सिंधुदुर्ग येथील सागरमंथन आणि मूर्तींचा शोध

उदय रोगे यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ सिंधुदुर्ग’ या व्हॉट्सअॅप ग्रूपवर ‘सागर मंथन’ या मोहिमेची माहिती थोडक्यात पाठवली आणि ‘दैनिक तरुण भारत’चे जिल्हा आवृत्ती प्रमुख विजय शेट्टी यांनी तत्काळ उत्स्फूर्तपणे कळवले, “मित्रा, चल पुढे, आम्ही आहोत बरोबर!” उदयचे साहस होते, समुद्राच्या तळाशी जाऊन लपल्या गेलेल्या मूर्ती शोधून काढण्याचे. त्याचे ‘सागरमंथना’चे धाडस  लोकविलक्षण होते. पण उदयविषयी आणि त्याच्या कार्याविषयी सद्भाव आहे. उदय म्हणतो, ‘विजय यांच्या प्रतिसादाने चेतना मिळाली आणि मी नाचूच लागलो!’

मोहीम प्रत्यक्षात संक्रांतीच्या दिवशी पाच तास चालू होती. मोहिमेत विविध प्रकारच्या अकरा मूर्ती व काही खास पाषाण मिळाले. उदय म्हणाला, की मालवणच्या समुद्रात पाषाण व मूर्ती इतिहासकाळात सोडल्या गेल्या असल्याची माहिती मिळाली होती. मात्र त्यांचे स्वरूप माहीत नव्हते. त्यामुळे औत्सुक्य होते. शोधमोहीम कोठे राबवायची ते जाणकार मंडळींकडून अधिक माहिती मिळवून ठरवले. स्कुबा डायव्हर्स सारे आमचे मित्रच आहेत. त्यामुळे त्यांनी मोहीम ताब्यात घेतली, म्हणा ना! ती मंडळी अशा साहसाच्या शोधात असतातच. त्यांच्या मी करत असलेल्या कार्याबाबतचे प्रेम व आस्था या भावनादेखील त्यामधून व्यक्त होतात. उदयने मूर्तीचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून त्यांची मांडणी केली जाईल असेही सांगितले.

सिंधुदुर्ग किल्ल्यासमोरील समुद्र साधारण बारा मीटर खोल आहे. मोहीम मकर संक्रांतीला (१५ जानेवारी २०१९) सकाळी साडेनऊ वाजता सुरू झाली. आठ माणसे मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी होती. सर्व सामान होडीत चढवून, ती सुमारे आठ ते बारा मीटर खोल पाण्यात पोचेपर्यंत दहा वाजून गेले होते. होडी जाणकारांच्या सांगण्यानुसार, ‘मूर्ती शोध मोहिमे’च्या जागी पोचली तेव्हा उदयने सागराकडे प्रार्थना केली. तिळगूळ व तिळाचा लाडू सागरास अर्पण केला, तोच प्रसाद सर्व मित्रांना देऊन “गोड बोला व गोड कार्य करा. मी ‘मूर्ती मिळाली’ हे शब्द ऐकण्यासाठी कान लावून उभा आहे” असे आर्जव केले.

मोहिमेतील आठ जणांपैकी दोघे डायव्हर्स समुद्रतळाशी जाण्यासाठी, एक समुद्रपाण्यावर तरंगता व पाचजण होडीवर अशी योजना होती. सोनोजी तोडणकर व गोविंद कोचरेकर हे दोन ‘गाईड’ ऑक्सिजन सिलिंडर घेऊन अथांग अरबी महासागरात प्रथम उतरले. ते समुद्रतळाशी जाऊन सारा भाग चाचपून पाहणार होते. योगेश मसुरकर स्नॉर्केलिंगचे साहित्य घेऊन काही वेळाने पाण्यात उतरले. ते समुद्रतळाशी गेलेले दोघे व होडीवरील उदय धरून पाच लोक यांच्यातील संपर्क व्यक्ती असणार होते. त्यांना पहिली बातमी जी समुद्रतळाकडून मिळाली ती मात्र सुखद नव्हती. तोडणकर यांचा निरोप आला, की “पाण्यात काही दिसत नाही. खाली भयंकर चिखल आहे.”

