अक्षय उणेचा आणि साल्सा!

Salsa6

अक्षय उणेचाअक्षय उणेचा या पुण्याच्या तरुणाने ऑस्ट्रेलियात १६ जून २०१२ रोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय साल्सा नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून पुण्याचा झेंडा सातासमुद्रापार फडकावला आहे. विदेशी नृत्य- प्रकारांनी भारतीय तरुणांना आकर्षित केले असून त्यांचा कल जगभरातील नृत्याचे विविध प्रकार शिकण्याकडे दिसून येतो. भारतीय तरुणांची पावले लॅटिन नृत्यप्रकारांमध्येही थिरकू लागली आहेत. तरुण पिढी आवडीने लॅटिन नृत्यप्रकारांचा दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, मुंबई , पाटणा आणि आता पुणे यांसारख्या मोठ्या शहरांत आनंद घेत आहे.
अक्षय उणेचा जोडीदारासह नृत्याचा सराव करतानाअक्षय हा पुण्यातील चित्रपट निर्माते आणि बांधकाम व्यावसायिक जगदीश उणेचा यांचा धाकटा मुलगा. तो एकवीस वर्षांचा आहे. अक्षयला तीन वर्षापूर्वी लॅटिन नृत्यप्रकाराचे वेड लागले. ‘सोल टू सोल’ या डान्सिंग शोमुळे तो त्या नृत्य प्रकाराकडे आकर्षित झाला आणि त्या नंतर त्याने त्या नृत्यप्रकाराचा ध्यासच घेतला! स्वतःहून सराव करत तो डान्स फ्लोअरवर लीलया ‘गिरक्या’ घेऊ लागला. त्याचे ते नृत्यकौशल्य पाहून त्याच्या कुटुंबीयांनी, विशेष करून वडिलांनी त्याला पाठिंबा दिला. त्यानंतर अक्षय साल्सा नृत्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी सिडनेला गेला. त्याने लॅटिन नृत्यातील साल्सा, चाचा, जाईव्ह, टॅन्गो, रूम्बा, साम्बा, बचाता, पॅसडोबल या प्रकारांमध्ये प्रभुत्व मिळवले. त्याने ‘साल्सा किंग’ म्हणून प्रसिध्द असलेले ऑलिव्हर पिनेडा यांच्याकडे प्रशिक्षण घेतले. अक्षयने सिडनेमध्ये सहा वेळा साल्सा नृत्यस्पर्धेत अजिंक्यपद मिळवले. त्याशिवाय त्याने वाली, ल्युडा, सेरेना, क्यास्बा, जेमै, पास्कले आदी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून ‘साल्सा’ चे धडे घेतले आणि त्यामध्ये आणखी नैपुण्य मिळवले.

अक्षयने २०११ साली ऑस्ट्रेलियात भरलेल्या ‘साल्सा ओपन’ या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत भाग घेऊन जिद्द आणि महत्त्वाकांक्षा यांच्या जोरावर स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला. अक्षय म्हणाला, “स्पर्धेत भाग घेतल्यानंतर मला खूपच टेन्शन आले होते. मात्र स्पर्धा जिंकायचीच या एका विचाराने मी भारावलो गेलो होतो. त्यामुळेच अंतिम स्पर्धेत मी अपेक्षित यश मिळवू शकलो.” त्यानंतर अक्षयने बंगळुरू येथील ‘लॅटिनो ह्रिदम्स डान्स अकादमी’ने आयोजित केलेल्या गोवा आंतरराष्ट्रीय लॅटिन फेस्टिवलमध्येही भाग घेतला होता.

साल्सा हा क्युबा देशातून उगम पावलेला नृत्यप्रकार. युरोपीय व आफ्रिकी संस्कृतींमधील संगीत व तालपरंपरांच्या प्रभावातून साल्सा नृत्य‍प्रकार अस्तित्वात आल्याचे मानले जाते. तो काळ १९२०च्या आसपासचा असावा. त्या नृत्यप्रकारावर क्युबीयन पौराणिक नृत्यांचा प्रभाव जाणवतो. साल्सा ही प्रामुख्याने जोडीने नृत्य करण्याची नृत्‍यशैली आहे. वर्तमानातील साल्सा हा लॅटिन अमेरिका आणि पाश्चिमात्य देश यांमधील प्रभावांचे मिश्रण आहे. त्या क्युबा शैली (कॅसिनो), न्यू यॉर्क शैली (मम्बोल ऑन टू), लॉस एन्जेमलिस शैली (ऑन वन), कोलंबिया साल्सा आणि मियामी साल्सा इत्यादी शैली आहेत. साल्सा हा लॅटिन अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया या प्रदेशात मुख्यत:, पण एकूण जगभर लोकप्रिय असलेला नृत्यप्रकार आशिया खंडातही वेगाने रसिकप्रिय होत आहे.

