एक सुवर्णदुर्ग – रक्षणा तीन उपदुर्ग !

सुवर्णदुर्ग हा दापोली तालुक्याच्या हर्णे बंदर गावात सागराच्या दिशेने उभा आहे. तो भव्यदिव्य आहे. त्यामुळे तो पर्यटकांना पहिली साद घालतो. सुवर्णदुर्ग किनाऱ्यापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. तो किल्ला म्हणजे कोकणच्या सौंदर्यात पडलेली जडजवाहिराची खाणच जणू ! त्याने आठ एकर जागा व्यापली आहे. किल्ल्याच्या तटबंदीची उंची तीस फूट आहे. किल्ला सागर किनाऱ्याचे रक्षण करत ताठ मानेने उभा आहे !

किल्ल्याचा इतिहास शिलाहारांपासून (इसवी सन 800 ते इसवी सन 1200) सुरू होतो. मात्र त्याबाबत कोणताही ऐतिहासिक आधार नाही परंतु प्रारंभी हा किल्ला निजामशाही राजवटीत होता. नंतर आदिलशाही राजवटीत किल्ल्याची डागडुजी सोळाव्या शतकात करण्यात आली. शिवरायांनी तो किल्ला दुसऱ्या अली आदिलशहाचा पराभव करून स्वराज्यात 1660 मध्ये आणला. त्यांनी त्याची मजबुती केली. सुवर्णदुर्गाचा इतिहासातील मोठा काळ आंग्रे घराण्याशी जोडलेला आहे. कान्होजी आंग्रे यांचा जन्म सुवर्णदुर्ग किल्ल्यावर झाला. आंग्रे यांच्या कालखंडात मराठा आरमाराची चार मुख्य ठाणी होती- कुलाबा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि सुवर्णदुर्ग !

छत्रपती शाहूमहाराज गादीवर अठराव्या शतकात आले. त्यानंतर मराठ्यांची सत्ता सार्वभौम झाली व भारतभर पसरली. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमामुळे कोकण किनारपट्टी मराठ्यांच्या वर्चस्वाखाली आली. कान्होजी यांचा मृत्यू 1729 साली झाला. त्यानंतर कारभार संभाजी आंग्रे यांच्याकडे आला. संभाजी आणि मानाजी आंग्रे यांच्यात झालेल्या झटापटीत संभाजी हे जखमी होऊन 1740 ला मृत्यू पावले. तुळाजी यांनी अंजनवेल किल्ला घेतल्याबद्दल शाहू महाराजांनी त्यांना ‘सरखेल’ हे पद 1742 साली बहाल केले. पेशव्यांना आंग्रे जड पडू लागले. त्यांचा पराभव करणे शक्य नसल्याने त्यांनी इंग्रजांची मदत मागितली. ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांची वारंवार खंडणी घेतल्याने इंग्रज तुळाजी यांचा काटा काढण्याची संधी शोधतच होते. इंग्रज व पेशवे यांच्यात तो करार 19 मार्च 1755 रोजी झाला. इंग्रजांनी मोहिमेची कामगिरी कप्तान विलियम जेम्सकडे सोपवली. ते संयुक्त आरमार घेऊन 29 मार्च 1755 रोजी सुवर्णदुर्गला येऊन थडकले. इंग्रजांनी सुवर्णदुर्ग जिंकून पेशव्यांच्या हवाली 2 एप्रिल 1755 रोजी केला.

दुसरे बाजीराव हे यशवंतराव होळकर यांच्या भीतीने 1802 साली काही काळ या सुवर्णदुर्गाच्या आश्रयाला होते. त्यानंतर इंग्रजांनी सुवर्णदुर्ग कर्नल केनेडी, कॅप्टन कॅपेल व लेफ्टनंट डॉमिनिसेट यांच्या आधिपत्याखाली अवघे पन्नास शिपाई व तीस खलाशी यांच्यानिशी हल्ला चढवून 1818 मध्ये ताब्यात घेतला.

सुवर्णदुर्गाचा मुख्य दरवाजा ‘गोमुखी’ पद्धतीचा आहे. दरवाज्यासमोर वाळूची पुळण व त्यात पडलेल्या तोफा आहेत. दरवाज्याच्या उजव्या तटावर मारूतीची मूर्ती आहे. किल्ल्याच्या पायरीवर कासव कोरलेले आहे. किल्ल्याला एकोणीस बुरूज असून तटबंदी बऱ्यापैकी शाबूत आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डाव्या बाजूला तटाजवळ विहीर आहे. पाणी पुरवठ्यासाठी विहीर व पावसाचे पाणी साठवण्यासाठी तलाव आहे. तेथून पुढे आल्यावर वाड्याचे अवशेष व दोन कोठारे लागतात. किल्ल्याच्या नैऋत्य टोकावरील बुरूजांवरून हर्णेच्या किनारपट्टीवरील कनकदुर्ग, फत्तेगड, गोवा किल्ला यांचे दर्शन होते. गडाच्या पश्चिमेस चोर दरवाजा आणि वायव्य टोकावर पाण्याचे टाके, दारूचे कोठार व उद्ध्वस्त वास्तू आहेत.

