करवंटीपासून कलाकृती – सुनील मोरे यांचे कसब

1
36
_Sunil_More_1.jpg

धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा येथील सुनील मोरे या उपक्रमशील शिक्षकाने त्याच्या हस्तकौशल्यातून नारळाच्या टाकाऊ भागातून एकापेक्षा एक असे सुंदर कलाविष्कार घडवले आहेत. मोरे यांनी तयार केलेल्या कलाकृती कलाप्रेमींच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे.

मोरे प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांना पर्यावरणाचे निसर्गाच्या अधिक जवळ जाऊन रक्षण करावे असे वाटायचे. त्यातच ते पर्यटनाच्या निमित्ताने सिंधुदुर्गात दहा वर्षांपूर्वी गेले होते. तेथे लाकडापासून, शंख-शिंपले यांपासून तयार केलेल्या कलावस्तू काही स्टॉल्सवर त्यांच्या नजरेस पडल्या. त्यांना शहाळ्यापासून तयार केलेल्या काही सुबक वस्तूही दिसल्या. त्यांनी शिंदखेड्यास परतल्यावर स्वयंप्रेरणेने, इच्छाशक्तीच्या जोरावर करवंटीच्या कलावस्तू बनवणे सुरू केले. त्यांनी दहा वर्षांत एक हजाराहून अधिक सुरेख कलाकृती साकारल्या आहेत.

_Sunil_More_2.jpgते सांगतात, की नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हणतात. त्या कल्पवृक्षाचे फळ म्हणजे नारळ-नारिकेल किंवा त्याला श्रीफळ असेही म्हणतात. नारळ म्हणजे सर्व शुभकार्याचा महामंगल स्रोत; नारळाचा उपयोग धार्मिक विधी, सण, उत्सव, पूजा, सत्कार-समारंभात केला जातो. देवापुढे श्रद्धा मनात ठेवून नारळ फोडला जातो. त्याचप्रमाणे नारळ स्वयंपाकघरातही हमखास हवा असतो. परंतु त्यात खोबऱ्यावरील कठीण कवच-आवरण म्हणजे करवंटी निरुपयोगी, म्हणून टाकून दिली जाते. श्रद्धेने देवाला फोडलेल्या नारळाच्या करवंट्या उकिरडे, गटारे यांत पडलेल्या दिसतात. त्याच करवंटीत सौंदर्य शोधून पर्यावरणाचे ऋण फेडण्यासाठी हा प्रयत्न आहे असे मोरे म्हणतात. त्यांनी ‘पुनर्वापर निसर्ग साधनसंपत्तीचा – मंत्र पर्यावरणरक्षणाचा’ हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून केवळ मन, मनगट आणि मेंदू यांच्या समन्वयातून सुरेख, आकर्षक आणि अल्पखर्चिक कलाकृतींची निर्मिती केली आहे. त्यांच्या या उपक्रमाची कला-कार्यानुभव या विषयांतर्गत शालेय शिक्षण विभागामार्फत ‘शिक्षणाची वारी’त गेल्या वर्षी निवड झाली. राज्यातील सर्वाधिक कलाप्रेमींनी भेट दिलेला व सर्वाधिक पसंतीचा उपक्रम म्हणून त्याची नोंद शासन स्तरावर घेतली गेली आहे.

मोरे यांना त्यात रोजगाराचेदेखील माध्यम दिसते. म्हणून त्यांनी शाळा, महाविद्यालये, शिक्षण महोत्सव, कला मेळावे, स्वयंसहायता बचत गट, राष्ट्रीय सेवा योजना अशा ठिकाणी कार्यशाळा घेऊन सातशे कलाप्रेमींना या कसबात प्रशिक्षित केले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना देखील कला-कार्यानुभवाच्या तासिकेत करवंटी कशी कापावी, घासून गुळगुळीत कशी करावी, चिकटवण्याची पद्धत आणि रंगवण्याचे कौशल्य रुजवले आहे.

प्राथमिक शिक्षण अभ्याक्रमात कलेतून शिक्षण, कलेचे शिक्षण आणि कला हेच शिक्षण ही त्रिसूत्री जोपासण्यावर भर दिला गेलेला आहे. शिक्षणाचा पाया म्हणून कलाशिक्षणाकडे पाहिले जाते. मोरे त्यांच्या विद्यार्थ्यांचा विकास सर्वांगीण व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत.

_Sunil_More_3.jpgकलाकृती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे नारळाच्या करवंट्या. त्या परिसरात सहज उपलब्ध होतात. म्हणून हा उपक्रम पूर्णपणे पर्यावरणस्नेही आहे असे ते आग्रहाने सांगतात. ते परिसरातील मंदिरे, धार्मिक स्थळे इत्यादी ठिकाणांहून फावल्या वेळात करवंट्या गोळा करतात. ते करवंटी कापण्यासाठी हॅक्सॉ ब्लेड, घासण्यासाठी पॉलिश पेपर, चिकटवण्यासाठी एम-सील व रंगवण्यासाठी ऑइल पेंट यांचा वापर करतात. त्यांनी एक कलाकृती तयार करण्यासाठी वीस ते चाळीस रुपये इतका खर्च येतो असे सांगितले. ते तयार कलाकृतीचे बाजारमूल्य दीडशे ते दोनशे रुपये असू शकते असे म्हणाले. महत्त्वाची गोष्ट ही, की छंद हे माणसाला आयुष्यावर प्रेम करण्यास शिकवतात, म्हणून प्रत्येकाने कोणता तरी छंद जोपासावा असे ते आवर्जून सांगतात.

सुनील मोरे यांनी त्यांच्या हस्तकलाकृतींचे प्रदर्शन त्यांच्या निवासस्थानी मांडले आहे.

– सुनिल मोरे 9604646100, sunilmore751@gmail.com
‘कल्पवृक्ष’, प्लॉट नं १० जाधवनगर, शिंदखेडा, जि. धुळे

– नितेश शिंदे  info@thinkmaharashtra.com

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here