी प्रमाणात केला जातो. महाराष्ट्रात शिंदीची झाडे नीरेसाठी सर्वसाधारणपणे उपयोगात आणली जातात. महाराष्ट्रात जवळजवळ पन्नास लाख ताड आहेत, त्यांचा उपयोग नीरा उत्पादनासाठी झाल्यास सुमारे तेहतीसशे छेदक व दोन हजार मदतनीस यांना ताडपानाच्या वस्तू व इतर उत्पादने असे काम मिळेल आणि सुमारे पाच हजार लोकांना महाराष्ट्रात कायम स्वरूपाचा रोजगार मिळेल. ताडाची लागवड करता येणे शक्य आहे.

ताड लागवड

ताडाची पिकलेली निवडक फळे घेऊन त्यांना छेदले असता त्यातून दोन किंवा तीन बिया मिळतात, त्या सुकवून पावसाळ्याच्या सुरुवातीला दहा फुटांच्या अंतराने दीड फूटांचे खड्डे खणून त्यांच्यात बी लावावी. बियांना सुमारे तीन महिन्यांनी अंकूर फुटून रोपे जमिनीच्या वर येतात. ताडाची रोपे उपटून दुसऱ्या ठिकाणी लावता येत नाहीत. म्हणजे ज्या ठिकाणी लागवड करायची असते त्या ठिकाणी बिया घालणे योग्य असते. एकदा उगवलेले रोपटे सहसा मरत नाही. त्याचे संरक्षण फक्त जनावरांपासून हवे. झाडे सुमारे बारा ते पंधरा वर्षांनी दहा-बारा फूट उंच वाढल्यावर नीरा देण्यायोग्य होतात. झाडांना खत व पाणी दिल्यास नीरा उत्पादन वाढते. झाडे उंच सरळ वाढतात व त्यांच्या मुळ्या खोलवर जात असल्यामुळे झाडे मोडून अगर उपटून पडत नाहीत. आंध्रच्या किनाऱ्यावर झालेल्या वादळात केवळ ताड समुद्रकिनारी उंच मानेने ताठ उभे राहून जणू वाऱ्यांना आव्हान देत होते. ती झाडे शेताच्या बांधांवर, कुंपणांच्या किनारी, नद्या व तळ्यांच्या किनारी, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना, शाळा-कॉलेज-हॉस्पिटल कंपाऊंड व म्युनिसिपल बागा येथे लावू शकतो. झाडे लहान असतात तेव्हा शोभेत भर घालतात, तर मोठी झाल्यावर उत्पादनाचे साधन होतात. जरी नीरा काढली नाही तरी शंभर ते दोनशे रुपयांची फळे मिळतील. शिवाय, वृक्ष रोपणाचा पर्यावरणासाठी पण उपयोग होतो ते वेगळेच.

ताडाच्या बिया जून महिन्यात खादी ग्रामोद्योग कमिशनच्या डहाणू ताडगुळ केंद्रामार्फत मिळू शकतील.

उपयोग

ताडवृक्ष हा खाद्य, खाद्य वस्तू आणि इतर अनेक पदार्थांचा स्रोत आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये त्यास 'कल्पतरू' अशी उपाधी देण्यात आली आहे. त्यातील शर्करायुक्त रस ही मुख्य उत्पन्नाची बाब आहे. ताडाच्या झाडापासून जानेवारी ते जूनपर्यंत नीरा मिळते. त्याची पेय रूपाने विक्री होते. ताडाचे फुलोरे महाछदातून बाहेर पडण्यापूर्वी त्यांना खाचा पाडून त्याखाली बांधलेल्या मडक्यात पाझरणारा गोड रस जमा करतात. आंबवल्यावर या रसाची ताडी बनते. ते मादक पेय आहे. रस आंबला जात असता त्‍यात पहिल्या ३ ते ८ तासांत ३ टक्के एथिल अल्कोहॉल व १ टक्का अम्ले असतात; प्रक्रिया चालू ठेवल्यास ५ टक्के एथिल अल्कोहॉल बनते; त्यापेक्षा जास्त आंबल्यास ती मनुष्याला पिण्यास योग्य नसते. ताडीपासून कमी प्रतीचे व्हिनेगरही (शिर्काही) तयार करतात. ऊर्ध्वपातनाने बनविलेल्या ताडीच्या दारूस ‘अर्राक’ म्हणतात. ग्रीक शास्त्रज्ञ हीरॉडोटस (ख्रि. पू. सु. ४२०) यांना ताडीची माहिती होती.

