अंध मनोहर वास्वानी यांची शैक्षणिक दृष्टी (Manohar Vaswani Defeats Blindness and Succeeds in Higher Education)

8
38

मनोहर सन्मुखदास वास्वानी यांनी त्यांच्या अंधत्वावर मात करून मिळवलेले यश हे स्तुत्य असे आहे. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय सिंधी कुटुंबात 1975 साली नागपूर शहरात झाला. मनोहर हे आई सुंदरीदेवी आणि वडील सन्मुखदास यांच्या पोटी पाच बहिणी व चार भाऊ यांच्यानंतर जन्मलेले शेंडेफळ ! मनोहर हे जन्मांध नव्हते. त्यांच्या डोळ्यांना अचानक आलेल्या ग्लोकोमाआजारामुळे त्यांच्या वयाच्या दुसऱ्या वर्षी त्यांची दृष्टी गेली.

घरचा असा त्यांचा कोणताच पिढीजात व्यवसाय नव्हता. वडिलांच्या सेल्समनच्या नोकरीवर सगळ्या कुटुंबाचा चरितार्थ चालत असे. मनोहर यांना अंध या कारणामुळे सर्वसामान्य मुलांच्या शाळेमध्ये शिकता आले नाही. म्हणून मनोहर यांनी नागपुरमधील ब्लाइंड रिलिफ असोसिएशनच्या अंध मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला.

शालेय जीवनात बक्षीस स्वीकारताना

मनोहर यांची मातृभाषा सिंधी होती. त्यांना मराठी भाषा बोलता येत नव्हती. तरीही मनोहर यांनी त्यावर मात करत ते मराठी भाषा शिकले व ते त्या शाळेत सातवीपर्यंत सतत प्रथम क्रमांकावर राहिले. त्यांना शिकण्याची उत्कट इच्छा होती. ते महात्मा गांधी हायस्कूल, जरीपटका(नागपूर) या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये पुढील शिक्षणासाठी गेले. त्यांनी दहावीला नागपूर बोर्डामध्ये प्रथम क्रमांक मिळवला (1994). पुढे, त्यांनी अकरावीचे व बारावीचे शिक्षण हिस्लॉप महाविद्यालय (नागपूर) येथे केले. तेथेही ते बारावीला बोर्डामध्ये प्रथम आले. त्यांच्या त्या यशस्वी शैक्षणिक वाटचालीत अजून एक भर पडली, ती म्हणजे त्यांना दि इंडस इंड मेरिट स्कॉलरशिप’ (19961999) मिळाली. त्यांनी धरमपेठ आर्ट्स कॉलेज (नागपूर) येथून बी ए प्रथम श्रेणीमध्ये केले.

मनोहर यांना अध्यापनात गोडी होती. तरी त्यांना त्यांच्या घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण सोडून नोकरी करणे भाग पडले. त्यांची निवड डिफेन्स अकांऊट डिपार्टमेंटमध्ये (दक्षिण कमांड) झाली. ती नोकरी पुण्यामध्ये होती. त्यामुळे ते पुण्यामध्ये नोकरीसाठी आले. त्याचबरोबर त्यांनी त्यांचे शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्रातून बहिस्थ विद्यार्थीम्हणून चालू ठेवले. कारण अध्यापक, व्याख्याता बनण्याचे त्यांचे स्वप्न ते सोडू शकत नव्हते. त्यांनी एम ए पदवी इंग्रजी विषय घेऊन प्रथम श्रेणीमध्ये मिळवली. दुसर्‍याच वर्षी, 2003 मध्ये ते राज्य स्तरावरील सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यामुळे त्यांचे व्याख्याता म्हणून कौशल्य सिद्ध झाले. त्याचबरोबर, ते विविध अभ्यासपूरक कार्यक्रमांत – बुद्धिबळ, विविध परिषदा, संवाद, चर्चासत्र, निबंधलेखन, कविता स्पर्धा – सक्रिय राहिले.

पीएच डी व्हायवा प्रसंगी

त्यांची बदली 2004 मध्ये नागपूर येथे झाली. तेथे त्यांनी व्याख्याता पदासाठी नागपूरमधील विविध महाविद्यालयांत अर्ज केले. पण त्यांच्या अंधत्वामुळे त्यांना ती संधी मिळत नव्हती. त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी गोष्ट 2008 मध्ये घडली. त्यांनी शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) येथे व्याख्याता पदासाठी अर्ज केला आणि त्यांची ओपन कोलँक्युममध्ये इंग्रजी अधिविभागामध्ये व्याख्याता म्हणून निवड झाली. ते त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी नागपूरहून बाराशे किलोमीटर दूर आले ! त्यांनी तेथे काम करत असतानाच पीएच डी पदवी मिळवली. त्यांचा विषय होता ब्रिटिश कादंबरीतील अंध पात्रांचे चित्रण (ए डिस्अॅबिलिटी स्टडिज परस्पेक्टिव्ह ऑन ब्लाइंडनेस इन द सिलेक्ट ब्रिटिश फिक्शन). त्याच अभ्यासाच्या आधारे त्यांनी 2015 ते 2018 या दरम्यान संशोधन प्रकल्प पूर्ण केला. त्या प्रकल्पास त्यांना विद्यापीठ अनुदान मंडळाचे साहाय्य मिळाले. ते त्यांचे महत्त्वाचे संशोधन मानले जाते. त्यांचा विषय आहे इंग्रजी निवडक साहित्यातील अंध पात्रांचे चित्रण (Depiction of blind and blindness in select english fiction). त्यांनी इंग्लंड, अमेरिका, ब्रिटन, भारत व दक्षिण आफ्रिका या पाच देशांतील कादंबऱ्या अभ्यासासाठी निवडल्या होत्या. त्या दरम्यान त्यांनी जर्मन भाषाही अवगत केली. तसेच, विविध सर्टिफिकेट कोर्सेससुद्धा पूर्ण केले. 

