इतिहासाची मोडतोड

भूतकाळात जे घडले त्याचे कथन म्हणजे इतिहास; या सोप्या व्याख्येतील अवघड भाग हा आहे, की भूतकाळात घडलेल्या घटनांचे ते कथन खरे आहे हे कसे काय जाणावे? कथनाच्या स्वरूपात इतिहास सांगणे, लिहिणे हे फार जुन्या काळापासून चालत आले आहे. प्रत्येक समाजाला ऐतिहासिक घटनांचे कथन, हकिगती, वृत्तांत असतात. त्यालाच इतिहास असे सैलपणे समजले जाते. ‘इतिहास’ ही गोष्ट राजकीय परिस्थितीत अत्यंत नाजूक बनते. वर्तमान राजकारणाला इतिहासाचा आधार घेऊन समर्थन हवे असते. त्यामुळे इतिहास-त्यातील विधाने-त्यामधील बदल ही बाब चिंतेची बनते.

सद्यकालात तसे घडत आहे का? इतिहासाच्या शालेय पाठ्यपुस्तकांत रामायण, महाभारत व पौराणिक कथा यांना इतिहासाचा दर्जा देणे (ही सारी स्वतः इतिहास नाहीत तर ती इतिहासाच्या अभ्यासाची साधने आहेत हे लक्षात ठेवावे), अकबराला सम्राट ही उपाधी न लावता ती महाराणा प्रताप यांना लावणे, पाठ्यपुस्तकातून मुघलांचा मध्ययुगीन भारतीय इतिहास गाळणे, भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातून जवाहरलाल नेहरूंचे नाव पुसून टाकणे… ही सारी लादलेल्या इतिहासाची उदाहरणे झाली. त्यांपैकी बऱ्याच बाबतींत सच्चे ऐतिहासिक सज्जड पुरावे असतानाही ते घडत आहे ही बाब चिंतेची आहे. ‘ताजमहाल आधी तेजोमहल म्हणजेच हिंदूंचे देऊळ होते’ असले निरर्थक दावे ऐतिहासिक पुराव्यांवर कधीच टिकत नाहीत. ते जनतेची दिशाभूल करून संशयाचे वातावरण निर्माण करतात. हेडगेवार व महात्मा गांधी यांची झालेली फुटकळ भेट ही घटना मध्यवर्ती ठेवून, ‘गांधींचा हेडगेवारांच्या कामाला व विचारसरणीला पाठिंबा होता’ असा ऐतिहासिक निष्कर्ष घाईघाईने काढता येत नाही. ते उदाहरण हेच दाखवते, की त्यांना इतिहासाचा वापर राजकीय फायद्यासाठी करून घ्यायचा आहे. ते भूतकाळातील अशा सुट्या सुट्या घटना बाजूला काढून, त्याभोवती कथा रचतात. तो इतिहास नसतो, तर ती इतिहासाची मोडतोड असते. सांस्कृतिक व ऐतिहासिक वातावरण असेच प्रदूषित होत राहिले तर पुराव्यांच्या आधारावर व चिकित्सेच्या धारेवर तावूनसुलाखून घेतलेला इतिहास सर्वसामान्य माणसांसाठी उपलब्ध असणे दुरापास्त होईल.

