टिप्‍परघाई - वडांगळी गावचा शिमगा


शिमग्याचे ‘कवित्व’ महाराष्ट्राला नवे नाही. मात्र सिन्नर तालुक्यातील वडांगळी या माझ्या गावात शिमगा साजरा केला जातो, तोच मुळी कवने गाऊन, टिप्परघाई खेळून. तेथे टिप्परघाई मौखिक परंपरेने चालत आलेले शिमग्याचे लोकगीत गात डफाच्या ठेक्यावर रंगते.

वडांगळीतील सामुदायिक होळी मारुती मंदिरासमोर पेटते. ती गावातील प्रत्येक घरातून आलेल्या पाच-पाच गोवऱ्यांनी रचली जाते. ती होळी सर्वांत मोठी. गल्लोगल्लीतील इतर होळ्या त्या मोठ्या होळीतील जळत्या गोवऱ्या नेऊन पेटवतात. मारुतीच्या होळीवर दोन मोठमोठे दगडी गोटे आहेत. मिसरूड फुटलेली तरुण मुले, त्यांच्या शरीरातील रग अजमावण्यासाठी ते त्यांच्या खांद्यावर ‘दगडी गोटे’ पेलून होळीला पाच प्रदक्षिणा घालतात. अनेक तरुणांना ते साधारण प्रत्येकी क्विंटलभर वजनाचे दगडी गोटे उचलणे जमत नाही. तालमीत तयार झालेली तरुण मुलेदेखील त्यात कधी कधी फसतात. काही तरुण मात्र तब्येतीने ‘तोळामासा’ असतात, पण ती ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ ठरवून ते गोटे लीलया पेलतात. लहानगी मुले टिमक्या वाजवत पुरणपोळीचा नैवेद्य खातात, तोंडावर पालथा हात मारत एकमेकांच्या नावाने बोंबा मारत, होळीचा आनंद लुटतात.

होळीला रंग चढतो तो धुळवडीत. घरोघरी, देवघरातील ‘वीराचा टाक’ खोबऱ्याच्या वाटीत घालून, लाल आलवणाच्या कपड्यात गुंडाळून ‘वीरा’ची वेशभूषा केलेल्या मुलांच्या हाती दिला जातो. घराघरातून सैनिक पूर्वी लढाईसाठी जात असावेत. त्यांची आठवण म्हणून प्रत्येक घरात ‘वीरा’चा चांदीचा टाक असतो. शिमग्याच्या दिवशी, त्यालाच ‘वीराचा पाडवा’ असे म्हणतात. त्या वीरांचे पूजन करून, त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून गावातून डफाच्या तालावर चांदीचे टाक घेतलेल्या ‘बालवीरां’ना वाजतगाजत मिरवले जाते. सजवलेले ‘बालवीर, वीराचे पवित्रे घेत होळीभोवती फेर धरत नाचतात. ती मिरवणूक गावाच्या गल्ल्यागल्ल्यांतून मिरवत महादेवाच्या मंदिराशी येऊन विसावते. वीर महादेव मंदिराच्या उंच दगडी पायऱ्यांवर स्थानापन्न होतात आणि मग रंगते टिप्परघाई...

भुलाबाईचा उत्सव - वैदर्भीय लोकसंस्कृती

अज्ञात 30/09/2015

विदर्भात साजरा होणारा भुलाबाईचा उत्सव हा नवीन आलेल्या धान्याच्या पूजनासाठी, स्वागतासाठी असतो. भुलाबाईचा सण विदर्भासह मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत व खानदेशातील जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर साजरा होतो.

