सुधीर रत्नपारखी - एक रिक्षा ते वीस बसेसचा ताफा!
सुधीर रत्नपारखी यांनी सोलापूरातील स्वतःच्या उद्योगाची सुरूवात एका रिक्षापासून केली. आज त्यांच्या दाराशी वीस बसचा ताफा उभा आहे. सोलापूरमध्ये 'स्कूल बस' ही कल्पना सर्वप्रथम राबवण्याचा मान त्यांच्याकडे जातो.
सुधीर रत्नपारखी यांचे मूळ गाव सोलापूर. त्यांचे कुटुंब नऊजणांचे. आई-वडील, दोन भाऊ (मोठा वसंत व लहान मिलिंद), बहीण चारुशीला, काका आणि आजी-आजोबा. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी एकट्या वडिलांवर. वडील नारायण हे ‘लक्ष्मी विष्णू’ मिलमध्ये कामाला होते, तर आई अंबुताई गृहिणी. त्या घरीच शिवणकाम करून मिळकतीत खारीचा वाटा उचलत.