अष्ट‘भुजा’ माधवी मेहेंदळे

0
71
Madhavi

पुण्या च्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनात माधवी मेहेंदळे हे नाव गेल्या दशकात एकदम पहिल्या रांगेत येऊ पाहताना दिसते, परंतु तेथे ते विराजमान मात्र होत नाही! कारण माधवी मेहेंदळे या एका व्यक्तीत अनेक माधवी मेहेंदळे वस्ती करून आहेत! त्या आज वाड्.मयीन सभेत दिसतात, तर उद्या सामाजिक जागृतीसाठी पथनाट्य संयोजनात गुंतलेल्या असतात, परवा त्यांची त्यांच्या पेटिंग च्या प्रदर्शनाची तयारी चाललेली असते वा तत्संबधात लेखन…. आणि त्यांचा असा विविध संचार चालू असताना रोजचा डोळ्यांचा दवाखाना चुकत नाहीच! माधवी मेहेंदळे व्यावसायिक प्रसिद्ध नेत्रतज्ञ तर आहेतच; पण चित्रकार , कलावंत, लेखक, चांगल्या व्यवस्थापक आणि मुख्य म्हणजे समाजात विधायक, चांगलं काही घडून येण्यासाठी धडपडणारं कृतिप्रवण व्यक्तिमत्त्वही आहेत.

माधवी मूळ नागपूर च्या. आई-वडील, दोन मोठे भाऊ असं अगदी चौकटीतलं सुरक्षित आयुष्य. शाळा-कॉलेजात बुद्धिमान म्हणून नावाजलेली मुलगी. सगळ्याच विषयांत गम्य. त्यावेळी चांगले मार्क्स मिळाले, की मेडिकलला जाण्याची प्रथा होती. त्याप्रमाणे त्यांनी नागपूरच्या गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतला. तिथं सगळीकडे पहिला नंबर, गोल्ड मेडल वगैरे स्वाभाविकपणे प्राप्त झालं.

लग्नानंतर माधवी पुण्यात आल्या. त्या आधी, इंटर्नशिपपासून पुण्यात राहात होत्याच. पुण्यात त्यांना पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा करायचा होता- पण त्यांचं एमबीबीएस नागपूरमधून झालं असल्याच्या कारणानं त्यांना पुण्यात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश देण्यास खळखळ सुरू झाली. माधवी ह्या मुळातच निर्भय आणि ठाम आत्मविश्वास असलेल्या व्यक्ती. ‘मी भारताची नागरिक आहे, मला नियमांप्रमाणे प्रवेश मिळायलाच हवा’ असं म्हणून त्यांनी सरळ कोर्टकेस केली. केस दोन-अडीच वर्षं चालली, पण त्या पदव्युत्तर शिक्षणासाठी पुण्यात प्रवेश मिळवण्यात यशस्वी झाल्या!

 दरम्यान त्यांचा रीतसर संसार सुरू झाला होता. दोन मुलंही झाली होती. त्यांनी डेक्कन जिमखान्यावर राहत्या घराच्या वास्तूत ‘प्रकाश आय हॉस्पिटल’मधून १९८८ साली प्रॅक्टिसला सुरुवात केली. ‘डेक्कन’सारख्या लोकवस्तीमध्ये, चोखंदळ माणसं असलेल्या परिसरात स्वत:ला एस्टॅब्लिश करणं हेच मुदलात आव्हान होतं. त्यात आणि ‘टिपिकल प्रकारच्या संसारा’त त्या मनापासून रमून गेल्या.

अचानक, एके दिवशी त्यांच्या मनात आलं -कदाचित बरेच दिवस ते त्यांच्या नेणिवेत असेलही- की हेच किती दिवस करायचं? डोळ्यांच्या ट्रिटमेंटसंबंधात जेवढी म्हणून नवीन टेक्नॉलॉजी आहे ती सगळी त्यांनी आत्मसात केली होती. ‘नव्या टेक्नॉलॉजीसाठी नवीन गुंतवणूक लागते. सतत नवनवीन तंत्रं पुढे येत असतात, ती साधनसामग्री घेण्यासाठी पुन्हा गुंतवणूक…. ते एक चक्रच होणार- त्यामधून बाहेर येण्याचा मार्ग नाही!’ मग त्यांच्या मनात आलं- आपण नक्की काय करतोय? आपण बुद्धिवादी म्हणवतो स्वत:ला – मग आपण इक्किपमेण्ट मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीच्या हातातलं बाहुलं व्हायचं का? इंडस्ट्रीनं बनवलं म्हणून आपण विकत घ्यायचं? आणि हप्ते फेडत बसायचं? “माझा सगळा दिवस संपूर्ण रात्र होइपर्यंतचा काळ क्लिनिकच्या त्या खोलीतच बंद होऊन जाई. मग काय करायचं? मला तर सतत समोर काहीतरी लागतं.” माधवी सरळसोट बोलतात पण मनापासून बोलतात, त्यामुळे त्यात एक झकास आर्जव असतं, ते ऐकत राहावंसं वाटतं.

