अकरावे साहित्य संमेलन : 1921 (Marathi Literary Meet 1921)

अकरावे साहित्य संमेलन 1921 साली बडोदे येथे भरले होते. त्याचे अध्यक्ष साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण ऊर्फ तात्यासाहेब केळकर हे होते. दहाव्या संमेलनानंतर चार वर्षांनी. तेवढ्या अवधीत तीन मोठे साहित्यिक मृत्यू पावले, ज्यांची पात्रता अध्यक्ष होण्याची होती. ते लेखक म्हणजे प्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरी (जन्म 26 मे 1885, मृत्यू  23 जानेवारी 1919), त्र्यंबक बापूजी ठोमरे ऊर्फ बालकवी (जन्म 13 ऑगस्ट 1890, मृत्यू 5 मे 1918), लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (23 जुलै 1856, मृत्यू 1 ऑगस्ट 1920). केळकर हे तसे भाग्यवान साहित्यिक. त्यांचा संबंध लोकमान्य टिळक यांच्याशी आला आणि ते केसरी-मराठा संस्थेत मार्च 1896 मध्ये रूजू झाले. तात्यासाहेब आणि टिळक यांची इतकी ओळख झाली नि संबंध इतके घनिष्ट जोपासले गेले, की ते टिळक यांच्या राजकीय आणि वृत्तपत्रीय नेतृत्वाचे वारस ठरले.

टिळक 1897 साली तुरुंगात गेले. त्यामुळे संपादक म्हणून तात्यासाहेब केळकर यांची नेमणूक झाली. केळकर केसरीत येऊन तेव्हा जेमतेम एक वर्ष झाले होते. केळकर यांच्या हातात महाराष्ट्राची राजकीय सूत्रे टिळक यांच्या निधनानंतर, 1920 साली आली. ते पुणे नगरपालिकेचे अध्यक्ष 1918 साली झाले. त्यांची मध्यवर्ती कायदे मंडळात निवड 1925 साली झाली. ते केसरी-मराठा संस्थेचे विश्वस्त, संचालक पुढे झाले. त्यांनी सह्याद्रीमासिक (1935 ते 1947)यशस्वीपणे चालवले. त्यांनी त्यांच्या हयातीत विपुल लेखन केले. अनेक प्रस्तावना लिहिल्या. त्यांचे अग्रलेख गाजले. त्यांनी पंधरा हजार छापील पृष्ठांपेक्षा जास्त मजकूर प्रसिद्ध केला. त्यांची निवड काँग्रेस व होमरूल लीग ह्यांच्यातर्फे विलायतेला जाणाऱ्या शिष्टमंडळाचे चिटणीस म्हणून 1918मध्ये झाली. त्यांनी विलायतयात्रा 1919 मध्ये केली. त्यांनी विलायतेत असताना ब्रिटिश इंडिया काँग्रेस कमिटीच्या इंडियाह्या पत्राचे संपादन केले. ते सोलापूर येथे 1920 मध्ये भरलेल्या काँग्रेस आणि होमरूल लीग ह्या दोन्ही पक्षांच्या संयुक्त प्रांतिक परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांनी तीन लक्ष रूपयांचा टिळक पर्स फंड त्याच वर्षी जमवून तो टिळक यांना अर्पण केला. त्यांची कायदेमंडळावर निवड स्वराज्य पक्षातर्फे 1923 मध्ये झाली. त्यांच्यावर वरिष्ठ कोर्टाच्या बेअदबीचा खटला 1924 मध्ये झाला व त्यात त्यांना पाच हजार दोनशे रुपयांचा दंड द्यावा लागला. ते पुणे येथे 1927मध्ये झालेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. त्यांना बडोदे वाङ्मय परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपदही देण्यात आले होते (1931). ते उज्जैन येथे भरलेल्या मध्य भारतीय कविसंमेलनाचे अध्यक्ष त्याच वर्षी होते.

