औषधी वनस्पती – वाळा(Vetiver)

महाकवी कालिदासाच्या शाकुंतल नाटकातील नायक म्हणतो, ‘कामज्वर आणि उन्हाच्या तापाने पीडलेल्या माझ्या प्रेयसीने अंगाची लाही कमी करण्यासाठी वाळ्याचा शीतल लेप लावला आहे. वाळ्याचे संस्कृत नाव ‘उशीर’ म्हणजे उष्णतेचा त्रास कमी करणारा असे आहे. (स्तनन्यस्तोशीरं शिथिलितमृणालैकवलयं| प्रियाया: साबाधं किमपि कमनीयं वपुरिदम्||)

वाळा प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. तो गवताचा एक प्रकार आहे. जमिनीची धूप होऊ नये म्हणून वाळ्याची लागवड करतात. वाळा हलक्या जमिनीत, डोंगरउतारावर लावतात.

वाळ्याची मुळे जमिनीखाली खोलवर रुतलेली असतात. त्यांची घट्ट अशी वीण तयार होते. ती मुळे मातीतील सुगंधी द्रव्ये शोषून घेतात. वाळ्यामध्ये जमिनीच्या सुगंधी तत्त्वांचा अर्क उतरला आहे. ते सुगंधी तेलच त्यातील कार्यकारी तत्त्व आहे. वाळ्यामध्ये तहान भागवण्याची क्षमताही अधिक आहे. पाण्याला जेवढी नावे आयुर्वेदात आहेत, ती सर्व वाळ्यालाही आहेत! वाळा कफनाशक, पित्तशामक, थंड व पाचक आहे. वाळा ताप, उलटी, तहान, विषबाधा, व्रण, लघवीची जळजळ हे विकार दूर करू शकतो.

हे ही लेख वाचा – 
कयाधू नदीकाठावर निसर्ग बहरला
दुर्वा
आघाडा – औषधी वनस्पती

वाळ्याची जुडी पिण्याच्या पाण्यात रात्री टाकून ठेवावी. त्याने पाण्याला सुगंध लाभतो व चव येते. जुडी काढून दिवसभर सावलीत झाकून ठेवावी. परत रात्री पाण्यात टाकावी. वाळ्याची जुडी साधारण आठवडाभर टिकते.
वाळ्याची जुडी किंवा चूर्ण पाण्यात भिजवून आंघोळीच्या वेळेस पायाच्या भेगा, हाताचे कोपरे व रापलेली त्वचा यांवर चोळावे. तेथे साठलेली घाण, मृतपेशी साफ होतात व त्वचा मऊ पडते. वाळा हा विषनाषक व जंतुनाशक असल्यामुळे त्वचारोग दूर करतो. वाळ्याचे चूर्ण अंगाला चोळल्याने अतिस्वेद, दुर्गंधी व मेद नाहीसा होतो. वाळा स्त्रियांमधील संप्रेरकांचे (हार्मोन्सचे) संतुलन राखण्यास मदत करतो.

वाळ्याच्या सुगंधी तत्त्वाला उर्दूत ‘रुह’ असे म्हणतात. त्याचे सरबत शामक व शीतल असते.