इंदिरा संतांकडील चंद्रमौळी हसू

मी कराडला कॉलेजात शिकत असताना दीक्षितसरांकडे म्हणजे प्रकाश संत यांच्या घरी जाणे ही आम्हाला- मला आणि माझ्या एका मैत्रीणीला पर्वणीच वाटे ! तेथे जाण्यासाठी आकर्षणे अनेक होती, पण त्यातील प्रमुख म्हणजे इंदिरा संत. त्यांचा अमलताश नावाचा बंगला होता. त्या त्यांच्या त्या बंगल्यातील सुरंगी, जाई, जुई यांपैकी कोणत्यातरी वेलावरील फुलांचा ढीग समोर मांडून बसलेल्या असत आणि सुंदर गजरे गुंफत. आम्ही पण आगाऊपणाने तेथेच ठिय्या मारून बसत असू… त्यामुळे आम्हालाही त्या गजऱ्यातील काही तुकडे मिळत.

इंदिरा संत सुरळीच्या वड्या उत्तम करत आणि खोबऱ्याच्या पांढऱ्या शुभ्र, बीटाच्या आणि टोमॅटोच्या लाल-गुलाबी, पण… त्यांना रंगसंगती साधून पदार्थ सजवून देण्याची फार आवड होती.

आम्हाला दीक्षितसर त्यांच्या कवयित्री आईशी कसे बोलत असतील? डॉक्टर वहिनींचे त्यांच्या सासुबार्इंशी नाते कसे असेल? याबद्दल कुतूहल असायचे. आम्ही एकदा तेथे गेलो असताना काहीतरी छोटीशी कुरबुर झाली. नेमके काय घडले ते आम्हाला कळले नाही, पण सर आणि वहिनी गोरेमोरे झालेले दिसत होते. इंदिराबार्इंनी त्या दोघांकडे मुळीच लक्ष न देता त्यांची कवितांची वही काढली आणि आम्हा दोघींना जवळ बोलावून त्यातील ‘नको नको रे पावसा… असा अवेळी धिंगाणा… घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली…’ ही कविता वाचण्यास सुरुवात केली. त्यामुळे वातावरण पार पालटले. सर आणि वहिनी कधी तेथे मागे येऊन उभे राहिले ते आम्हालाही कळले नाही. कविता संपता संपेपर्यंत तिघांनी एकमेकांकडे पाहिले. तिघांच्याही डोळ्यांत ते चंद्रमौळी हसू होते ! त्यांची कट्टी संपून बट्टी झालेली होती.

मंजुषा देशपांडे 9158990530 dmanjusha65@gmail.com

——————————————————————————————————————————–