अमृतमहोत्सवाच्या नावावर पैशांची उधळपट्टी

–  प्रकाश महादेव तामणे

  महाराष्‍ट्राच्‍या विधिमंडळाला पंच्‍याहत्‍तर वर्षे पूर्ण झाल्‍याच्‍या निमित्‍ताने आयोजित करण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमास डॉ. तामणे उपस्थित होते. या कार्यक्रमात त्‍यांना अनेक त्रुटी दिसून आल्‍या. यासंबंधात त्‍यांनी मांडलेली ही काही निरीक्षणे…


– प्रकाश महादेव तामणे

     महाराष्‍ट्राच्‍या विधिमंडळाला 19 जुलै 2011 रोजी पंच्‍याहत्‍तर वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्‍ताने आयोजित करण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमास मी उपस्थित होतो. कार्यक्रमात अनेक सांस्‍कृतिक कार्यक्रम सादर करण्‍यात आले, मात्र त्या सगळ्यांत महाराष्‍ट्राची संस्‍कृती कुठेच दिसली नाही. आयोजकांनी तमाशातील दोन-चार गाणी आणि सादर केलेली ठाकर-कोळीगीते यांवरच समाधान मानलेले दिसले. बालगंधर्व, जितेंद्र अभिषेकी, श्रीनिवास खळे, एस. एम. जोशी, ना.ग.गोरे, रंगभूमीचे कलाकार किंवा राष्‍ट्रपतींवर शस्‍त्रक्रिया करणारे वि.ना.श्रीखंडे यांच्यासारख्‍या कोणत्‍याच व्‍यक्‍तींचा कुठेच उल्‍लेख करण्‍यात आला नाही, ही बाब खटकली. सुशीलकुमार शिंदे यांची अनुपस्थिती जाणवली. त्‍यांचा उल्‍लेख केवळ शिवाजीराव देशमुखांनी केला. त्‍यांच्‍या गैरहजेरीचे कारण समजले नाही. मृणाल गोरे हजर असल्‍या तरी त्‍यांच्‍या नावाचा उल्‍लेखही करण्‍यात आला नाही. त्‍यांना साधी मानाची जागाही देण्‍यात आली नव्‍हती. एकेकाळी त्‍यांनी विधानसभा गाजवली होती. त्‍यांचा विचार होणे आवश्‍यक होते. एव्‍हरेस्‍ट सर करणार्‍या कृष्‍णा पाटील यांचाही सरकारला विसर पडलेला दिसला. कार्यक्रमादरम्‍यान लावण्‍यात आलेले क्‍लोजसर्किट टीव्‍ही बंद होते. काही वेळाने टी.व्‍ही. सुरू झाले तर पंखे बंद पडले, असा गोंधळ उडत होता.

     स्‍टेज आणि बाकीचा सभोवताल यांची सजावट चांगली होती. इव्‍हेण्ट मॅनेजमेण्टचे कॉन्‍ट्रॅक्‍ट नितीन देसाईंना दिले होते. त्‍यांनी ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या आपल्‍या कार्यक्रमातील काही आयटम कार्यक्रमात घुसडले होते. या वेळी सादर करण्‍यात आलेल्‍या गणेशवंदनेसाठी मॉरिशसहून लोक आमंत्रित करण्‍यात आले होते. त्‍याबरोबर पुणे-कोल्‍हापूर-नागपूर-परभणीतील लोकांना पाचारण केले असते, तर अधिक चांगल्‍या प्रकारे गणेशवंदना सादर झाली असती.

     एकूणच कार्यक्रम अपेक्षेपेक्षा सुमार झाला. कार्यक्रमावर पाच कोटी रूपये खर्च करण्‍यात आला असल्‍याचे माझ्या वाचनात आले. तसेच विधिमंडळ अमृतमहोत्‍सवाच्‍या निमित्‍ताने वर्षभरात होणार्‍या कार्यक्रमांसाठी पंच्‍याहत्‍तर कोटी रूपये मंजूर करण्‍यात आले असल्‍याची घोषणा करण्‍यात आली. ही पैशांची निव्‍वळ उधळपट्टी आहे. महाराष्‍ट्राची पंरपरा म्‍हटल्‍यानंतर काही गोष्‍टी ठळकपणे सादर करणे आवश्‍यक होते. त्‍यातल्‍या त्‍यात राष्‍ट्रपतींचे आणि त्‍यानंतर विलासराव देशमुखांचे भाषण चांगले झाले. पण एकूण कार्यक्रम अत्‍यंत सुमार दर्जाचा होता. या कार्यक्रमास खर्च करण्‍यात आलेल्‍या पैशांमधून अनेक चांगले प्रकल्‍प किंवा गोष्‍टी घडवता आल्‍या असत्‍या!

डॉ. प्रकाश महादेव तामणे, भ्रमणध्वनी : 9892454746,

संबंधित लेख –

विधिमंडळ अमृतमहोत्सवानिमित्ताने

{jcomments on}