इंजिनीयर विजय गोळे – ‘केल्याने प्रवास-पर्यटन मनुजा चातुर्य येतसे फार’

इंजिनीयर विजय गोळे नोकरीउद्योगाच्या निमित्ताने देशभर फिरले, पण अखेरीस स्वगावी, दापोलीला येऊन स्थिरावले. त्यांना परदेशी जायचेच नव्हते, त्यामुळे तो मुद्दा त्यांच्या जीवनात पुढे आला नाही. त्यांचे मूळ गाव हर्णे, दापोलीपासून पंधरा किलोमीटरवर. तेथे त्यांचे दोनशे वर्षांपूर्वीचे जुने घर आहे. विजय हे डॉ. एकनाथ गोळे यांचे धाकटे बंधू. त्यांचे ‘व्हीजेटीआय’मधील इंजिनीयरिंगचे शिक्षण त्यांचा मोठा भाऊ म्हणून डॉक्टरांनी केले. ती सहा भावंडे होती. त्यांचा सांभाळ डॉक्टरांनी वडिलांच्या मृत्यूनंतर केला. त्यामुळे विजय हे मोठ्या भावाच्या, डॉक्टरांच्या इच्छेबाहेर वागले नाहीत. त्यांनी पदवी मिळवल्यानंतर आठदहा वर्षे नोकरीनिमित्ताने बाहेर काढली व ते भावाच्या इच्छेनुसार दापोलीला आले. तेथेच त्यांनी विविध उद्योग केले आणि दापोलीत स्वत:चे नाव कमावले.

त्यांचा पहिला उद्योग मंगलोरी कौले निर्मितीचा. तो कारखाना डॉ. गोळे यांनी एका ध्येयाने काढला होता. त्यांचे मामा- श्रीकृष्ण खाडिलकर तो कारखाना पाहत होते. गावचे लोक नोकरीधंद्यासाठी मुंबईकडे धावत होते. त्यांना थोपवण्यासाठी डॉ. गोळे यांनी ही कल्पना लढवली व गावातच कौलांचा कारखाना काढला. घरावर छप्पर घालण्यासाठी मंगलोरी कौले हवी असतातच, ती केरळातून आणावी लागत. कोकणात माती होती, माणसे होती. कारखाना उभा राहिला. डॉक्टरांनी ती जबाबदारी प्रथम मामांवर व नंतर भाऊ विजयवर टाकली. विजय सांगतात, कारखान्यात वीस जणांना काम मिळाले, पहिल्या काही वर्षांतच नफा झाला ! आमची कल्पना ‘हीट’ ठरली.

विजय यांनी उद्योगधंद्याचे हे कौशल्य पदवीशिक्षणानंतर नोकऱ्यांनिमित्त केलेल्या देशभ्रमंतीत मिळवले होते. विजय सांगतात, की माझे शिक्षण संपल्यावर माझ्या आईने मला बजावले, की महाराष्ट्रात राहायचे नाही. बाहेर जायचे. तिचा होरा काय होता ते मला कळले नाही, परंतु भटकंतीमुळे माझ्यात चौकसपणा आला, चातुर्य वाढले ! त्यांनी त्या नोकऱ्यांत 1965 ते 1972 अशी सात वर्षे काढली. त्यांना पहिली नोकरी गुजरातेत सुरतजवळ बिलिमोरा येथे ‘गायकवाड मिल्स’मध्ये मिळाली. त्यांची पुढील नोकरी भारतभर फिरण्याची होती. ‘असोशिएटेड टेक्स्टाइल इंजिनीयर्स’ असे त्या कंपनीचे नाव. त्यांची यंत्रसामग्री ठिकठिकाणी होती. त्या त्या ठिकाणी जाऊन देखभाल-दुरुस्ती पाहायची व त्यानुसार सल्ला द्यायचा असे ते काम होते.

दरम्यान, त्यांचा विवाह झाला, त्यांनी मुंबईत घर थाटले. पण डॉक्टर बंधूंशी बोलणे झाल्यावर, त्यांच्या कल्पना समजून घेतल्यावर विजय यांनी त्यांचा मुंबईतील संसाराचा पसारा आवरता घेऊन स्थलांतर कायमस्वरूपी दापोलीला केले. त्यांचा मंगलोरी कौलांचा व्यवसाय फार काळ टिकला नाही, कारण घरबांधणीची शैलीच बदलली होती. उतरत्या छपराची घरे नाहीशी होऊन सिमेंटकाँक्रिटच्या घराची वास्तुशैली अगदी खेड्यापर्यंत पोचली. तेव्हा विजय यांनी दापोलीमध्येच एक वर्कशॉप सुरू केले आणि कोकणात गरजेची भासतात अशी यंत्रसाधने निर्माण करणे आरंभले. त्यात त्यांना त्यांच्या संशोधन बुद्धीची साथ मिळाली आणि बुद्धीला ते आव्हानही वाटले !

