चंद्रपूरचा परकोट
चंद्रपुरात शहरासभोवती परकोट आहे. त्याचा पाया गोंड राजवंशातील दहावा परंतु चंद्रपूर येथे राज्य करणारा पहिला राजा खांडक्या बल्लाळशहा याने 1472 च्या सुमारास घातला व त्याची राजधानी बल्लारपूर येथून चंद्रपूरास हलवली. तेल ठाकूर नावाच्या वास्तुशिल्पकाराने परकोटाचा नकाशा तयार केला व साडेसात मैल परिघाची आखणी करून पायाभरणी केली. परकोटाचा पाया बारा फूट खोल आहे. खांडक्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हीरशहा याने बांधकाम सुरू केले. त्याने प्रथम परकोटाच्या चार वेशी उभारल्या. ‘हत्तीवर आरूढ असलेला सिंह’ हे शौर्याचे राजचिन्ह ठरवून, प्रत्येक वेशीवर बाजूस खोदवले. त्या शिल्पात सिंहाचे शरीरआकारमान हत्तीच्या दुप्पट दर्शवले गेले आहे! हीरशहाचा नातू कर्णशहा याच्या कारकिर्दीत तटाची उंची केवळ अर्ध्यावर बांधून झाली. कर्णशहाचा नातू धुंड्या रामशहा (1597 - 1622) याच्या कारकिर्दीत परकोटाचे काम पूर्ण झाले. त्यानिमित्त मोठे वास्तुपूजन होऊन दानधर्म झाला. याचा अर्थ खांडक्याच्या सहाव्या पिढीत ते काम पूर्ण झाले. सव्वा कोट रुपये खर्च झाला व कामास सव्वाशे वर्षांचा कालावधी लागला. तटाची उंची वीस फूट (सुमारे) असून परीघ साडेसात मैल आहे.