नीरेपासून गुळ बनवला जातो. तो ताडगुळ म्हणून ओळखला जातो. ताजी नीरा उकळून त्यापासून गूळ बनवतात. त्यापासून काही गोड पदार्थ बनविता येतात. तमिळनाडूत या गुळाचे उत्पादन होते; तीही उत्पन्नाची बाब ठरते. शिवाय, निरेपासून साखर, खडीसाखर तयार होते. साखरेचा उपयोग चहा, कॉफी, आईस्क्रिम, कन्फेक्शनरी व इतर मिठाई बनवण्यासाठी होतो, तर खडीसाखर औषधासारखी उपयोगी असते. एका झाडापासून सुमारे दीडशे लिटर नीरा मिळते. जर ती नीरा गुळासाठी वापरली तर पंधरा किलो गूळ मिळेल. नीरा-ताडगूळामध्ये भरपूर प्रमाणांत खनिज पदार्थ आहेत.

ताडाचे खोड बाहेरुन कठीण असते. ते मजबूत व टिकाऊ असल्‍याने त्‍याचा वापर खांब, वासे, फळ्या इत्यादींच्‍या निर्मितीसाठी केला जातो. खोडाचा तळभाग सुटा करून, पोखरून तो बादलीसारखा वापरतात. इतर सरळ भाग पोखरून त्यांचा पाणी वाहून नेण्यास पन्हाळाप्रमाणे उपयोग होतो. ताडाच्या कोवळ्या पानांपासून अनेक प्रकारच्या उपयोगी वस्तू उदाहरणार्थ, बास्केट, चटया, टोपल्या, फूल, हार, पंखे, छपरे, छत्र्या, हॅट, बनवले जातात. ताडाची पाने घरे शाकारण्यासाठी व दोरी तयार करण्यासाठी वापरली जातात. फार पूर्वी लिहिण्याकरिता ताडाच्‍या पानांचा वापर केला जात असे. या पानांच्या देठांपासून व मध्यशिरेपासून निघणाऱ्या राठ धाग्यांपासून झाडू, कुंचले, दोर, चुड्या इ. वस्तू बनविणे हा घरगुती धंदा बनला आहे. ताडाच्‍या कच्च्या बियांतील मऊ गरापासून मुरंबे वगैरे बनवितात किंवा तो तसाच खातात. लहान रोपटी जमिनीतून काढून भाजीप्रमाणे खातात अथवा दळून त्यांचे पीठ करतात. बियांपासून तेल मिळते; त्या भाजूनही खातात. या झाडापासून मिळणारा डिंक काळा व चमकदार असतो. ताडाच्या देठापासून तंतू (रेषा) मिळतो. त्याचा उपयोग विभिन्न प्रकारचे ब्रश बनवण्यासाठी होतो. शिवाय, रेषा परदेशांत निर्यात करून देशात चार-पाच कोटी रुपयांचे परकीय चलन मिळते. ताडाच्या वेतापासून पलंग व खुर्च्यांची विणाई केली जाते. ताडाच्या बुंध्यापासून इमारती लाकूड मिळते तर म्हातारपणी टेकू देणाऱ्या सुंदर काठ्या तयार केल्या जातात.

या झाडाचे मूळ थंडावा देणारे व झीज भरून काढणारे आहे. मूळांचा रस लघवी साफ करणारा, उत्तेजक व कफनाशक असून तो जलशोधात (पाणी साचून झालेल्या सूजेवर) आणि दाहक विकारात गुणकारी असतो. ताडाच्‍या बियांतील गर शामक व पौष्टिक असतो. हिंदू व बौद्ध धर्मीय लोक ताडाला पूज्य मानतात.

– य.वि. साळवी

('मराठी विश्‍वकोश संकेतस्‍थळ' आणि 'ग्रामोद्योग, जुलै १९९१' अंकातील माहितीवरून)

6 COMMENTS

 1. सुंदर लेख आहे हा.
  सुंदर लेख आहे हा.

 2. उपयुक्त माहिती .

  उपयुक्त माहिती .
  ताडगुळाचे औषधी गुणधर्म , पोषणमूल्य आणि उपलब्धता ही माहिती सुद्धा द्यायला हवी .

 3. उपयुक्त माहिती पुरवल्या बद्दल
  उपयुक्त माहिती पुरवल्या बद्दल
  धन्यवाद
  रुपेश केसेकर

 4. मला ताडीची झाडे कोठे मिळतील…
  मला ताडीची झाडे कोठे मिळतील ८६००७८१२८७ माझा नंबर आहे मार्गदर्शन करा

 5. उपयुक्त माहिती मराठीत…
  उपयुक्त माहिती मराठीत दिल्याबद्दल आभार.

Comments are closed.