देव दीपावली (देवदिवाळी)

अज्ञात 12/12/2015

‘मासांना मार्गशीर्षो ऽ हम्’ या वचनाने गीतेत मार्गशीर्ष महिन्याचा गौरव केलेला आहे. त्या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा मागेपुढे मृगशीर्ष नक्षत्र असते. केशव ही त्या महिन्याची अधिदेवता आहे. त्याच महिन्यात वद्यपक्षात धनुर्मासास सुरुवात होते. मकरसंक्रांतीपर्यंत रोज सूर्योदयाबरोबर देवाला आणि सूर्याला गूळपोळी, खिचडी, बाजरीची भाकरी-लोणी असा नैवेद्य दाखवतात व सर्वजण सकाळीच भोजन करतात.

मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाचा दिवस म्हणजे देवदिवाळी किंवा मोठी दिवाळी. मुख्यत: चित्तपावनांमध्ये कुलदैवत, ग्रामदैवत यांना भजण्याचा तो दिवस. चित्तपावनांमध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे-घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्यांची संख्या वेगळी असते. गावातील मुख्य देवता, इतर उपदेव-देवता महापुरुष, वेतोबा, ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात. त्याचबरोबर काही कुटुंबांत पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात. त्यामुळे नैवेद्याच्या पानांची संख्या सतरा, चोवीस, नऊ अशी कोणतीही असते.

त्याच दिवशी मल्हारी नवरात्रही सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात.

मणीसूर-मल्लासूर दैत्यांचा संहार करण्यापूर्वी श्रीशंकराने ‘मार्तंड भैरव’ अवतार धारण केला. त्या युद्धात विजयासाठी त्याच दिवशी सप्तर्षींनी एक प्रतिष्ठान स्थापले व त्यावर ते रोज एक माळा चढवत होते. सरतेशेवटी शंकराचा विजय झाला. म्हणून देवांनी मार्तंड भैरवावर भंडारा उधळला, त्‍यावर चंपा फुलांची वृष्टी केली तो दिवस शुद्ध षष्ठीचा होता. म्हणून चंपाषष्ठीला नवरात्र उठते अशी कथा त्यामागे सांगितली जाते.

भुलाबाईचा उत्सव - वैदर्भीय लोकसंस्कृती

अज्ञात 30/09/2015

विदर्भात साजरा होणारा भुलाबाईचा उत्सव हा नवीन आलेल्या धान्याच्या पूजनासाठी, स्वागतासाठी असतो. भुलाबाईचा सण विदर्भासह मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत व खानदेशातील जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर साजरा होतो.

विदर्भातील ग्रामीण भागांमध्ये कोजागिरी पौर्णिमा ही माळी पौर्णिमा म्हणून शेतकरी कुटुंबांमध्ये उत्साहात साजरी केली जाते. माळी पौर्णिमा हा नवीन धान्याच्या स्वागताचा सण भुलाबाईचा उत्सव म्हणून घराघरांतील लहान मुली व महिला सामूहिकपणे साजरा करतात. भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून कोजागरी पौर्णिमेपर्यंत सण साजरा होतो. भुलाबाई म्हणजे माहेरवाशीण. महिन्याभराकरता ती तिच्या माहेरी येते ही कल्पना. तिचा हा सण गृहिणी ही भुलाबाईसोबत भुलाबाई म्हणजे पार्वती आणि भुलोजी म्हणजे भोळा सांब महादेव श्री शंकर, लहानसा असलेला गणेश म्हणजे गणपती भुलाबाईचा उत्सव सखी पार्वती, शिवशंकर व गणपती यांचा म्हणून ओळखला जातो.

महिनाभर रोज संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी मुली एकमेकींच्या घरी जाऊन भुलाबाईची पारंपरिक लोकगीते म्हणतात. त्यानंतर भुलाबाईचा प्रसाद म्हणजेच खिरापत वाटली जाते. खिरापतीमध्ये रोज नवे प्रसाद असतात व ते बंद डब्यांतून आणले जातात. भुलाबाईंच्या पारंपरिक गाण्यानंतर सर्व मुलींमध्ये या डब्यांतील खिरापत ओळखण्याची स्पर्धा रंगते.

विठोबाचे नवरात्र


पुण्याच्या विठ्ठलवाडी येथील मंदिरातील छायाचित्रआषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी, माझी एक मैत्रीण माझ्याकडे आली होती. गप्पांच्या ओघात, ती मला म्हणाली, ‘आज आषाढ शुध्द नवमी. माझ्या आईकडचे विठोबाचे नवरात्र उठले असेल!’

‘विठोबाचे नवरात्र?’ असे मी आश्चर्याने विचारले. मी विठोबाचे नवरात्र हा विधी प्रथमच ऐकत होते. नवरात्र देवीचे, रामाचे, चंपाषष्ठीचे, बालाजीचे, शाकम्बरीचे, नरसिंहाचे वगैरे माहीत आहेत. त्यामुळेच विठोबाच्या नवरात्राचे नवल वाटले.

मैत्रीण मूळची उस्मानाबाद जिल्ह्यातील धारूरची. तिचे माहेरचे आडनाव देशपांडे. पण त्यांना धारूरचे म्हणून धारूरकर-देशपांडे असे म्हणतात. सर्व धारूरकर-देशपांड्यांचे मूळ आडनाव ‘निरंतर’ असे आहे. त्या सर्वांचे धारूर येथे कसब्‍यावर वास्‍तव्‍य होते. त्‍यांना वतनदारी मिळाली होती, म्‍हणून त्‍यांचे नाव देशपांडे असे झाले. वतन आसपासच्‍या दहा-पंधरा गावांचे होते. काहींना इनामी जमीन/शेतीही मिळाली. वतने महात्‍मा गांधींच्‍या हत्‍येच्‍या वेळेस खालसा झाली. पण त्‍यांना मिळालेली जमीन/शेती त्‍यांच्‍याकडे तशीच राहिली. काही लोक शेती करत आहेत. परंतु काहींनी आपली शेती विकून शहराकडे प्रयाण केले आहे.

वतने खालसा झाल्‍यानंतर काही धारूरकर- देशपांड्यांनी आपले मूळचे निरंतर हे आडनाव लावण्‍यास सुरूवात केली. काहीजण वतने मिळाल्‍यानंतरही निरंतर हेच आडनाव लावत होते. काहीजण वतने खालसा झाल्‍यानंतरही ‘धारूरकर-देशपांडे’ असेच आडनाव लावत आहेत. पुण्‍यात वास्‍तव्‍यास असणा-या वेदमूर्ती अंबादास निरंतर यांना भेटल्‍यानंतर मला ही माहिती मिळाली.

वेदमूर्ती अंबादास निरंतर हे मूळचे धारूरचे. त्‍यांचे वास्‍तव्‍य पुण्‍यात बिबवेवाडी येथे गेल्‍या वीस वर्षांपासून आहे. त्‍यांनी असे सांगितले, की ‘श्री विठ्ठल सहस्रनाम’ स्‍तोत्र हे अत्‍यंत दुर्मीळ व खूपच कमी लोकांना माहीत असणारे स्‍तोत्र त्‍यांच्‍यापाशी आहे.