अठरा विश्वे

3
136
_AtharaVishve_Daridya_Carasole

अठराविश्वे दारिद्र्य या शब्दप्रयोगाचा शोध तीन वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेला आढळतो. अठरा या संख्येशी निगडित काही गोष्टी भारतीय संस्कृतीत आहेत. जसे – महाभारतातील पर्वाची संख्या अठरा. महाभारत युद्धातील सैन्य कौरवांचे अकरा आणि पांडवांचे सात अक्षौहिणी असे दोन्ही मिळून अठरा अक्षौहिणी; तसेच, गीतेच्या अध्यायांची (आणि योगांची) संख्या अठरा होती. त्याशिवाय अठरा महापुराणे, अठरा अती पुराणे, अठरापगड जाती, अठरा कारखाने, अठरा स्मृतिकार, अठरा अलुतेदार (नारू), अठरा गृह्यसूत्रें. परंतु अठरा विश्वांचा उल्लेख काही कोठे आढळत नाही. मग ही अठराविश्वे आली कोठून?

खरे म्हणजे अठराविश्वे असा शब्द नसून विसे असा शब्द आहे. वीस-वीसचा एक गट म्हणजे विसा. माणसाने व्यवहारात प्रथम बोटांचा वापर केला. दोन्ही हातापायांची बोटे मिळून होतात वीस. ग्रामीण भाषेत विसाचा उच्चार इसा असाही केला जातो. निरक्षर लोक वीस-वीस नाण्यांचे ढीग करून ‘एक ईसा दोन इसा’ अशा पद्धतीने पैसे मोजत. डॉ. नरेंद्र जाधव यांनी त्यांच्या  ‘आमचा बाप आणि आम्ही’ या आत्मचरित्रपर पुस्तकात त्यांच्या आईविषयी लिहिले आहे, ‘मातोसरींचा पैशांचा हिशेब हा संशोधनाचा स्वतंत्र विषय आहे. खरे म्हणजे तिला विसाच्या पुढे मोजता येत नाही. शंभर म्हणजे पाच ईसा असे तिचे गणित असते.’

थोडक्यात विसा किंवा ईसा म्हणजे वीस. अठरा विसे म्हणजे अठरा गुणिले वीस बरोबर तीनशे साठ. भारतीय कालगणनेत महिन्याचे दिवस तीस आणि वर्षाचे दिवस तीनशेसाठ होतात. त्यामुळे अठरा विसे म्हणजेच वर्षाचे तीनशेसाठ दिवस दारिद्र्य. त्याचाच अर्थ सदा सर्वकाळ गरिबी!

विसे शब्दाचे कृत्रिम संस्कृतिकरण झाले, ‘विश्वे’. जसे अक्कलकोटला ‘प्रज्ञापूर’ म्हणणे किंवा गुंडम राऊळ यांना ‘गोविंदप्रभू’ संबोधणे त्यातील तो प्रकार. कृत्रिम संस्कृतिकरणाच्या आहारी गेल्यामुळे ‘अठरा विसे दारिद्र्य’ ह्या अर्थपूर्ण आणि आशयसंपन्न शब्दप्रयोगाचे ‘अठरा विश्वे दारिद्र्य’ ह्या गरिबी निर्देशक वाक्प्रचारात रुपांतर झाले असे म्हणण्यास हरकत नाही.

– उमेश करंबेळकर

(राजहंस पत्रिके’वरून उद्धृत)


‘अमुक एका गृहस्थाच्या घरी अठरा विश्वे दारिद्र्य आहे’ असा वाक्प्रचार आहे. त्यावर चर्चा होऊन अठरा गुणिले वीस (विश्वे) म्हणजे तीनशेसाठ असा अर्थ करून वर्षातील  तीनशेसाठ दिवस त्याच्या घरी दारिद्र्यच आहे असा केला गेला. त्यात वीसचे विश्वे कसे झाले ते समजत नाही. वीसचे अनेकवचन लोकभाषेत विसा असे होते. ते ‘तीन विसा आणि साठ सारखेच’ या वाक्प्रचारात दिसते. पूर्वी वयही विसात सांगत : ‘चार विसा आन पाच वरसा झाली.’ तेव्हा ‘अठरा विश्वे’तील विश्वे म्हणजे अठरा गुणिले वीस असा अर्थ करता येणार नाही.