उदय रोगे काही काळ स्तब्ध झाले. त्यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रार्थना मनोभावे केली. उदयने कोकण इतिहास परिषदेच्या दुसऱ्या बैठकीत “हे कार्य मी करणार आहे. तुम्हाला साथ द्यायची असेल तर द्या” असे उद्गार काढून ठणकावले होते. तो त्या मोहिमेवर पक्का होता. त्यामुळे तो सुखासुखी मोहीम सोडणार नाही हे त्याच्या साथीदारांना ठाऊक होते. शिवाय, परिषदेचे कार्यकर्ते नारकरसरांचा त्याला खंबीर पाठिंबा होता. त्यांना उदयसारखेच कणखर व्यक्तिमत्त्व हवे होते. शेट्टीसरही तयार होते. पहिली बातमी शंकास्पद आल्याने उदय धास्तीचे मन घेऊन होडीत बसून राहिला; त्याची मनोमन प्रार्थना सुरू होतीच. उदय यांना त्यावेळची मनोवस्था विचारली तेव्हा ते म्हणाले, समुद्र किनाऱ्यावरून जेवढा स्वच्छ दिसत होता तेवढा तो मूर्ती ज्या ठिकाणी असणार असे वाटत होते, त्या भागात नव्हता. तेथे पाणी गढूळ होते. डायव्हर्संना तळाशी खूप चिखल लागला. ते हातातील काठ्या ठिकठिकाणी मारून शोध घेत होते. काठीला दगड लागला, की खोल जात व हातांनी चाचपत. डायव्हर्स अर्धा-पाऊण तास पाण्याखाली राहिले की पाण्यावर येत.

मोहिमेत निरशा पसरू लागणार तेवढ्यात तोडणकर-कोचरेकर यांचा उत्साहवर्धक निरोप योगेश मसुरकरने ओरडून सांगितला. थोड्या वेळाने, खरोखरीच गोड बातमी आली! तोडणकर यांनी आशेचा किरण दाखवला. हात उंचावून दोरी मागितली. काही वेळाने, उदय विचारते झाले, ‘मूर्ती सापडली?’ तोडणकर यांनी आनंदाने प्रतिसाद दिला, “हो, मिळाली.” सर्वांना आनंद झाला. मोहिमेत आनंदाचा पूरच आला! सर्वांच्या चेहऱ्यावर भर उन्हात चांदणे चमकत होते. आमच्या होडीतील हुशार साथीदारांनी, म्हणजे भाई जाधव, लिलाधर आचरेकर, कान्होबा मालंडकर यांनी लहान जाडीची दोरी घेऊन तिला एका टोकास खडीचे वजनदार बिंब (सिमेंट कॉंक्रीटचे असते त्यातून दोरी आरपार जाण्यास छिद्र असते. ते दीड-दोन किलो वजनाचे असते.) बांधले व दुसऱ्या टोकास पाण्याची रिकामी बॉटल बांधून निशाणी बनवली. ती प्रमुख ठेवून मूर्ती शोध मोहीम पुढे सुरू झाली. भाईने दोरी फेकली. तोडणकर यांनी पहिली मूर्ती इतर दोघांच्या मदतीने बांधली. भाई, लिलाधर व कान्होबा आता मूर्ती महासागरातून बाहेर काढत होते. उदय रोगे शूटिंग करत होते. पहिली मूर्ती पाहून उदय यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. तोडणकर-कोचरेकर महासागराच्या तळाशी चिखल तुडवत, हाताने कुरवाळत मूर्तीचा शोध घेत होते.

