ए.के. शेख – एक तपस्वी मराठी गझलकार

-a.k.-shaikh

गझल ही मुळात माणसाच्या अंत:करणाची बोली आहे. प्रेषित सुलेमान यांनी गझल-गझलात गायले; म्हणजे गझलला अरबी भाषेत प्रथम शब्दरूप मिळाले. पण ती अरबी भाषेत विकसित झाली नाही. ती जेव्हा अरबीतून फारशी भाषेत आली तेव्हा तिचा विकास झाला. कारण रूदकीने गझलचे छंदशास्त्र निर्माण केले. गझल ही मग मोगलांबरोबर भारतात आली. सूफी संत अमीर खुसरो यांनी फारसी आणि ब्रज या भाषांचा उपयोग करून ‘सखी पिया को जो न देखूं तो कैसे काटू अंधेरी रतिया’ लिहिली, मग सुलतान कुली कुतुबशाह यांनी गझलला हिंदुस्थानी रंगात ‘पियाबाज प्याला पिया जाये ना’ अशी रंगवली. मग वली दखनी यांनी दखनी भाषेत ‘जिसे इश्क का तीर काही लगे उसे जिंदगी क्यों न भारी लगे’ अशी गझल लिहिली. गझल दखनी भाषेतून उर्दूत आली. तिचा बोलबाला राजाश्रयामुळे होऊन विकास झाला. नंतर, गझल इतर प्रादेशिक भाषांबरोबर मराठी भाषेतही आली. अमृतराय आणि मोरोपंत यांनी मराठी गझललेखनाचा शुभारंभ केला.

मला मानवी जीवनाच्या अनुभूतीतून अभिव्यक्त झालेली गझल एक कविता म्हणून आवडते. ए.के. शेख हा गोड गळ्याचा गोड माणूस आहे. ऋजू, प्रसन्न, हसतमुख ए.के. शेख बोलले तरी संगीतवाद्ये झंकारत आहेत असे वाटते. त्यांच्या मराठी गझला अनेक प्रातिनिधिक गझलसंग्रहात समाविष्ट आहेत. साहित्य अकादमीने प्रसिद्ध केलेल्या प्रातिनिधिक गझलसंग्रहातही त्यांच्या काही गझलांचा समावेश करण्यात आलेला आहे, हे विशेष आहे.

ए.के. शेख तिसऱ्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या ‘अमृताची पालखी’त ‘अ’पासून ‘ज्ञ’पर्यंतची सगळी मुळाक्षरे रदीफ आणि काफिया यांच्या स्वरूपात घेऊन त्यावर गझलांची रचना केलेली असल्यामुळे तो मराठीतील पहिला दिवान ठरतो. म्हणजे मराठी गझलांचा पहिलावहिला दिवान लिहिण्याचा बहुमान ए.के. शेख यांना मिळालेला आहे. ए.के. शेख यांच्या गझलरचनेने छंद अथवा वृत्त यांची वेशभूषा केलेली असली तरी ती अकृत्रिम असल्याने ती बांधेसूद, जातिवंत व काव्यात्म झालेली आहे. ए.के. शेख हे मराठी गझलचे एक ‘स्कूल’च चालवतात, म्हणा ना! त्यांच्या गझल स्कूलमधून बाहेर पडलेले फातिमा मुझावर, प्रमोद खराडे, रमेश सरकाटे, रोहिदास पोटे, ज्योत्स्ना रजपूत, छाया गोबारी, जनार्दन म्हात्रे यांसारखे काही विद्यार्थी दमदार गझला लिहीत आहेत.

