कबिरानुभूती (Living With Saint Kabir)

0
29

 

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक णि कायदा ह्यामुळे देशातील वातावरण तापले होते. कोरोनामुळे तो मुद्दा थोडा बाजूला पडला आहे. मुस्लिम बांधवांचा सूर नागरिकत्व कायद्याबद्दल नकारात्मक जाणवतो. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना रुजली आहे का? तशातच काही मुस्लिम तसेच हिंदुत्ववादी नेते भडकाऊ भाषणे करत असतात. देशांतर्गत हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये तणावाचे चित्र दिसते. दिल्लीत जामिया मिलिया येथे आंदोलनाच्या ठिकाणी, गांधी पुण्यतिथीचे औचित्य साधून एका हिंदुत्ववादी तरुणाने केलेला गोळीबार, बंगलोरमध्ये ओवेसींच्या सभेत पाकिस्तान समर्थनार्थ एका मुस्लिम युवतीने केलेली घोषणाबाजी, गुलबर्ग्यात नागरिकत्व कायद्याच्या विरोधाच्या निमित्ताने  चिथावणीसदृश झालेले भाषण इत्यादी घटनांनी त्यावेळी मन विषण्ण झाले होते. धर्माच्या मुद्यावरून आपसांत भेद करून भारतीय समाज कट्टरतावादाकडे झुकत आहे का?असे काही प्रश्न मनात असतानाच उत्तर प्रदेशात संत कबीरनगर जिल्ह्यात (पूर्वाश्रमीचे खलिलाबाद) संत कबीरांचा मृत्यू जेथे झाला, त्या मगहर क्षेत्रात जाण्याचा योग आला. त्या निमित्ताने त्यांच्या जीवन चरित्रात थोडा डोकावलोही; आणि मग तीव्रपणे वाटले, की आज, कबीरांसारख्या माणसांची नितांत आवश्यकता आहे!
संत कबीर दास हे एक असे व्यक्तिमत्त्व होते, की ज्यांना हिंदू आणि मुस्लिम, दोन्ही बांधव मानत असत. कबीरांचा जन्म मुस्लिम की हिंदू कुटुंबात झाला ह्याची निश्चित माहिती नाही. मात्र कबीरांचा सांभाळ निरू आणि निमा ह्या, विणकाम करणाऱ्या मुस्लिम जोडप्याने केला. कबीरांचे दोहे वाचले, की जाणवते, कबीर हे मानवता ह्याच धर्माबाबत आग्रही होते. ते हिंदू, मुस्लिम ह्या दोन्ही धर्मातील कर्मकांडाच्या विरुद्ध होते. कबीरांच्या दोन ओळी फार  उद्बोधक आहेत : ‘मोको कहा ढूँढे बंदे, मैं तो तेरे पास में न मै देवल, न मै मस्जिद, न काबे कैलास में . . .  कबीरांच्या मृत्यूबाबतदेखील मगहरमध्ये एक कथा प्रचलित आहे. तीच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह वाटते, पण कथा रंजक आहे. कबीरांच्या मृत्यूनंतर, हिंदू आणि मुस्लिम असे दोन्ही पक्ष कबीर आमचेच म्हणून त्यांच्या देहाचे अंतिम संस्कार त्यांच्या धर्मानुसार करण्यासाठी आग्रही होते. हिंदूंना कबीरांच्या देहास अग्नी द्यायचा होता, मुस्लिमांना देह दफन करायचा होता. त्यातच, त्यांच्या देहावरील चादर ओढली असता, पाहिले तर तेथे देह नव्हताच; त्याऐवजी तेथे केवळ फुले उरलेली! शेवटी, दोन्ही पक्ष ती फुले आपसांत वाटून घेऊन शांत झाले आणि त्यामुळेच कबीरांच्या ह्या परिनिर्वाण स्थळी दोन्ही पक्षांनी समाधी आणि मजार अशा दोन वास्तूंची निर्मिती केली आहे. कबीर शेवटी कोणाचेच झाले नाहीत; अगदी आयुष्यभर जसे राहिले तसेच मृत्यूनंतरही लोकांच्या स्मरणात राहिले.
