कलामहर्षी केकी मूस

2
15
carasole

लपली आहे ती सर्व कला!

कलामहर्षी केकी मूस यांचा जन्म २ ऑक्टोबर १९१२ रोजी झाला. त्यांना बाबुजी म्हणत. बाबुजी हे पारशी समाजात जन्मले, ते तहहयात अविवाहित राहिले. त्यांची आई पिरोजाबाई सात्त्विक, प्रेमळ अन् दयाळू होत्या. वडील माणेकजी शांत, संयमी, सुशील व हिशोबीदेखील होते.

बाबुजींचा जन्म मुंबईतील उच्चभ्रू वसाहतीत – मलबार हिल येथे त्यांच्या मामांच्या घरी झाला. मामा स्वातंत्र्यपूर्व काळातील नामवंत बिल्डर होते. छत्रपती शिवाजी टर्मिनस ही त्यांनी बांधलेली वास्तू आहे. त्यांचे नाव आर.सी. नरिमन. मुंबईतील समुद्रकाठच्या एका टोकाला त्यांचेच नाव देण्यात आले आहे – नरिमन पॉर्इंट. मामांनी केकींचे शिक्षण- प्राथमिकपासून तर महाविद्यालयापर्यंत मुंबईत केले. केकींनी १९३३ साली पदवी प्राप्त केली.

मामा अविवाहित होते. त्यांनी केकीला त्यांचा मुलगा मानले होते. केकीने पदवी प्राप्त होताच लंडनला जाऊन कलाशिक्षण घेण्याची इच्छा प्रकट केली. परंतु मामाला त्यांचा उद्योग व्यवसाय केकीने सांभाळावा असे वाटत होते. केकी हट्टी होते. ते म्हणाले, “मामा कोठलेही ऐश्वर्य मला माझ्या निर्णयापासून दूर घेऊन जाऊ शकत नाही.” ते ऐकल्यावर मामा भडकले. त्यांनी केकींना त्यांच्या आईबाबांकडे पाठवून दिले. केकींनी त्यांची बॅग भरली व त्याच मिनिटाला मामांचा बंगला सोडला व रात्रीची कलकत्ता मेल धरली.

केकींचे बाबा, माणेकजी मूस हे १९३४ साली कालवश झाले. त्यांच्या आईचा आधार गेला. पण१९३३-१९३४ सालामध्ये केकींनी पाटणादेवी, तीर्थक्षेत्र बालझिरी, खुलताबाद, वेरूळ या ठिकाणी कित्येकदा जाऊन फोटोग्राफी केली, पेंटिंग्ज केली. केकींनाही वडिलांच्या निधनाने हादरा बसला. केकी त्यांच्या आईला तिच्या हॉटेल व्यवसायात मदत करू लागले. केकींनी लंडनला जाण्याचा विषय आईकडे कधीही काढला नाही. खुस्त्रो माणेकजी मूस हे केकींचे नाव, परंतु पिरोजाबाई लाडाने त्यांना केकी म्हणू लागल्या. त्याच नावाने ते जगप्रसिद्ध झाले.

केकींच्या मनातील घालमेल आईला कळली बहुधा, आई एक दिवस त्यांना म्हणाली, “केकी, बाळा, मी तुला उद्या पैसे देणार आहे, तू लंडनला जाण्याची तयारी कर!”. केकी त्यांच्या अखेरच्या प्रवासापर्यंत कधीही आईचे ते ‘देणे’ विसरू शकले नाहीत. आईची आठवण आल्यावर केकी देवालाही रागावायचे आणि म्हणायचे, ‘कसला देव बीव काय नाय! देव असता तर माज्या आईला त्याने नेला नसता.’ आईने परवानगी दिल्याने केकी जाम खूश झाले. केकींनी १९३५ ला लंडनला प्रयाण केले व तेथील ‘द बेनेट कॉलेज ऑफ शेफिल्ड’मध्ये प्रवेश घेतला. केकींनी चार वर्षांत त्यांचा ‘कमर्शियल आर्ट’चा डिप्लोमा पूर्ण केला. ‘द बेनेट कॉलेज ऑफ शेफिल्ड’ने फोटोग्राफीच्या जागतिक दर्ज्याच्या ज्या स्पर्धा त्या चार वर्षांत घेतल्या त्या स्पर्धांमध्ये केकींनी प्रथम येण्याचा बहुमान दोनदा मिळवला, अन् ते लंडनमध्ये असतानाच जगप्रसिद्ध छायाचित्रकार म्हणून नावारूपाला आले. त्यांनी जगाच्या नकाशावर भारताचे नाव उज्ज्वल केले. लंडनचे नागरिक केकींना ‘गोल्ड मेडलिस्ट, गोल्डन मॅन केकी’ म्हणू लागले. केकींनी १९३८-१९३९ या वर्षभरात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जपान, ब्रिटन, इटली इत्यादी राष्ट्रांचा दौरा केला. केकींनी त्या त्या राष्ट्रातील कला जाणून घेतल्या. तेथील नामवंत प्रसिद्ध कलावंतांना सदिच्छा भेटी दिल्या. केकी १९३९ च्या डिसेंबर महिन्यातील शेवटच्या हप्त्यात भारतभूमीवर उतरले. ते दिल्लीवरून मुंबई आणि मुंबईवरून सरळ चाळीसगावी त्यांच्या बंगल्यात आले आणि त्यानंतर तब्बल पन्नास वर्षें, त्यांनी त्यांच्या बंगल्यात स्वत:ला स्वेच्छेने आत्मकैद केले. नंतर ते कधीही त्यांच्या घराबाहेर पडले नाहीत.

