तुळशीचे लग्न


तुळशीचे लग्न दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीस लावले जाते. त्या संबंधातील कथा पद्मपुराणा आहे. ती अशी, की जालंधर नावाचा महाप्रतापी व असाधारण योध्दा राक्षस होऊन गेला. त्याने आपल्या पराक्रमाने देवांना जिंकून वैभव प्राप्त केले आणि आपल्या भाईबंद दैत्यांस सुखी केले. त्याची वृंदा नावाची पत्नी महापतिव्रता होती. तिच्या पुण्याईमुळे जालंधर त्रिभुवनात अजिंक्य ठरला होता. त्याने इंद्रपुरीवर चाल करून इंद्राची खोड मोडण्यासाठी कडेकोट तयारी चालवली होती. पुढे, देव व दैत्य यांच्यांत युध्द होऊन अनेक देवांस गतायू व्हावे लागले. तेव्हा विष्णूने जालंधरास युद्धात हरवण्यासाठी कपटकारस्थान रचले. त्याने जालंधराची पत्नी वृंदा हिच्या जाज्वल्य पातिव्रत्यामुळेच जालंधरास सामर्थ्य प्राप्त झाले आहे हे जाणून, ते नष्ट करण्यासाठी युक्ती योजली.

विष्णूने दोन वानरांकडून जालंधर हा रणभूमीवर मारला गेला आहे अशी बतावणी करून, आपले शीर व धड तंतोतंत जालंधराप्रमाणे बनवून ते दोन अवयव वृंदेपुढे टाकले. तेव्हा वृंदा शोक करू लागली. इतक्यात, एका कपटी साधूने संजीवनी मंत्राने कपटवेषधारी जालंधरास म्हणजेच विष्णूस जिवंत केले! वृंदेने आपला पती जिवंत झालेला पाहून आनंदातिशयाने त्याला मिठी मारली. अशा प्रकारे, विष्णूने वृंदेसमवेत राहून तिचे पातिव्रत्य भंग केले. अज्ञानात का होईना पण वृंदेच्या पातिव्रत्यभंगामुळे जालंधर बलहीन होऊन लढाईत मारला गेला. काही काळानंतर, वृंदेस खरा प्रकार कळताच तिने क्रोधित होऊन विष्णूस शाप दिला, की त्याला पत्नीचा वियोग घडून दोन मर्कटांचे सहाय्य घेण्याची पाळी त्याच्यावर येईल. त्याप्रमाणे पुढे रामावतारी तसे घडले!