यादव सिंघणदेव (द्वितीय) याच्या पाटण (आजचे पाटणादेवी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव ) येथील शिलालेखात सोईदेव निकुंभ या सामंत राजाने प्रख्यात गणिती भास्‍कराचार्य (द्वितीय) यांचा नातू चंगदेव याच्या मठासाठी जी दाने दिली त्यात ‘ग्राहकापासी दामाचा विसोवा आसूपाठी नगरें दीव्हला’ असा उल्लेख आला आहे.’ त्यात ‘नगर’ म्हणजे व्यापार्‍यांची पंच समिती (गिल्ड). त्यांनी प्रत्येक ग्राहकामागे (त्याने दिलेल्या मूल्यामागे) प्रत्येक आसू (एक सुवर्ण नाणे) एका दामाचा विसोवा मठाला दिला. तेव्हा-

20 विसोवे = 1 दाम,  24 दाम = 1 आसू

हे कोष्टक दिसते. दाम आणि विसोवा यांचा उल्लेख सियडोण शिलालेखात स्पष्टपणे आला आहे. त्या लेखात विष्णुदेवतेच्या गंध, दीप, धूप, लेप आदींसाठी विविध व्यापार्‍यांनी जी दाने दिली त्यात –

अ. पंचीय द्रम्म सत्क पादमेकं (ओळ 6)
ब. आटिक्राहद्रम्मस्य पादमेकं प्रदत्तं l
एतदर्थे मासान्मासं प्रति दीयमानं
पंचिय द्रम्मैमेकं सासनं लिखितं प.द्र. 1. ओळ 37-38

यावरून पाव दामाचे पंचीय द्रम्म नामक नाणे होते. अर्थात दामाचे वीस भाग होते. त्यालाच विशोपक म्हणत. त्याच लेखाच्या दहाव्या ओळीत देवाच्या धूप, दीप आदींसाठी ‘प्रतिवराहकथ विंसोपकैकं प्रतिदिनं वि’ दान दिल्याचा उल्लेख स्पष्ट आहे. विंसोवक > विसोवा > विसवा हा अपभ्रंशक्रम दिसतो.

तेव्हा अठरा विसोवे (विसवे) दारिद्र्य म्हणजे नव्वद टक्के दारिद्र्य असा अर्थ सहजच ध्यानी येतो. लोक रुपया-आण्यांच्या मापात पूर्वी बोलत. आमचा एक मित्र अभिमानाने सांगत होता, ‘औरंगाबादचे चौदा आणे वकील मला ओळखतात.’ ‘प्रकृतीत दोन आणे उतार आहे’. ‘सोळा आणे काम झालं’ हे तर सर्वश्रुत आहे. तसेच हे अठरा विश्वे दारिद्र्य.

– ब्रह्मानंद देशपांडे

(संदर्भ – 1. शं.गो.तुळपुळे, प्राचीन मराठी कोरीव लेख, पृ. 105-113 2. EI., I pp.162-170)

‘ऐतिहासिक’, 14, अनुपम वसाहत, औरंगाबाद – 431 005 दूरध्वनी : (0240) 233 6606, भ्रमणध्वनी : 09923390614


‘अठरा विश्वे’ या शब्दप्रयोगाविषयी डॉ. ब्रह्मानंद देशपांडे ह्यांनी विसोवा ह्या नाण्याचा उल्लेख केला आहे, त्याला पुष्टी मिळेल असा दाखला मला ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात मिळाला. मन कसे चंचल आहे ते अर्जुनाने भगवंताला सांगितले आहे:

ह्मणौनि मन येक निश्चल राहीलl मग आह्मांसि साम्य येईल l
हें विस ही विश्वे न घडैलlतें एआ लागि ll 6.416 ll

(म्हणून मन थोडेसे निश्चल राहील, (आणि) मग आम्हांला समत्वबुद्धी येईल हे विसांतल्या वीसही विश्वांनी (म्हणजे – शंभर टक्के) घडावयाचे नाही, ते यामुळे(च) – (‘ज्ञानदेवी’, संपादक अरविंद मंगरूळकर, विनायक मोरेश्वर केळकर, खंड 1, पान 353) विश्वा, विस्वा किंवा विसोआ हे नाणे होते आणि त्याचे मूल्य मोठ्या नाण्याच्या एक विसांश होते. ‘विस ही विश्वे’ म्हणजे वीसपैकी वीस, म्हणजेच शंभर टक्के.

जञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातही तसाच उल्लेख आला आहे. ‘जय कोणाचा होईल?’ असे धृतराष्ट्राने संजयाला विचारले, पण त्याआधी तो त्याचा अंदाज सांगताना म्हणाला,

यर्‍हविं विश्वे बहुत एक lआमचें ऐंसें मानसिक l
जे दुर्योधनाचे अधिक lप्रताप सदा ll18.1609ll

विश्वे बहुत एक म्हणजे बव्हंशी, पुष्कळ टक्क्यांनी; त्यावरून अठरा विश्वे दारिद्र्य म्हणजे नव्वद टक्के दारिद्र्य असा अर्थ प्रा. श्री.मा.कुलकर्णी ह्यांनीही दिला आहे. (‘संशोधन सुमने’, गुच्छ दुसरा, पान 152) आणि तो डॉ.ब्रह्मानंद देशपांडे ह्यांच्या स्पष्टीकरणाशी जुळतो.

– विजय पाध्ये

4 चित्रा ‘बी’, विद्यासागर सोसायटी, बिबवेवाडी, पुणे – 411 037
दूरध्वनी : (020) 2421 1951, भ्रमणध्वनी : 098220 31963, इमेल : v.padhye@gmail.com


कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील बेळगाव या गावातील एक मिळतीजुळती आठवण सुमारे साठ वर्षांपूर्वीचा काळ. स्वयंपाकासाठी चूल, वैलचूल, शेगडी अशी साधने वापरात होती. ती पेटवण्यासाठी किंवा पेटती ठेवण्यासाठी ‘शेणी’ वापरत असत. शेणी (शेणकुट) म्हणजे शेण, कोळशाची खर आणि भाताचा भुसा कालवून थापलेली व उन्हात वाळवलेली (इंधनासाठी) शेणाची भाकरी (आकारसदृश्य) अशा शेणी बनवून, बुत्तीतून (= हाऱ्यातून) दारोदार विकणे हा गरीब स्त्रियांचा व्यवसाय होता. तो व्यवसाय शेकड्यावर होई. पण शेकडा मोजता येत नव्हता. त्यावेळी एका हातात तीन व दुसर्‍या हातात दोन अशा पाच शेणी मोजून त्या एक (१) म्हणायच्या आणि असे वीस घातले की ‘पाचवीसा’ किंवा पाच इसा’ म्हणजे शंभर व्हायचे. पण त्यावेळी पाच विसा  (=105) किंवा पाच विसा  (=110) चा शेकडा असायचा.

– हेमा क्षीरसागर

(संदर्भ – ‘भाषा आणि जीवन’ पावसाळा २०१०.)

Last Updated On – 05 June 2018

About Post Author

Previous articleहापूस, पुरातत्त्व, वेद आणि इतर बरेच काही…
Next articleबदलाच्या दिशेने…
डॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे आहेत. ते तेथील मोतीचौकात असलेल्‍या त्‍यांच्‍या दवाखान्यात वैद्यकी करतात. त्‍यांच्‍याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्‍या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्‍वतः लेखक आहेत. त्‍यांनी 'ओळख पक्षीशास्‍त्रा'ची हे पुस्‍तक लिहिले आहे. त्‍यांना झाडे लावण्‍याची आवड आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्‍यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्‍यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्‍या 'कुहू' या पहिल्‍या मल्टिमिडीया पुस्‍तकामध्‍ये आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9822390810

3 COMMENTS

  1. खूप वेगळी आणि रंजक माहिती…
    खूप वेगळी आणि रंजक माहिती मिळाली. धन्यवाद!

  2. शंका निरसन झाले. छान माहिती…
    शंका निरसन झाले. छान माहिती. धन्यवाद!

Comments are closed.