आभाळाएवढा बाप

प्रतिमा राव
स्वयंसेवामध्ये वंचित मुलांचा ‘आभाळएवढा बाप’ रामभाऊ इंगोले आणि सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी लढणार्‍या प्रतिमा राव.

स्वयंसेवा- व्यक्तिनिष्ठा

आभाळाएवढा बाप

रामभाऊ इंगोले

‘आयुष्य वेचिले, कुटुंब पोशिले’ ही जगरहाटी आहे, पण समाजाकडून उपेक्षित अशा, दुर्देवाने देहविक्रय करणार्‍या स्त्रिया व मुलांना आधार देणारे विरळा! नागपूरचे रामभाऊ इंगोले यांचे कार्य या दुर्लक्षित क्षेत्रात आहे.
 

रामभाऊ इंगोले यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते, त्यामुळे रामभाऊंना लहानपणापासून समाजसेवेचे जणू बाळकडू मिळाले. त्यांच्या कार्याची सुरुवात नागपूरमधील वेश्यावस्ती हटवण्यासाठी कटिबद्ध असलेल्या षड्यंत्राविरुद्ध लढा देण्यापासून, १९८० मध्ये झाली. रामभाऊंवर अनेक वेळा गुंडांकडून हल्ले झाले, तरीही त्या आंदोलनात ते डगमगले नाहीत. वेश्या या समाजाच्या घटक असूनही त्यांना त्यांचे हक्क नाकारले जातात. वारांगनांच्या व त्यांच्या मुलांच्या उन्नतीसाठी त्यांनी १९९२ साली ‘विमलाश्रम घरकुला’ची स्थापना केली. तेव्हापासून ती संस्था उपेक्षित व वंचित मुलांचे पुनर्वसन करत आहे. त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे म्हणून स्वावलंबी बनवत आहे. संस्थेच्या विद्यमाने ‘पाचगाव’येथे नवीन देसाई निवासी विद्यासंकुल उभे राहिले आहे. वीस मुलांपासून सुरू झालेल्या या शाळेत दोनशे विद्यार्थी आहेत.
 

शेतकर्‍यांचे नैराश्य व दारिद्रय दूर करण्यासाठी, त्यांनी शेतकर्‍यांच्या मुलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे.

त्याचबरोबर खाणीत काम करणार्‍या मजुरांच्या मुलांसाठी त्यांनी ‘देसाई फन स्कूल’ सुरू केले आहे.
 

त्याची पुनर्वसनाची चळवळ नागपूर जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता अमरावती, अकोला, सुरत या ठिकाणीही पसरली आहे. मानवी हक्कांसाठी लढताना त्यांनी वेगवेगळ्या चळवळींमध्ये सहा वेळा तुरुंगवास भोगला आहे.

१. रोटरी क्लब ऑफ नागपूर, ऑरेंज सिटी पुरस्कार
२. रोटरी क्लब इंटरनॅशनल तर्फे ह्युमॅनिटेरियन सर्विस सेंटेनरी पुरस्कार
३. दीनदयाळ उपाध्याय सेवा पुरस्कार
४. सह्याद्री नवरत्न सेवा पुरस्कार
५. दीपस्तंभ पुरस्कार

अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. त्यांच्या जीवनावर आधारित आधारवड, तळपत्या तलवारी, वारांगनांच्या मुलांचा आभाळएवढा बाप अशी पुस्तकेही प्रसिद्ध केली गेली आहेत.

‘गोल्डन आय ग्रूप’ने त्यांच्या कार्यावर आधारित सिनेमा केला आहे, त्याचे दिग्दर्शन अरुण नलावडे यांनी केले आहे.

संपर्क:

भ्रमणध्वनी: 9860990514

 

सैनिकहो, तुमच्यासाठी!

प्रतिमा राव

श्रीमती प्रतिमा राव  या ‘सैनिकभारती ह्युमॅनिटी’ या संस्थेच्या संस्थापक व अध्यक्ष आहेत.
 

