आडवाटेचे ऐतिहासिक गुंज गाव

2
13
_Gunj_Gaon_1.jpg

गुंज हे भिवंडी-वाडा महामार्गावरील कुडूस गावापासून दहा-बारा किलोमीटरवर असलेले छोटेसे गाव. गुंज गाव हे दोन भागांत विभागले आहे, गुंज गाव आणि गुंज कोठी. दोन्ही बाजूला शेती आणि शेताच्या मधून एकावेळी एक वाहन जाऊ शकेल असा रस्ता, कौलारू घरे आणि घरापुढे असलेले अंगण हे दृश्य गुंज गावात जाईपर्यंत दृष्टीस पडत असते.

गुंज गावाने त्याच्या पोटात पेशव्यांचा इतिहास सामावून घेतला आहे. चिमाजीआप्पांनी वज्रेश्वरी देवीला नवस केला तो ह्याच गावात. गावात पेशवेकालीन परशुराम भार्गवरामाचे मंदिर आहे. डोंगराच्या पायथ्याशी तळे आहे. त्याच्या काठावरल्या मंदिराचे भग्न अवशेष दिसतात. ते मंदिर कोणाचे असावे याचा उलगडा होत नाही. ते अवशेष आणि वज्रेश्वरी देवीचे मूळ देवस्थान यांच्या रूपाने इतिहास तेथे जिवंत आहे.

भार्गवरामाचे मंदिर टेकडीवर असल्यामुळे ते लांबूनच लक्ष वेधून घेते. तलाव गावाच्या टोकाला आहे. त्या जवळून जाणारी पायवाट भार्गवरामाच्या मंदिरात जाते. तलाव ऑक्टोबर-जानेवारीमध्ये कमळाच्या फुलांनी आणि पानांनी भरून गेलेला असतो. ती ‘वॉटर लिली’ या प्रकारातील पाणफुले असतात. ‘कुमुद’ जातीची त्या प्रकारची फुले कोकणातील आणि सह्याद्रीतील अनेक तळ्यांत फुलतात. फुले पांढऱ्या रंगाची, पाच सेंटिमीटर व्यासाची असतात. त्यांना पाच किंवा सहा पाकळ्या असतात. फुलांच्या मध्यभागी पिवळी छटा असते. पाकळ्यांवर नाजूक धाग्यांची कलाकुसर असते. पानांचा आकार बदामाकृती असून पानांमधून लांब देठ काढून ती फुले ताठ मानेने सभोवतालचा आसमंत बघत असतात, पण फुलांचा तो ताठरपणा फूल देठासकट तोडले, की लगेच गळून पडतो. फुलांना मंद असा सुवास असतो. फुलांचे ते सौंदर्य काठावरून अनुभवायचे आणि तलावाजवळ असलेले मंदिराचे अवशेष (आता फक्त चौथरा आणि कोरीव काम केलेले काही दगड) बघून भार्गवराम मंदिराच्या दिशेने पावले वळतात. मंदिराच्या अवशेषांवरून ते मंदिर सहाशे-सातशे वर्षें जुने असावे.
मंदिराकडे जाणारी पायवाट चांगली मळलेली आहे. पायवाटेच्या दोन्ही बाजूला झाडे असल्यामुळे वाट चढताना थकवा जाणवत नाही. तळ्यापासून मंदिरापर्यंत पोचायला पंधरा-वीस मिनिटे लागतात.

_Gunj_Gaon_2.jpgभार्गवरामाचे मंदिर उत्तराभिमुखी असून जांभ्या दगडात बांधले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती कोरली आहे. मंदिर गर्भगृह आणि गाभारा अशा दोन भागांत विभागले गेले आहे. गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी दरवाजे तीन दिशांना आहेत. मंदिराचा गाभारा छोटा असून, भार्गवरामाची मूर्ती चौथऱ्यावर दगडी महिरपीत उभी आहे. मूर्ती साधारणपणे दोन फूट उंचीची आहे. मूर्तीच्या गळ्यात फुलांचा हार कोरलेला असून भार्गवरामाने पिवळा पितांबर नेसलेला आहे. मूर्तीच्या हातात कोणतेही शस्त्र नाही. मंदिरातून बाहेर येताच आजूबाजूचा परिसर मन प्रफुल्लीत करतो. मंदिराजवळून दिसणारे पंधरा-वीस घरांचे गुंज गाव, गावाच्या पाठीमागे असलेला तलाव हे दृश्य सुंदर दिसते. मंदिराजवळ मोठी झाडे आणि झुडुपे असल्यामुळे अनेक प्रकारची फुलपाखरे आणि रानटी फुले दृष्टीस पडतात.

वज्रेश्वरी हे मंदिर गुंज गावापासून दोन किलोमीटरवर गुंजकोठीमध्ये आहे. वज्रेश्वरी मंदिरात जाणारा रस्तासुद्धा शेतातून जातो. मंदिराच्या तिन्ही बाजूंना शेतजमीन आहे. मंदिराच्या आजुबाजूला पळस, जास्वंद आणि इतर फुलझाडे आहेत. मंदिराचा जीर्णोद्धार झालेला असून गाभाऱ्यात देवीच्या दोन मूर्ती आहेत. वज्रेश्वरी देवीने उजव्या हातात तलवार आणि डाव्या हातात गदा धारण केली आहे. वज्रेश्वरी देवीच्या उजव्या बाजूला रेणुकादेवीची मूर्ती आहे. रेणुकादेवीने उजव्या हातात तलवार धारण केली आहे. गाभाऱ्यात गणपती, हनुमान, आदि देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिराशेजारी पाण्याचे टाके असून, जवळ एका मंदिरात देवीची भग्न मूर्ती आहे.

– पंकज समेळ
Email – pankajsamel.1978@outlook.com

2 COMMENTS

  1. Really worth visiting. Didn…
    Really worth visiting. Didn’t know being even so close to it. Thanks a lot for such records.

  2. खूप छान…मी सूद्धा त्या…
    खूप छान…मी सूद्धा त्या गावचा रहिवासी आहे..

Comments are closed.