कवी कालिदास

अज्ञात 21/07/2017

कालिदास हा शकारी विक्रमादित्याच्या पदरी असलेल्या नवरत्नांपैकी एक होता असे मानले जाते. पण डॉ. भांडारकर, मिराशी इत्यादी पंडितांच्या मते कालिदास हा गुप्त घराण्यातील द्वितीय चंद्रगुप्त विक्रमादित्य याच्या आश्रयाला होता. विक्रमादित्याने इसवी सन ३८० ते ४१३ या कालखंडात राज्य केले. म्हणून कालिदास चौथ्या शतकाच्या शेवटी व पाचव्या शतकाच्या आरंभी झाला असला पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे.

त्याच्या नैसर्गिक प्रतिभेला शास्त्राभ्यासाची, कला-परिचयाची व सूक्ष्म अवलोकनाची जोड मिळाली होती. त्याची वृत्ती शृंगाररसात रमत असे. त्याने अनेक ठिकाणी उत्तम गृहस्थाश्रम व एकनिष्ठ पत्निप्रेम यांचाही गौरव केला आहे. त्याचा स्वभाव विनोदी, विनयसंपन्न, निरलस आणि वत्सल असावा. त्याचे एकूण आयुष्य थोर लोकांच्या सहवासात आणि संपन्न अवस्थेत गेले. त्याची प्रतिभा सर्वार्थाने अनुकूल वातावरणात खुलत गेली. भावकवी, महाकवी, श्रेष्ठ नाटककार ही त्यांची ओळख. ‘ऋतुसंहार’ हे निसर्गवर्णनपर काव्य, ‘मेघदूत’ हे खंडकाव्य, ‘कुमारसंभव’ व ‘रघुवंश’ ही दोन महाकाव्ये आणि ‘मालविका मित्र’, शाकुंतल ही त्याची नाटके रसिकांच्या मन:पटलावर विराजमान झालेली आहेत.

(भारतीय संस्कृति कोशातून उद्धृत)

संवत्सर - अर्थात वर्ष

अज्ञात 29/05/2017

_sanvatsar.jpgसंवत्सर - काळाचा एक भाग. वर्ष. संवत्सराची व्याख्या अशी - ‘सम्यग् वसन्ति मासादयोसमिन्’ (ज्यात मास आदी कालविभाग व्यवस्थित सामावतात, त्याला संवत्सर असे म्हणतात). बारा महिन्यांच्या (मासांच्या) कालखंडाला संवत्सर असे नाव आहे. महिन्यांचे चांद्र, सावन व सौर असे भेद आहेत; तसेच, संवत्सराचेही चांद्र, सावन व सौर असे तीन प्रकार आहेत.

चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन अमावास्येअखेरचा जो काळ, त्याला चांद्र संवत्सर असे म्हणतात. चांद्र संवत्सर तीनशेचौपन्न दिवसांचे मानलेले आहे. तीनशेसाठ दिवसांच्या कालखंडाला सावन संवत्सर असे नाव आहे. सूर्याने मेष राशीत प्रवेश केल्या दिवसापासून तो मीन राशीतून बाहेर पडण्याच्या दिवसाअखेरपर्यंतचा जो कालखंड, ते सौर वर्ष होय. सौर वर्ष तीनशेपासष्ट दिवसांचे असते.

संवत्सराचे बार्हस्पत्य व नाक्षत्र असे आणखी दोन प्रकार क्वचित सांगितले जातात. मानलेले आहेत. बार्हस्पत्य संवत्सरात तीनशेएकसष्ट दिवस असतात. नाक्षत्र संवत्सर तीनशेचोवीस दिवसांचे असते.

भारतीय पंचांगात शालिवाहन शकाबरोबर एक संवत्सर दिलेले असते. ते चक्र साठ वर्षांचे एक आहे. त्या साठ संवत्सरांची नावे अशी –