काही लिखाणांत असे नमूद आहे, की कबीरांचे अंतिम संस्कार मुस्लिम धर्मानुसार  झाले. मात्रकबीरपंथीयांकडून आणि अभ्यासकांकडून अधिकृत माहिती मिळाली नाही. मगहरचा प्रदेश हा प्रांत पूर्व उत्तरप्रदेशात बुद्धाशी जोडल्या गेलेल्या पावन स्थळांना (जसे कुशीनगर, कपिलवस्तू लुम्बिनी) जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावर आहे. तसातो गोरखनाथ आणि अयोध्या यांनाही जोडून आहे. त्यामुळे वाटसरूंची, यात्रेकरूंची अव्याहत, रेलचेल त्या मार्गावर प्राचीन काळापासूनच असते. वाटसरूंवर क्वचित लुटारूंचे हल्ले झाल्याचेही ऐकण्यास मिळते. कबीर नेमके येथे आले कधी आणि कसे ह्याविषयी जे सांगण्यात येते ते ऐकल्यावर कबीरांच्या महानतेची प्रचीती येते. कबीर मुळात काशीचे. ते हिंदू धर्माच्या दृष्टीने पवित्र ठिकाण. हिंदुधर्मीय त्यांच्या अखेरच्या काळात मोक्ष मिळण्यासाठी काशीकडे पाचारण करतात. परंतु कबीर त्यांच्या अखेरच्या काळात मगहर प्रांतात जाणीवपूर्वक आले होते. अशी एक लोकधारणा आहे, की मगहरमध्ये मृत्यू पावलेली व्यक्ती नरकात जाते, तिला स्वर्गाचे दरवाजे बंद असतात. कबीर यांना नरकगमनाच्या लोकांच्या धारणेस फाटा द्यायचा होता. कबीर आयुष्यभर धर्मनिरपेक्षतेचा प्रसार करत राहिले; अंधश्रद्धा, कर्मकांड ह्या गोष्टींचा विरोध करत राहिले. त्यांनी त्यांच्या जगण्यातूनदेखील तोच संदेश दिला. कबीरांचा मृत्यू जेथे झाला ती जागा हिंदू आणि मुस्लिम,दोन्ही समाजांसाठी पवित्र स्थळ म्हणून  मानली जाते. ते स्थळ लहानशा आमी नदीवर वसलेले हे. ते गोरखपूरपासून तीस किलोमीटर आणि लखनपासून दोनशे किलोमीटर दूर आहे. आज आमी नदीचे पात्र बऱ्यापैकी अरुंद  झालेले आहे. नदीपात्रातल पाणी काळसर रंगाचे दिसून आले. बहुधा ते प्रदुषित असावे. आमी नदी पुढे जाऊन राप्ती नदीला मिळते.
कबीरस्थळी गेल्यावर, सुरवातीलाच कबीरांची कांस्यमूर्ती आहे. कबीरस्थळाचे एकूण क्षेत्र जवळपास सत्तावीस एकराचे आहे. त्यातील मुख्य जागा म्हणजे त्यांची समाधी (हिंदू धर्मानुसार) आणि मजार ( मुस्लिम धर्मियानुसार). त्या दोन्ही वास्तू शेजारी शेजारी  उभारलेल्या आहेत. मंदिरात समाधी आहे आणि घुमटासदृश वास्तूत मजार आहे. राम जन्मभूमीवरून गेली  कित्येक वर्षे चिघळलेला वाद, संघर्ष, दोन्ही धर्मियांकडून दाखवली जाणारी कट्टरता ह्या बाबींचा विचार केल्यास येल समाधिमंदिर आणि मजार यांच्या लगोलग वसलेल्या स्थितीचे महत्त्व अनन्यसाधारण वाटते. हिंदू आणि मुस्लिम वर्षानुवर्षें येथे कबिरांच्याप्रती नतमस्तक होतात, अगदी शेजारी शेजारी. हिंदू-मुस्लिम ऐक्यास पुढाकार देणारी सकारात्मक जागा असेच तिचे वर्णन करता येईल. समाधिमंदिरात ठिकठिकाणी कबिरांचे दोहे भिंतींवर लिहिलेले आहेत. दोह्याची रचना सरळ, साधी, पण अर्थपूर्ण अशी आहे. त्यातल गहनतेविषयी विचार केल्यास कबिरांच्या कवित्वाविषयी मनोमन आदर वाटतो. कबिरांच्या मूळ रचना प्रामुख्याने तीन भागांत वर्गीकृत होतात – बीजक, ग्रंथावली आणि साखी. त्या रचनांची पुस्तके समाधिमंदिराच्या आवारात एका कोपऱ्यात मिळतात. समाधीच्या तुलनेत, मजारची अवस्था बिकट दिसते. कबीरपंथीय महंतांचे आवास समाधिमंदिर आवारातच हे. लोकांची रेलचेल ते दिसून येते. मजारच्या आवारात मात्र देखरेख करणारा शिपाई वगळता इतर काही नसल्याचे दिसून आले. समाधिस्थळाच्या बरोबर मागे कबीरगुफा आहे. असे सांगण्यात येते, की त्या गुफेतच कबीर ध्यानास बसत. आधी ती गुफा कच्ची