दरम्यान, त्यांची एका पेशंटशी मैत्री झाली. ती ‘फाईन आर्टस्’मध्ये एम.ए. करत होती. मग माधवींनीही एस.एन.डी.टी. विद्यापीठात ‘फाईन आर्टस्’ केलं. त्यांनी त्या दोन वर्षांतले सुंदर अनुभव लिहून काढले. ते ‘रंगचिंतन’ या नावाचे लेख ‘सकाळ ’ आणि ‘अंतर्नाद’मधे प्रकाशित झाले. माधवी यांना स्वत:चा हा नवीनच शोध लागला! पेंटिंग आणि लिहिणं एकाच वेळी सुरू झालं. त्यांनी विविध विषयांवर लिहायला सुरुवात केली. ‘सकाळ’, ‘लोकसत्ता ’, ‘मिळून सार्‍या जणी’, ‘अंतर्नाद’, ‘माहेर’ अशा ठिकाणी ते छापूनही आलं. वाचक या नव्यानं अवतरलेल्या, वेगळ्या तरल संवेदनेनं लिहिणार्‍या लेखिकेकडे औत्सुक्यानं पाहू लागले.

माधवी मेहेंदळे त्यांच्या या नवीन गवसलेल्या छंदाचं व त्यावेळच्या मनस्थितीचं समर्पक वर्णन करतात. त्या म्हणतात, “मी सतराव्या वर्षीच्या कोवळ्या वयात वैद्यकाला प्रवेश घेतला आणि तेविसाव्या वर्षी डॉक्टर होऊन बाहेर पडलेदेखील. सगळेच विद्यार्थी असं करत असतात. आम्हांला सतराव्या वर्षी मृत शरीर पाहावं लागतं, त्याचं विच्छेदन करावं लागतं. त्यावेळी मानवी जीवनाची जवळून ओळख होते. स्त्री-पुरूष असं ‘इनहिबिशन’ संपून जातं. मानसिकतेत बदल होतो. तिथल्या तिथं निर्णय घेण्याची क्षमता आणि वैयक्तिक सुखदु:खं बाजूला ठेवून काम करण्याची वृत्ती निर्माण होते. अधिक संवेदनाशील मनांना विज्ञानाचं अपुरेपण कळतं. आम्ही डॉक्टर म्हणून घडत असताना मनात असे अंतर्बाह्य बदल होत असतात. परंतु मनाचं आणि शरीराचं नातं वैद्यकात नीट शिकवलं जात नाही. मला प्रत्यक्ष व्यवसाय करत असताना. हे सारं उमजत गेलं आणि मी वेगवेगळ्या तर्‍हेचं लेखन आरंभलं. त्याच काळात चित्रकलेचा ध्यास घेतला. तो अभ्यास करताना मायकेलँजेलोपाशी येऊन पोचले आणि तिथं ज्ञानशोधाचं एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटलं.”

माधवी जगभरातली चित्रं बघण्याच्या ध्यासापोटी युरोपमध्ये अक्षरश: गॅलरी टु गॅलरी हिंडल्या. त्यांनी ‘आर्ट टुरिझम’वर लिहिलं. त्या अमेरिकेतल्या एका मैत्रिणीसह कुठलंही प्लॅनिंग न करता फिरल्या. “इटलीत मायकेलँजेलो मानगुटीवरच बसला. त्याच्याविषय़ी प्रचंड वाचलं, अभ्यास केला. आता लिहायला पाहिजे असं वाटलं. मग काय राहिलं होतं ते पाहण्यासाठी पुन्हा इटलीला गेले. त्यातून मायकेलँजेलो हे पुस्तक झालं.” माधवी सांगत होत्या. मी त्यांनी जपून ठेवलेली जगण्यातली प्रचंड उत्स्फूर्तता, ऊर्जा आणि संवेदनशीलता पाहून चकितच झाले!

