आजी-आजोबांचे पाळणाघर

0
14

‘रेनबो’ या संस्थेने वृद्धाश्रम व घर यांचा मध्य साधण्याचा प्रयत्न केला आहे. ती संस्था ऑक्टोबर 2015 मध्ये सुरू झाली. ती एका संघटनेच्या अंतर्गत चालवली जाते. त्या संघटनेचे नाव आहे Center for Action Research & Education (CARE). ‘रेनबो’ संस्थेत विविध वयोगटांतील आजी-आजोबा येतात. वय वर्षें बासष्टपासून ते वय वर्षें अठ्ठ्याऐंशीपर्यंतचे आजी-आजोबा सध्या तेथे येतात. त्या वयातील लोकांशी बोलणे जास्त गरजेचे असते, त्यांना सहवासही हवासा असतो. त्यांना त्या दोन्ही गोष्टी तेथे मिळतात. काही आजी-आजोबा आठवड्यातून एकदा येतात, तर काही आठवड्यातून दोनदा येतात. काहीजण रोज येतात. रेनबो म्हणजे सात रंगांनी मिळून तयार झालेले ‘इंद्रधनुष्य’. त्या इंद्रधनुष्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रांतांतील, जाती-धर्मांतील लोक एकत्र गुण्यागोविंदाने एकमेकांची सुखदुःखे वाटून दिवसभरातील वेळ आनंदाने घालवतात आणि संस्थेचे नाव सार्थ ठरवतात.

लहान मुलांचे जसे पाळणाघर असते तसेच मोठ्यांचे म्हणजे आजी-आजोबांचेही पाळणाघर काढावे ही कल्पना अनुराधा करकरे यांना सुचली आणि त्यांनी ती अंमलात आणली. त्यांना त्यांच्यासारख्याच अवलियांची त्या कामात साथ लाभली आहे. आजी-आजोबांचा वेळ मजेत जावा, त्यांना त्यांच्या वयाचे साथीदार गप्पा मारण्यासाठी मिळावेत, त्यांचे ‘बोनस’ दिवस आनंदात जावेत आणि त्यांच्या मुलांनादेखील त्यांच्या ऑफिसमध्ये निश्चिंतपणे जाता यावे या उद्देशाने संस्था उभारली गेली. संस्थेचे कार्य गेली चार वर्षें चालू आहे.

तेथे वृद्धांचा रोजचा दिनक्रम ठरलेला आहे, ज्येष्ठांना सतत ‘बिझी’ ठेवले जाते. आजी-आजोबांना त्यांचा दिवस कधी सुरू होतो आणि कधी संपतो ते कळतदेखील नाही. त्यामुळेच त्यांचे घरी गेल्यावर लक्ष दुसऱ्या दिवशीचे नऊ कधी वाजतात याकडे लागलेले असते. संस्था सकाळी नऊ वाजता सुरू होते, संस्थेने पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत येण्या-जाण्याची सोयही केली आहे; त्यासाठी संस्थेकडे दोन व्हॅन आणि एक कार आहेत.

• संस्थेत 9:00 वाजता आल्यावर सर्वांना नाष्टा दिला जातो, रोज वेगवेगळा नाष्टा असतो. मेनू सर्वांची आवड विचारात घेऊन ठरवला जातो. आजी-आजोबा त्यांची फर्माईश सांगतात तेव्हा त्यांचा मान राखला जातो.   

• 9:30 ते 10:00 वाजेपर्यंत पेपर वाचन, एकमेकांशी हाय- हॅलो

• 10:00 ते 10:45 प्रार्थना, चर्चा, समुपदेशन

• 11:00 ते 12:00 योग. त्यात प्राणायाम, छोटे-मोठे व्यायामप्रकार, मेडिटेशन, मोठ्याने हसणे यांसारख्या अॅक्टिव्हिटी

• 12:00 ते 12:30 एकत्र वाचन. नुकतीच त्यांनी मृत्युंजय कादंबरी वाचली.

• 12:30 ते 1:15 दुपारचे जेवण. डॉक्टरांच्या सल्यानुसार, डाएट प्लॅनप्रमाणे दुपारचे जेवण असते. पोळी-भाजी, भात-वरण, ताक इत्यादी. सण असेल तर त्यादिवशी गोड पदार्थ.

• 1:30 ते 3:00 वामकुक्षी (दुपारची झोप) प्रत्येकासाठी कॉट.

• 3:15 वाजता दुपारचा चहा- बिस्किट.

• 3:30 ते 4:30 अॅक्टिव्हिटी घेतली जाते, दरदिवशी वेगळा माणूस येतो. आठवड्यातून एक दिवस पुस्तकवाचनाचा कार्यक्रम असतो. त्यांची ‘मृत्युंजय’ कादंबरी नुकतीच वाचून झाली, एक दिवस साने गुरुजी कथामाला, तर एक दिवस डान्स थेरपी, म्युझिक थेरपी (दर बुधवारी), एक दिवस आर्ट आणि क्राफ्ट, एक दिवस बुद्धीला चालना देणारे खेळ जसे, की शब्द खेळ. उदाहरणार्थ, शेवटचे अक्षर ‘श’ असणारे शब्द सांगा. एक दिवस पत्ते खेळले जातात, एक दिवस कॅरम, एक दिवस हौजी खेळला जातो.

• 4:30 वाजता छोटा नाष्टा लाडू-चिवडा, दडपे पोहे असे काही…

• 5:00 वाजता घरी जाण्याची वेळ.