इतिहास हा अभ्यासाचा विवाद्य विषय नेहमीच ठरला आहे, कारण तो राजकारणाशी निगडित आहे. भारताच्या इतिहासाचे लेखन सर्वप्रथम ब्रिटिश वासाहातिक इतिहासकारांनी केले. स्वाभाविकपणे, त्यांनी भारतीय इतिहासाचा अर्थ वासाहातिक ध्येयधोरणाला पूरक होईल असा लावला. त्यातून प्राचीन इतिहास कालखंड हा ‘हिंदू काळ’ म्हणजे सुवर्णयुग, मध्ययुगीन कालखंड हा ‘मुस्लिम काळ’ म्हणजे अंधारयुग, मध्ययुगीन काळानंतरचा कालखंड हा ‘ब्रिटिश काळ’ म्हणजे आधुनिक युग अशी समीकरणे उद्भवली. कारण वासाहतिक धोरण हिंदू-मुस्लिम समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचेच होते. राष्ट्रवाद या संकल्पनेस ‘इतिहास’ आवश्यक असतो, किंबहुना अपरिहार्यच असतो. राष्ट्रवाद इतिहासाशिवाय बाणवता येत नाही. मग ‘राष्ट्रवाद’ स्वतःच्या गरजा पेरतो. त्यातून इतिहासातील ‘सुवर्णयुग’ अशी सुखावणारी किंवा ‘अंधारयुग’ अशी दुखावणारी कल्पना निर्माण केली जाते. बहुसंख्य लोक त्यातच रमून जातात. ते प्राचीन कालखंडाबाबत प्रकर्षाने घडते. कारण त्या कालखंडाबाबत ठोस विश्वसनीय पुरावे कमी उपलब्ध असतात. त्यामुळे दंतकथा, मिथककथा यांचे फावते. इतिहासात तसे घडण्यास हवे होते अशा भ्रामक कथा सहजतेने रचल्या जातात. परिणामी, इतिहासाच्या दोन स्वतंत्र आवृत्ती तयार होतात. एक आवृत्ती म्हणजे सरळसोट राष्ट्रवादाची. तो निधर्मी होता कारण तो ब्रिटिश वसाहतीविरूद्ध लढण्यासाठी निर्माण झाला. ब्रिटिश राजसत्ता हा शत्रू स्पष्ट होता. म्हणूनच ‘आम्ही भारतीय’मध्ये सर्वच जण -हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन, इतर जाती, आदिवासी जमाती, भटक्या जमाती, धर्म, भाषा, पंथ – समाविष्ट होते. इतिहासाची दुसरी आवृत्ती म्हणजे एकतर ‘आम्ही हिंदू’ व ‘आमचा हिंदू इतिहास’ किंवा ‘आम्ही मुस्लिम’ व ‘आमचा इस्लामिक इतिहास’ असा अर्थ काढला जात होता. जगाच्या इतर भागांतील इतिहासाप्रमाणे भारताचा इतिहासही संमिश्र आहे. भारताचा प्राचीन इतिहास कल्पनारम्य सुवर्णयुग नव्हते किंवा मध्ययुगीन इतिहास अंधारयुग नव्हते. दोन्ही कालखंडांत असंख्य चढउतार होते. त्यात अनेक विधायक, सकारात्मक गोष्टी होत्या; तशाच अनेक नकारात्मक व निषेधात्मक गोष्टी होत्या. तसेच, वेगवेगळ्या पातळीवर असलेल्या हिंदू -मुस्लिम संबंधांचा फक्त भारतीय इतिहासावर परिणाम झाला असे नाही तर, निरनिराळ्या समाजांतील एकमेकांमध्ये असलेले संबंधही काही वेळा सौहार्दपूर्ण तर काही वेळा शत्रुत्वाचे होते. प्रत्येक वेळेस एकाच प्रकारची ऐतिहासिक परिस्थिती नसते. म्हणूनच, संपूर्ण ऐतिहासिक काळाला लागू होईल अशा प्रकारची सरधोपट ऐतिहासिक विधाने करता येत नाहीत.

एक खरे, की भूतकाळात घडून गेलेल्या घटनेबद्दल शंभर टक्के हमी देऊन कोणी बोलू शकत नाही. त्यामुळे इतिहासाकडे बघण्याचे भिन्न भिन्न लोकांचे भिन्न भिन्न दृष्टिकोन व तसेच हेतू असतात. ब्रिटिशांनी त्यांच्या नजरेतून इतिहास लिहिला. मुस्लिमांनी त्यांच्या नजरेतून इतिहास लिहिला. हिंदुत्वववादी त्यांच्या नजरेतून इतिहास लिहितात. त्यामुळे वस्तुनिष्ठ इतिहास समजून घेण्यात अडथळे निर्माण होतात. तसे तर वर्तमानाबद्दलच्या विधानाची खात्रीही शंभर टक्के देणे शक्य नसते. आजही, एखादी घटना घडते त्याचे सहा प्रत्यक्षदर्शींनी केलेले कथन सहा प्रकारचे असू शकते. भूतकाळातील गोष्टी अमूर्त असतात. त्यात कल्पिताला भरपूर वाव असतो. म्हणून भूतकाळातील घटनांबद्दल पूर्णपणे निश्चिती कोणीही देऊ शकत नाही.