शेख यांचा मराठी गझलसंग्रह ‘अमृताची पालखी’चा आस्वाद घेतल्यानंतर माझ्या अंत:करणाला प्रकर्षाने असे जाणवले, की शेख यांचे कोमल, हळवे व्यक्तिमत्व गझलेने पुरते वेडे झालेले आहे. त्यांनी ‘सखी’सारख्या गझलसाठी आणि गझलसारख्या सखीसाठी प्रार्थनेसह साधना अन् वेदना यांचा अवकाळी पाऊस अंगावर झेलून खुदाची याचना केलेली आहे; तेव्हा कोठे ‘गझलसखी’ त्यांना प्राप्त झालेली आहे. ए.के. शेख यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रेम, जिव्हाळा आणि माणुसकी मुरलेली आहे. तुम्ही प्रेम कशावरही करा ते जर मनापासून असेल तर ते आंधळे होत जाते. प्रेमाने आंधळे झालेल्यांना बाकी काही दिसत नसते. ‘प्रेम एके प्रेम’; अगदी तसेच, ‘गझल एके गझल’ होऊन जात असते! म्हणून तर अलौकिक यातनांची शांतिपूर्ण सुखात्म चैतन्याची पालखी अमृतमयी अक्षरांतून निघू शकते. गझलेच्या तपश्चर्येशिवाय गझलेची पालखी निघणे जसे शक्य नसते तसे गझलेचे ‘स्कूल’ सुरू होणेही शक्य नसते. म्हणून ए.के. शेख ‘राहिले रे अजून श्वास किती’ या गझलेतून असा विश्वास व्यक्त करतात, की ‘गझल देई नित्य रोज नवे, वाल्मिकी, व्यास, कालिदास किती’
कवीचा तो विश्वास फळाला आलेला आहे. म्हणून गझलचे वाल्मिकी, व्यास आणि कालिदास निर्माण होत आहेत. साहित्य संमेलनातही स्वतंत्र गझल संमेलन घेतले जात आहे. त्याचा अर्थ असा आहे, की मराठी गझल तिचे पाय मराठी मातीत घट्ट रोवून उभी आहे. त्यात ए.के. शेख यांचा वाटा मोलाचा आहे. कारण गझल लिहिणे हे त्यांच्या जगण्याच्या अनेक प्रयोजनांपैकी एक प्रयोजन आहे. ‘काही न मिळवले मी बस गझल लिहित गेलो’, ‘शब्दांशी खेळत जगणे श्वासांनी कोरून लिहिणे’, ‘साद आली साजणीची गझल मी छेडली’… सखी हा त्यांच्या जगण्याचा अपरिहार्य असा आधार आहे. म्हणून त्यांनी गझलमधून गझल म्हणजे काय असते? याचा काव्यात्म ऊहापोह केलेला आहे.

अमृताची अक्षयाची अक्षरांची पालखी
गझल म्हणजे गच्च ओल्या भावनांची पालखी
ताजसम पृथ्वीवरी या आठवे आश्चर्य ती
गझल म्हणजे तर अलौकीक वेदनांची पालखी
हीर रांझा कृष्ण राधा मजनु लैला तर कधी
गझल मीरेच्या मनातिल यातनांची पालखी
वेद रामायण महाभारत महाकाव्यातली
गझल शांतीची सुखाची चेतनांची पालखी
श्रावणाचा मास वासंतिक बहर वर्षा ऋतू
गझल एके उत्सवांची अन् सणांची पालखी

ए.के. शेख यांच्या गझलांमध्ये सखीचा होकार असला- नसला, तरी त्यांच्या मनात संवाद हा सतत चालू राहतो आणि त्या संवादातून आल्हाददायक गझल आकाराला येत असते. ए.के. शेख होकारासह नकारालाही बोलका करत असतात. अमृताच्या पालखीवर त्यांनी काळजाच्या अक्षरांनी सखीच्या भावविभ्रमांची नक्षी कोरलेली आहे, ती कोणत्याही रसिक मनाला भुरळ घालून खिळवून ठेवते. कारण कवीच्या सखीत रसिक त्याची सखी न्याहाळत असतो. त्याने जो संवाद तेव्हा केला नव्हता तो आता मनातील मनात करून घेत असतो. कारण सखीच्या भावविभ्रमांची ती हिरवळ, रसिकांच्या हिरवळीशी समांतर जात असते.

शेख यांच्या गजलांत सखा-सखीचे राज्य असले तरी त्या राज्यात आईबापही राहतात. समाज नावाने ओळखली जाणारी प्रजाही राहते. त्या राज्यात ईश्वराचेही अस्तित्व असते. गझलकार हा शेवटी एक माणूस असतो, म्हणून त्याचेही माणूस म्हणून स्वतंत्र जगणे असते, जगण्याच्या अनुभवातून केलेले एक चिंतन असते. त्या राज्यात माणसाच्या ईश्वरासोबत धर्माचेही अस्तित्व असते. त्या सर्वांची काही अक्षररूपे ‘अमृताच्या पालखी’त रेखाटलेली आहेत.

