आनंदयात्री चकोर

0
26
शंकर विटणकर लिखित काव्‍यसंग्रह - 'चकोर'
शंकर विटणकर लिखित काव्‍यसंग्रह - 'चकोर'

शंकर विटणकर लिखित काव्‍यसंग्रह - 'चकोर'माणसाच्या चित्तवृती चांगली कलाकृती वाचल्यावर स्थिरावतात. मनाला प्रसन्नता येते. अंत:करणातील सत्प्रवृत्तींना पालवी फुटू लागते. वृत्ती अंतर्मुख परंतु आशायुक्त बनते. माणसाला या जाणिवांपासून आनंद मिळतो. वाचकाला असा आनंद द्यायला नवा काव्यसंग्रह आला आहे. त्याचं नाव आहे ‘चकोर’ आणि कवी आहेत नागपूरचे बुजूर्ग कवी शंकर विटणकर. संग्रहाला राम पंडित यांची प्रस्तावना आहे. संग्रहात सुरुवातीला ते ईश्वराविषयी म्हणतात,

जिथे राहतो, तुला पाहले कसा म्हणू सांगाती नाही?

आणि अशा, सर्वदूर भरलेल्या ईश्वराला ते मागणं मागतात

दे मला देवा कविता,
वा सखा आनंदयात्री

कवी एक आनंदयात्री आहेत ह्याचा प्रत्यय प्रत्येक कविता वाचताना येतो. त्या आनंदात आहे अखंड नवोन्मेष फुलवण्याची शक्ती. संग्रहात एकूण एकशेअडतीस रचना आहेत. त्या पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात आणि तरीही त्यातील सर्वस्व ग्रहण केलं गेलं आहे असं वाटत नाही. काही ओळी पाहा,

राधा गोरी काळा शाम
दिवसरातिचा संग बघा
परक्यास्तव अश्रू ढाळी
माणसातला संत बघा

कविता म्हणजे शब्दांची जुळवणूक; पण ती आंतरिक आणि आत्मिक स्वरूपाची असते. शब्द कवितेत एकत्र येतात तेव्हा त्यांना तीन अवस्थांतून जावं लागतं. वाक्पुंीज, वाक्संधी आणि वाग्बंध. त्यानंतर शब्दांचं शब्दत्व उजळून निघतं. सार्थ होतं. पाहा-

धर्म आवडे मनास माझ्या
जो प्रीतीला स्वर्ग मानतो
सोनियाचा घास असतो
माय जो भरवी पिलाला

कवी शंकर विटणकर काव्य ही एक समस्या आहे. एक नवसृष्टी आहे. प्राण, शरीर व आत्मा ही जशी सृष्ट पदार्थांची अंगें, तसंच भावना हा काव्याचा प्राण, यथातथ्यता हे शरीर आणि गूढदर्शन हा आत्मा. काव्य ह्या तिन्ही कसोट्यांना उतरलं पाहिजे. काव्याचे अनेक प्रकार आहेत. जसे अभंग, लावणी, पोवाडा, सुनित, गीत-गझल…प्रत्येकाचे स्वत:चे असे नियम आहेत आणि त्याबरहुकूम ते लिहिले जावेत. मग ते रसिकांना खटकत नाही.
साहित्यिक हा दार्शनिकांचा दार्शनिक आहे. अस्सल काव्य हा काही लौकिक चातुर्याचा उद्गार नव्हे, की केवळ उत्कट भावनेचा उद्गारही नव्हे. तो एक उत्कट मंत्रोद्गार आहे. भारलेला, तसाच भारणारा. तो आंतरिक भूक भागवू शकतो. म्हणूनच विटणकर म्हणतात,

वाचित जावे ग्रंथ मनाचा
देवही लिहितो तयात काही

प्रत्येक गोष्टीत परमेश्वराचं अधिष्ठान आहे-असतं ही खुणगाठ मनाशी बांधून कलाकार-साहित्यिक आपलं सर्वस्व पणाला लावत असतो. त्यात प्रेम ओतत असतो आणि ते प्रेम रसिकांना जाणवल्याशिवाय राहत नाही. प्रेमानं तर जग जिंकता येतं; पाहा;

जिंकले ज्याने जगाला लाखदा तो
मित्र माझा, प्रेम त्याचे नाव आहे

प्रत्येक माणूस सुखाच्या मागे लागलेला असतो, पण हे सुख कसं असतं?

हसून फसवी, रुसून फसवी
सुखासारखी दुष्ट न राणी

 

मानवी संस्कृतीची वाढच मुळी सौंदर्य-प्रेमातून झाली आहे. शुभत्वाच्या आणि मांगल्याच्या कल्पनेत आकर्षकता, उचितता आणि अर्थपूर्णता यांचं अपूर्व मिश्रण असतं. विटणकरांच्या संग्रहात मिश्रण अचुकपणे झालेलं दिसतं. सर्व रचनांमध्ये प्रासादिकता गुण आवर्जून पाळला गेलेला आहे. संग्रहाची बांधणी, मुखपृष्ठ, कागद उत्कृष्ट. आतील रेखाचित्रंही छान. संपूर्ण आनंदासाठी तो मुळातून वाचायला हवा. तर हा काव्यसंग्रह ‘चकोर’ चंद्रासारखा रसिकांच्या आणि त्यांच्या चांदण्यासारख्या प्रेमाच्या प्रतीक्षेत आहे. शेवटी त्यांच्याच तरल ओळींनी समारोप

तोच पाहिना वळून मागे
ज्याच्यासाठी डोळे भिजले

चकोर (काव्यसंग्रह)
शंकर विटणकर – ९८६००२४६२९
लीला प्रकाशन, नागपूर -२२
पृष्ठे, १८४, मूल्य, १९० रूपये

ए. के. शेख
८२७५३२५८११/९८६९२०२६५०/०२२-२७५९०८२९
ए/२. अंबर अपार्टमेंट, उर्दू शाळेजवळ, पाटकरवाला दर्गा जवळ, पनवेल.