इतिहासकाराचा संबंध भूतकाळात खरोखर काय घडून गेले आहे हे शोधून काढण्याशी नसतो. इतिहासाच्या अभ्यासात उपलब्ध पुराव्यांवरून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचे तर्कशास्त्रानुसार, बुद्धीला पटणारे स्पष्टीकरण देऊन, त्या घटना समजावून घेऊन, पुराव्यांनुसार अनुमान काढता येते, इतकेच. पण संदिग्धता आहे म्हणून इतिहास अनिश्चिततेवरच कायम तरंगत असतो असे मात्र नव्हे; किंवा सगळ्याच इतिहासकारांची विविध स्पष्टीकरणे एकाच वेळी बरोबर असतात असेही नाही. एकाचे प्रतिपादन दुसऱ्या च्या प्रतिपादनापेक्षा जास्त बरोबर असते, ही निश्चितता मानावीच लागते.

इतिहाससंशोधनाची वैज्ञानिक पद्धतीवर आधारित शास्त्रशुद्ध पद्धत गेल्या पन्नास- साठ वर्षांत विकसित झाली आहे. इतिहास हा जास्तीत जास्त तार्किक बुद्धीला पटणारा आणि माहितीचे व पुराव्याचे कसून विश्लेषण करणारा असावा. इतिहास कला म्हणून विचारात न घेता समाजशास्त्र म्हणून विचारात घेतला जातो, तेव्हा ‘इतिहास’ वस्तुनिष्ठ उत्तरांचा शोध घेऊ लागतो. ठोस पुरावे जरी अस्तित्वात असले तरी त्यांचा अर्थ लावणे व त्यातून ऐतिहासिक निष्कर्षापर्यंत पोचणे हे इतिहासकाराचे काम असते. लेखी काय किंवा मौखिक काय, सारेच पुरावे तयार केलेले असतात. त्यामुळे दोन्ही कसे ‘वाचायचे’ याची इतिहासकाराला जाण हवी. त्यासाठी इतिहासकार प्रशिक्षित असावा लागतो.

भारताच्या इतिहासाचा अभ्यास करणारे अनेक प्रशिक्षित नवइतिहासकार 1950 नंतरच्या काळात भारतात व भारताबाहेर निर्माण झाले. त्यांनी वैज्ञानिक पद्धतीने उपलब्ध पुराव्यांचा अभ्यास केल्यानंतर, तोपर्यंत रूढ असलेल्या ऐतिहासिक निष्कर्षांना धक्के बसू लागले. इतिहासाची पुनर्मांडणी होऊ लागली. पण ती सारी घुसळण अभ्यास म्हणून झाली. अभ्यासाच्या पातळीवर, इतिहासाचा प्रवास व्यक्तिनिष्ठ निष्कर्षापासून वस्तुनिष्ठ निष्कर्षाकडे जाणारा आहे. प्रशिक्षित इतिहासकाराने लिहिलेला इतिहास जास्त ग्राह्य असतो. इतिहासाचे निष्कर्ष असतातच. ते प्राधान्यक्रमाप्रमाणे ठरवले जातात. ते गंभीर चिकित्सेनंतर बदलू शकतात. अनेक निष्कर्षांवर घासून घेतलेला इतिहास ग्राह्य असतो. लादलेला इतिहास नेमका त्याच्या उलट असतो. सरकार इतिहासाची पाठ्यपुस्तके तयार करते व तोच इतिहास आहे असा हुकूम करते आणि तो प्रत्येकाला मान्य करावा लागतो! भारतात अशी परिस्थिती येऊ घातली आहे का?

