राजापूरची गंगा! वैज्ञानिक महात्म्य

1
43
carasole
राजापूरची गंगा पुन्हा प्रवाहित

राजापूरच्या गंगेचा काशिकुंडातील गोमुखाद्वारे वाहणारा पाण्याचा प्रवाह ८ जून रोजी बंद झाला होता. मात्र, तो पुन्हा अचानक शनिवारी प्रवाहित झाला. त्याचबरोबर मूळ गंगेच्या क्षीण झालेल्या पाण्याच्या प्रवाहाचा वेगही वाढला. गंगेच्या इतिहासात असा प्रकार प्रथमच घडला.

राजापूरची गंगा २०१२ साली ११ एप्रिलला अवतरली होती. ती साधारणत: दर तीन वर्षांनी प्रकट होत असे. मात्र, गेल्या काही वर्षांत राजापूरच्या गंगेचे तीन वर्षांच्या आधीच आगमन होऊ लागले आहे. यंदा तर ती  अवघ्या नऊ महिन्यांच्या कालावधीत पुन्हा प्रकटली.

गंगेचे आगमन एप्रिलमध्ये ऐन उन्हाळ्याच्या कालावधीत झाले. नियमानुसार, साधारणत: दोन महिन्यांच्या वास्तव्यानंतर, गंगेच्या निर्गमनाची चाहूल लागते. त्यानंतर करण्यात येणारा गंगापूजनाचा सोहळाही २६ मे रोजी झाला. मात्र, जोपर्यंत मूळ गंगेतून वाहणारा पाण्याचा प्रवाह पूर्ण बंद होत नाही, तोपर्यंत गंगेचे निर्गमन झाले असे मानत नाहीत. राजापूरच्या गंगेच्या इतिहासात प्रथमच २०१२ साली नावीन्यपूर्ण प्रकार घडला. गोमुखातून होणारा पाण्याचा खंडित झालेला प्रवाह शनिवारी, ८ जूनला पुन्हा सुरू झाला आणि काशिकुंड भरून वाहू लागले. त्याचवेळी मूळ गंगेच्या क्षीण झालेल्या प्रवाहातही वाढ दिसून आली. मात्र, असा प्रकार फक्त दोन कुंडांच्या बाबतीत घडला. एकूण चौदा कुंडांपैकी उर्वरित बारा कुंडांतील पाण्याच्या साठ्यात अथवा प्रवाहात कोणतीही वाढ झालेली नाही.

महेश शिवलकर, राजापूर
(दैनिक प्रहार –  सोमवार, ९ जुलै २०१२ वरून)

राजा पटवर्धन कळवतात, की गंगा जवळजवळ गेले वर्षभर वाहतच आहे!
 