न.चिं. केळकर यांनी लोकमान्य टिळक यांचे तीन भागांतील चरित्र लोकमान्य यांच्या निधनानंतर लगेच लिहिले. त्यांच्या चाहत्यांनी त्यांना साहित्य सम्राटही पदवी उत्स्फूर्तपणे बहाल केली व ती लोकांनी मान्य केली. त्यांनी त्यांचे आयुष्य व्यवस्थित, शिस्तशीरपणे आखले. त्यांनी अनेक व्यासपीठांवर अध्यक्षस्थान भूषवले; अत्यंत रसाळ प्रवचने केली. भाषणे केली. केळकर यांनी वाङ्मयाचे सर्व मार्ग यशस्वीपणे चोखाळले. प्रसन्नचित्त, खेळकर वृत्तीचे केळकर लोकांना हवेहवेसे वाटायचे. ते त्यांच्या राजस व्यक्तिमत्त्वामुळे आणि त्यांच्या अप्रतिम भाषणांमुळे लोकप्रियता पावले.

त्यांचा जन्म 24 ऑगस्ट 1872 रोजी मोडनिंब (मिरज) येथे झाला. त्यांनी बी ए (1891), एलएल बी (1894) असे शिक्षण घेतले होते. त्यांनी सातारा येथे वकिलीची सनद घेऊन वकिलीही सुरू केली. त्यांची नेमणूक वर्षभरात अक्कलकोट संस्थानात मुन्सफ म्हणून झाली, पण त्यांचा जीव तेथे रमेना. म्हणून ते जमखंडी संस्थानात प्रयत्न करू लागले. योगायोगाने त्यांची लोकमान्य टिळक यांच्याशी गाठ पडली नि ते केसरी-मराठा संस्थेत 1896 साली आले. त्यांनी त्यांचे आयुष्य त्या संस्थेलाच वाहून घेतले. ते केसरी वृत्तपत्राचे संपादक 1897 साली झाले. पुढे ते त्याच संस्थेचे विश्वस्त आणि संचालक झाले. ते सह्याद्री मासिकाचे संपादक 1935 साली झाले ते शेवटपर्यंत.

मराठी वाचकांना आणि लेखकांना वाङ्मयचर्चेची गोडी लावण्यात केळकर यांचा वाटा मोठा आहे. केळकर यांनी अनेक वाङ्मयीन प्रश्न उपस्थित करून त्यांची चर्चा केली आहे. वाङ्मय म्हणजे काय, वाङ्मयानंदाचे स्वरूप काय, कलेचा हेतू व तिचे फळ – एक की भिन्न, वाङ्मयातून प्रकट होणारे सत्य व शास्त्रीय सत्य ह्यांतील फरक काय, अलंकार व रस ह्यांचा परस्परसंबंध काय, नवे वाङ्मय का व केव्हा निर्माण होते, वाङ्मयाच्या संदर्भात अश्लीलतेचा अर्थ काय, वास्तववाद व ध्येयवाद यांतील भेद काय, विनोद व काव्य ह्यांचे नाते काय, हास्याची कारणे कोणती, उपमेचे निर्णायक गमक काय, गद्य व पद्य आणि पद्य व काव्य ह्यांच्या परस्परसंबंधांचे स्वरूप काय, काव्याचे वर्गीकरण कसे करावे, नाटकातील पदे कशी असावीत, वाङ्मयीन टीका म्हणजे काय, आठवणी व आख्यायिका ह्यांत कोणता फरक असतो वगैरे ते प्रश्न आहेत. त्यांच्या समग्र लेखनाचे समग्र केळकर वाङ्मयया नावाने बारा खंड प्रसिद्ध आहेत. विशेषत: त्यांचे लोकमान्य टिळक चरित्र, मराठे व इंग्रज, हास्य-विनोद मीमांसा, तोतयाचे बंड, ज्ञानेश्वरी सर्वस्व यांसारखे हे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांचा मृत्यू 14 ऑक्टोबर 1947 रोजी झाला.

वामन देशपांडे 91676 86695, अर्कचित्र सुरेश लोटलीकर 99200 89488

———————————————————————————————-——————————————————–