मनोहर वास्वानी कुटुंबासमवेत

अमेरिकन व भारतीय दिव्यांग व्यक्तींच्या आत्मकथनासंदर्भात तुलनात्मक अभ्यास या प्रकल्पावर त्यांचे काम चालू आहे. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध संशोधन पेपर प्रकाशित केले आहेत. तसेच, इंग्रजी महाविद्यालयांत साहित्यावर व्याख्यातेम्हणून भूमिका बजावली आहे. त्यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच डीसाठी चार विद्यार्थी काम करत आहेत. त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामधील दृष्टिदोष असणाऱ्या अंध व अन्य अक्षम विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या योजना राबवण्याबाबत पाठपुरावा केला आहे. त्यांनी ग्रंथालय विभागामार्फत आयोजित वर्कशॉपमध्ये मार्गदर्शनही केले आहे. मनोहर अंध मुलांना शिक्षण व रोजगार या कामी साहाय्य करतात. ते त्यांचे महत्त्वाचे एक ध्येय आहे. त्यांच्या मते, शारीरिक अक्षमता व त्याच्याकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन ही सर्वांत गंभीर समस्या आहे.

मनोहर वास्वानी पत्नी सरोज व मुलगा दीप यांच्यासमवेत

मनोहर यांचे बुद्धिबळ खेळणे, संगीत ऐकणे हे छंद आहेत. ते, त्यांच्या पत्नी सरोज व मुलगा दीप असा त्यांचा संसार आहे. त्यांच्या पत्नी कोल्हापूरच्या कॅनरा बँकेत अधिकारी आहेत. मुलगा सतरा वर्षांचा आहे. तो बारावी सायन्सला आहे. मनोहर त्यांच्या जीवनाचा अधिक सारा वेळ अध्ययन, अध्यापन व संशोधनामध्ये घालवतात. 

मनोहर वास्वानी 94048 25544

नगिना माळी 89752 95297naginamali2012@gmail.com

 

नगिना सुभाष माळी शिवाजी विद्यापीठात (कोल्हापूर) शिक्षणशास्त्र अधिविभागात कार्यरत आहे. त्यांनी राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांत एम ए तसेच, शिक्षणशास्त्रात पीएच डी मिळवली आहे. त्यांचे संशोधनपर लेख राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झाले आहेत. त्यांना गायनाची आवड आहे. त्यांचे लेखन विविध वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होत असते. त्या काकाचीवाडी येथे राहतात.

————————————————————————————————————————————————-———————————

About Post Author

8 COMMENTS

  1. या लेखातून जगण्याचा सुंदर विचार अधोरेखित होतोय अशी मनस्वी माणसे दिसायला हवीत

  2. नगीना माळी मॅडमजी नमस्कार….आपला लेख वाचला..फारच छान व सुंदर व प्रेरणादायी लेख व जीवन प्रवास आहे…या पुढेही असे उत्कृष्ट लेख लिहावेत ते वाचायला नक्कीच आवडतील…शुभेच्छांसह..🙏💐💐💐

  3. खूप सुंदर व्यक्तीचित्रण. प्रेरणादायी. समाजभान असलेलं लेखन व्यक्तीमत्वाच्या प्रेमात पाडतं. पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा…नगिना मँडम!!!

  4. Dr.Nagina Mali.🙏🙏Aapla lekh vachala. Khup Chan lekh lihilat ,ha lekh aattachya pidhila prernadayi tharel ase lekh ajun lihavet.Pudhchya lekhnasathi shubhechha 💐💐💐💐🙏🙏✌️✌️

  5. डॉ. नगिना माळी मॅडम, अतिशय महत्त्वपूर्ण लेख. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध आणि महत्व आपण महत्त्वपूर्ण रीतीने उलगडून दाखवले. आपल्या लेखनातून नक्कीच प्रेरणा मिळते धन्यवाद.. पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा

  6. डॉ. नगिना माळी मॅडम, अतिशय महत्त्वपूर्ण लेख. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध आणि महत्व आपण महत्त्वपूर्ण रीतीने उलगडून दाखवले. आपल्या लेखनातून नक्कीच प्रेरणा मिळते धन्यवाद.. पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा.. डॉ. रवींद्र शिंदे, पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here