अचलपूरची नृसिंह जयंती – दोनशे वर्षांची परंपरा

नृसिंह जन्मोत्सव वैशाख शुक्ल चौदाला अचलपूरच्या सावरकर नगरमध्ये वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा केला जातो. दशावतारातील चौथा अवतार हा नृसिंहाचा. त्या अवतारामागील कथा या दिवशी भक्तिमय वातावरणात नाट्यरूपाने अचलपूर येथे साकारली जाते. हे रोमांचकारी नाट्य गेली दोनशे वर्षे साकारले जाते

नरसिंह जन्मोत्सव वैशाख शुक्ल 14 ला अचलपूरच्या सावरकर नगरमध्ये वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा केला जातो. दशावतारातील चौथा अवतार हा नृसिंहाचा म्हणजे पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे वाटचाल करणाऱ्या प्राण्याचा आहे. श्रीविष्णूचा तो अंशावतार शीर सिंहाचे तर शरीर मानवाचे अशा स्वरूपात आहे. हिरण्यकश्यपू नावाच्या असुराचे निर्दालन व त्याच असुराचा पुत्र असलेल्या विष्णुभक्त प्रल्हादाचे रक्षण करण्याकरता श्रीविष्णूचा अवतार स्तंभातून प्रकट झाला म्हणजे एकाच वेळेस श्रीविष्णूने रौद्र व भक्तवत्सल असे रूप घेतले ! त्या अवतारामागील कथा भक्तिमय वातावरणात नाट्यरूपाने अचलपूर येथे साकारली जाते. भक्तिमय नाट्यीकरणाची सुरुवात पहाटे साडेचारच्या सुमारास श्री नृसिंह देवतेच्या नामजपाने होते. जप करण्यास बसलेले असतात नाट्य कलावंत. त्यांना त्यांचा जप पूर्ण झाल्यावर श्रीनृसिंह वेश चढवला जातो. लांब उपरणेवजा गंडा वस्त्र त्यांच्या कमरेस गुंडाळत असतानाच, त्यांच्या शरीरात श्री नृसिंह चैतन्य तत्त्व संचारते प्रत्यक्ष नृसिंह अवतरण मात्र तेथून जवळच राहत असलेल्या देशपांडे यांच्या वाड्यात होते. सर्व भक्तपरिवार जमलेला असतो. नृसिंह रूपातील कलावंत जमावाबरोबर पायीच देशपांडे यांच्या वाड्यात येतात. त्यांच्या जाण्याच्या मार्गावर स्थानिक रहिवासी सडा-रांगोळी घालून मार्ग सुशोभित करतात.

देशपांडे यांच्या वाड्यात नृसिंह जन्मावताराचे कीर्तन सुरू असते. वाडा स्त्री-पुरुषांनी गजबजलेला असतो. कीर्तनकाराच्या समोरच हिरण्यकश्यपूचा वेश धारण केलेला नाट्य कलावंत बसलेला असतो. वाड्यातील मध्यभागी चौकात चारही बाजूंनी कागद व कापडी पडदा लावून उभारलेल्या स्तंभात श्रीनृसिंह येऊन बसतात. समोरून इशारा होताच हिरण्यकश्यपू ललकारत येतो व स्तंभाचा कागद तलवारीने फाडतो. स्तंभातून पितळी मुखवटा धारण केलेले भगवान नरसिंह प्रगट होतात व दोघांचे युद्ध होते. शेवटीनृसिंह हिरण्यकश्यपूला खाली पाडून त्याचा वध करतो. तो पूर्ण प्रसंग चित्तथरारक व चित्तवेधक पद्धतीने सादर होतो. अंगावर रोमांच उभे राहतात. स्तंभातून प्रकट झालेल्या नरसिंहाच्या आरतीने जन्मोत्सवाची सांगता होते आणि नाट्य संपते.

फक्त पाच ते दहा मिनिटांचा तो प्रसंग पाहण्यास गावातीलगावाबाहेरील मंडळी पहाटे चारपासून आवर्जून उपस्थित राहतात. तो प्रसंग पाहणे म्हणजे रोमांचक अनुभव घेणे होय.

नरसिंह व हिरण्यकश्यपू यांच्या भूमिका करणारे ते दोन्ही कलाकार त्यांच्या त्यांच्या भूमिकेशी इतके समरस होतात, की बऱ्याच वेळानंतर त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते. त्यानंतर सर्व भक्त मंडळी त्यांना नमस्कार करून बाहेर पडतात. बाहेर जाताना स्तंभास लावलेला कागद घरी नेण्यास मात्र ते विसरत नाहीत. तो कागद घरात ठेवल्यास भीती, अशुभ, वाईट वृत्ती घरात राहत नाहीत असा स्थानिक लोकांचा विश्वास आहे. जन्मोत्सव गत दोनशे वर्षांपासून याच पद्धतीने साजरा होतो. नाट्य सादर करणारे कलाकार बदलत जातात. सध्या देशपांडे राहत आहेत त्याच ठिकाणी अण्णाजी जुगादे हे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व राहत होते. त्यांच्या घरी तो उत्सव साजरा होत असे. तो जन्मोत्सव तारे व देशपांडे कुटुंबीय तेवढ्याच जबाबदारीने व उत्साहाने साजरा करताना दिसतात. त्यांच्या देवघरात पूर्वापार चालत आलेला स्तंभ व नरसिंह प्रतिमा दिसून येतात.

– रामचंद्र खवसे 9420235390 anukhawase29@gmail.com

———————————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here