एक झंझावती व्यक्तिमत्त्व - मेधा पाटकर
अन्यायाविरुध्द लढणारे अनेक, पण न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्याचा होम करणारे थोडे. अशांमध्ये मेधा पाटकर यांना अग्रक्रम द्यावा लागेल. आजच्या जमान्यात 'माणुसकी' नि 'सहानुभूती' हे शब्द पुस्तकातदेखील सापडणे महाग. अशा काळात हदयात अपार सहानुभूती घेऊन माणुसकीच्या मूल्यांसाठी संग्राम करणारी, आयुष्य केवळ एका ध्येयासाठी समर्पित केलेली ही एक महाराष्ट्रीय तेजस्वी स्त्री. स्त्री कसली वीजच ती जंगल-द-यांतून, नदी-नाल्यांतून, रात्री-अपरात्री, उपाशी-तापाशी, घरीदारी एकच ध्यास घेतलेली.
भ्रष्टाचार, स्वार्थी वृत्ती, बोकाळलेला वास्तुवाद आणि ढासळणारी जीवनमूल्ये यांमध्ये अंधारमय निराशा सर्वत्र पसरतअसताना, काही दैदीप्यमान माणसे हातात आशेचे दीप घेऊन आजही कार्यरत आहेत. अशाच एक मेधा पाटकर.
मेधा पाटकरांचा जन्म १ डिसेंबर १९५४ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे वडील वसंत खानोलकर हे स्वातंत्र्य चळवळीतले अग्रगण्य लढवय्ये सैनिक आणि अनुभवी, प्रसिध्द कामगार संघटक (ट्रेड युनिअनिस्ट). त्यांनी पुढे 'प्रजा समाजवादी पक्ष' कार्यरत केला. मेधाताईंच्या आई इंदू खानोलकर हे एक प्रसन्न व्यक्तिमत्व. त्या नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रत्येक प्रसंगात न चुकता येतात.
'मेधा पाटकर म्हणजे नर्मदा बचाव आंदोलन' असे समीकरणच आहे. शिवाय, त्या मुंबईत 'स्वाधार' नावाची महिलांची संघटनाही चालवतात.