अश्व परीक्षा, नव्हे अश्व पुराण !

0
267

भारतीय लोकांना अठरा पुराणे ठाऊक आहेत. त्या अठरांत कूर्म आणि वराह या नावांची प्राण्यांना उद्देशून दोन पुराणे आहेत. ते विष्णूचे अवतार. मात्र घोडा हा माणसाचा जुन्यातील पाळीव प्राणी आणि त्याचे महत्त्व असूनदेखील त्याच्या नावाने एखादे पुराण नाही कारण विष्णूने अश्वावतार घेतला नव्हता मात्र अश्वपरीक्षा नावाचे एक जुने पुस्तक वाचण्यास मिळाले आणि पुराणाची उणीव भरून निघाली. घोड्याला संस्कृतीत यथायोग्य स्थान मिळाले अशी भावना झाली. त्या अश्वपुराणाची ओळख करून घेण्यापूर्वी त्या ग्रंथाच्या संग्राहकाची ओळख करून घेण्यास हवी. पुस्तक संकलित केले आहे रामचंद्र सखाराम गुप्ते यांनी…

गुप्ते हे पेन्शनर मामलेदार व हुजूर डेप्युटी कलेक्टर होते. त्यांनी ‘सूपशास्त्र’ व ‘कृषिकर्म विवेचन’ अशी आणखी दोन पुस्तके लिहिली. सूपशास्त्र हे ‘रेसिपी बुक’ म्हणता येईल. कृषिकर्म विवेचन हे कृषीविषयक पुस्तक. सूपशास्त्र 1875 मध्ये प्रकाशित झाले. तर अश्वपुराण 1885 मध्ये. सूपशास्त्राची संशोधित आवृत्ती अलिकडे प्रकाशित झाली आहे असे समजते. त्या पुस्तकासंबंधी एक तपशील माहितीजालावर मिळाला तो असा – त्या पुस्तकात कोरफडीचा मोरंबा नावाची एक पाककृती दिली आहे. त्या पदार्थाचा उपयोग गुप्तरोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी होतो असे त्यात म्हटले आहे. पुण्यामध्ये गुप्तरोगांचा प्रादुर्भाव 1865 नंतर बराच काळ खूपच वाढला होता. त्यामुळे कोरफडीचा मोरंबा हे गुप्तरोग प्रादुर्भावाचे समानार्थी नाव बनले होते.

अश्वपरीक्षा हे संग्राहकांनी दिलेले नाव. तो ग्रंथ म्हणजे अनेक भाषांतील घोड्यांविषयीच्या माहितीचा रचलेला कोष आहे. तो प्रकाशित झाला त्या काळात घोडे हे लढाईत वापरले जात आणि श्रीमंत, राजे-महाराजे यांच्याकडे मोठे घोडदळ असे. मात्र घोडा हा फक्त लढाईत वापरण्याचा प्राणी नव्हता तर ते वाहतुकीचे साधनही होते. तशा काळात घोड्यांसंबंधीची साद्यन्त माहिती देणारा कोष महत्त्वाचा ठरला असेल हे स्पष्ट आहे. त्याची उपयुक्तता जाणवली असल्याने त्याची किंमत (1885 मध्ये) चार रुपये एवढी मोठी ठेवली गेली असा अंदाज बांधता येतो.

मात्र ते एकच कारण त्यामागे नसून त्यासाठी संकलकांनी घेतलेली मेहनत हेही कारण असावे. प्रस्तावनेत गुप्ते सांगतात –“सातारचे राजे प्रतापसिंह छत्रपती यांच्या कारकिर्दीत प्रतापसिंह हा ग्रंथ तयार झाला, तो पध्दतवार  झाला आहे. तो आम्हास मोठ्या प्रयत्नांनी मिळाला. त्या संस्कृत ग्रंथाचा उपयोग फार झाला. नळकृत व नकुलकृत असे दोन शालिहोत्राचे ग्रंथ मिळाले. फारशी भाषेत अनुभवशीर असलेला ग्रंथ श्री रा. रा. बाळासाहेब, खारकर जामनगर राजाचे दिवाण यांणी आम्हास दिला. त्यावरून घोड्यांच्या रोगांविषयी चिकित्सा आणि औषधे यांचा उपयोग केला. हा फारशी ग्रंथ जुन्या संस्कृत ग्रंथांस अनुसरून आहे. यात अनुभवास आलेली औषधे फार आहेत. जुन्या इंग्रजी ग्रंथातील विवेचनही आमच्या ग्रंथाशी मिळतेजुळते आहे. संस्कृत ग्रंथाचे भाषांतर वामनशास्त्री केमकर तर फारशी ग्रंथांचे भाषांतर पुणे येथील विद्वान व वृद्ध काजी सय्यद अली साहेब यांनी केले आहे’’.