ए.के. शेख यांचा जन्म खेड्यातील असल्याने त्यांचा मन:पिंड थेट माणसाचा आहे. ते मृदू स्वभावी आहेत. त्यांच्यात बळ आहे पण ते बलवान नाहीत. त्यांच्याकडे गरजेपुरते धन आहे पण ते धनवान नाहीत. म्हणजे ते एक सर्वसामान्य, सरळ, प्रतिभावान माणूस आहेत. त्यांनी जी मानवी जीवनातील विद्रुपता अनुभवली, स्वतःचे असह्यपण अनुभवले तेव्हा ते अंतर्बाह्य हादरले आहेत, गर्भगळीत झाले आहेत. अशा वेळी ते कविमन मानवी कळवळ्याने दयाळू, कृपाळू ईश्वराची प्रार्थना करते-

सदाचार संकल्प संकल्पना दे,
जगी चांगले तेच आमुच्या मना दे
हळुवार उठतात सुख दुःख लहरी,
तया जाणण्या तूच संवेदना दे
उपेक्षित नजरेस दे तू दयाही,
समृद्धी सद्भाव सद्भावना दे
मुलांना मुलींना कळ्यांना फुलांना
फुलू दे झुलू दे नवी चेतना दे
असू दे कृपाछत्र माता-पित्याचे
जिव्हाळा लळा ओढ करुणाघना दे
कधी मागतो मी फुलांची गावे
सुगंधात भिजवून दे वेदना दे|

शेख यांनी त्यांच्या इतर प्रार्थनांमधून करुणाघनाकडे सर्व जिवांचा जीवनमार्ग सुखकर होण्याची याचना केलेली आहे.

ए.के. शेख यांचे मुस्लिम मन ‘आम्हा जरा जगू द्या, आम्हा जरा हसू द्या’, ‘महिन्याच्या उपवासानंतर येते ईद’, ‘माझ्याकडून कोठला घडला असा प्रमाद’, ‘झोपलेली माणसे अन् शहरसुद्धा, निष्पाप लेकरांचा आक्रोश पाहवेना’ आणि ‘गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय’ या ‘अमृताची पालखी’तील गझलांतून साकार झालेले आहे. तसेच, ‘आनंद सौख्य देऊनी रमजान महिना चालला’, ‘थकल्या जीवाला आता आल्हाद तूच व्हावे’, ‘जगतात माणसाने कीर्ती करुनी जावे’ या रचनांचाही विचार त्या सदरात करावा लागणार आहे. ए.के. शेख यांनी त्यांच्या गझलांमधून त्यांचे गझलप्रेम सांगताना, त्यांचे सखी प्रेम सांगताना, जीवन प्रेम सांगताना, त्यांचे भक्ती प्रेम सांगताना, अथवा त्यांचे मुस्लिम मन व्यक्त करताना कोठेही तीव्र स्वर लावलेला नाही. ते सतत मध्यम कोमल स्वरात जगतात, वागतात, बोलतात आणि लिहितात.

आम्हाला जरा जगू द्या आम्हाला जरा हसू द्या
वाळीत टाकलेल्या या जीवना फुलू द्या
सोसून खूप झाले भोगून खूप झाले
आनंद जीवनाचा मनमोकळा लुटू द्या
डोळ्यातली सरू द्या करुणा घृणा उपेक्षा
स्वप्नास द्या दिलासा संवेदना सजू द्या
धन्वंतरी जगाचा काढेल मार्ग काही
विश्वास आमुच्या हा प्राणामध्ये रुजू द्या
द्या प्रेम प्रेमळाचे द्या मानवी जिव्हाळा
इतुकेच मागणे हे जन्मास सावरू द्या

