हळदीचा सांस्कृतिक आणि औषधी प्रवास
हळदीची आणि भारतीय लोकांची ओळख आर्युवेदाच्या माध्यमातून पाच हजार वर्षांपूर्वीं झाली असली तरी तिचा स्वयंपाकघरातील वापर मात्र अडीच हजार वर्षांनंतर झाला. आता तर या वनस्पतीने स्वयंपाकघराचा पूर्ण ताबा घेतला आहे. दक्षिण भारतामध्ये वाण्याच्या दुकानात सामानाची यादी देताना प्रथम क्रमांकावर हळद असते. एवढ्या प्रमाणात हळद आपल्यात जीवनात रूळलेली आहे.
पूर्वी हळद केवळ जंगलात मिळत असे. दक्षिण पूर्व आशियाई देशात तिचे जास्त वास्तव्य आढळते. त्या काळात जंगलात आढळणारी हळद भारतात फक्त औषधांसाठीच वापरली जात असे. नंतर तिचा उपयोग रंगकामासाठी होऊ लागला आणि यानंतर मात्र तिने मसाल्याच्या डब्यात हळद पावडरच्या रुपाने उडी घेतली. हळदीची औषध, रंग आणि मसाल्याच्या पदार्थांतील वापरामुळे मागणी वाढली आणि शेतीक्षेत्रात तिचा प्रवेश झाला. पिवळ्या रंगामुळे हळद काश्मीरमध्ये मिळणाऱ्या केशरसाठी पर्याय ठरली. केशराची जशी शेती तशी हळदीची का नको? म्हणून भारतीय जंगलात आढळणारी हळद आणि श्रीलंकेच्या जंगलातील हळद यांचा संकर झाला आणि शेतीसाठी हळदीचे पहिले वाण तयार झाले.