राजापूरची गंगा! वैज्ञानिक महात्म्य
राजापूरच्‍या गंगेत स्‍नानासाठी भाविकांची गर्दीगंगास्‍नानराजापूरच्या (जिल्हा – रत्नागिरी) गंगेचे महात्म्य महाराष्ट्राला परिचित आहे. देशाच्या अन्य राज्यांतूनही जिज्ञासू व भाविक तो चमत्कार पाहायला भेट देतात. मी माझ्या मित्रमंडळींसह शाळकरी वयात जानशी या माझ्या जन्मगावापासून अनवाणी चालत गंगादर्शनाला गेलो होतो. राजापूरला नेहमी जाणारे लोक पायवाटेचे ते अंतर सोळा मैल आहे असे म्हणत. तेव्हापासून मला गंगेबद्दल जिज्ञासा होती. गुजरातमधील भूज या ठिकाणी ७.७ रिश्टर स्केलच्या महत्तमतेचा भूकंप २६ जानेवारी २००१ रोजी झाला. योगायोग असा, की त्याच दिवशी राजापूरची गंगा प्रगटली! त्यावेळी भूकंप व गंगा यांचा काही परस्पर संबंध आहे का अशी चर्चा सुरू झाली. भूकंप नोंदण्याची अधिकृत यंत्रणा आहे, पण गंगेचे काय? मी लोकप्रतिनिधी, सामाजिक क्षेत्रात काम करणारे अशांशी संपर्क केला. कुणालाही तशा नोंदी असल्याबद्दल माहिती नव्हती. त्यांना त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे तशी माहिती मिळवावी याबद्दल जिज्ञासाही नव्हती. मुंबईतील वृत्तपत्रांकडे चौकशी करता राजापूरच्या गंगेच्या नोंदी सापडल्या नाहीत. इंडोनेशियात ८.५ रिश्टर स्केलचा भूकंप ११ एप्रिल २०१२ ला झाला व नेमका पुन्हा योगायोग जुळून आला. त्याच दिवशी राजापूरची गंगा अवतरली! गंगा १० फेब्रुवारी २०११ ला आली होती व एकशेसोळा दिवसांचे माहेरपण पूर्ण करून स्वगृही परतली होती.भूकंप शास्त्रज्ञ अरुण बापट यांनाही गंगा व भूकंप याचे नाते अभ्यासावे असे वाटत होते. मी त्यावेळचे रत्नागिरी जिल्हाधिकारी राजीव जाधवसाहेब व राजापूर तहसीलदार भगवान सावंत यांची मदत घेतली. परिणामी, गंगातीर्थ ट्रस्टींच्या समवेत तहसीलदारसाहेबांनी घेतलेल्या बैठकीतून एकशेतीस वर्षांच्या नोंदी सापडल्या. पहिली नोंद १८८३ सालची असून तारीख, महिना यांची नोंद नाही. त्यानंतर, १९४२ पर्यंत काही अपवाद वगळता असलेल्या नोंदींत तारखांचा उल्लेख नसला तरी महिन्यांचा उल्लेख सापडतो. त्या कालखंडातल्या नोंदींप्रमाणे १९१९ ते १९३५ अशा सोळा वर्षांत एकही नोंद आढळली नाही. म्हणजे गंगा आली होती की नाही ते कळत नाही. नोंद केली गेली नाही असे झाले का? तेही शोधायला हवे. ज्यांचे वय ऐंशी वर्षांच्यावर आहे अशा राजापूर  परिसरातील लोकांकडून काही उपयुक्त माहिती मिळाल्यास मदत होईल. एकोणपन्नास नोंदी १८८३ ते २०१२ या कालखंडात सापडल्या आहेत. गंगेचे वास्तव्य प्रत्येक वेळी वेगवेगळे असते. राजापूरची गंगा किमान बारा ते कमाल एकशेसोळा दिवस मुक्कामाला होती असे स्पष्ट दिसते. तीस दिवसांपेक्षा कमी काळ अशा नऊ नोंदी असून तीस ते नव्वद दिवसांच्या तेहतीस  नोंदी आहेत. गंगा नव्वद दिवसांपेक्षा अधिक काळ फक्त दोन वेळा राहिली आहे. गंगा २००३-०४ व २०११-१२ अशा दोन वर्षी लागोपाठ आल्याची नोंद आढळली.

गंगेचे कुंडगंगेसारख्या चमत्कारांचा भूकंपाशी संबंध जोडायचा तर भूकंपाची महत्ता व तीव्रता या गोष्टींची किमान माहिती असायला हवी. राजापूर तालुक्यात प्रस्तावित जैतापूर अणुप्रकल्पानिमित्ताने भूकंपाची उदंड चर्चा झालेली आहे. राजापूरचे लोक भूकंपाच्या दृष्टीने साक्षर आहेत. रिश्टर स्केलवर (रिश्टर हा अमेरिकन शास्त्रज्ञ, त्याने भूकंपाचा Magnitude म्हणजे महत्ता मोजणारे यंत्र तयार केले.) ३.९ पर्यंतची महत्ता Minor म्हणजे किरकोळ समजली जाते. ४ ते ४.९ पर्यंत Light म्हणजे सौम्य महत्ता. ५ ते ५.९ पर्यंत Moderate म्हणजे मध्यम स्वरूपाची. ६ ते ६.९ हा भूकंप Strong किंवा जोराच्या महत्तेचा समजला जातो. ७ ते ७.९ या महत्तेच्या भूकंपाला Major म्हणजे मोठा म्हणतात. आठ आणि  त्याहूनही अधिक महत्तेचा भूकंप हा सर्वांत मोठा किंवा Great समजला जातो.