– विद्यालंकार घारपुरे

2 COMMENTS

 1. मुघल परकीय,धर्मांध व आक्रमक…
  मुघल परकीय,धर्मांध व आक्रमक होते.त्यांनी या देशाच्या सभ्य व सुसंस्कृृत पणाचा गैरफायदा घेतला.त्यांचे गुणगान का करायचे?या देशातील वीर कथा दाबून ठेवल्या.खरा इतिहास कळलाच नाही.जुलमी मुघलांचे गुणगान का करायचे?
  अकबर हा धर्मांध होता.तो हिंदुस्थानचा सम्राट नसून मुघलांचा होता.महाराणाप्रताप या मातीतला होता.या माती साठी लढला व मेला.हिंदुस्थानियांसाठी महाराणा प्रतापच सम्राट आहे.
  महाभारत,रामायण ही ऐतिहासीक साधने नसून तो इतिहास आहे,इथल्या मातीतला,इथल्या लोकांचा.हे आपल्या सभ्य संस्कृतीचे प्रतीक आहे.
  नेहरू हे देशाचे पंतप्रधान होते म्हणून त्यांचे विषयी आदर आहे पण त्यांनी असा कोणता त्याग केला की ते पंतप्रधान झाले?ज्यांचे कर्तुत्वच नाही त्यांचे इतिहासातून नाव गाळले असेल तर योग्यच झाले.
  इतिहास आता नाही दडपला जात तो इंग्रजांपासून दडपला जातोय.देश स्वतंत्र झाला तरी अपवाद सोडल्यास नाकर्त्यांच्या हातात सत्ता गेल्याने इतिहास उलगडलाच नाही.
  अजूनही या देशातील स्थळांना वास्तुंना,रस्त्यांना इंग्रज व परकीय आक्रमकांची नावे कायम आहेत हे कशाचे लक्षण?

 2. तुझा लेख मी संपूर्ण वाचला…
  तुझा लेख मी संपूर्ण वाचला.लेखातील तळमळ कळली.खर सांगायचे तर,तुझे विषयच असे क्लिष्ट असतात,ते आजच्या काळात रमणाऱ्या व्यक्तिच्या बुद्धिपलिकडे,मेंदूची व्याप्ती संपवुन टाकणारे असतात.ते पेलवणे थोडे नाही तर खूपच जड जाते.यासाठी तु माहीत असणे आवश्यक.कारण तुझ्या विचारांना तेच प्रतिक्रीया समर्पक देऊ शकतील.असो.
  हेही खर आहे,ज्या इतिहासाची शिकवण त्यात्या पिढीला उत्तम सजग नागरिक म्हणून घडवू शकली असती असा इतिहास कधीच समोर आला नाही.असे माझे प्रांजळ मत.ज्यांनी-त्यांनी पद्धतशीरपणे आपल्या बाजूने अर्थ लावून स्वार्थी इतिहासाची निमिर्ती केली.मग ते शिक्षण असो की राजकारण.
  अशा सर्वच वर्गापुढे खरी बाजू मांडायची म्हटली तर जो-तो अस्त्र (शत्र) घेऊन बसलाय.मग ते शब्दांचे,नाहीतर खरेखुरे असते.अशाच एखाद्या माथेफेरूमुळे(आपल्याकडे अशी भरपूर उदाहरणें आहेत) मनुष्य शरीर संपून गेल्यावर त्यांचे विचार संपत,अगर नष्ट होत नाहीत असे असले तरी झळ,दुःख,वेदना या त्यांनाच सोसाव्या लागलेल्या असतात.हे नसे थोडके.याचाही विचार होणे आवश्यक आहे.असे असले तरी खरं स्वरूप जगासमोर येणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
  लेखातील मांडणी वास्तववादी आहे.जसे गांधींचा हेगडे वारांच्या कामाला व विचार सरणीला पाठिंबा,त्याचे केलेले भांडवल, हिंदुकाळ(सुवर्णयुग),मुस्लिम काळ(अंधारयुग),ब्रिटिश काळ(अधुनिक युग) याबतचे विवेचन प्राप्त स्थितीत परखड,वास्तववादी आहे.
  लेखातील सारांश अधोरेखित करायचा झाला तर इतिहासाची मोडतोड करून सक्तीने अंगीकार करावयास भाग पाडलेली जीवनशैली समाजाला निश्चित वळणावर घेऊन जाऊ शकत नाही.त्यामुळे दिशाहीन भरकटले पणाची भीती तू लेखाच्या शेवटी तू मांडली आहेस.ती जरी खरी वाटत असली तरी,आशादायक बाब म्हणजे समाज आता सजग झाला आहे.तो बदलतोय.आपण काहीही थोपवू शकतो,असे जर धर्मवाद्यांना वाटत असेल तर ती त्यांची चूकच असेल.कारण आवाज हा कुठून तरी येत रहाणार,आणि तो बोलका-पुरेसा आहे.उशीराने का होईना दखल ही घेतली जाते.हा विश्वास या निमित्ताने बाळगायला काही हरकत नाही.
  महेशकुमार,कर्जत(रायगड)-९७६३५७२०१५

Comments are closed.