ऐनापूर शिलालेखातील भाषाविशेष
कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापूर या गावी यादवकालीन शिलालेख आहे. तेथे शेतात काम सुरू असताना काही दगड, सतीची शिल्पे, गजलक्ष्मी शिल्प, गणेशमूर्ती आणि हा शिलालेख अशा गोष्टी मातीत गाडलेल्या अवस्थेत सापडल्या. शिलालेखावरील बरीच अक्षरे झिजलेली आहेत. शिलालेखाचे प्रथम वाचन डॉ. हरिहर ठोसर आणि अ.ब. करवीरकर यांनी केले. ते राजवाडे संशोधन मंडळ, धुळे येथून प्रकाशित होणाऱ्या ‘संशोधक’ या त्रैमासिकाच्या सप्टेंबर 1990 च्या अंकात प्रसिद्ध झाले होते. शिलालेखाच्या सतराव्या ओळीत काळाचा उल्लेख आलेला आहे, तर आठव्या ओळीत यादवराजा महादेवराय याचे नाव आलेले आहे. लेखात शके 1992 शुक्ल संवत्सर वैशाख अमावास्या असा काळाचा निर्देश आलेला आहे. ‘तथापी गत पंचांगानुसार काल आणि संवत्सर नामानुसार शिलालेखाचा काळ शके 1991 असा धरावा लागेल. तो इसवी सन 1269 असा येईल.’ (ठोसर, करवीरकर, 1990 : ३४) म्हणजे शिलालेख ज्ञानेश्वरीच्या अगोदर बारा वर्षांपूर्वी कोरला गेलेला आहे.