उदय रोगे हे कवी आहेत. त्यांना नात्याची, मैत्रीची जाण आहे. मोहीम सुरूच होती. काही वजनदार मूर्ती कार्यकर्त्यांच्या हातून निसटून पुन्हा पाण्यात पडल्या. उदय म्हणाले, की होडी एका जागी स्थिर होती. मूर्ती सापडली की ती दोऱ्याला बांधून दोर होडीत दिला जात असे. तेथील तरूण ती मूर्ती ओढून वर घेत. त्यात दोराला बऱ्याच वेळा झोल मिळत असे. मूर्ती कधी खूप अंतरावरून खेचली जाई. त्यात मूर्ती पुन्हा समुद्रात पडेदेखील उदय म्हणाला, ‘महासागराच्या तळाशी असलेल्या दोन डायव्हरांना पाहा, त्यांना काही इजा तर झाली नाही ना?’ लगेच, योगेशने तळ गाठला व वर येऊन ‘सर्व ठीक आहे’ असे सांगितले. सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

मोहीम दोन वाजता संपली. पुरणपोळी, वडापाव, सामोसा असा भरपूर नाष्टा सर्वांसाठी होता. पाषाण व मूर्ती मिळून सोळा वस्तू महासागराबाहेर काढण्यात आल्या होत्या. परतीचा प्रवास सुरू झाला. मूर्ती होडीतून बाहेर काढण्यासाठी हातगाडी ढोपरभर पाण्यात नेण्यात आली. सर्व मूर्ती शिवमुद्रा संग्रहालय (मालवण) येथे ठेवण्यात आल्या आहेत. उदय रोगे यांचे सागरमंथन पूर्ण झाले!

उदय म्हणाले, “मिळालेल्या मूर्ती मंदिरांचा जीर्णोद्धार करतेवेळी बदलण्यात येतात, त्यावेळी समुद्रार्पण केलेल्या असाव्यात. त्यावेळी मूळ मूर्तीचा पुरातन ठेवा व त्यांचे महत्त्व लक्षात घेतले जात नाही. त्या तशाच समुद्रात विसर्जित केल्या जातात.” उदय समुद्रकिनारी राहतात. त्यामुळे होडी मालक त्यांच्या परिचयाचे आहेत. मोहीम त्यांच्या सांगण्यानुसार व समुद्राची खडान् खडा माहिती असणारे जाणकार यांच्या माहितीने नक्की केली गेली. मोहिमेचा गाजावाजा झाला तेव्हा पुरातत्त्व विभागाच्या एका अधिकाऱ्याने फोनवर मोहिमेतील आठ जणांपैकी दोघे डायव्हर्स समुद्रतळाशी जाण्यासाठी, एक समुद्रपाणायवर तरंगता व पाचजण होडीवर अशी योजना होती. यांच्याकडे विचारणा केली व सदर मूर्ती मराठाकालीन आहेत असे सांगितले. त्याने मिळालेल्या मूर्तींची माहिती पुरातत्त्व विभागास कळवावी असे बजावले, पण त्याचवेळी तो उदय यांना म्हणाला, तुमचे कार्य महान आहे! तुमची इतिहास वाचवण्याची तळमळ पाहून, ह्या मूर्ती शिवमुद्रा संग्रहालय येथे ठेवण्यास परवानगी देऊ. उदय म्हणाले, मोहिमेची संपूर्ण माहिती व पुढील सूचना खात्यास दिलेल्या आहेत. ते मूर्तींचे काय करायचे ते कळवतील.

उदय यांनी स्वत: शोध मोहिमेचा खर्च केला. तो आठ हजार रुपये आला. त्यांच्या मनात या मोहिमेचे यश पाहून पुन्हा तसा प्रयत्न करण्याचे त्यांच्या मनात आहे.

हेमांगी उदय रोगे 9049394916, uday.roge9@gmail.com
 

 

About Post Author