भारताची फाळणी झाली. ती कोणी केली? ज्याची त्याची उत्तरे वेगवेगळी आहेत. भारताचा इतिहास लिहिणारेही त्यांच्या त्यांच्या सोयीचे लिहितात आणि गैरसोयीचे लपवतात. त्यामुळे भारतात राहिलेला मुस्लिम समाज फाळणीनंतर नेतृत्वहीन झाला. त्याला हिंदुराष्ट्र निर्मितीसाठी बळीचा बकरा करण्यात आले. भारतातील संमिश्र संस्कृती मागे टाकण्यात आली. धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी माणूसकेंद्री राज्यघटनेचा मुख्य राष्ट्रीय प्रवाह निर्माण करण्याचा जोरकस प्रयत्न कोणत्याही राजकीय पक्षाने केला नाही. उलट, हिंदू संस्कृती, हिंदू धर्म यांना बहुसंख्यांकांच्या नावाखाली मुख्य राजकीय प्रवाह म्हटले जाऊ लागले.

भारतीय मुस्लिम समाज हा देशातील बहुजन समाजाचे एक अभिन्न अंग आहे. त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न बहुजन समाजापेक्षा वेगळे नाहीत. त्यांचे वेगळेपण केवळ प्रार्थनेतील आहे. त्यांचे केवळ बकरी ईद आणि रमजान हे दोनच सार्वत्रिक सण आहेत. बाकीचे सण स्थानिक प्रदेशाच्या संस्कृतीनुसार थोडेफार बदल करून साजरे केले जातात. रमजानच्या उपवासातून अन्नाचे महत्त्व आणि पाण्याचे महत्त्व अनुभवाला येते. त्या पवित्र महिन्यात जकात, फितरा आणि सदका या नावाखाली गोरगरिबांना श्रीमंतांच्या संपत्तीतील वाटा दिल्याने माणुसकीचा स्रोत निर्माण होतो. उपवासानंतर येणारी रमजान ईद सगळेच आनंदाने साजरी करतात. असा मुस्लिम माणूस स्वतःच्या स्थिती-गतीविषयी मनातील काही बोलला तर त्याच्यावर तर्कवितर्काने आरोप केले जातात. त्याच्या बोलण्यात नसलेले अर्थ काढून प्रवाद उठवले जातात. दोन माणसांतील प्रश्न दोघांत सुटत असले तरी त्या प्रश्नांसाठी लवाद नेमले जातात. जसे कापडाला एक लहानसे छिद्र पडलेले असले तरी त्या छिद्राला मोठे करून छिद्रान्वेषी दृष्टीने वैयक्तिक प्रश्न सामाजिक केले जातात. तेव्हा मुस्लिम माणसाने कितीही कळवळून वास्तव सांगितले, तरी त्या वास्तवाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते. ते सगळे एका व्यापक षड्यंत्राचा भाग असते. पण तसे ते अजिबात भासवले जात नाही. उलट, मात्र खाण्याची कितीही तयारी केली, तरी त्यातूनदेखील नवे वाद कावेबाजपणाने निर्माण केले जातात. तेव्हा शहरेही झोपलेली असतात आणि माणसेही झोपलेली असतात, पण जेव्हा त्या नवनव्या वादांतून कुरापत काढून दंगल घडवली जाते अन् ती उत्स्फूर्त असल्याचे परत परत ‘खोटे बोल पण रेटून बोल’प्रमाणे बोलले जाते तेव्हा माणसे आणि माणसांतील माणुसकी संपलेली असते. अन् शहरसुद्धा संपलेले असते. कारण सुन्नता थकल्या मनाने माणसांसकट शहरही पाय ओढत ओढत चालू लागते. माणसे भल्याबुऱ्या अफवांच्या कारंज्यांनी शहरासह गंजून जातात. माणसांबरोबर शहरेही सूड आणि बदला घेण्याच्या खुळ्या ओझ्याने वाकलेली दिसतात. एवढे इतके होऊनदेखील, येथील शहरी माणसे दंगलीनंतर मात्र प्रेम, माणुसकी आणि जिव्हाळा यांच्या आंतरिक ओढीने परस्परांशी बांधली जातात. तो भारतीय संमिश्र संस्कृतीचा विजय असतो. पण त्या विषयी भले भलेही का बरे बोलत नसावेत?

