आवरा आणि सावरासुध्दा!

– विलास माने व खलील शेख

     अलिकडे महापुरुषांचे पुतळे, त्यांच्या प्रतिमा आणि त्याबाबतच्या कार्यक्रमांकडे लक्ष वेधण्यासाठी योजलेले डिजिटल फलक किंवा फ्लेक्स बोर्डस हे प्रबोधनापेक्षा वैयक्तिक प्रतिष्ठेचा प्रश्न होऊ पाहात आहेत. कोणी कोणाची बरोबरी केली तर कोणी कोणाला ‘ओव्हरटेक’ केले यावरून सुंदोपसुंदीही होत आहे. त्यातून एकमेकांच्या पदाचे, अधिकाराचे प्रश्न त्यावरून राजिनाम्याच्या मागण्या, हकालपट्टीचे आदेश आणि हे सारे करताना निष्ठा आणि तत्त्वांचा मुलामा! त्यातही आधी ‘कोण होता पाग्या, मग झाला वाघ्या’ याची जनतेला माहीत असलेली नव्याने ओळख करून दिली जात आहे. यातून सामान्य जनतेची करमणूक होते. जोवर त्यांची दमवणूक होत नाही तोवर!

– विलास माने व खलील शेख

     अलिकडे महापुरुषांचे पुतळे, त्यांच्या प्रतिमा आणि त्याबाबतच्या कार्यक्रमांकडे लक्ष वेधण्यासाठी योजलेले डिजिटल फलक किंवा फ्लेक्स बोर्डस हे प्रबोधनापेक्षा वैयक्तिक प्रतिष्ठेचा प्रश्न होऊ पाहात आहेत. कोणी कोणाची बरोबरी केली तर कोणी कोणाला ‘ओव्हरटेक’ केले यावरून सुंदोपसुंदीही होत आहे. त्यातून एकमेकांच्या पदाचे, अधिकाराचे प्रश्न त्यावरून राजिनाम्याच्या मागण्या, हकालपट्टीचे आदेश आणि हे सारे करताना निष्ठा आणि तत्त्वांचा मुलामा! त्यातही आधी ‘कोण होता पाग्या, मग झाला वाघ्या’ याची जनतेला माहीत असलेली नव्याने ओळख करून दिली जात आहे. यातून सामान्य जनतेची करमणूक होते. जोवर त्यांची दमवणूक होत नाही तोवर!

     आधी पुतळ्याबाबत, मग त्याच्या जागेबाबत, मग त्याबाबतच्या दुर्लक्षाबाबत, मग कधी विटंबनेबाबत रणकंदन; तर कधी समाजात दंगलीही झाल्या आहेत. मग हे पुतळे, पुतळे न वाटता सुप्त ज्वालामुखी किंवा टाईमबॉम्ब वाटू लागतात! आता राजकारण सुधारून पुतळ्यांची जागा प्रतिमांनी घेतली आणि प्रतिमेची स्थापना अनावर होऊन अनावरण करण्याचा नवा फंडा सुरू झाला. आता याही लागणीची प्रतिजैविके पचू लागल्यानंतर त्यांची जागा विविध कार्यक्रमांच्या निमित्ते भव्यदिव्य, लक्षवेधी, चौक व कमानी व्यापणार्‍या फ्लेक्स बोर्डानी घेतली. असा फलक जेवढा मोठा, तेवढा तो उभारणारा माणूस मोठा! हा नवा अवतार रुढ झाला आणि कावळासुध्दा फलकांवर आरूढ होऊन गरूड समजू लागला आहे!

     एकदा, अशाच फलकाजवळ जाऊन त्या भव्य फलकाकडे, अंधूक दृष्टी झालेले म्हातारबाबा पुन्हा पुन्हा पाहात होते, आणि इतरांना विचारत होते, की ‘या आपल्या गल्लीतल्या तरण्याताठ्या पोराचा फोटो एवढा मोठा का लावलाय?’ त्यावर शेजारी उभा असलेला तरुण म्हणाला, ‘अहो बाबा, आज त्याचा वाढदिवस आहे.’ ते ऐकून म्हातारबाबांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. तेव्हा न राहवून त्या तरुणाने विचारले, की बाबा, काय झालं? त्यावर मान हलवत बाबा म्हणाले, की अभिनंदन की श्रध्दांजली हे जवळ जाऊन विचारेपर्यंत जीवाला घोर लागतो.

