बार्शीचा अंबरीषवरद भगवंत

लोककथेप्रमाणे विचार केलातर बार्शीचा भगवंत पंढरीच्या विठ्ठलाहून जुना आहे असे जाणवते. भक्ताच्या परित्राणासाठी तो भगवंत शंखचक्रगदा व पद्मसहित त्याच्या लाडक्या लक्ष्मीला पाठीवर घेऊन पंढरीच्या विठ्ठलाच्या आधीपासून अद्भुत अशा बार्शीमध्ये उभा आहे…

लोककथेप्रमाणे, बार्शीचा भगवंत पंढरपूरच्या विठ्ठलाहून जुना आहे ती कथा राजा अंबरीषास जोडली आहे. अंबरीषाची कथा श्रीमद्भागवत पुराणाच्या नवव्या स्कंधातील चौथ्या अध्यायात आलेली आहे. राजा अंबरीषाची वंशावळ श्री अंबरीष महात्म्य या संस्कृत ग्रंथात दिलेली आहे. ती वैवस्वत मनूशी (सूर्यवंशातील) नाते सांगणारी आहे.

अंबरीष राजा हा यमुनेच्या तीरावर राहत असे. तो द्वादशी क्षेत्र (बार्शी) येथे पुष्पावती नदीच्या काठी तप करत होता. तो साधन द्वादशीचे व्रत करत होता. इंद्राने स्वर्गातील अप्सरांना तेथे त्याचा तपोभंग करण्यासाठी पाठवले, परंतु अंबरीषाचा तपोभंग त्या अप्सरांच्याकडून झाला नाही. तेव्हा इंद्राने त्या कामी दुर्वास महर्षी यांची मदत घेण्याचे ठरवले. दुर्वासही त्यांच्या सात हजार शिष्यांनीशी अंबरीषाचा व्रतभंग करण्यासाठी इंद्राच्या सूचनेप्रमाणे त्या ठिकाणी आले. त्या वेळी पुष्पावती नदीने त्यांना प्रतिबंध केला. दुर्वासांनी नदीचा वेगवान प्रवाह ओलांडून जाण्यासाठी नदीला शांत होण्याचा व दुभंग होऊन वाट देण्याचा आदेश दिला. नदीने तो आदेश मानला नाहीतेव्हा दुर्वास ऋषींनी पुष्पावती नदीस शाप देऊन पालथी केली व नगरात प्रवेश केला अंबरीष करत असलेल्या साधन द्वादशी व्रतामध्ये दशमीस एकभुक्त राहूनएकादशीस निर्जल राहवे लागते व द्वादशीस सूर्योदयापूर्वी एकादशी सोडल्यास सदर व्रताचे पुण्य लाभते असा समज आहे. कार्तिक शुद्ध एकादशी झाल्यानंतर अंबरीषास द्वादशी सोडण्याचे व्रत होते.

अंबरीषाने दुर्वास ऋषी आल्यानेत्यांचे प्राथमिक आगतस्वागत करून तुम्ही नदीवर जाऊन आन्हिक उरकूनभोजनास या असे सांगितले. दुर्वास त्याप्रमाणे नदीवर गेलेपण लवकर परत येईनात. इकडे द्वादशी अतिक्रांत (ओलांडूनएकादशीचे पारणे द्वादशीला सूर्योदयापूर्वी भोजन करुन करणेसूर्योदय झाल्यावर द्वादशी अतिक्रांत झाली असे म्हटले जातेहोत चालली. तेव्हा व्रतभंग होऊ नये म्हणून राजाने देवास नैवेद्य समर्पण करूनस्वतफक्त तीर्थप्राशन करून पारणे सोडले. दुर्वासांना ते कळल्यानंतर त्यांना मोठा राग येऊन त्यांनी त्यांच्या जटेतून एक कृत्त्या (राक्षसी, एखाद्याचा नाश करण्यासाठी स्वतःच्या तपसामर्थ्याने निर्माण केलेली राक्षसी) निर्माण करून राजावर सोडली व शापही दिलाकी तू अनेक योनींत जन्म घेशील.’ भगवंताने राजाचा नाश होणार हे जाणून सुदर्शन चक्र कृत्त्येवर टाकले. चक्र कृत्त्येचा नाश केल्यावर दुर्वासांच्या मागे लागले. त्यांचे संरक्षण कोणताही देव करेना. अखेर, भगवंताने दुर्वासांना सांगितले, की तुम्ही राजाकडे जाऊन त्याची क्षमा मागा. तो तुमच्यासाठी उपाशी राहिला आहे.’ तेव्हा दुर्वास परत अंबरीष राजाकडे एका वर्षाने गेले. तो उपाशी राहून अतिथीची वाट पाहतच होता ! राजाने सांगताच दुर्वासांच्या पाठीचे सुदर्शन चक्र सुटले व राजाने दुर्वासांना पंक्तीला घेऊन भोजन केले.

