नदीची संस्कृती, प्रकृती आणि मानवाने केलेली तिची विकृती
मराठवाड्यातील बीड जिल्हा आणि त्या जिल्ह्यामधील गणेशी नदीकाठी वसलेले खडकी घाट हे माझे आजोळ. त्या नदीचा व माझा माझ्या जन्मापासून संबंध. आई म्हणत असे, की नदीवरून आणलेली पाण्याची घागर घरात ठेवली आणि तुझा जन्म झाला! ती त्या दिवसापासून माझी दुसरी आई झाली. मी आजोबांच्याबरोबर पहाटे नदीवर जात असे. पूजेसाठी स्वच्छ पाणी आणि पात्राच्या कडेस असलेली कण्हेरीची मुबलक फुले आणणे हा माझा प्रत्येक सुट्टीमधील दैनंदिन उपक्रम. नदीने दहावी इयत्ता पास होईपर्यंत मला खूप माया लावली. हिवाळा आणि उन्हाळा यांमधील संथ स्वच्छ वाहते पाणी, किनाऱ्याच्या दोन्ही बाजूंस नदीपात्रापेक्षाही मोठा रूपेरी वाळूचा किनारा, त्यास लागून घनदाट वृक्ष... पिंपळ, उंबर, आंबे तर मुबलकच होते! वाटीने वाळू बाजूला केली, की खाली स्वच्छ पाण्याचा झरा मिळत असे. पाण्याची घागर लहान वाटीने भरून देताना नदीने मला प्रत्येक थेंबाचे महत्त्व शिकवले. मी नदीची सोबत उच्च शिक्षणाच्या शिड्या चढत असताना प्रत्येक पायरीवर ठेवली होती. मला पुन्हा आजोळी जाता आले नाही, पण जेव्हा गेलो तेव्हा तो नदीचा भाग उजाड झाला होता! विलायती बाभळीचे मोठे वनच तेथे तयार झाले होते. माझे वड, पिंपळ, उंबर कोठेच दिसत नव्हते, वाळूचा कणही नव्हता. डोळ्यांत अश्रू जमा झाले. कोठे असेल माझी आई? कोणीतरी उत्तरले, येथे मोठे धरण होत आहे. गाव धरणाखाली गेले आहे. एका सुंदर नदीचे अस्तित्व इतक्या सहजासहजी पुसले जाऊ शकते?