पण ही उत्स्फूर्तता तेवढ्यावरच थांबलेली नाही. उलट तिथून पुढेच माधवी जे शोधत होत्या ते जगण्याचं श्रेयस त्यांना सापडलं. डॉ.राणी बंग यांच्या सहवासात. त्या 2005मध्ये अचानक उठल्या आणि अभय बंग यांच्या कर्मभूमीत पोचल्या. बंग पतीपत्नी चांगलं विधायक काम करतात एवढंच त्यांना माहीत होतं. त्या म्हणाल्या, “with no agenda मी तेथं गेले, तिथं माझं राणीशी मस्त जमलं. तिथं कार्यकर्त्यांबरोबर आत जंगलांमधून, नक्षलवादी परिसरातूनही हिंडले. नंतर परत दोन-तीन महिन्यांनंतर टिम घेऊन गेले. तेथील लोकांचे डोळे तपासले – त्यांना चष्मे दिले. तिथले सगळे प्रोजेक्ट बघितले. बंग यांनी खेड्यापाड्यांतल्या लोकांसाठी काय काय केलंय ते सगळं बघितलं- बालमृत्यू कमी करण्यासाठीचा ‘अंकुर’ प्रोजेक्ट, व्यसनमुक्ती, दायांना प्रशिक्षण, आरोग्य प्रशिक्षण……. त्या भेटींतून लक्षात आलं की एक डॉक्टर पेशंटसाठी समाजात मिसळून काय काय करू शकतो! आदिवासी मुलींसाठी इतक्या सरकारी योजना आहेत, त्यांचे फायदे आहेत. पण ते त्यांना सांगणार कोण? राणी बंगनं ते काम केलं. हा मोठाच श्रीमंत करणारा अनुभव होता. कारण त्यांना काही ठाऊकच नाही. मच्छरदाण्या दिल्या तर त्यांचा वापर ते मासे पकडायला करू लागले किंवा त्या अंगावर पांघरून घेऊ लागले. हे सगळं बघितलं आणि मला स्वत:ला माझा मार्ग सापडला. परत आल्यावर मी राणीवर लेख लिहिला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझा फोकस राणी आहे.” माधवी सांगत होत्या.

राणी बंग तिकडे ‘सेक्स एज्युकेशन’वर शिबिरं घेतात. माधवी यांच्या लक्षात आलं की शहर भागातही या गोष्टींची गरज आहे. मग त्यांनी अठरा ते पंचवीस या वयोगटाच्या मुलामुलींसाठी- ‘तारुण्यभान’ नावाचं शिबिर घेतलं. “सुरुवातीला मला फारटेन्शन आलं होतं” माधवीताई म्हणाल्या – “लोक कसं बघतील याकडे, कुणी येतील की नाही? मग प्रत्येक कॉलेजच्या प्राचार्यांना भेटले. त्यांना वाटायचं की या डोळ्यांच्या डॉक्टर हे काय करतायत? ते म्हणायचे, मुलं बसणारच नाहीत. पण ‘लोकसत्ता’सारख्या दैनिकानं सहकार्य दिलं. बातमी छापली. राणीला बोलावलं होतं. काहीच घडलं नाही तर आपण गप्पा मारू असं तिला म्हटलं होतं. पण प्रत्यक्षात हॉल भरून गेला. काही मुलांना परत जावं लागलं.” मग अशी अनेक शिबिरं माधवी यांनी घेतली. रोटरीच्या त्या अध्यक्ष आहेत. तिथली यंत्रणा त्यांना या कामांसाठी उपयोगी पडते. टिमनं काम करण्याचं महत्त्वही त्या सांगतात.

या शिबिरांत मुलं किती मोकळेपणानं बोलतात याची उदाहरणं माधवी यांनी सांगितली. एका मुलीनं त्याना विचारलं, की ‘सेक्स करताना खूप दुखतं – मग त्यात आपण मरतो का?’ दुसर्‍या मुलीनं आपले आजोबा आपल्यावर रोज बलात्कार करतात असं सांगितलं. मुलामुलींच्या मनात आपल्या शरीराविषयी असणारे न्यूनगंड या शिबिरांत काढून टाकले जातात. त्यांच्या प्रश्नांना रिडिक्युल न करता ते नीट हाताळावे लागतात, असं त्या म्हणाल्या

‘मुक्तांगण’ आणि रोटरीचं नेटवर्किंग वापरून त्यांनी अॅडिक्शन- व्यसनमुक्तीवरही शिबिरं घेतली. मुलं तंबाखूपासून ते इंटरनेटपर्यंतच्या अॅडिक्शनला बळी पडतात. या मुलांसाठी त्यांनी पथनाट्यस्पर्धा घेतल्या. छोट्या छोट्या संहिता, छोटे विषय, फार मोठे खर्च नाहीत – अशा त्या स्पर्धा प्रभावी ठरल्या. त्यांनी एचआयव्हीबाधित मुलामुलींसाठी विवाहमेळावे भरवले. ‘मेडिकली त्यांना त्रास असला तरी मानसिक गरज असतेचना! त्याही स्थितीत लग्न जमावं म्हणून नटूनथटून येणार्‍यांना पाहिलं की पोटात तुटतं” त्या म्हणतात.