प्रभव, २. विभव, ३. शुक्ल, ४. प्रमोद, ५. प्रजापती, ६. अंगिरा, ७. श्रीमुख, ८. भाव, ९. युवा, १०, धाता, ११. ईश्वर, १२. बहुधान्य, १३. प्रमाथी, १४. विक्रम,१५. वृष, १६. चित्रभानू, १७. सभानू, १८. तारण, १९. पार्थिव, २०. व्यय, २१. सर्वजित्, २२. सर्वधारी, २३. विरोधी, २४. विकृती, २५. खर, २६. नंदन, २७. विजय, २८. जय, २९. मन्मथ, ३०. दुर्मुख, ३१. हेमलंब, ३२. विलंबी, ३३. विकारी, ३४. शर्वरी, ३५. प्लव, ३६. शुभकृत् , ३७. शोभन, ३८. क्रोधी, ३९. विश्वावसू, ४०. पराभव, ४१. प्लवंग, ४२. कीलक, ४३. सौम्य, ४४. साधारण, ४५. विरोधकृत, ४६. परिधावी, ४७. प्रमाधी, ४८. आनंद, ४९. राक्षस, ५०. अनल, ५१. पिंगल, ५२. कालयुक्त, ५३. सिद्धार्थी, ५४. रौद्र, ५५. दुर्मती, ५६. दुंदुभी, ५७. रुधिरोद्गारी, ५८. रक्ताक्ष, ५९. क्रोधन व ६० क्षय.

केळवण


मराठी घरात लग्न किंवा मुंज यांसारखे मंगल कार्य ठरले, की लगेच केळवणाची आमंत्रणे येण्यास सुरुवात होते. केळवण हा लग्न, मुंज यांसारख्या मंगलकार्यापूर्वी होणारा समारंभ आहे. त्यामध्ये वधू आणि वर यांच्या स्वतःच्या घरी स्वतंत्रपणे थाटाने मेजवानी करून नातेवाईकांना जेवायला घातले जाते. तसेच, नातलगही त्यांच्या त्यांच्या घरी वधूला किंवा वराला मेजवानी देतात आणि भोजनोत्तर घरचा अहेरही देतात. त्याला यजमानांनी केळवण केले असे म्हटले जाते. ते सहसा वधुवरांचे नातेवाईक व मित्रमंडळी यांजकडून होत असते. लग्नासाठी तयार (वॉर्मअप) करण्याचा हा प्रकार!

केळवण याचा एक अर्थ काळजी घेणे किंवा काळजीपूर्वक सांभाळणे असाही आहे. केळीच्या पिकाची काळजी घेऊन मशागत करावी लागते. नाहीतर केळीची रोपे सुकून जातात. त्यामुळे लग्न ठरलेल्या वधूची माहेरी जशी काळजी घेतली जाते तशीच सासरीही घेतली जावी हाही केळवण करण्यामागचा हेतू असावा.  

केळवणाला गडगनेर असेही म्हटले जाते. गडगनेरचा गडंगनेर किंवा गडंगणेर असे दोन्ही उच्चार आढळतात. गडू आणि नीर यांपासून गडगनेर हा शब्द बनला आहे. गडू म्हणजे पाण्याचा तांब्या आणि नीर म्हणजे पाणी. परंतु गडगनेर याचा शब्दशः अर्थ नुसता पाणी भरलेला तांब्या असा धरला जात नाही तर तो शब्द पाहुण्यांना देण्याची मेजवानी अशा अर्थाने येतो.

भैरव राजेंद्र शिंदे 13/02/2017

भैरव हा शैव परिवारातील देव आहे. त्याला शिवाचे एक रूप मानतात. भैरव महाराष्ट्रात सामान्यत: ग्रामदेवता म्हणून पूजला जातो. त्याला भैरोबा किंवा बहिरोबा असेही म्हणतात.

महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यात भैरोबा किंवा बहिरोबा देवाचे ठाणे असतेच असते. कधी त्याची मूर्ती असते, तर कधी तांदळा असतो. जी मूर्ती उभी असते, तिच्या उजव्या हातात डमरू आणि डाव्या हातात त्रिशूल असतो. भैरोबा देवाचे वाहन कुत्रा आहे.

महाराष्ट्रातील भैरवमूर्ती सामान्यत: नग्न असतात. त्यांच्या कंबरेला सापाचा कडदोरा असून, गळ्यात नरमुंडमाळा असते. चेहरा भयानक, नाकपुड्या रूंद आणि तोंडाच्या दोन्ही बाजूंना सोंडेसारखा पुढे आलेला भाग असतो.

भैरवांना चार, आठ, बारा किंवा त्याहून अधिकही हात असतात. त्या हातांतून विविध शस्त्रे असतात. डाव्या बाजूच्या खालच्या हातात नरमुंड असते व त्यातून रक्त ठिबकत असते. ते ठिबकणारे रक्त कुत्री चाटत असतात.