जगाच्या नोंद झालेल्या इतिहासात सुमात्रा (इंडोनेशिया) चा २६ डिसेंबर २००४ चा भूकंप ९.३ अशा विक्रमी महत्तेचा होता. त्याच्या सहा दिवस अगोदर २० डिसेंबर २००४ ला राजापूरची गंगा अवतीर्ण झाली होती. भूकंपशास्त्रानुसार इतका मोठा भूकंप झाल्यास त्या घटनेपूर्वी काही दिवस अगोदर पाण्याची पातळी वाढून असे चमत्कार घडू शकतात. भूकंपाच्या नोंदी महत्तेप्रमाणे केल्या जातात. तशाच नोंदी Intensity म्हणजे तीव्रता जाणण्यासाठी केल्या जातात. मुख्यत: भूपृष्ठावरील उत्पाती घटना, मोडतोड, घरे गाडली जाणे, नद्यांचे प्रवाह बदलणे इत्यादीची नोंद ही तीव्रता दर्शवते. राजापूरच्या गंगेसंबंधात कोयनेचा १० डिसेंबर १९६७ चा ६.५ महत्तेचा भूकंप व लातूरचा ३० सप्टेंबर १९९३ चा ६.३ रिश्टर महत्तेचा भूकंप यांची दखल घ्यायला हवी. महाराष्ट्राने अनुभवलेले ते प्रमुख दोन दुर्दैवी भूकंप होते. त्यावेळी प्रचंड नुकसान झाले. प्राणहानीही खूप झाली. दोन्ही भूकंपांमुळे राजापूरची गंगा प्रगटली नाही. गंगा येणे हा उत्सव असतो. महाराष्ट्राच्या दु:खाने गंगा हिरमुसली असावी!  म्हणूनच रिश्टर स्केल ६.५ पर्यंतच्या महत्तेचे भूकंप गंगेच्या प्रकटीकरणास जबाबदार असत नाहीत असे दिसते. जम्मू-काश्मिरमध्ये सात महत्तेचा भूकंप ३० मे १८८५ रोजी झाला होता. त्याच वर्षी जून महिन्यांत (तारखेची नोंद नाही) राजापूरची गंगा अवतरली. शिलाँग येथे आठ महत्तेचा भूकंप १२ जून १८९७ ला झाल्याची नोंद आहे. त्याच साली राजापूरला गंगा आली, परंतु तारीख वा महिन्याची नोंद सापडली नाही. आसाममधल्या १८ जुलै १९१८ च्या भूकंपाची नोंद ७.६ महत्तेची आहे. त्याच साली राजापूरची गंगा आल्याची नोंद आहे, परंतु तारीख व महिना यांची नोंद नाही. मुद्दा असा, की भारतात साताहून अधिक महत्तेचे भूकंप १८८५ ते २००१ या काळात अकरा वेळा झाले आहेत. पैकी दोन वेळा त्याच दिवशी गंगा आली आहे. 1885 व 97 सालात भूकंपाचा व गंगा येण्याचा महिना जुळतो व १९१९ साली जुलै महिन्यात आसाममध्ये भूकंप झाला, त्याच वर्षी गंगा आली होती. पण तारीख व महिना यांची नोंदच नाही. यावरून एवढेच म्हणता येते, की अकरापैकी सहा वेळा भूकंप व गंगा यांचा मेळ बसत नाही; चार वेळा बसतो. एका वेळचा तारीख व महिना माहीत नसल्यामुळे संबंध सांगू शकत नाही. यावरून असे अनुमान निघते, की तो संबंध निर्विवाद सिद्ध होत नाही. त्याचबरोबर असा संबंध सिद्ध करण्यासाठी अधिक अभ्यासाची गरज आहे. याचे मुख्य कारण इंडोनेशियातील ८ व ९.३ च्या महत्तेचे भूकंप राजापूरच्या गंगेशी थेट संबंध जोडतात.

राजापूरच्या गंगेचे पाणी येते कुठून? वर्षाच्या बारा महिन्यांपैकी उपलब्ध नोंदीनुसार फक्त नोव्हेंबर महिन्याचा अपवाद वगळता उरलेल्या सर्व महिन्यांत गंगा प्रकट होताना दिसते. गंगेला आवडणारा महिना एप्रिल असावा. नऊ वेळा एप्रिलमध्ये, आठ वेळा मार्चमध्ये, सात वेळा जून (जून १० पूर्वी) मध्ये, सहा वेळा मे महिन्यांत गंगा आल्याची नोंद आहे. मार्च ते मे किंवा जून १० पर्यंत उष्णता वाढत जाते. विहिरीतील पाणी आटत जाते. त्याच वेळी राजापूरची माहेरवाशीण सोबत जलस्रोत घेऊन अवतरते! त्यामुळेच तो चमत्कार समजला जातो.

भूकंप होण्यापूर्वी त्याच्या महत्तेप्रमाणे म्हणजे ऊर्जेप्रमाणे भूगर्भात दाब वाढल्यामुळे गंगेसारखे चमत्कार संभवतात. जगभरच्या भूकंपपूर्व नोंदींनुसार भूपृष्ठावरील जलाशयाच्या पाण्याच्या पातळीत एकदम बदल होतात; पातळी वाढू शकते तर कधी कमीही होते, तर कधी तरंग उमटतात, चक्क उसळी मारतात. राजापूरच्या गंगेसंबंधात गंगेच्या उगमाखाली मोठा जलाशय असू शकतो. जवळून वाहणारी अर्जुना नदी व उन्हाळे गावातील गरम पाण्याचे बारमाही झरे यांचाही अभ्यास होणे गरजेचे आहे. अरुण बापट यांनी या गरम पाण्याचे तापमान आठवड्यातून विशिष्ट वेळी दोन वेळा नोंदवले जाण्याची इच्छा व्यक्त केली. भावी काळात त्याचा उपयोग होईल. गंगा येणे, भूकंप व या गरम पाण्याची नियमितपणे केलेली तापमान नोंद यांचा परस्पर संबंध स्पष्ट होण्यास मदत होईल. गंगा प्रकटते त्याच्यावर सुद्धा जलाशय असू शकतो. काही कारणाने तो तुडुंब भरून वाहू लागल्यावर तो गंगा रूपाने प्रकटू शकतो. हे सर्व तर्क आहेत. शास्त्रीयदृष्ट्या अनुमान काढायचे तर अधिक खोल अभ्यासाची गरज आहे.

