तांबवे गावची वज्रेश्वरी देवी
तांबवे हे नीरा नदीकाठी वसलेले तीन हजार लोकसंख्येचे गाव. गावाचा पाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे नीरा नदी व प्रमुख पीक म्हणजे ऊस! सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात अकलूजपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर ते गाव स्थित आहे. वज्रेश्वरी देवी हे त्या गावाचे ग्रामदैवत. सुमारे सात हेक्टरच्या निसर्गरम्य परिसरात हेमाडपंथी शैलीतील ते पुरातन दगडी मंदिर उभे आहे. त्या मंदिराचे वैशिष्ट असे, की ते वज्रेश्वरी देवीचे भारतातील दुसरे ज्ञात मंदिर आहे. वज्रेश्वरी देवीची मंदिरे देशभरात फक्त दोन ठिकाणी आढळतात. एक मुंबईजवळच्या वसई येथे तर दुसरे सोलापूरच्या तांबवे गावात.