दुसरा गोवा किल्ला. तो सुवर्णदुर्गाच्या रक्षणासाठी बांधण्यात आलेल्या तीन किल्ल्यांपैकी एक. गोवा किल्ल्यावर एक कमानयुक्त दरवाजा आहे. दरवाज्यात देवडी (उंबरा) मात्र दिसत नाही. दरवाज्यातून प्रवेश केल्यावर डावीकडील टेकडीवर बालेकिल्ला दिसतो. किल्ल्याच्या उत्तरेला व पश्चिमेला समुद्रकिनारा आहे. गडाचा दुसरा दरवाजा उत्तरेकडील तटबंदीमध्ये उत्तम बांधलेला असा आहे. तो दरवाजा सध्या बुजवलेला आहे. तो किल्ल्याच्या आतील बाजूने पाहता येतो. तो उत्तराभिमुख आहे. तोच मुख्य दरवाजा म्हणून पूर्वी वापरात होता. मुख्य दरवाज्याच्या आतील बाजूस प्रशस्त अशा देवड्या आहेत. दरवाज्यावर मेघडंबरी सदृश बांधकामाचे अवशेष दिसतात. दरवाज्यावर दोन्ही बाजूंना तळाशी व्याघ्रसदृश प्राण्याचे शिल्प कोरलेले आहे.

किल्ल्याच्या डाव्या बाजूला गंडभेरूंड व त्याने हातापायात पकडलेले चार हत्ती असे शिल्प आहे. पूर्वाभिमुख दरवाज्यातून प्रवेश केल्यावर उत्तरेकडील तटावरून गडाच्या पश्चिमेकडील तटबंदीवर चालत जाता येते. त्या भागातून बालेकिल्ल्यावरील टेकडीवर पोचता येते. बालेकिल्ला समुद्रापासून चाळीस फूट उंचीवर आहे. या किल्ल्यावरून सुवर्णदुर्गाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. किल्ल्याची तटबंदी काही भागात ढासळलेली आहे. किल्ल्याचे सातही बुरूज सुस्थितीत आहेत. इमारतीच्या अवशेषांशेजारी मोठा तलाव आहे. त्याला बारमाही पाणी असते.

सुवर्णदुर्गाचा सहाय्यक दुर्ग ‘कनकदुर्ग’ हा किल्ला तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेल्या हर्णे बंदराला लागूनच आहे. त्याचे क्षेत्रफळ साधारणतः पाव हेक्टर आहे. किल्ल्याचा आकार लांबट असून आत उंच जागी दक्षिण दिशेस दीपगृह आहे. तेथे हवामान खात्याचे कार्यालय आहे. किल्ल्याच्या आत, एका बाजूस पाण्याचे छोटे छोटे नऊ हौद सलग दिसतात. किल्ल्याच्या पश्चिम व दक्षिण बाजूंना समुद्रसपाटीच्या पातळीवर खडक दिसतो. कनकदुर्गावरून सुवर्णदुर्गाचे नयनरम्य असे सुंदर दर्शन होते. सूर्यास्ताच्या वेळी सूर्याच्या सोनेरी किरणांमध्ये सुवर्णदुर्ग जणू न्हाऊन निघालेला असतो.

फत्तेगड सुवर्णदुर्गाच्या रक्षणासाठी उभारलेल्या उपदुर्गांपैकी आणखी एक दुर्ग ! सध्या तेथे कोळी बांधवांची वस्ती असल्याने किल्ल्यातील अवशेष नामशेष झाले आहेत.

प्रदूषणाच्या या जगात, सृष्टीसौंदर्याने नटलेली ही धरती
हर्णेश्वराचे घेऊनी वरदान माथी, सागरातून मिळती हिरे, माणिक-मोती
करूया जागर शिवरायांचा जतन करूया इतिहास हिंदवी स्वराज्याचा !!!

डॉ. समृद्धी संदेश लखमदे 8087666788 samruddhi.lakhamade@gmail.com
मु.पो. हर्णे, ता-दापोली, जिल्हा- रत्नागिरी
—————————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here