साल्साकडे आकर्षित होण्यापूर्वी अक्षयला विविध कलाप्रकारांमध्ये रस होता. तो सांगतो, “मी चांगली चित्रे काढत असे. तायक्वानदोचे प्रशिक्षण घेत असे. बास्केटबॉल खेळत असे. मला घोडेस्वारी आणि संगीत यांचीही आवड होती. मला या सर्व गोष्टी साल्सामध्ये उपयोगी ठरल्या. संगीतामुळे मला ह्रिदमचे ज्ञान झाले. चित्रकलेमुळे मला लक्ष एकाग्र करण्यास मदत झाली. तायक्वानदो-बास्केटबॉलमुळे माझ्या शरिरात चपळता आणि लवचीकता निर्माण झाली.”

साल्सा नृत्यप्रकाराची मुद्रा सादर करताना अक्षयअक्षय २०११ सालापासून साल्सा नृत्य करत आहे. तो सांगतो, की साल्सामुळे त्याला आनंदासोबत मनाची शांतीही लाभते. आपल्या नृत्य सहका-यास आदर देण्यातून आणि त्याच्यामकडून मिळणा-या त्याच प्रकारच्या प्रतिसादामधून नर्तकाच्या मनावर आणि वर्तणुकीवर चांगला परिणाम दिसून येत असतो.

अक्षयच्या कुटुंबात त्याच्या वडिलांसोबत त्यांची आई कमल, त्याचा भाऊ राकेश आणि बहीण रिंकू आहे. भाऊ राकेश वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करतो. मात्र वडिलांनी त्याच्यावर साल्सा सोडून व्यवसायात सामिल होण्याची अपेक्षा कधीच व्यक्त केली नसल्याचे अक्षय सांगतो. कुटुंबातील सर्व व्य‍क्तींचा पाठिंबा त्याला महत्त्वाचा वाटतो.

अक्षयच्या ऑस्ट्रेलियातील यशाबद्दल पुण्यातील ‘पुण्यभूषण फाउंडेशन’ या संस्थेने एका खास कार्यक्रमात त्याचे कौतुक केले. पुण्याच्या महापौरांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. अक्षय म्‍हणतो, की साल्सा नृत्याप्रकाराच्या अभ्यासक्रमात सातत्याने बदल होत असतात. त्यामुळे त्याला पुढील काही वर्षे साल्सामधील विविध गोष्टी शिकायच्या आहेत. जगभरातील स्‍पर्धांमध्ये सहभागी व्हायचे आहे. त्यानंतर भारतात परतून येथे साल्सा नृत्‍यप्रकार रूजवण्या‍साठी विशेष प्रयत्न करण्याचा त्याचा मानस आहे. त्या‍ची त्याने साल्साबद्दल मिळवलेले ज्ञान इतरांपर्यंत पोचवण्या‍ची इच्छा आहे. भारतातील साल्साचा अभ्यासक्रम जुना असून जगातील विविध प्रदेशांतून साल्सामध्ये होणारे बदल वेचून भारतातील अभ्यासक्रम अधिक अद्यावत करण्याचाही त्याचा प्रयत्न असेल, असे अक्षय सांगतो.

अक्षय उणेचा,
८३८०८४९३४३
akshayunecha@hotmail.com

– श्रीकांत ना. कुलकर्णी

Previous articleहरमेन्यूटिक्सचे शास्त्र
Next articleकोकणातील नमन – खेळे
श्रीकांत नारायण कुलकर्णी गेली चाळीस वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. 'प्रजावाणी', 'तरुण भारत', 'लोकसत्ता' अशा विविध वृत्तपत्रांमध्ये संपादकीय विभागात काम करून ते निवृत्त झाले. ते सध्या मुक्त पत्रकार म्हणून पुण्यात काम करतात. त्यांनी आतापर्यंत विविध वृत्तपत्रे, दिवाळी अंक आणि इतर नियतकालिकांमधून विविध विषयांवर लेख लिहिले आहेत. त्‍यांना साहित्याची - विशेषता: बालसाहित्याची आवड असून कविता, कथा, विनोदी लेख, चित्रपट परिक्षण अशा विविध पद्धतीचे लेखन त्‍यांनी केले आहे. आजपर्यंत त्यांची बारा पुस्तके प्रसिद्ध झाली असून छांदिष्‍ट व्‍यक्‍तींवर लिहिलेल्या 'असे छन्द असे छांदिष्ट ' आणि 'जगावेगळे छांदिष्ट' या दोन पुस्तकांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. कुलकर्णी स्वत: 'छांदिष्ट' असून ते दगडांमधून पशुपक्ष्‍यांच्‍या आकारांचा शोध घेतात. ते 'निर्मळ रानवारा' या 'वंचित विकास' संचलित बालमासिकाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत. त्यांनी विविध दिवाळी अंक, विशेषांक, आणि निवडक पुस्तकांचे संपादन केले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9422319143