विजय यांनी वर्कशॉपमध्ये तीन महत्त्वाची उपकरणे बनवली. पहिले होते ते बैलगाडीचे धावेचे चाक. त्या चाकांमुळे बैलांना गाडी ओढणे सोपे होई आणि गाडीची गतीही वाढे. त्यांचे दुसरे उपकरण म्हणजे नारळाच्या झाडावर चढण्यासाठी शिडी. नारळ उतरवण्यासाठी माणसे मिळत नसत. त्यामुळे वाडीच्या मालक कुटुंबांना मोठा प्रश्न असे. विजय यांच्या शिडीमुळे वाडीमालक स्वत: किंवा त्याचे सहाय्यक सहजपणे नारळ उतरवू शकत. विजय यांचे तिसरे उपकरण म्हणजे सुपारी व नारळ सोलण्यासाठी यंत्र. सुपारीचे रोठे सोलण्यासाठी खूपच यातायात असे. वेळही उगाच जास्त लागे. रोठे उन्हात वाळवण्यासाठीच दोन आठवडे लागत. विजय गोळे यांच्या यंत्रामुळे रोठे झाडावरून काढताच सुपारी बाहेर येत असे. यंत्राचा वेगही चांगला होता. विजय सांगतात, की “ही तिन्ही यंत्रसाधने लोकांना खूप उपयोगाची वाटली आणि त्यांच्यामुळे माझेही दापोलीत बस्तान बसले.”

विजय यांचे ते वर्कशॉप चालू आहे. तेथे वेगवेगळे कामगार येऊन त्यांची कामे करून घेतात. विजय स्वत: मात्र वयानुसार तशा कोणत्या कामात लक्ष घालत नाहीत. ते ब्याऐंशी वयाचे आहेत मात्र चारचाकी गाडी अजूनही चालवतात.

विजय यांचे वडील मधुसूदन गोळे यांचे एलएलबीपर्यंत शिक्षण झालेले होते. ते सुधारणावादी विचारांचे होते. हर्णे या गावी उन्हाळ्यात पाणी नसे. तेव्हा ते घरासमोरून जाणाऱ्या कुणबी, कोळी किंवा मुस्लिम महिलांस सहज सांगत. आमच्या विहिरीतून पाणी भरून घेऊन जा ! त्याकाळी त्या महिलादेखील संकोचत असत. गोळे यांना त्यांच्या आजूबाजूचे लोक त्याबद्दल नावे ठेवत. तेव्हा ते म्हणत, “आम्ही याच पाण्याने देवाचीही पूजा करतो. देवाने पाणी इतरांना देतो म्हणून आमचे काहीही वाईट केलेय का? नाही ना !”

विजय यांचे गव्हे येथील घर निसर्गपूरक बांधकाम शैलीने बांधले आहे. त्यांच्या घरात एके ठिकाणी झाड उगवले आहे. त्यांनी ते कापून न टाकता वेगळ्या तऱ्हेने जतन केले आहे. ते सोलर पॅनेलचा वापर करतात. त्यांनी पाण्याची टाकी कल्पकतेने उंचीवर आणि वेगळ्याच धाटणीची उभारली आहे. त्या घराचे व टाकीचे डिझाईन त्यांचे नाही हे ते प्रमाणिकपणे सांगतात. त्यांच्या घरापुढे सुंदर बाग आहे. त्यात मातीचे विविध प्राणी ठेवले आहेत. ती बाग त्यांची पत्नी नीला यांनी परिश्रमपूर्वक तयार केली व जोपासली आहे. त्यांचे घर गावाच्या सुरुवातीलाच रोडवर आहे. तेथे एक फळा बसवला आहे. त्यावर त्या चाळीस वर्षांपासून नियमित सुविचार लिहितात.

त्यांचा मुलगा हिमांशू हा इंजिनीयर व मुलगी सुपर्णा डॉक्टर आहे. ती दोघे त्यांच्या त्यांच्या परिवारासह मुंबईत वास्तव्यास असतात.

विजय गोळे 9823526348

प्रतिनिधी

—————————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here