अंबरीष राजा भगवंताचा एवढा लाडका भक्त होताकी अनेक योनींत जन्म हा दुर्वासांचा शाप त्याला बाधू नये म्हणून भगवंताने मत्स्यादी अवतार स्वतत्याच्यासाठी घेतले. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीमध्ये त्याचे वर्णन ‘एकाचे गर्भवासही साहिले’ अशा प्रकारे केलेले आहे. तो सर्व प्रकार द्वादशीस घडला. बारस म्हणजेच द्वादशीत्यावरून बारसपूर – बारशी – बार्शी असे नाव त्या गावाला मिळाले.

त्याशिवाय अंबरीष विजय’ नामक ग्रंथामधील ओव्यांमध्ये बार्शीतील बारा पवित्र तीर्थांची नावे येतात. त्यामुळे बारा पवित्र तीर्थांचे गाव बाराशिव यावरून बारशी हे नाव मिळाले असावे असेही एक मत आहे. वारकऱ्यांचा प्रघात पंढरपूरला एकादशी करून द्वादशी बार्शीस सोडण्याचा आहे.

बार्शी शहरात अंबरीष रक्षणासाठी प्रकटलेल्या भगवंताचे हेमाडपंती धाटणीचे मंदिर आहे. भगवंताने जे अवतार अंबरीषासाठी घेतले त्या दशावताराची शिल्पे शिखरावर कोरलेली आढळून येतातमुख्य गाभाऱ्यातील भिंतीवर महादेवाची पिंडगणपतीअश्वमेधाचा अश्वसर्पाकृतीतील सुदर्शन चक्रशेषावरील विष्णूचंद्रसूर्य यांच्या शिल्पाकृती कोरलेल्या आढळतात. लक्ष्मीनारायणाची मूळ मूर्ती मंदिरात डावीकडे कोपऱ्यात दिसून येते. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात अंबरीषवरद श्री भगवंत उभे आहेत. ती मूर्ती शाळिग्राम पाषाणाची असूनमनोहर अशी आहे. भगवंताच्या त्या मूर्तीची वैशिष्ट्ये दोन आहेत- एक म्हणजे भगवंतापुढे अंबरीष उभा असूनभगवंताने त्याच्या मस्तकावर हात ठेवलेला आहेत्याच शीळेत भगवंताच्या पाठीशी टेकून उलट दिशेस तोंड केलेली लक्ष्मीची मूर्ती आहे. म्हणजे ती मूर्ती समोरून विष्णूची तर पाठीमागून लक्ष्मीची आहे. पूर्वीसोवळ्याने भगवंताच्या उजव्या हाताने जाऊन लक्ष्मीचे दर्शन घेता येत असे. सध्या लक्ष्मीचे दर्शन आरशातून घ्यावे लागते !