     एका जावयाने तर आपल्याला जोड्याने मारून हाकलून दिल्याच्या कारणावरुन सासरवाडीच्या रस्त्यावरच एका पडेल नेत्याच्या वाढदिवसाबरोबर आपला वट असलेला ‘असा’ फ्लेक्स लावून सासर्‍याबरोबर सासरवाडीवर ‘सूड’ उगवला. समाजातील या विकृत आणि अज्ञानमूलक ओढीचा फायदा राजकीय मंडळी उठवताना दिसतात. तेव्हा कोणतेही कार्य किंवा कार्यक्रम हे मानवतावादी मूल्यांवर आधारित असले पाहिजेत. त्यात व्यक्तिगत प्रतिष्ठा महत्त्वाची असता कामा नये. पण जुजबी काम करणार्‍या नेतृत्वामध्ये समाजाला बरोबर घेऊन जाण्याचा अभाव प्रकर्षाने आढळत आहे. तेव्हा अशा नेतृत्वाने फक्त आत्मकेंद्रित वृत्ती सोडून, धंदेवाईक दृष्टिकोन न ठेवता विधायक व व्यापक विचार व तसे कार्य व कार्यक्रम साकारण्याची गरज आहे. सामान्य जनतेला आवाज असतो. पण तो दबलेला आणि दाबलेला जिथे असतो, तिथे हलक्या हाताने कायम थंडावा देणारे पण प्रारंभी झणझणीत अंजन घालण्याची गरज आहे. सामान्य जनतेची अशांना आवरा आणि पुन्हा सावरासुध्दा अशीच अपेक्षा अवास्तव म्हणता येणार नाही.

विकृत मनोवृत्ती

      ‘आवरा आणि सावरासुध्दा!’ हा अग्रलेख आवडला. फ्लेक्स बोर्ड फ्रेम तयार करण्याचा आमचा प्रमुख व्यवसाय आहे आणि आपल्या शहरातील अर्ध्यांहून आधिक फ्रेमच्या ऑर्डर्स आम्ही पुर्‍या करतो, तरीही आपला लेख वाचून फ्लेक्समागच्या विकृत मनोवृत्तीचे समर्थन करण्याऐवजी निषेध करणेच आम्हाला आवडेल. स्वत:च स्वत:चे गोडवे गाणारे आणि शहराच्या प्रमुख रस्त्यांना आणि चौकांना विद्रूप करणारे हे फ्लेक्स बोर्ड निषेधार्हच आहेत. अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे कावळेसुध्दा फ्लेक्स बोर्डवर आरूड होऊन गरूड समजून घेत आहेत. हे विदारक दृश्य इच्छा नसतानाही पाहावे लागावे, हे जनतेचे दुर्दैव आहे. निदान वजनदार नेत्यांनी तरी लाळघोट्या, लबाड, मतलबी कार्यकर्त्यांना आवर घालायला हवा. पण घडते नेमके उलटेच. नेत्यांचाच भव्य फलक लावला, तरच लबाडांना संधी अधिक! म्हणून ही स्पर्धा तीव्र होत चालली असून आपल्या अग्रलेखाने ठसठसणारे गळूच फोडले आहे.

(‘साप्ताहिक मनोमन’मधील अग्रलेख व खलील शेख यांचे त्यावरील पत्र – संक्षिप्त रूपात)

खलील शेख (आण्णा) पंताचा गोट, सातारा.

विलास माने, संपादक ‘साप्ताहिक मनोमन, ‘करंजे पेठ, सातारा – (02162) 232255, 230955

दिनांक – 23/06/2011

{jcomments on}