असावी,. ी ति काँक्रिटीकरण करून पक्की बनवली गेली आहे. तेथे कबीरपंथीय महंतांद्वारे सेवा संस्था कार्यरत आहे. त्या संस्थद्वारे अनाथालय, शाळा आणि महाविद्यालये चालू आहेत; तसेच, आसपासच्या निवडक गावांत समाजकार्यदेखील होते. मध्यंतरी संस्थतर्फे परिनिर्वाण स्थळाच्या आवारात स्वास्थ्य शिबिराचे आयोजन केले गेले होते. त्यासाठी पुण्यातील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमधून डॉक्टरांचे पथक आले होते. कबीर परिनिर्वाण स्थळ आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे बनावे अशी शास्त्रज्ञ अब्दुल कलाम यांनी इच्छा व्यक्त केली होती असे मला सांगितले गेले. आवारात एके ठिकाणी रसोई आणि यात्री निवासाचे बांधकाम सुरू असल्याचे कळले. त्या स्थळाचा विकास होईल आणि व्हावाच. कारण आजच्या परिस्थितीत कबिरांच्या विचारसरणीचा, त्यांच्या उपदेशाचा प्रसार होणे गरजेचे आहे. धर्मावर आधारित द्वेषास कमी करण्यास त्याची निश्चित मदत होईल. त्या स्थळी आल्यावर सहिष्णता वाढेल, मानवता हाच एक प्रमुख धर्म आहे ही भावना वृद्धिंगत होण्यास मदत होईल. दिल्लीत अशोकनगर भागात सहा महिन्यांपूर्वी कडव्या हिंदुत्ववादी लोकांनी मशिदीला आग लावून ती द्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. अशा घटना दोन्ही बाजूंनी वाढत आहेत. कडवे हिंदू आणि कडवे मुस्लीम आम जनांना भडकावत असतात. उलट, आम जन गेली दोन-तीन हजार वर्षें भारतभूमीत सौहार्दाने राहत आले आहेत. सद्यकाळात हिंदू आणि मुस्लिम, दोन्ही समाजांनी विवेक आणि संयम दाखवून, कबिरांचे स्मरण करण्ास हवे.
 आज जर कबीर असते तर ते हेच म्हणाले असते :  कासी काबा एक है, एकै राम रहीम मैदाइक, पक्वान्न बहु बैठि कबीरा जीम.|
संदीप चव्हाण drsandeep85@gmail.com
संदीप चव्हाण यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून पदव्यूत्तर शिक्षण घेतले आहे. ते टाटा ट्रस्टमध्ये कार्यरत आहेत. ते उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेलगतच्या गोरखपूर भागात बालमृत्यू कमी करण्यासासंबंधीच्या कामानिमित्त गोरखपूरमध्ये स्थित आहेत. 
————————————————————————————————————————————

About Post Author

Previous articleलेखक समीक्षकांच्या वेबसाईट्स थिंक महाराष्ट्रचा नवा उपक्रम (Marathi Writers Critic on Web!)
Next articleइस्लामी राष्ट्रांतील गणपती (Ganesh Worship, Worldover)
संदीप चव्हाण यांनी ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थे’तून ‘आरोग्यसेवांचे व्यवस्थापन’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी देशात विविध राज्यांतील दुर्गम भागात संस्थात्मक पातळीवर प्राथमिक आरोग्य सेवा, माता-बाल आरोग्य, मानसिक आरोग्य ह्या क्षेत्रात कार्य केले आहे. ते ‘सहजकर्ता प्रतिष्ठान’ त्यांच्या गावी- वाणेवाडी (तालुका बारामती) येथे चालवतात. प्रतिष्ठान तर्फे मानसिक आरोग्य संवर्धनाचे कार्य चालते- अभ्यासिका आहे. संदीप यांना इतिहास निरीक्षण, दुर्ग भ्रमंती, सायकल भटकंती, खाद्य व लोकसंस्कृतीचा अभ्यास असे छंद आहेत. त्यांचे वास्तव्य पुण्याला असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here