• मराठी, हिंदी सिनेमा बघण्यासाठी प्रोजेक्टरची सोय आहे. शॉर्ट फिल्मसाठी आठवड्यातून एक दिवस.

• वर्षातून दोनदा- पावसाळा व हिवाळा – एकदिवसीय सहल.

• संस्था तात्पुरती राहण्याची सोयदेखील करते, म्हणजे दोन-तीन दिवस जर आजी- आजोबांकडे बघणारे कोणी नसेल तर अशा वेळी आजी-आजोबांना संस्थेत राहता येते. आजी-आजोबा एक दिवसापासून ते तीस दिवसांपर्यत तेथे राहू शकतात. तेथे नर्सिंग सोय नाही. परंतु आजी-आजोबांची औषधे संस्थेत असतात. ती त्यांना त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेनुसार दिली जातात. इमर्जन्सी आली तर मुलांना फोन लावून कळवले जाते आणि फोन लागलाच नाही तर ताबडतोब मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेले जाते व तेथे उपचारांना सुरुवात केली जाते.

• आजी-आजोबांना अॅडमिशन घेणे असेल तर पाच दिवस आधी सांगावे लागते. आजी-आजोबांनी दोन तास वेळ घालवल्यानंतर त्या आजी-आजोबांच्या परवानगीने त्यांची अॅडमिशन निश्चित केली जाते.

आजी-आजोबा घरी शांत असलेले तेथे खूप दंगा-मस्ती करतात. कारण त्यांचे तेथे लाड होतात. ते म्हणतात, की येथे ‘आम्हाला लहान झाल्यासारखे वाटते. आमचे वाढदिवस साजरे केले जातात; तसेच, प्रत्येक सण साजरा केला जातो.’

आजी-आजोबांच्या सेवेसाठी तीन मावशी आणि तीन समाजसेविका आहेत. शनिवारी हाफ डे असतो आणि रविवारी संस्थेला सुट्टी असते. संस्थेने नुकतेच पौड येथील लवळे या गावात ‘विरंगुळा सेंटर’ सुरू केले आहे. तेथे दर गुरुवारी फ्री ओपीडी असते. त्यासाठी ‘रेनबो’ संस्थेतून दोन डॉक्टर, दोन समाजसेवक आणि एक व्हॅन जाते. तेथे वेगवेगळे कॅम्प आयोजित केले जातात.
शरीराबरोबर मनाचे आरोग्यदेखील नीट राखले जावे यासाठी छत्रे सभागृहात दर शनिवारी चार ते सहा या वेळेत मनाची कार्यशाळा (मार्इंड जिम) सुरू केली आहे. तेथे लेक्चर फ्री असते, मान्यवर मानसोपचारतज्ज्ञांना बोलावले जाते. बुद्धीला चालना देणारे विविध गेम्स तेथे घेतले जातात व त्यावर चर्चा केली जाते; मार्गदशनही केले जाते. ज्येष्ठांमधील नैराश्य, भीती, चिंता या भावना तीव्र असतात. त्यांच्या विचार, भावना, वर्तन यांमध्ये काही प्रमाणात बदल घडावा म्हणून ही ‘माईंड जिम’. विविध कलांच्या माध्यमातून ‘स्व’पर्यंत पोचण्याचा प्रयत्न त्या उपक्रमाद्वारे केला जातो. अनुराधा यांनी सांगितले, की. म्हातारपण आनंदी, समाधानी आणि शांततेचे जावे हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून, मेंदू व मन यांच्या विकारांपासून दूर राहता यावे यासाठी मार्इंड जिम आहे. नाट्य, संगीत, कला, नृत्य, सिनेमा, साहित्य, शब्दखेळ या माध्यमातून आम्ही ज्येष्ठांपर्यंत पोचणार आहोत. व्यक्त होणे, मोकळे होणे, शेअर करणे यांतूनच ते जमणार आहे. या सर्व कला म्हणजे ‘स्व’पर्यंत पोचण्याचे माध्यम आहे. ‘मार्इंड जिम’ हा स्वतःला बदलवत नेण्याचा प्रयत्न आहे.

त्या पुढे म्हणाल्या, की माणूस सवयीनुसार वागत असतो, त्या सवयी खूप खोलवर रूतलेल्या असतात. त्यामुळे दुसऱ्या वेगळ्या मार्गाचे वर्तन अशक्य वाटू लागते. माणूस सवयीचा गुलाम तर असतोच, पण त्या सवयी आजुबाजूच्या लोकांना जाचक होऊ शकतात. म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण असा समज आहे, परंतु ते तसेच असायला पाहिजे असे नाही. त्यामुळे दृष्टिकोन मोठा करणे, त्यात लवचीकता आणणे आणि माणसाचे जगणे स्वतःसाठी व इतरांसाठीदेखील सुकर करणे हे ‘माईंड जिम’चे उद्दिष्ट आहे.

संकटे आल्यावर धडपड करण्यापेक्षा ती संकटे येऊच नयेत यासाठी वर्तमानात केले गेलेले प्रयत्न म्हणजे हे ‘माईंड जिम’ आहे. तेथे येणाऱ्या प्रत्येकाला स्वतःचे मत, विचार मांडण्याची संधी मिळते, ते विचार आवर्जून ऐकले जातात. त्यामुळे पूर्ण हॉलमध्ये चैतन्यमय वातावरण तयार होते.

अनुराधा यांना पुणे शहरात विविध ठिकाणी या उपक्रमाच्या शाखा उभारायच्या आहेत.

अनुराधा करकरे 9373314849, Care.pune.in@gmail.com