माधवी यांच्यामध्ये अफलातून कल्पकता आहे. रेणू गावस्करां च्या शाळेतल्या मुलांना त्या मध्यंतरी चित्रकला शिकवत होत्या. त्याविषयी त्या सांगत होत्या, “मी मुलांना मंडईत घेऊन जायची. आम्ही आमच्या घराच्या टेरेसवर जाऊन पतंग उडवायचो, भेळ खायचो. एकदा अशाच टेरेसवर असताना एका मित्राचा फोन आला. तो म्हणाला, ‘काय करतेयस?’ मी सांगितलं, ‘रेणूच्या मुलांबरोबर पतंग उडवतेय.’ तो म्हणाला, ‘आलोच मी.’ आणि अक्षरश: ऑफिसातलं काम टाकून तो दहा मिनिटांत तिथं हजर झाला.” रेणू गावस्करांच्या मुलांसाठी माधवी मोफत चेकिंग करतात. तसंच मुकबधिर मुलांनाही त्यांच्याकडे फ्री एण्ट्री आहे.

इतकं सगळं करणार्‍या माधवी यांना पुण्यातल्या ट्रॅफिकवर काही काम करण्याची इच्छा आहे, “परदेशात मुलांना ट्रॅफिकबाबत सक्षम करून मगच रस्त्यावर आणलं जातं. आपल्याकडे ते न करताच आपण त्यांना रस्त्यावर आणतो.” त्या म्हणतात. रोटरीच्या माध्यमातून छोट्या छोट्या ट्रॅफिक अवेअरनेस फिल्म्स बनवण्याची त्यांची इच्छा आहे. त्यासाठी लागणारा पैसा त्यांना अक्षरश: एक-दोन फोनवर उपलब्ध झाला. ‘चांगल्या कामासाठी पैसा कमी पडत नाही’ हा त्यांचा स्वत:चा अनुभव त्या सांगतात. त्या म्हणतात. – “आज डॉक्टर-पेशंट नातं हे अविश्वासानं भरलेलं आहे. पण मला कितीतरी पेशंट जास्तीचे पैसे देऊन जातात. आपल्या कामातला सच्चेपणा, प्रामाणिकपणा लोकांना नक्की कळतो.” पुण्यातल्या ‘सिटीप्राईड’, ‘अलका’ यांसारखा थिएटरांनी माधवी यांना या फिल्म्स मोफत दाखवण्याचं आश्वासन दिलंय

माधवी यांना आणखीही बरंच काही करायचंय. भोवताली प्रश्न इतके आहेत आणि माधवी यांची संवेदनशीलता अतीतीव्र. स्वत:वर, माणसातल्या माणूसपणावर आणि बदल घडू शकतो यावर त्यांचा अमीट विश्वास आहे. या सकारात्मक ऊर्जास्रोतानं माधवी मेहेंदळे यांना जणू अष्ट‘भुजा’च बनवलंय!

– डॉ.माधवी मेहेंदळे,
‘प्रकाश’ डोळयांचे हॉस्पिटल,
‘गुडलक’ रेस्टॉरंटच्या मागे,
डेक्कन जिमखाना, पुणे – 411 004
भ्रमणध्वनी – 9890904123,
इमेल : madhavimehendale@gmail.com

अंजली कुलकर्णी,
3, विघ्नहर अपार्टमेंट,
जयवर्धमान सोसायटी,
बिबवेवाडी रोड, पुणे -411037 भ्रमणध्वनी : 9922072158,
इमेल : anjalikulkarni1810@gmail.com

महाजालावरील इतर दुवे  माधवी मेहेंदळे लिखित ‘दैवी प्रतिभेचा कलावंत : मायकेलँजेलो’ पुस्तकातील संपादित अंश!

संबंधित लेख –

मुक्तता – माधवी मेहेंदळे    
‘कलांगण’चा ‘भावे’ प्रयोग
श्रीधर फडके
सिनेमारसिकतेच्या शोधात दहा दिशा…….
अफलातून भालचंद्र नेमाडे
सुलेखनाची पालखी
मुक्तता!

{jcomments on}

About Post Author

Previous articleमुक्तता!
Next articleहरी घंटीवाला
अंजली कुलकर्णी या पुण्‍याच्‍या कवयित्री. त्‍यांनी आतापर्यंत काव्‍यसंग्रह, ललित लेखसंग्रह, संपादीत अशी एकूण बारा पुस्‍तके लिहिली आहेत. त्‍यांनी लिहिलेले 'पोलादाला चढले पाणी' हा रशियन कादंबरीचा अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. त्‍यांनी अनेक कवितांचे हिंदी आणि इंग्रजीतून अनुवाद केले आहेत. त्‍यांच्‍या लेखनाला आतापर्यंत महाराष्‍ट्र राज्‍य शासन, यशवंतराव प्रतिष्‍ठान यांसारख्‍या संस्‍थांकडून अनेक पुरस्‍कार प्राप्‍त झाले आहेत. लेखकाचा दूरध्वनी - 9922072158