दहिगाव संस्थानचे वर्तमान


सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील दहिगाव हे जैनांचे भगवान महावीर व ब्रम्हमहती शांती सागर महाराज यांच्या क्षेत्रामुळे प्रसिद्ध आहे. दहिगाव नातेपुतेपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. त्या गावाला संस्थानिकांचे गाव म्हणूनही ओळखले जाते. शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र छत्रपती राजाराम यांची कन्या त्या गावात निंबाळकर घराण्यात दिली होती. तर संताजी घोरपडे याला त्याच संस्थानात मानाजी माने याने पकडल्याची नोंद आढळते.

दहिगाव परिसरात निंबाळकर राजघराण्याचे कोठलेही अवशेष आढळत नाहीत. छत्रपती राजाराम यांची कन्या आणि जावई यांची समाधी तेथे असल्याचे बोलले जाते, मात्र त्या गावात किंवा परिसरामध्ये कोठल्याही प्रकारची समाधी दिसली नाही. मात्र गावाच्या पश्चिमेला पूर्वी निंबाळकर घराण्याची जमीन होती, त्या ठिकाणी पडिक स्थितीतील समाधीसदृश वास्तू पाहण्यास मिळते. त्या दोन वास्तू आहेत हे खरे व त्या एकमेकांपासून साधारण एक हजार फूट अंतरावर आहेत. त्या ठिकाणी सत्याईचे मंदिर असून, त्या नेमक्या कोण याचाही उलगडा होत नाही.

सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील कन्हेर हे गाव तेथील महादेव मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. ते नातेपुतेपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. ते पूर्वी दहिगाव संस्थानात येत होते. त्या ठिकाणी दोन ओढ्यांचा संगम झाला असून त्याला संगम ओढा म्हणून संबोधले जाते. संताजी घोरपडे त्या ओढ्यावर अंघोळीला येत असत; त्याच ठिकाणी त्यांचा घात झाल्याची माहिती मिळते.