विदर्भातील ग्रामीण भागांमध्ये कोजागिरी पौर्णिमा ही माळी पौर्णिमा म्हणून शेतकरी कुटुंबांमध्ये उत्साहात साजरी केली जाते. माळी पौर्णिमा हा नवीन धान्याच्या स्वागताचा सण भुलाबाईचा उत्सव म्हणून घराघरांतील लहान मुली व महिला सामूहिकपणे साजरा करतात. भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून कोजागरी पौर्णिमेपर्यंत सण साजरा होतो. भुलाबाई म्हणजे माहेरवाशीण. महिन्याभराकरता ती तिच्या माहेरी येते ही कल्पना. तिचा हा सण गृहिणी ही भुलाबाईसोबत भुलाबाई म्हणजे पार्वती आणि भुलोजी म्हणजे भोळा सांब महादेव श्री शंकर, लहानसा असलेला गणेश म्हणजे गणपती भुलाबाईचा उत्सव सखी पार्वती, शिवशंकर व गणपती यांचा म्हणून ओळखला जातो.

महिनाभर रोज संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी मुली एकमेकींच्या घरी जाऊन भुलाबाईची पारंपरिक लोकगीते म्हणतात. त्यानंतर भुलाबाईचा प्रसाद म्हणजेच खिरापत वाटली जाते. खिरापतीमध्ये रोज नवे प्रसाद असतात व ते बंद डब्यांतून आणले जातात. भुलाबाईंच्या पारंपरिक गाण्यानंतर सर्व मुलींमध्ये या डब्यांतील खिरापत ओळखण्याची स्पर्धा रंगते.

तुंबडीवाल्यांचे गाव


‘तुंबडीवाला’ हा गोंधळी , भराडी , वासुदेव , पांगुळ, बहुरूपी या लोकगायकांच्या परंपरेतला लोकसंस्कृतीच्या उपासकांतील महत्त्वपूर्ण घटक होय. तुंबडीवाल्यांचे वास्तव्य महाराष्ट्राच्या वर्धा  जिल्ह्यात आढळून येते. कारंजा (घाडगे) तालुक्यातील खापरी हे गाव तुंबडीवाल्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांचा परंपरागत, पिढीजात व्यवसाय म्हणजे ‘तुंबडी’ या वाद्यावर गाणी म्हणून भिक्षा मागणे. त्यांच्यापैकी काही मंडळी शेतीव्यवसाय व पशुपालन करत आहेत, नवी पिढी शिक्षण घेत आहे. मात्र हे प्रमाण नाममात्र आहे.

महाराष्ट्रातले ‘तुंबडीवाले’ मध्यप्रदेशात ‘बसदेव’ आणि उत्तर प्रदेशात ‘हरबोले’ या नावांनी ओळखले जातात. मध्यप्रदेशात त्यांचे वास्तव्य ‘बालाघाट’, ‘रानडोंगरी’, बैतुल’ या प्रदेशांत आहे. त्यांचे वास्तव्य उत्तरप्रदेशात तुरळक दिसून येते. त्यांचे मुख्य उपास्य दैवत ‘महादेव’. तुंबडीवाले हिंदू समाजाप्रमाणे सर्व सण-उत्सव साजरे करतात. त्यांचे रीतिरिवाज, चालीरीती हिंदूंप्रमाणे आहेत. ते श्रीकृष्ण, गणपती, हनुमान यांना विशेष पूजनीय मानतात.

तुंबडीवाला भिक्षा मागताना जी गाणी गातो ती परंपरेने त्यांच्या घराण्यात मौखिक रूपाने प्रचलित असतात. प्रत्येक पिढीत त्यात कमी-अधिक होते. त्यामुळेच त्यांच्या गीतांत नित्यनूतनता दिसून येते. गाणी परंपरागत ‘तुंबडी’ या वाद्यावर गातात. त्यांच्या तोंडी असणारी विविध प्रकारची गाणी, पोवाडे, कथागीते उपदेशात्मक आणि मोहक असतात. त्यांच्या गाण्यांनी ऐकणा-यांचे मन प्रसन्न होते. तुंबडीवाला भिक्षा मागताना एकटाच असतो. शक्य झाल्यास त्याच्या सोबतीला लहान मुलगा असतो. कधी ते बरोबरीचे दोघे असतात. त्यावेळी दुसरा साथीदार कोरसप्रमाणे गीताच्या चरणांची पुनरावृत्ती करतो.