ताजा कलम : राजापूरच्या गंगेचा वैज्ञानिक दृष्टीने शोध घ्यावा म्हणून मी लेख लिहिला. तो महाराष्ट्रातील चार वृत्तपत्रांनी मे २०१२ मध्ये छापला. लेख प्रसिद्ध झाल्यानंतर मला अनेक फोन आले.

लोकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी, देवगड, सावंतवाडी इत्यादी ठिकाणचे अनुभव सांगितले. राजापूरच्या गंगेच्या वेळी तसाच प्रकार वैभववाडीत पाहायला मिळतो. गंगा देवगडलाही येते, पण राजापूरची गंगा दीर्घकाळ टिकते म्हणून तिचे महात्म्य! ते अन्य जागी नाही. लोकांनी भूकंपानंतर किंवा त्या दरम्यान त्या प्रदेशातील विहिरींचे पाणी वाढते अशी माहिती मला दिली.

रायगड जिल्ह्यातील इंदापूर-माणगाव परिसरातून एका भगिनींनी फोन करून राजापूरची गंगा आली, की त्या परिसरात विहिरींच्या पाण्याची पातळी एकदम वाढते असे ठामपणे सांगितले. ते पाणी दीर्घकाळ वाढलेलेच राहते असे त्यांचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. त्याचप्रमाणे राजापूर तालुक्यातील उंच डोंगरावर पाण्याचा प्रचंड साठा असून बाराही महिने पंप लावून पाणी आटत नाही असे एका राजापूरकराने फोन करून सांगितले.

नासिक जिल्ह्यातून एन.एम. आव्हाड (सिव्हिल इंजिनीयर व ‘विज्ञानतरंग’ या पुस्तकाचे लेखक) यांनी सविस्तर प्रतिक्रिया कळवली. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात ‘वासुदेव पेल्या’चे तत्त्व शिकवले जाते. पेला पूर्ण भरल्यावर नळीतून पाणी बाहेर पडते. पेला रिकामा होईपर्यंत तो प्रकार सुरू असतो. आव्हाड यांच्या मते, राजापूर गंगेचा ‘चमत्कार’ ‘वासुदेव प्याला’[वक्रनलिका तत्त्व ] तत्त्वावर आधारलेला आहे. जलाशय पूर्ण भरला [वासुदेव प्याल्याप्रमाणे] की गंगा ‘माहेरी’ (राजापूरला) जाण्यास निघते. ते मत एका भूगर्भशास्त्रज्ञांना सांगितले. त्यांच्या मते, वक्रनलिका तत्त्वानुसार गंगा येण्यासाठी जलाशय वीस-पंचवीस मीटर इतका जवळ हवा. मुद्दा असा, की राजापूरची गंगा भूपृष्ठावरील जलाशयातून येते, की भूगर्भातील जलसाठ्यातून? की भूकंपासारख्या घटनांमुळे?

राजापूरचे तहसीलदार उन्हाळ्याच्या गरम झऱ्याच्या तापमानाची नोंद ठेवायला हवी याला तयार झाले. परंतु नोंद कोण ठेवणार?  ती व्यवस्था शासकीय आदेशानुसार होऊ शकेल. पण त्यासाठी लोकांचे दडपण यायला हवे. वाचकांनी राजापूर तहसीलदारांना विनंती पत्रे लिहिली तर ते घडू शकेल. त्यामुळे पुढील काळात गंगेच्या रहस्याचा उलगडा होण्यास मदत होईल.

(हा लेख लिहित असताना अरुण बापट व प्रवीण गवळी या तज्ज्ञांकडून मला महत्त्वाची माहिती मिळाली. त्यांचे आभार.)

राजा पटवर्धन
१०१, साईकृपा अपार्टमेंट,
कामगार कल्याण भवनसमोर,
अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०६९
(०२२) २६८३५७९५
patwardhanraja@hotmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. हे पाणी एकाच ठिकाणी उगम का
    हे पाणी एकाच ठिकाणी उगम का पावते? आजुबाजुच्या परिसरात का येत नाही?

Comments are closed.