भैरवाचे ‘शैव आगम’ या ग्रंथात चौसष्ट प्रकार सांगितले आहेत. तो शिवभक्तांना प्रिय ग्रंथ आहे. आठ भैरवांचा एक असे आठ वर्ग होतात. त्यांचे प्रमुख अष्टभैरव या नावाने ओळखले जातात. त्याशिवाय कालभैरव, बटुकभैरव असेही भैरव प्रसिद्ध आहेत.

तंत्रग्रंथांत चौसष्ट भैरवांना चौसष्ट योगिनींचे स्वामी मानले गेलेले आहे. योगिनी म्हणजे शक्ती. म्हणून भैरव हा प्रत्येक शक्तिपीठाचे संरक्षण करत असतो असे म्हटले जाते.

गंमत अशी, की शाक्त पंथामध्ये शक्तिश्रेष्ठता असली तरी भैरवाला प्राधान्य दिले गेलेले आहे. भैरव शाक्त उपासनेचे महत्त्व देवीला समजावून देतात असे ‘कौलज्ञाननिर्णय’ या ग्रंथात दर्शवले आहे. शक्तीची पूजा भैरवाला वगळून केली तर ती निष्फळ ठरते असे ‘महापीठनिरूपण’ ग्रंथात म्हटले आहे.

भैरवाची मृत्यूला भिववणारा देव म्हणून पूजा पंजाबात होते.

कालभैरव आहे, तसाच बालभैरवही आहे. त्याच्या नावाने एखाद्या दगडाला शेंदूर फासलेला असतो. शेंदूर आणि तूप दिले, की बालभैरव संतुष्ट होतो! गावकरी पेरणी व कापणी करण्यापूर्वी भैरवाची पूजा करतात.

 

यम-नचिकेत संवाद

अज्ञात 12/08/2016

उपनिषदे म्हणजे उप+नि+सद्. त्याचा अर्थ – जवळ जाणे, बसणे, रहस्य उलगडणे. उपनिषदे ही वेदांचे अंग ‘वेदान्त’ म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रथम वेद, नंतर ब्राह्मणे, आरण्यके व शेवटी उपनिषदे असा क्रम आहे.

विश्वाच्या शक्तीचे रहस्य कळण्याकरता प्रथम ती शक्ती आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी त्या शक्तीजवळ गेले पाहिजे. प्राचीन काळी तपोनिष्ठ ऋषींनी त्यांच्या ज्ञानाने विश्वाच्या शक्तीजवळ जाण्याचा मार्ग शोधला. त्यांत त्यांना जे ज्ञान प्राप्त झाले ते त्यांनी सूत्रबद्ध केले. तीच ‘उपनिषदे’.

ईश केन प्रश्न मुण्ड माण्डूक्य तित्तिरी |
ऐतरेयं च छान्दोग्यं बृहदारण्यकं तथा ||

अशी दहा उपनिषदे आहेत. शिवाय आणखी उपप्रकारही आहेत.

कृष्ण यजुर्वेदाच्या ‘कठ’ किंवा ‘काठक’ शाखेचे उपनिषद हे ‘कठोपनिषद’ म्हणून ओळखले जाते. कठोपनिषदात दोन अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायात तीन भाग आहेत. त्यांना ‘वल्ली’ असे नाव आहे. अध्याय एक मध्ये तीन वल्ली आहेत. त्यात वल्ली एकमध्ये एकोणतीस श्लोक आहेत. तर दुसऱ्या वल्लीत पंचवीस श्लोक आहेत. तिसऱ्या वल्लीत सतरा श्लोक आहेत. अशा प्रकारे प्रथम अध्यायात तीनही वल्ली एकमध्ये पंधरा श्लोक आहेत, वल्ली दोनमध्ये पंधरा श्लोक आहेत, वल्ली तीनमध्ये अठरा श्लोक आहेत. संपूर्ण कठोपनिषदात दोन्ही अध्यायांत सर्व वल्ली मिळून एकशेएकोणीस श्लोक आहेत.
कठोपनिषदात प्रामुख्याने यम-नचिकेत संवाद आहे.

- (आदिमाता, जानेवारी २०१६ वरून उद्धृत)

अभ्यंगस्नान


अंगाला तेल, उटणे व अत्तर लावून उष्णोदकाने (गरम पाण्याने) स्नान करणे याला अभ्यंगस्नान करणे म्हणतात. त्याला मांगलिकस्नान असेही नाव आहे. ती चाल प्राचीन काळापासून भारतात आणि आणि इतरही देशांत आहे. आयुर्वेदात अभ्‍यंगाला महत्त्वाचे स्‍थान आहे. दिवाळीतील नरक चतुर्दशी दिवशी अभ्‍यंगस्‍नान करण्‍याची परंपरा आहे. दिवाळीच्‍या सुमारास भारतात थंडी सुरू होते. त्‍या काळात त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्‍यक ठरते. त्‍याकरता अभ्‍यंगस्‍नानाचा आणि त्‍यात वापरल्‍या जाणा-या उटण्‍याचा फायदा होतो.

