बूच : नावातच जरा गडबड आहे!
माझ्या गेटसमोर एका बाजूला प्राजक्त आणि दुस-या बाजुला बूच आहे. पावसाळयात दोघांचा मिळून गेटसमोर सडा पडतो. दोहोंचा सुगंध नाकात शिरताच शाळेपासून कॉलेजापर्यंतचे कोठलेही हळवे क्षण ताजे होऊन समोर उभे ठाकू शकतात.
फुलांचे शेकडो घोस बुचावर लटकलेले असतात. त्यांना उंची दागिन्यांचा फिल असतो. वा-याची झुळूक आली, की फुले हलकेच झोके घेऊ लागतात. त्यांची मिजास अशी, की जसे काही एखाद्या लावण्यवतीच्या कानातील झुमके. लोकांची भिस्त खाली पडणा-या फुलांवरच असते. ती अलगद खाली येतात आणि भूमातेच्या अंगावर झोपावे तशी सर्वत्र विखरून पसरून राहतात. ती इतर फुलांप्रमाणे कधीच तोंडावर पडत नाहीत. त्यांचे ते लवंडणे राजेशाही असते. त्यांच्या दांड्या एकमेकांत गुंफून गजरे केल्याच्या आठवणी घरोघरी सापडतात. पण, बुचाबद्दल एक खंत मला कायम वाटत आली आहे; ती नावासंबंधी आहे. एवढे स्वर्गीय देखणेपण आणि सडसडीत उंची लाभलेले फुलाचे दुसरे झाड नसेल. पण, त्याचे नाव फारच निरस आहे.