टिक्केवाडीचे ग्रामदैवत – भुजाईदेवी
कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यात दक्षिणेकडे टिक्केवाडी हे गाव आहे. सह्याद्रीच्या दोन डोंगरांमध्ये वसलेल्या टिक्केडवाडीची लोकसंख्या दोन-अडीच हजारांची. टिक्केवाडी गावाचे ग्रामदैवत म्हणजे भुजाईदेवी.
भुजाईदेवी हे जागृत देवस्थान मानले जाते. देवीचे मंदिर टिक्केवाडी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर, डोंगराच्या पायथ्याशी दाट निसर्गाच्या छायेत वसलेले आहे. देवीचे मूळ नाव अष्टभुजाईदेवी. गावकरी तिचा उल्लेेख ‘भुजाईदेवी’ असा करतात. भुजाईदेवीची यात्रा फेब्रुवारी महिन्यातील पौर्णिमेच्या पहिल्या मंगळवारी भरते. टिक्केवाडीतून कराड, सातारा, सोलापूर, निपाणी, बेळगाव, गोवा, मुंबई इत्यादी ठिकाणी वास्तव्यास नोकरीस गेलेले लोक यात्रेला देवीच्या दर्शनाला येतात. जत्रेच्या कालावधीत गावात सासणकाठ्या, लेझीम, दांडपट्टा इत्यादी मर्दानी खेळ होतात. सासणकाठ्या खेळताना वेळूच्या काठीला देवीचा झेंडा लावून तो हलगीच्या तालावर गावात नाचवला जातो. तो झेंडा गावच्या एकोप्याचे प्रतीक मानले जाते.