कलाक्षेत्रातील महान विभूती केकी मूस यांना प्रत्यक्ष भेटणाऱ्या आणि त्यांच्या कलादालनाला पाहणाऱ्या व्यक्तींमध्ये काही महनीय व्यक्तींची नावे अशी –  पंडित जवाहरलाल नेहरू, बाबा आमटे, विनोबा भावे, शिवाजी भावे, लोकनायक जयप्रकाश नारायण, साने गुरुजी, अभिनेता दिलीपकुमार, बाबासाहेब पुरंदरे, एम.एफ. हुसेन, जगप्रसिद्ध मुर्तिकार राम सुतार, प्र.के. अत्रे, पु.ल. देशपांडे, धोंडो केशव कर्वे, ना.सी. व कमला फडके.

केकी मूस यांच्याकडे अनेकविध कला होत्या. ते जगप्रसिद्ध फोटोग्राफर होते. तरी त्यांच्याकडे वॉटर कलर पेंटिंग्ज, ऑईल कलर पेंटिंग्ज, क्ले मॉडेलिंग, ट्रिक फोटोग्राफी, वुड कार्विंग, ओरिगामी, शिल्पकला, कास्ट शिल्पकला, स्केचिंग, मूर्तिकला असा सर्व आविष्कार पाहताना केकी नामक अवलियाच्या दुनियेत कलाप्रेमी स्वत:ला हरवल्याशिवाय राहत नाही. केकींच्या रंगछटांमध्ये न्हाऊन निघताना वाटते, त्या कलादालनातच चिंब होऊन भिजत राहवे!

त्यांना मृत्यूची चाहूल लागली होती. म्हणूनच त्यांनी शहरातून प्लायवूड, फेविकॉल, बारीक चुना, सनमाईका मागवला. त्यांच्या सान्निध्यातील नेहमीचे सेवेकरी आणि ‘कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठान’चे विद्यमान अध्यक्ष भि.ज. गायकवाड, तर सेक्रेटरी क.अ. सामंत व प्रमुख विश्वस्त अ.भा. लोखंडे यांनी बाबुजींना या आणलेल्या साहित्याबाबत विचारणा केली. तेव्हा बाबुजींनी गंभीर होत धीरोदात्तपणे उत्तर दिले, की “तुमी लोक बी ना बस… आरे! आपलेला आज ना उद्या जग छोडाचा नाही का! मी तर ज्यानार, बाबा! माझे काम मी खतम केला, बघ. आता तेची बुलाव्याची वाट बघतो, म्हणून कोणाला बी तरास नको. माज्या कफन मीच बनवून ठेवते!”. बाबुजींची हिंमत आणि उद्गार ऐकून तिघांच्या काळजाचा ठोका चुकला होता. अवघ्या पंधरा दिवसांनी, ३१ डिसेंबर १९८९ रोजी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बाबुजींना त्या कफनचा आधार घ्यावा लागला.

बाबुजी म्हणायचे, जी लपली आहे ती खरी कला आहे (‘आर्ट इज इन कन्सीलिंग द आर्ट’). आज आम्ही म्हणतो की बाबुजी, तुम्ही कोठे लपला आहात?

– भुरन घुले

व्यवस्थापक, श्रीमती पिरोजा माणेकजी मूस आर्ट गॅलरी
अँड कल्चरल सेंटर ट्रस्ट, चाळीसगाव, जि. जळगाव

2 COMMENTS

  1. खरच छान लेख माहिती करून…
    खरच छान लेख माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद केकी मूस यांच्या बद्दल आणखी सविस्तर माहिती लिहायला हवे

Comments are closed.