पूर्वी घराघरातील स्त्रिया अभ्‍यंगस्‍नानाची तयारी करत असत. त्‍या शिकेकाई, रिठा, कडुनिंब यांसारख्या औषधी वनस्पती तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्‍या पाण्यात घालून ते पाणी चूलीवर किंवा बंबामध्‍ये उकळून घेत. ते पाणी केस धुण्यासाठी वापरले जात असे. अंघोळीपूर्वी स्त्रिया घरातील पुरुषांना आणि मुलांना तेलाने मालीश करत. ते तेल प्रामुख्याने जाईच्या सुवासिक फुलांचे असे. जाईचे फुल सात्विक मानले जाते. राधाकृष्णासाठी जाईजुईच्या फुलांची, तुळशीची आरास करायची असा उल्लेख लोककथा आणि गीतांमध्ये आहे. मालीश केल्‍यानंतर बेसन, हळद, चंदन, गुलाबपाणी यापासून तयार केलेले सुगंधी उटणे अंगाला लावले जाई. आजच्या काळात जसे स्क्रब वापरले जाते, तसे उटणे हे निसर्गातील वस्‍तूंपासून तयार केलेले स्‍क्रब म्‍हणता येईल. उटण्याच्या वापरामुळे मृत त्वचा नष्ट होऊन त्वचेची रंध्रे मोकळी होतात. त्वचा कोमल आणि सुगंधी होते. काही घरांत उटणे तयार करताना कापूर, साय आणि संत्र्याची सालही वापरली जाते. आता घराघरातून उटणे तयार करण्‍याची प्रथा फार कमी ठिकाणी पाळली जाते.

माळवद किरण क्षीरसागर 19/05/2015

महाराष्‍ट्रात माळवद या नावाने ओळखली जाणारी घरातील वातावरण नियंत्रीत ठेवण्‍याची पारंपरिक पद्धत होती. माळवद या शब्‍दाचा अर्थ घराचे छप्‍पर, गच्‍ची अथवा टेरेस असा विविधांगांनी समजून घेता येतो. वर्तमानात एकमजली घरांना छप्‍पर म्‍हणून सिमेंट-लोखंडाचे पत्रे वापरले जातात. पूर्वीच्‍या काळी घराला छपराच्‍या जागी मोठमोठे लाकडी ओंडके टाकले जात असत. त्‍यावर सागाच्‍या लाकडाच्‍या पट्ट्या लावल्‍या जात. लाकडाचे ओंडके आणि सागाच्‍या पट्ट्या यांची एकसंघ आणि अनेक स्‍तरांची रचना केली जाई. त्‍यानंतर त्‍यावर भरपूर पांढरी माती मोठा दाब देऊन टाकली जाई. या प्रकारच्‍या छपरांना माळवद असे म्‍हणत.

माळवद तयार करण्‍यामागे घरातील वातावरण नियंत्रीत राहावे हा उद्देश असे. माती आणि लाकूड, दोन्‍ही घटक उष्‍णतोरोधक असल्‍याकारणाने उष्‍णतेस अटकाव होई आणि माळवद असलेल्‍या घरातील वातावरण नियंत्रीत राही. त्‍यामुळे माळवदाखालील घरामध्‍ये वातावरण उन्‍हाळ्यात थंडगार तर हिवाळ्यात उबदार राहत असे.