या माहितीमुळे मी गुप्ते यांना संकलक असे उल्लेखले आहे. गुप्ते यांनी आणखी दोन महत्त्वाच्या गोष्टी नोंदल्या आहेत. “इंग्रजी ग्रंथांवरून इंग्रजी औषधांचा बराच उपयोग लिहिला आहे. एका रोगावर एकच औषध लिहिले असे नाही. दहा-वीस औषधे लिहिली आहेत. त्यांचा त्यांचे लिखाण महत्त्वाचे आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न अप्रत्यक्ष तरी जाणवण्याइतका स्पष्ट आहे.

“घोडा खरेदी घेणे म्हणजे पूर्वीचे लोक गुण-अवगुणाचे खोडीकडे फार लक्ष देत असत. त्याविषयी हल्ली आस्तिक्य कमी झाले आहे, तरी अद्यापी ती चाल मोडली नाही’’

प्रस्तुत ग्रंथाचे दोन भाग आहेत. पहिल्यात अश्वांची विविध पद्धतीची माहिती दिलेली आहे. त्याची सुरुवात अश्व हे नाव घोड्यास कसे मिळाले याने होते. नंतर माणसांप्रमाणे अश्वांचे चार वर्ण – ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे आहेत. त्यांची लक्षणे : कोणत्या वर्णाच्या अश्वाचा रंग कोणता असतो, चाल, भिन्न अवयव, त्यांच्या शारीरिक क्षमता वगैरे वगैरे. आता हे चातुर्वर्ण्य केवळ अश्वांना लावून भारतीय ऋषी थांबले नाहीत; तर अश्व एका वर्णाचा आणि अश्विणी दुसऱ्या वर्णाची असेल तर त्यांची संतती कोणत्या वर्णाची असेल याचेही तपशील दिलेले आहेत. वेगवेगळ्या वर्णांच्या अश्वांची वैशिष्ट्ये सांगितली आहेत ती पाहिली, की चातुर्वर्ण्यात माणसांच्या गुणांची उतरंड घोड्यांनाही लागू पडते असे प्रतिपादन केले आहे, असे जाणवते – “जे अश्व रूपवान, तेजस्वी, नम्रता धारण करणारे, ज्यांना पुष्कळ उपचार करावे लागतात व ज्यांची बुद्धी चांगली असून जे मागील स्मृती (भूतकाळातील) बाळगतात ते ब्राह्मण अश्व. असे अश्व क्षुधा सहन करणारे, भार सोसण्यास समर्थ; पाणी, जीन, चंदी ही दुसऱ्याची उच्छिष्ट असल्यास टाकतात.”

क्षत्रिय अश्व- अडचणीत जाण्यास निर्भय, रागीट, अती तेजस्वी, तिखट स्वभावाचे, शूर, त्याचा शब्द अतिशय गंभीर. त्यांना घाम फार येतो, मूत्र व लीद फार सोडत असतात, पुढे घोडे पाहिले असता त्यांना भय दाखवतात व हर्षाने क्रीडा करतात.

वैश्य अश्व- बुद्धी उत्तम, ते कधी रागावत नाहीत व हर्षही पावत नाहीत; जितेंद्रिय (अन्य अश्विनींशी गमन न करणारे) मोठे व्यंग नसले तरी मोठे वीर्यवान नसतात; त्यांचा वास मत्स्याप्रमाणे किंवा उंटिणीच्या दुधाप्रमाणे असतो.

शूद्र अश्व- एकमेकांचे उष्टे आवडते, डोळे रक्तवर्णीय, जमीन पायाने उखळतात, निंद्य पदार्थ भक्षण करतात, मत्सराने वागतात, पालनकर्त्यास मारतात; चव्हाट्याचे ठिकाणी व द्वाराचे ठिकाणी मलत्याग करतात.