अंबरीष विजय’ ग्रंथाचा कर्ता मल्हारी विठ्ठल याने या भगवंताचे नेटके वर्णन त्याच्या ग्रंथात केले आहे. प्रथम भगवंतास नमन करताना तो म्हणतो,

मातुलिंगपद्म हस्ते शोभा । शिरी धरून भवा तू उभा ।

सव्यभागी अंबरीष उभा । भक्तरक्षणा तुज नमो ||

यानंतर या राजस सुकुमार पुतळ्याचे वर्णन आलेले आहे ते असे –

शंख चक्राते करूनी धारण । पाठीशी उभी लक्ष्मी आपण ।

हृदयी विप्रपदाचे भूषण । कौस्तुभ गळा साजिरा ।।

पीतांबर नेसूनि कटी । तुळशीमाळा रूळे कंठी

कुंडले किरीट बाहुटी । कीर्तिमुख शोभतसे ।।

असे हे साजरे रुपडे आहे. तो अंबरीषवरद श्री भगवंत म्हणजे विष्णूच होय. भारतात अनेक विष्णूमंदिरे आहेत. परंतु पाठीशी श्रीलक्ष्मीची मूर्ती असणारी ही एकमेव प्रतिमा आहे.

भगवंताच्या पाठीशी असणाऱ्या लक्ष्मीच्या मूर्तीविषयी अनेक दंतकथा आहेत. काही जणांच्या मते, अंबरीषाच्या रक्षणासाठी त्वरेने येताना, घाईत वेळच न मिळाल्याने भगवंत लक्ष्मीला पाठीवर घेऊन आलेला आहे. पुराणात मात्र त्याचे कारण वेगळे दिलेले आहे. भगवंत अंबरीषाच्या विनंतीनुसार बार्शीस राहिला, लक्ष्मीने त्याचा विरह सहन न होऊन घोर तप आरंभ केले. अखेर भगवंतापाठोपाठ तीदेखील बार्शीस आली. लक्ष्मीची निष्ठा पाहून भगवंत प्रसन्न झाला व त्याने लक्ष्मीला स्वत:च्या पाठीमागे उभे केले. त्या संदर्भात अंबरीष विजयकर्ता म्हणतो –

आलीस तू माझे पाठी लागून । तू माझे पाठीशी बसावे ।

हेही प्रमाण असे अर्धासन । राहे सदा या ठाय ।।

अशा तऱ्हेचे अभिवचन भगवंताने लक्ष्मीला दिले व त्यामुळे ती त्याच्या पाठी राहिली. भगवंताच्या पाठीवर असणाऱ्या लक्ष्मीच्या मूर्तीची कारणमीमांसा काहीही असली, तरी सोलापूर जिल्ह्यामध्ये जनमानसात प्रचलित असणाऱ्या लोककाव्यांत मात्र, लोककाव्यकर्त्यांनी भगवंताला बाईलवेडा ठरवलेले आहे.

बारशीचा भगवंत असा नाई पाहीयला । ‘घेतो पाठकुळी बायकूला ।।

खरोखरच असा बायकोला पाठीवर वागवणारा नवरा कोठे पाहण्यास मिळणार? बायकोचे एवढे कौतुक करणारा तो परमेश्वर स्त्रीमनाला तर अधिकच भावतो. अगदी आदर्श पती वाटतो.

किती गं चांगला बारशीचा भगवंत । पाठीवर बायकू बाइलवेडा कंथ ।।

म्हणून लोककाव्याने बार्शीच्या भगवंताला ‘बाइलवेडा कंथ’ ठरवलेला आहे.

सोलापूरचे शाहीर कविराय रामजोशी यांनी आणखी वेगळेच कारण त्यांच्या बार्शीच्या लावणीत सांगितले आहे. प्रथम ते भगवंताच्या या नगरीचे कौतुक करतात.

दाट साधुचा हाट भागवत, पाठ रुचिर फारशी । अशी ही अद्भुत, जगि बारशी ।।

अशा या बार्शीत वैकुंठाहून हा देव आलेला आहे. नुसताच नव्हे, तर अगदी पळून आलेला आहे. सोबत त्याच्या लक्ष्मीलादेखील घेऊन आलेला आहे.