माळवदाचा वरील भाग हा कमी खोलीच्‍या लहान हौदासारखा दिसत असे. घराच्‍या माथ्‍यावर चारी बाजूंनी फूट-दीड फूट उंचीच्‍या भिंती असत. त्‍यामध्‍ये पांढ-या मातीचा भरणा असे. लाकडी ओंडक्‍यांचे काही स्‍तर, त्‍यानंतर सागाच्‍या पट्ट्या आणि वर मातीचे आवरण याप्रकारचे तयार केलेल्‍या माळवदाची उंची काही फुटांची असे. त्यावरची मातीदेखील घट्ट असे. तसेच पांढरी माती पाणी धरून ठेवत नसल्‍यामुळे पावसाळ्यात माळवदातून पाणी खाली झिरपत नसे. माळवदावर साठलेले पाणी निघून जाण्‍याकरता पन्‍हाळी लावलेली असे. सध्‍याच्‍या काळात थंडाव्‍यासाठी फ्रीज आणि उबदार वातावरणासाठी हिटरचा वापर केला जातो. मात्र आपल्या पूर्वजांनी पारंपरिक ज्ञानातून विकसित केलेली माळवदासारखी उपयुक्‍त पद्धत बदलत्‍या जीवनशैलीच्‍या प्रवाहात लुप्‍त होण्‍याच्‍या मार्गावर आहे. पूर्वीच्‍या काळी महाराष्‍ट्रात पुणे, बीड, नाशिक, सोलापूर, उस्‍मानाबाद यांसारख्‍या जिल्‍ह्यांत घरांना माळवद असे. आजही या परिसरातील काही जुन्‍या घरांवर माळवद आढळतात. सध्‍या सर्वच प्रदेशातील घरांच्‍या रचना आधुनिकतेकडे झुकत असताना दिसतात. त्‍यामुळे माळवद असलेली घरेदेखील लवकरच दिसेनाशी होतील.

- किरण क्षीरसागर

संत श्रीकबीर जयंती

अज्ञात 11/06/2010

संत श्रीकबीर हे उत्तर भारतातील श्रेष्ठ साक्षात्कारी संत. संत कबीर श्रीरामाचे निस्सीम भक्त होते. त्यांना लौकीक शिक्षण नव्हते. मात्र त्यांनी व्यक्त केलेली त्यांची विचारधारा व त्यांनी रचलेले दोहे यांतून आध्यात्मिक व्यक्तींना अंतर्मुख करण्याची क्षमता आहे. त्यांनी रचलेले काही भक्तिविषयक दोहे :

प्रेम बिना जो भक्ति है, सो निज दंभ विचार | उदर भरन के कारन, जन्म गवाइये सार|| - प्रेमाशिवाय केलेली भक्ती ही भक्ती नसून दंभ आहे. केवळ बाह्य उपचाराने भक्ती केल्यास त्या प्रदर्शनाला स्वार्थ म्हणतात. तो उपजीविकेसाठी केला जातो. खर्‍या भक्तीशिवाय सगळे काही व्यर्थ आहे.

भक्ती बिना नहि निस्तरै, लाख करै जो कोय | शब्द सनेही है रहै, घरको पहुंचे सोय || - भक्तीशिवाय उद्धार होणे असंभव आहे. कोणी लाखो प्रयत्न केले तरी भक्तीशिवाय सारे व्यर्थ आहे. जे जीव सद्गुरुप्रेमी आहेत, सत्य ज्ञानाचे आचरण करणारे आहेत ते फक्त त्यांचे ध्येय प्राप्त करू शकतात.

भक्ति निसैनी मुक्ति की, संत चढे सब धाय | जिन जिन मन आलस किया, जनम जनम पछिताय || - मुक्तीचे मूळ साधन भक्ती आहे. म्हणून साधू जन आणि ज्ञानी पुरुष त्या मुक्तीरूपी साधनावर धावत चढतात. तात्पर्य हे आहे, की जे लोक भक्तिसाधना करतात, परंतु आळस करतात, त्यांना अनेक जन्म पश्चाताप करावा लागतो. कारण ती संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही.

भक्ती भेष बहू अंतरा, जैसे धरनी आकाश | भक्त लीन गुरु चरण में, भेष जगत की आश || - भक्ती आणि वेष यांमध्ये इतके अंतर आहे जितके अंतर धरती आणि आकाश यांमध्ये आहे. भक्त नेहमी गुरुसेवेत मग्न राहतो. त्याला इतर कशाचा विचार करण्यास वेळ मिळत नाही. परंतु जो वेषधारी आहे म्हणजे जो भक्ती करण्याचे सोंग करत आहे, तोच त्याचे जीवन सांसारिक सुखामध्ये फिरत असताना दुसर्‍याला फसवत स्वत: व्यर्थ घालवत आहे.

भक्ती दुलैही गुरू न की, नहिं कायरता का काम | सीस उतारे हाथ सो, ताहि मीलै निजधाम || - गुरुभक्ती करणे अती कठीण कार्य आहे; ते डरपोकांचे काम नाही. ते पुरुषार्थाचे असे कार्य आहे, की जेव्हा आपल्या हातांनी आपले मस्तक कापून श्रीगुरुचरणांवर समर्पित करू तेव्हाच मोक्ष प्राप्त होईल.