म्हणजे असे म्हणता येईल, की चातुर्वर्ण्यात ब्राह्मण वर्ण सर्वश्रेष्ठ आणि क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही उतरंड : म्हणजे त्या त्या नुसार त्यांचे गुण कमी होत जातात हा जो तर्कदुष्ट आग्रह माणसांच्या बाबतीत पुराणकाळात होता तोच पुराणकर्त्यांनी घोड्यांच्या बाबतीतही धरला; तसेच वर्गीकरण खेचरांचेही दिले आहे.

त्यानंतर विविध देशांतील घोड्यांची वैशिष्ट्ये, हिंदुस्तानातील विविध प्रांतांतील घोड्यांचे विशेष वगैरे माहिती येते. घोड्यांना आहार कोणता द्यावा, कधी द्यावा, कोणत्या ऋतूंत कोणता व किती आणि कधी द्यावा याबद्दलचे तपशील येतात.

आश्चर्य म्हणजे घोडा या प्राण्याविषयी काही निष्कर्ष सुरुवातीला येऊ शकले असते किंवा उचित झाले असते असे आहेत. ते पहिल्या भागात बऱ्याच उशिरा येतात – “घोड्याची बुद्धी कुत्र्याच्या बुद्धीपेक्षा काही कमी आहे. कुत्र्यास मनुष्याचा हुकूम ऐकण्याची व त्याप्रमाणे काम करण्याची जशी बुद्धी आहे तशी घोड्यास नाही. त्याचे शिकण्याचे सर्व ज्ञान लगामावर आहे. बसणारा जसा लगाम वळवील त्याप्रमाणे तो चालतो. त्यावरून त्यास बुद्धी अजिबात नाही असे नाही.” लगाम आणि त्याची हालचाल म्हणजे खरे तर घोड्यावर बसणाऱ्याचे शब्द म्हणता येतील आणि तसे म्हटले तर घोडादेखील कुत्र्याप्रमाणे मालकाचे हुकूम पाळतो असेही म्हणता येईल. तो अर्थ संकलक स्पष्ट करत नाहीत, याचे कारण त्यांनी बहुदा माहितीचे संकलन एवढे एकच लक्ष्य ठेवले होते. आणखी एक माहिती जी सर्वसामान्य समजुतीपेक्षा वेगळी आहे – घोड्याने उभ्याने निद्रा घेतल्यास पायास इजा होऊ शकते. परंतु जमिनीवर निद्रा तो त्याच्या खुषीनेच घेऊ शकतो. निद्रा पाच तासांहून अधिक नसते. घोड्यावरील स्वार पडला तर बहुदा घोडा उभा राहतो; घोडीवरील स्वार पडला तर ती पळून जाते.

त्यापुढे संकलक उद्धृत करतात, की घोड्यांची एकंदर चोपन्न कुळे आहेत. त्यांतील चार मुख्य व चार उपमुख्य. घोड्यांच्या अवयवांची संस्कृत व प्राकृत नावे दिलेली आहेत. ते घोडे कोणते चांगले याबाबतच्या सर्वसामान्य ज्ञानाला दुजोरा देतात –  “उत्तम अश्व अधिक गुणवान असतात ते पारशीक (इराण) तार्तरी, केकाण या देशातील. अरबस्तानात घोडे इजिप्तमधून आले असे इंग्लिशचे धर्मपुस्तकात जेकब या महापुरुषाने लिहिले आहे.” त्यावरून शोध लागलेले घोड्यांचे मूळ जन्मस्थान हे आफ्रिका खंड हे होय. मात्र ते सांगताना सुरुवातीला ते हिंदूंच्या ग्रंथात सांगितलेला सिद्धांत नजरेआड करतात का असे वाटल्याशिवाय राहत नाही (तो सिद्धांत असा – अश्वपात नावाच्या ऋषीने यज्ञ केला. त्याचा धूर त्या ऋषींच्या डोळ्यांत गेला. डोळ्यांतून अश्रू खाली पडले. उजव्या डोळ्यातून पडलेल्या अश्रूतून नर घोडा जन्मला, तर डाव्या डोळ्यातून पडलेल्या अश्रूतून मादी घोडा जन्मला.)