आपण ज्या सैनिकांच्या जीवावर निर्भयपणे जगतो, त्यांच्या हौतात्म्याचे गोडवे गातो, त्या रणांगणावर धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांचे पुढे काय? या प्रश्नावर आपण फारसा विचार करत नाही, परंतु प्रतिमा राव या स्वत: एक सैनिकपत्‍नी असल्यामुळे त्यांना मात्र या समस्येची भीषणता जाणवली व त्यांनी स्वत:ला सैनिकांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याच्या कार्यात झोकून दिले. त्यांच्या स्वत:च्या पतीच्या निधनानंतर, सैनिकांच्या हक्काच्या असलेल्या सुखसुविधा मिळवताना त्यांना आलेल्या अनुभवावरून सैनिकांच्या समस्या दूर करण्याची आवश्यकता त्यांना जाणवली. त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी ‘सैनिकभारती ह्युमॅनिटी फाऊंडेशन’ची स्थापना केली. त्या स्वखर्चाने संस्थेचा कारभार करत आहेत.
 

संस्था सैनिकांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांचा पाठपुरावा करते. उदाहरणार्थ, इतर राज्यांत सैनिकांच्या नावांवरील घरांना ‘मालमत्ता कर’ माफ केला जातो. महाराष्ट्रात मात्र हा कर आकारला जातो. हा अन्याय दूर करण्यासाठी प्रतिमा राव यांनी ‘कर-माफी’चा प्रश्न धसास लावला आहे. त्यांच्या प्रयत्‍नांनी व चिकाटीमुळे महाराष्ट्रात ठाणे, नवी मुंबई, पुणे, अहमदनगर अशा काही महापालिकांमध्ये करमाफीच्या कागदोपत्री असलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ‘मालमत्ता करमाफी’ व्हावी यासाठी त्या जिद्दीने प्रयत्‍न करत आहेत.
 

प्रतिमा राव यांच्या मनामध्ये समाजसेवेचे बीज रुजले, फार वर्षापूर्वी, १९८१ मध्ये. त्यांनी ‘व्हिजन ब्युटी हेल्थ केअर सेंटर’ची स्थापना केली. या सेंटरमध्ये गरीब होतकरू मुलींना अनेक प्रकारची कौशल्ये शिकवून, रोजगार मिळवून देऊन त्यांनी स्वावलंबी बनवले.
 

प्रतिमा राव “सैनिक भारती’ हे पाक्षिक २००६ सालापासून प्रकाशित करत असून त्यामधून सैनिकांना मार्गदर्शन करत आहेत. ‘सैनिकभारती ह्युमॅनिटी फाऊंडेशन’ संस्थेतर्फे

१. सैनिकांच्या पाल्यांसाठी आर्थिक मदत मिळवून देणे
२. त्यांच्या नोकर्‍यांसाठी प्रयत्‍न करणे
३. शहीद सैनिकांच्या माता-पित्यांचे व विधवांचे पुनर्वसन इत्यादीसाठी

त्या सतत प्रयत्‍नशील आहेत.
 

शिवाय, प्रतिमा राव ‘व्हिजन कन्सल्टिंग’ या संस्थेतर्फे सैनिकांच्या मुलांना नोकर्‍या मिळवून देण्यासाठी व व्यवसायांतील विविध अडचणी दूर करण्यासाठी मदत करतात. त्यांना मुस्लिम-जम्मातुल्ला ट्रस्ट तर्फे जर्मन चान्सलरच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. टीचर्स असोसिएशनतर्फेही त्यांचा सत्कार करण्यात आला.
 

संपर्क: 9323989886
 

माहिती-अधिकाराचा पाठपुरावा

ठाणे महानगरपालिकेत माहिती अधिकाराचे ग्रंथालय उघडणार अशी बातमी

होती ‘थिंक महाराष्ट्र’वर गेल्या आठवड्यात दिली- असे ग्रंथालय असायला हवे म्हणून ठाण्याचे माहिती अधिकार चळवळीचे कार्यकर्ते मिलिंद गायकवाड यांनी पाठपुरावा केला. ते स्वत: केमिकल इंजिनीयर असून एका खाजगी कंपनीत एक्झिक्युटिव्ह प्रॉजेक्ट इंजिनीयर म्हणून काम करतात. त्यांनी माहिती-अधिकाराखाली ठाण्यातील ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ चा प्रश्न सोडवला. ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर जास्तीत जास्त माहिती यावी यासाठी आग्रह धरला. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या सभा यांचे कार्यवृत्तांत वेबसाईटवर, त्यांच्या सततच्या प्रयत्‍नांतून उपलब्ध होऊ लागले आहेत. बेकायदा जाहिराती आणि होर्डिंग यांविरुध्द देखील त्यांनी प्रखर आंदोलन केले.

मिलिंद गायकवाड यांची स्वत:ची milindgaikwad.com ही वेबसाईट उभी राहत आहे. त्यांचा मोबाईल नं. ०९३२२९५०४४१