चार दिवस बाजार तेथिचा वार करूनी लौकरी । आला हो बाइल पाठीवरी ।।

एवढ्या त्वरेने याने येण्याचे कारण तरी काय? तर या बाजारात असणाऱ्या भक्तरूपी देणेकऱ्यांना चकवण्यासाठी ! त्यांचे देणे बुडवण्यासाठी तो पळून आलेला आहे.

मला वाटते थेट हि आला येथ पळुनिया घरी । वोढतिल तेथे देणेकरी ।।

कविरायांना बार्शीत आल्यानंतरदेखील त्याची ती सवय जाणार नाही असे वाटते. कारण जेथे जातो तेथे तो ठकडा तसाच वागतो. तेथील भक्तांना त्याच्या मोहात पाडतो आणि त्यांचे देणे परत करण्याची वेळ आली, की तो ते देणे बुडवण्यासाठी चक्क पसार होतो !

तिथे बुडविले इथेहि आला जिथे तिथे हा तसा । पहा हो खटला केला कसा ।।

कविरायांनी भगवंताचा आणखी एक वेगळाच पैलू त्यांच्या काव्यात दाखवलेला आहे. भगवंताच्या पाठीवरील लक्ष्मीसंदर्भात अशी वेगवेगळी पण मनोरंजक कारणे आढळतात. अंबरीषवरद भगवंताच्या पाठीवर असणाऱ्या श्री लक्ष्मीच्या मूर्तीबद्दल अंबरीष विजयकर्ता जे मत मांडतो ते त्याच्या भक्तीच्या भावनेतून आलेले आहे, तर लोककाव्यकर्त्यांनी त्याविषयी मांडलेले मत सर्वसामान्य संसारी माणसाचे मन प्रतिबिंबित करते. कविरायांनी त्याविषयी मांडलेले मत हे संत व पंत यांच्या मताप्रमाणेच आहे. त्यांना त्यामध्ये तो लबाड, चोरटा देव अभिप्रेत आहे. ते सारे खूपच मनोरंजक आहे.

बार्शीत सध्या असणारे भगवंत मंदिर इसवी सनाच्या तेराव्या शतकापासून अस्तित्वात आहे. नानासाहेब पेशव्यांनी मंदिराच्या खर्चासाठी १७५९-६० मध्ये सनद दिल्याची नोंद मिळते. अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिरासाठी देणगी दिल्याचे उल्लेखही सापडतात. सध्या उपलब्ध असणारी सनद १८७४ मधील असून, ती इंग्रज सरकारची आहे. बार्शीच्या मंदिराच्या बांधणीसंदर्भात कोणतेही पुरावे अस्तित्वात नाहीत. मंदिरातदेखील कोणत्याच प्रकारचे शिलालेख वगैरे त्याच्या निर्मात्यांनी कोरलेले नाहीत. ते मंदिर तेराव्या शतकामधील असावे असा केवळ अंदाज आहे. त्यामुळे त्या मंदिराचा निर्माता इतिहासाला अज्ञात आहे. लोककथेप्रमाणे विचार केला, तर ते दैवत पंढरीच्या विठ्ठलाहून जुने आहे असे जाणवते. भक्ताच्या परित्राणासाठी तो भगवंत शंख, चक्र, गदा व पद्मसहित त्याच्या लाडक्या लक्ष्मीला पाठीवर घेऊन पंढरीच्या विठ्ठलाच्या आधीपासून ते अगदी आजपर्यंत त्या अद्भुत बार्शीमध्ये उभा आहे.

– अनिरुद्ध बिडवे 9423333912 bidweanirudha@gmail.com

———————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

  1. History about Bhagwant temple is true as written here as per pothi we had yrs back.
    The writer has not mentioned about start period of Vitthal mandir of Pandharpur.
    Barshi story is from first Avtar of Vishnu
    Where as Vitthal Avtar is from start of Kaliyug.after Krishna Avtar.
    So Barshi temple is senior most among all Vishnu temple.
    V.N.Deshpande.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here