ग्रंथाचा दुसरा भाग म्हणजे घोड्यांना होऊ शकणारे रोग, त्यांची लक्षणे व कारणे आणि त्यावर उपाय. तो भाग जवळ जवळ साडेतीनशे पृष्ठांचा आहे. सुरुवातीला माहिती येते, ती अशी – घोड्यांची सर्व प्रकारे काळजी घेण्यासंबंधीचा तो कोष असल्याने, घोड्याला झोपण्यासाठी कोणता बिछाना कोणत्या प्रकारे तयार करावा- “घोड्यास रात्री बिछाना केला पाहिजे तो सुक्या गवताचा. गवत दाट पसरावे, लिदीने किंवा मुत्राने रात्रीस ते खराब होईल. सकाळी चांगले गवत, मलमूत्राने माखलेल्या गवताच्या जागी टाकावे.” या खंडातील तपशील फार विस्तृत आहेत. त्यातील वेधक असे काही देण्याचा प्रयत्न करतो – ‘घोड्यास कोस-दोन कोसांवर विष्ठा-मूत्र करवावे. त्यास पाहिजे तसे पाणी व चारा द्यावा. असे न केल्यास त्यांत दोष निर्माण होतात. घोड्यांच्या निगराणीसाठी मालकाने कोणत्या वस्तू हाताशी बाळगाव्या यांची यादी आहे. तशा वस्तू एकंदर तेवीस आहेत. त्या खंडात घोड्यांच्या विकारांची माहिती देताना त्यांनी घोड्यांच्या शरीररचनेच्या आकृत्याही दिल्या आहेत. “घोडे धुवू नयेत. आंघोळ ही मालिश करण्याला पर्याय होऊ शकत नाही. धुतल्याने घोड्यांचे सांधे धरण्याची व त्यांना कुमरीव शेम्बा व बरसाती व ग्रीस (पायाचे खुरात रस उतरतो तो) वगैरे होण्याची भीती असते.

वळू घोडा – चांगले घोडे निपजण्यासाठी वापरण्याचा प्रजोत्पादक घोडा. त्याला मादीकडे किती वेळा व किती दिवसांनी सोडावे याची माहिती कारणे देऊन नमूद केली आहेत. त्याच माहितीचा उत्तरार्ध ते सांगतात – “चांगल्या घोड्यापासून आपल्याकडील घोडीला शिंगरे होऊ द्यावीत यासाठी घोड्या बाळगणारे लोक शोध काढत येत असत व त्यासाठी कोणतेही दाम घोड्याच्या मालकाला मिळत नसे. वळू घोड्याबद्दल फी देण्यास लोक राजी होण्याचे दिवस पुढे कदाचित येतील. तेव्हा आवडते वळूबद्दल जास्त फी ठरवून मग त्या लोकांस घोडे पसंत करू दिले असता चालेल ; परंतु तसे आता करता येत नाही. जेंव्हा करण्यात येईल तेंव्हा सरकारी वळू- घोडे मागण्यासाठी माद्यांचे मालक न येत असे न होईल; असे रीतीने हळू हळू व फार सावधगिरीने करावे.” कोणत्या प्रकारच्या घोडीस कोणता घोडा अपत्यप्राप्तीसाठी द्यावा याचे नियम सांगितले आहेत.

अश्वपरीक्षा ह्याचे दोन अर्थ होतात. पहिला घोडा खरेदी करताना कोणती लक्षणे पाहून, कोणती शारीरिक वैशिष्ट्ये तपासून तो निर्णय घ्यावा यासंबंधीच्या तपशीलवार सूचना दिल्या आहेत. दुसरा अर्थ म्हणजे प्रकृती बिघडलेल्या घोड्याला झालेल्या विकाराचे निदान करणे व त्यावर उपाय सांगणे. तो भाग अतिशय विस्तृत आहे. त्यात काही विकार घोडे व माणूस यांना सारख्याच प्रकारे होतात – खरूज, गजकर्ण, सर्व शरीरावर फोड येणे असे. माणसाप्रमाणेच घोड्यांचीही कफ, पित्त व वात प्रकृती असते. त्यामुळे कोणते विकार उद्भवू शकतात व त्याचे उपाय काय, कोणती औषधे कोणत्या प्रमाणात व कशी तयार करून द्यावीत याचे तपशीलवार मार्गदर्शन त्या खंडात आहे.

ज्या काळात घोडे ही एक महत्त्वाची गोष्ट होती त्या काळात त्यांचे जतन व संवर्धन कसे करावे याबाबतचा इतका साद्यन्त कोष मराठी माणसाने परिश्रमपूर्वक करावा व त्याचा मोठ्या प्रमाणात उगम संस्कृत ग्रंथात असावा यामुळे भारताच्या सांस्कृतिक भूतकाळाकडे बघण्याची नजर बदलून जाते हे निश्चित.

– रामचंद्र वझे

—————————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here