-a.k.-shaikh.-photoभारतात आणि भारतीय उपखंडात द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताने हिंदू-मुस्लिम समाजाची पुरती वाट लावलेली आहे. तरीदेखील भारतीय राजकारण त्याच दिशेने प्रवास करत आहे. त्यामुळे नागरिकांना माया, जिव्हाळा, दयायुक्त जो धर्म आहे तोच पायदळी तुडवला जात आहे. धर्मांधांच्या विखारी जोशामुळे निष्पाप लेकरे आक्रोशत आहेत. त्यांच्या नाऱ्यांनी आणि घोषणांनी दहशत पसरत आहे. त्यांच्या हिंसेतील जल्लोष पाहून दरदरून घाम फुटत आहे. जुळलेल्या हिंदू-मुस्लिम मनामनांत रोष निर्माण होत आहे. मंदिर, मस्जिद, माणसांची घरे, त्यांची मने जाळून झालेली आहेत. त्यात भारताचाच पराभव झालेला आहे, तरी स्वतःच्या पराभवाचा जयघोष हा देश का बरे करत आहे? हिंदुस्तानला पाकिस्तानच्या वाटेने घेऊन जाताना, या देशाच्या मूळ ‘धर्मा’चा लोप होत आहे. तो मर्त्य माणसातील दोष कविमनाला पाहवत नाही. रक्षकच खुशीने भक्षक होऊन आसुरी आनंद घेत आहे. कवीला तो खुनी, पशुवत आनंद देखवेनासा झाल्याने त्याने त्यावर गझल लिहिली. सृजनशील माणूस यापरते वेगळे काय करू शकतो? त्यातून समाजमनात काही परिवर्तन झाले तर ते कवीला हवेच असते. येथे एक खंत नोंदवून ठेवावीशी वाटते, की उपरोक्त गझलमधील ‘डोळ्यांतील सरू द्या करुणा-घृणा-उपेक्षा’ या ओळीतील करुणा या शब्दाऐवजी संशय या शब्दाच्या अर्थाचा शब्द असायला हवा होता, हा कवीच्या अंत:करणातील भाव यथार्थ आहे. पण करूणेच्या बाबतीत ‘दिखाऊ कणव सरू द्या’ असा अर्थ कसा काय घेता येईल? कारण ‘सरू द्या’चा भाव करुणा, घृणा, उपेक्षा या तिन्ही शब्दांसाठी समसमान लागू होतो ना?

हिंदू-मुस्लिम समाजांतील हा गुंता आणि जागतिकीकरणाने त्यात घातलेली भर असह्य होऊन संवेदनशीलांना ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ अनुभवावा लागत आहे. म्हणून कवीने नशिबावर भरोसा ठेवून बहुजनाबरोबर अल्पसंख्यांकांना ही गझलेतून चक्क आरक्षणाची मागणी करून टाकलेली आहे! बहुतेक आरक्षणाची ही मागणी मान्य होण्याची शक्यता नसल्याने या गुंत्यातून निसटून दिलासा मिळण्यासाठी अल्लाहाची प्रार्थना केलेली आहे. थकलेल्या-भागलेल्या जीवांचा, त्राता केवळ आणि केवळ अल्लाह आहे अशी कवीची श्रद्धा आहे. म्हणून कवी ईश्वराकडे मुक्या मनाला समजून घेऊन मनामनांत एकतेची ज्योत पेटवून, अंतरातील अज्ञानाचा अंधार दूर करण्याची विनंती करत आहे. तो जगनियंताच मानवी जीवनाचा आधार आहे.

मुस्लिम मनात ईश्वरानंतर ईश्वराच्या प्रेषिताचे स्थान असल्याने ए.के. शेख यांनी ईशस्तुतीसह प्रेषितांचीही स्तुती गायलेली आहे. माणसांनी जीवन तरून जाताना जीवनाच्या कोणत्याही एका क्षेत्रात त्याची कीर्ती करून जाण्याची शिकवण प्रेषित मुहंम्मद यांनी दिलेली आहे. त्या शिकवणीनुसार ए.के. शेख यांनी मराठी गझलची तपश्चर्या करून मराठी काव्यक्षेत्रात त्यांची कीर्ती दुमदुमवली आहे.

-फ.म. शहाजिंदे (फकीरपाशा महेबूब शहाजिं‌‌दे)

(‘दखलपात्र शब्दांचा ऊरूस’वरून उद्धृत)